June 20, 2024
A novel about the life of the laborers in Mandesh
Home » सवळा : माणदेशातील श्रमिकांचं जिणं मांडणारी कादंबरी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सवळा : माणदेशातील श्रमिकांचं जिणं मांडणारी कादंबरी

विठ्ठल खिलारीला योगायोगानेच तसा मी खूप वर्षांपासून ओळखतो. पंढरपूरच्या कार्तिक वारीचा बहुतांश प्रवास माणदेशातून, वारीतील चवथ्या दिवशी मायणीवरून येणाऱ्या वारीचा मुक्काम असतो शेनवडीत. तिथेच गावापासून दूर कोणत्या वस्तीवर राहणारा विठ्ठल संध्याकाळी चहाच्या टपरीवर मला भेटलेला. बहुतेक राजन गवस यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठात एम. ए. करीत असावा तेव्हा. नंतर घरीही आला होता एकदा. कष्टाळू, गरीब, नम्र अशी एक प्रतिमा माझ्यासमोर आहे त्याची. कराडच्या सह्याद्री साखर कारखान्यावर त्याच्या कुटुंबातील माणसं ऊसतोडणीला यायची.

जातीच्या उतरंडीत विठ्ठल ज्या जातीचे प्रतिनिधित्व करतो त्या “खिलारी’ जातीचे स्थान जनरल कॅटेगरीत वा मागास जनजातीत होत नाही. कादंबरीत विठ्ठल सांगतो, पूर्वी दगडी तोडीच्या अवाढव्य बांधकामात लागणारा चुना बनवण्याचे काम हा समुदाय करायचा. कित्येक वर्ष अशा बांधकामाच्या इमारती, बुरूज आणि वाडे टिकायचे. सिमेंटच्या वापरामुळे आज हा धंदा नामशेष झाला आहे. त्यावर उदरनिर्वाह करणारा समाज देशोधडीला लागला आहे. शेती करावी तर वडिलोपार्जित पुरेशी जमीन नाही. सगळा अवर्षणाचा प्रदेश, चारपाच वर्षात नेहमीचा दुष्काळ म्हणून गावी कामं नाही.

आपल्या जातीविषयी बोलताना विठ्ठल सांगतो, ‘गावातली मराठ्याची माणसं जशी दुकानाला असायची तशी लोणाऱ्याची माणसं ऊसाला असायची. उचल घेणारा एकादं दुसराच. तो पैसे चांगल्या कामाला लावायचा. नायतर सगळी पेण्यावं, पत्याच्या डावावं घालावायचं. त्यांच्या बायकां पोरांचं लय हाल हुयाचं. नवरा बायकोची तर रूजचीच भांडणं. देवाची देवपुजा चुकल पण त्यांच्यातली भांडणं चुकायची नाहीती.’ असा हा सगळा व्यसनाधिन अशिक्षित कर्जबाजारी समाज. शहराच्या झोपडपट्टीतील असंघटित कामगारांच्या सारखेच एकूण त्यांचे जगणे. हे आहे विठ्ठल खिलारीच्या ‘सवळा’ या कादंबरीचे प्रमुख आशयसूत्र.

आनंद विंगकर यांचे दस्तावेज हे पुस्तक amazon वर खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://amzn.to/4asgQyM

या आत्मकथनात्मक कादंबरीची सुरुवात नायक महंकाळ याच्या जन्मापासून होते. दवाखान्याशिवाय घरीच बाळंत होणाऱ्या स्त्रियांचे शब्दांत न सांगता येणारे हाल इथे येतात. कादंबरीभर ‘कळाय लागल्यापासून बायच्या जन्माला दुःख, कष्ट आणि यातना जशा की पाचवीला पुजलेल्या’ मूल सातआठ महिन्याचे झाले नाही तोच ओल्या बाळंतीण स्त्रियांना उन्हं, वारे, पाऊस अशा वातावरणात तेही परत आडरानाला, कधी गावंदरीला उघड्यावर ऊसतोडणीला जावे लागते. नवऱ्याने आधीच उचल घेतलेले कर्ज फेडण्यासाठी फटकरीला जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. तिथे पहाटेपासून उशीरा रात्रीपर्यंतचे ढोर कष्ट, जेवणाची, राहण्याची आबाळ, उघड्यावर राहिल्याने लहान बाळांचे सततचे आजार, दिवसभर फडात काम करताना बाळांना संभाळण्यासाठी अकाली अर्ध्यावर शाळा सोडून मुलगा मुलगी आणलेली असते. त्यांच्या लहानपणीच शिक्षणाअभावी अवघं आयुष्य कुरतडून गेलेलं असतं. कधी अशी लहान लेकरं संभाळायला स्वतःलाच सावरणं जड जाते, असे वय उतरणीला लागलेला एकादा म्हातारा अथवा म्हातारी असते.

रानात तब्येतीला मानवत नाही म्हणून मध्येच मूल घेऊन आपल्या गावी जाण्याचा त्याचे तऱ्हेवाईक स्वभाव. यातून अकाली दुध तोडलेल्या बाईचे मरणांकित हाल. अज्ञानी रूढीबाज नवऱ्यांचा बेफिकिरपणा. कधी पायात ऊसाचा सड किंवा हाताला कोयता लागूनचे जन्मभरासाठीचे जायबंदीपण नशीबाला येते. विवाहित स्त्रीपुरुषांचे अनैतिक संबंध, त्यातून येणारी रोजची भांडणं, कुटंबाची उध्वस्तता, मध्येच गावी जीवलग नातलगाचा मृत्यू त्याला मरण्याआधी भेटता आले नाही याचे दुःख, अचानक वाढलेला कर्जाचा डोंगर. दीर्घ दुखणाईत आजार खर्चिक दवाखाना. दर पंधरा तीन आठवड्यानंतरच स्थलांतर, सवयीने लळा लागलेल्या ठिकाणावरूनचे विस्थापन त्यातूनची मानसिक घालमेल निर्माण झालेल्या ओळखी विसरत तोड संपली की, परत मुकादम सांगेल त्या गावाला सगळं गबाळं उचलून निघून जाणं.

विठ्ठल खिलारीच्या संवेदनशील नजरेनं हे सारं निर्विकार मनाने टिपलेलं आहे. या कादंबरीचा एक मोठा आवकाश ऊसतोडणीला निघून गेलेल्या आईवडिलांनी आपल्या नशिबाला लागलेलं न सुटणारे चक्र मुलांच्या आयुष्याला लागू नये म्हणून शिक्षणासाठी गावातीलच जवळच्या शेजाऱ्यापाशी शाळेसाठी ठेवलेल्या लहान मुलांचे भावविश्व रेखाटण्यात खर्ची पडलेला आहे. यात मूल ठेवलेल्या शेजाऱ्यांकडून फुकट मिळालेल्या आश्रित मुलांचे शोषण अधिक प्रत्ययकारी शब्दांत वर्णन केले आहे. रोज शाळेला जाणं बाजूलाच रहाते केवळ अन्नासाठी मिळालेल्या या हंगामी मालकाच्या घरची सगळी कामं त्यांना निमुटपणे करावी लागत असतात. थंडीच्या दिवसात भल्या पहाटे उठणे, दुरून घरासाठी पाणी भरणे, गुरांचा गोठा साफ करणे, वैरणीची ओझी वहाणे अशी एकदोन नाही असंख्य कामे त्यांना करावी लागतात. दुखले खुपले काय तर सांगण्यासाठी जवळ आयबाप नसतात. आईवडील असूनही पोरक्या निराधार पोरांचे जगणे खूपच करुण आणि केवीलवाणं, बालपणातील विट्ठल खिलारींचे जगणंच यातून उलगडत जातं.

ऊसतोड कामगार संघटनांनी आश्रमशाळांची सातत्याने मागणी करून सुद्धा पुरेशा आश्रमशाळा निर्माण होत नाहीत. अर्धवट शाळा सोडलेल्या नेटाक मुलांच्या हातात विनासायास कोयता येत आहे. जत तालुका सोडला तर ऊसतोडणीला अलिकडे माणदेशातून सर्रास माणसं जात नाहीत. बहुतांश आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या उपेक्षित, धनगर, मातंग, बौद्ध, व्हलार, मुस्लीम, रामोशी अगदीच किरकोळ गरीब मराठा आणि खिलारी समाजातील कष्टकरी स्त्रीपुरुष अशा या हंगामी कामगारांचा भरणा जास्त असतो.

ही कादंबरी जशी परक्या मुलकात फडावर होणारी जगण्याची परवड लेखक कोणत्याही अभिनवेशाशिवाय मांडतो. तेवढ्या निराकार मनाने गावी शिक्षणासाठी म्हणून परक्याच्या घरी ठेवलेल्या मुलाच्या आश्रित कष्टमय जीवनाचे वर्णन करतो. सोबतच वंचित खालच्या असंघटित जातींचे दैनंदिन जगणं टिपत असतानाच माणदेशातील बेकारी, वर्षातील आठ महिन्यांची पाणी टंचाई, तिथल्या एकूण सामूहिक जीवनाच्या वाट्याला आलेले सततचे छावणीसादृष्य आयुष्य याचेही चित्रण करते.

आनंद विंगकर,
कवी, कादंबरीकार anandwingkar533@gmail.com

पुस्तकाचे नाव : सवळा
लेखक : विठ्ठल आप्पा खिलारी
प्रकाशकः दर्या प्रकाशन, पुणे
किंमतः २५० रुपये
पुस्तकासाठी संपर्क – 99753 56048

Related posts

श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर समाधी स्थान…

बालवयात मोबाईल वापरण्याचे धोके गंभीर !

शेतकऱ्यांचे प्रश्न नवं तंत्रज्ञान आणि वास्तववादी साहित्य सोडवू शकते – कवी प्रकाश होळकर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406