विचार शून्य व्हायला हवेत म्हणजे विचार थांबायला हवेत. त्यामध्ये स्थिरता यायला हवी. मन स्थिर व्हायला हवे. विचार शून्य कसे होतात ? विचार कसे थांबतात ? खरे तर विचार हे येतच राहतात. त्यांना थांबवणे अशक्य असते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
नभाचे शून्यत्व गिळून । गुणत्रयातें नुरवून ।
ते शून्यतें महाशून्य । श्रुतिवचन संमत ।।९२५।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा
ओवीचा अर्थ – आकाशाचें शून्यत्व गिळून, सत्यादि तिन्ही गुणांचा नाश करून जें शून्य असते, तेच महाशून्य होय, अशाबद्दल वेदवचन प्रमाण आहे.
गणितात शून्याला महत्त्व आहे. आलेखात शून्य हा केंद्रस्थानी असतो. शून्यापासूनच चढत्या किंवा उतरत्या क्रमांकाची सुरवात होते. शून्य समही नाही, विषमही नाही. जीवनात चढउतार असतात, पण स्थिरतेला महत्त्व आहे. शून्य अवस्थेला अध्यात्मात खूप महत्त्व आहे. विचार शून्य व्हायला हवेत. सध्याच्या युगात हे कसे शक्य आहे? विचार शून्य व्हायला हवेत म्हणजे विचार थांबायला हवेत. त्यामध्ये स्थिरता यायला हवी. मन स्थिर व्हायला हवे.
विचार शून्य कसे होतात ? विचार कसे थांबतात ? खरे तर विचार हे येतच राहतात. त्यांना थांबवणे अशक्य असते. आज यावर विजय मिळवला तर उद्या काय त्याच्याकडून पराभूत झालो. यातून सुख-दुःखे उत्पन्न होत असतात. विजयाने आनंद तर पराभवाने दुःख होते, पण विजय मिळाला म्हणून हुरळून जायचे नाही व दुःखाने खचून जायचे नाही. यासाठी मन उदास व्हायला हवे.
मी कोण आहे ? हे जाणणे हाच खरा विजय आहे. आत्मज्ञान प्राप्ती हेच ध्येय असावे. त्यानंतर सर्व आनंदी आनंद आहे. दुःख नाहीच. मनाला या खऱ्या आनंदाची ओढ लावायला हवी. आपल्याकडे अमाप गोष्ट असते तेव्हाच आपण त्यातील थोडी दुसऱ्याला वाटू शकतो. आपल्याकडे अमाप आनंद असेल तरच आपण दुसऱ्याला आनंदी करू शकू. आत्मज्ञानी व्यक्तीकडे आनंद ओसंडून वाहत असतो. त्याच्या ज्ञानातून वाहणाऱ्या या आनंदात डुंबायला शिकायला हवे. मनाला या आनंदाची गोडी लागली की आपोआप स्थिरता येते. विचार शून्य होतात.
शून्याची बेरीज व वजाबाकी शून्यच येते. शून्याला भागच नाहीत त्यामुळे त्याचा भागाकार होत नाही आणि गुणाकार केला तर उत्तर शून्यच येते. विचारांचा गुणाकार केला तर विचार पटीत वाढतात, पण विचाराला शून्याने गुणले तर विचार शून्यच होईल. शून्याची ही अवस्था जाणून घ्यायला हवी. त्याची व्यापकता जाणून घ्यायला हवी. आकाशाची पोकळी किती मोठी आहे ! अनंत विस्तार असणाऱ्या या आकाशाचे मोजमाप अद्याप कोणालाही करता आले नाही. कारण ते एक शून्य आहे. शून्याचे मोजमापच होत नाही. शून्याचे मोजमाप शून्यच आहे. हे महाशुन्य जाणून घ्यायला हवे. मग विचार आपोआपच शून्य होतील.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.