अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ शरद गडाख यांची नियुक्ती
राहूरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील सशोधन संचालक डॉ शरद रामराव गडाख यांची अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ गडाख यांची नियुक्ती जाहीर केली. डॉ गडाख यांची नियुक्ती पाच वर्षांकरिता किंवा ते वयाची ६५ वर्ष पुर्ण करेपर्यंत, यापैकी जे अगोदर येईल, त्या दिवसापर्यंत करण्यात आली आहे.
डॉ शरद गडाख (जन्म २९ नोव्हें १९६१) यांनी राहूरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातून वनस्पती शरीर विज्ञान विषयात पीएच.डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन, प्रशासन व विस्तार कार्याचा व्यापक अनुभव आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास भाले यांचा कार्यकाळ ४ सप्टेंबर २०२२ रोजी संपल्यानंतर कुलगुरुपद रिक्त झाले होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ दिलीप मालखेडे यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी प्रो एस अय्यप्पन, माजी महासंचालक, भारतीय कृषि संशोधन परिषद यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. डॉ ए के सिंह, संचालक, भारतीय कृषि संशोधन संस्था व एकनाथ डवळे, सचिव, कृषि विभाग हे समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ गडाख यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.