September 16, 2024
control measure on Lampe Skin Virus
Home » लम्पी स्किन आजार: प्रसार व नियंत्रण
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

लम्पी स्किन आजार: प्रसार व नियंत्रण

लम्पी स्किन आजार हा जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. संकरित जनावरे आणि वासरांमध्ये अधिक तीव्र स्वरुपात हा आजार दिसून येत आहे. या विषाणूजन्य आजारावर प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा एक प्रभावी उपाय आहे. या आजाराची लक्षणे काय आहेत ? या आजाराचा प्रसार कसा होतो ? यावर नियंत्रण कसे मिळवायचे याबाबत माहिती सांगणारा हा लेख…

डॉ. सुधाकर आवंडकर
सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, पशुवैद्यक महाविद्यालय, उदगीर
मो.क्र. ९५०३३९७९२९
  • लम्पी स्कीन हा गोवर्गीय आणि म्हैसवर्गीय जनावरांना जडणारा देवीसदृष विषाणूजन्य आजार आहे.
  • या आजारात गुरांची त्वचा आणि इतर भागांवर गाठी येतात.
  • कॅप्रीपॉक्स या देवी वर्गीय विषाणूमुळे हा आजार होतो.
  • हा विषाणू अत्यंत स्थिर असून सामान्य वातावरणात जखमेवरील वाळलेल्या खपलीमध्ये फार दिवस तसेच ५५ ०से. तापमानावर दोन तास आणि ५५ ०से. वर अर्धा तास सक्रीय राहू शकतो. बाधित चामडीमध्ये ३३ आणि कोरड्या चामडीमध्ये १८ दिवसांपेक्षा जास्त काळ सक्रीय राहतो. अधिक आम्ल किंवा अल्क धर्मी सामू, २% फिनोल, २% सोडीअम हायपोक्लोराईट, १:३३ आयोडीन, ०.५% क्वाटरनरी अमोनिअम पदार्थामध्ये १५ मिनिटात निष्क्रिय होतो. सूर्यप्रकाशात हा विषाणू निष्क्रिय होतो. मात्र ढगाळ वातावरणात, अंधाऱ्या ठिकाणी आणि बाधित गोठ्यात काही महिनेपर्यंत सक्रीय राहतो.
  • हा आजार दमट आणि उष्ण वातावरणात जास्त प्रमाणात दिसून येतो.
  • भारतात या आजाराची लागण सन २०१९ पासून दिसून येत आहे. मात्र तो आजवर जवळपास सर्व भारतभर पसरलेला दिसून येतो. 
  • बाधित गुरांमध्ये प्रसंगी मृत्यू सुद्धा होऊ शकतो. यादरम्यान जीवाणू संसर्ग झाल्यास आजाराची तिव्रता वाढते.
  • या आजाराची लागण साधारणत: १० ते २०% गुरांना होऊ शकते. बाधित गुरांमध्ये १ ते ५% मरतुक दिसून येते. संकरीत गुरे आणि वासरांमध्ये आजाराची तीव्रता आणि मृत्युदर अधिक असतो. तुलनेने देशी गुरांमध्ये या आजाराची तीव्रता आणि मृत्युदर कमी असल्याचे दिसून आले आहे.
  • या आजारात गुरांची प्रकृती ढासळते. गायींच्या दूध उत्पादनात भरपूर प्रमाणात घट होते. गुरांच्या प्रजननात अडथडे येतात. त्वचेवर गाठी येत असल्याने चामडी खराब होते. पशुपालक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. हा आजार पशुपालकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून त्याचा प्रसार थांबविणे आवश्यक झाले आहे.
  • या आजाराची लागण दिसून आल्यास जवळच्या पशुवैद्यकीय अधिकार्‍यास सुचना द्यावी.
  • आजारी तसेच त्याच्या संपर्कातील जनावरांचे रक्त, रक्तजल आणि गाठीवरील खपली रोगनिदानासाठी पाठवावी.
  • पक्या रोगनिदानाची सोय राष्ट्रीय पशुरोग निदान प्रयोगशाळा, भोपाळ या ठिकाणी उपलब्ध आहे. ही सेवा पशुसंवर्धन खात्यामार्फत निशुल्क उपलब्ध करून दिल्या जाते.

रोगप्रसार

  • लम्पी स्कीन आजाराचा प्रसार बाधीत गोवर्गीय किंवा म्हैसवर्गीय जनावरांच्या कायदेशीर किंवा बेकायदेशीर वाहतुकीमुळे होण्याची शक्यता असते.
  • वाहतुकीमुळे या आजारास कारणीभूत विषाणू लांब अंतरापर्यंत संक्रमित होवू शकतो.
  • या आजाराचे विषाणू बाधीत जनावरांच्या रक्तात किमान पाच दिवस ते दोन आठवडे पर्यंत राहतात. अशा जनावरांचे रक्त शोषण करणारे किटक रोगप्रसाराचे कार्य करतात.
  • जनावरांना चावणार्‍या किटकांमुळे बाधीत गोठ्यापासून किमान ५० किमी परिघातील परिसरात या आजाराचा प्रसार होण्याची शक्यता असते.
  • एडीस प्रजातीच्या किटका व्यतिरिक्त स्टोमॉक्सीस माशा आणि रिफिसेफॅलस गोचिडिव्दारे या आजाराचा प्रसार होत असल्याचे दिसून आले आहे.
  • बाधीत मृत जनावर उघड्यावर टाकल्यास त्याच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या जनावरांना हा आजार जडण्याची शक्यता असते.
  • लक्षणे दाखवित असलेल्या जनावरांच्या त्वचा, अश्रृ, लाळ आणि शेबुडावाटे १८ ते २० दिवसांपर्यंत विषाणूचे उत्सर्जन होते.
  • विषाणूने प्रदुषित शारीरिक स्रावाचा प्रादुर्भाव वैरण आणि पाण्यात झाल्यास त्यावाटे रोगप्रसार होवू शकतो.
  • त्वचेवरील फोड सुकल्यानंतर निघत असलेल्या खपल्यांमध्ये हा विषाणू अधिक काळापर्यंत सक्रिय राहतो.
  • बाधीत जनावरांचा गोठा आणि प्रक्षेत्राच्या वातावरणात हे विषाणू दिर्घकाळ टिकाव धरतात आणि निरोगी जनावरांना बाधीत करतात.
  • बाधीत वळूच्या वीर्यात विषाणू उत्सर्जीत होतात. त्यामुळे विषाणू प्रदुषित विर्यातून रोगप्रसार होण्याची शक्यता असते.
  • बाधीत जनावराच्या दुधात सुद्धा विषाणू उत्सर्जन होते. दुधावाटे वासरांत रोगप्रसार होतो.
  • माणसात या रोगाची लागण होत नाही. तरी दूध उकळून प्यावे.
  • बाधित पशुच्या दूध, लाळ, नाक-डोळ्यातील स्त्राव आणि विर्यात विषाणू ४२ दिवसांपर्यंत उत्सर्जित होतात.

आजाराची लक्षणे

  • संक्रमण झाल्यानंतर विषाणू साधारणतः दोन आठवड्यापर्यंत रक्तामध्ये वास्तव्य करतात. त्यानंतर ते शरीराच्या इतर भागात संक्रमित होतात. शरीराच्या विविध भागात विषाणू संसर्गाने वेदनादायी दाह निर्माण होतो. गुरे अत्यवस्थ होतात.
  • विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर बाधीत जनावरे साधरणतः एक ते पाच आठवड्या नंतर लशणे दाखविण्यास सुरुवात करतात.

लक्षणांचा क्रम साधारणतः असा असतो…

  • सर्वप्रथम डोळ्यातून अश्रृ आणि नाकातून शेंबूड वाहण्यास सुरुवात होते. डोळ्यांवर चिपाड येतात.
  • खांदा आणि मांडीतील लसिका ग्रंथी सुजतात.
  • ४०.५ अंश सें पेक्षा जास्त ताप येतो.
  • ताप एक आठवड्यापर्यंत राहू शकतो.
  • दूध उत्पादन अचानक कमी होते.
  • ताप आल्यानंतर ४८ तासांत त्वचेवर १० ते ५० मिलीमीटर परिघाच्या गाठी येतात.
  • या गाठी एकट्या, गोलसर, फुगीर, टणक आणि वेदनादायी असतात. अशाच गाठी पचनसंस्था, श्वसनसंस्था आणि प्रजननसंस्थेच्या विविध अवयवात दिसतात. त्यात पु सारखे द्रव्य साठते.
  • कालांतराने गाठी लहान आणि कमी होत जातात. त्या ठिकाणी व्रण तयार होतात. व्रणाच्या सभोवताली खपल्या तयार होतात.
  • तोंड आणि नाकाच्या श्लेष्म त्वचेवर व्रण दिसतात. पु मिश्रित शेंबुड दिसून येतो. लाळ जास्त प्रमाणात गळते.
  • क्वचित डोळ्यांमध्ये सुद्धा व्रण तयार होतात. त्यामुळे जनावर आंधळे बनू शकते.
  • बाधीत जनावरांत फुफ्फुसाचा दाह, कासेचा दाह आणि पायावर सूज दिसून येते.
  • गुरे क्षीण होतात, लंगडतात, वैरण कमी खातात, रवंथ करण्याचे प्रमाण कमी होते.
  • वळू काही काळ किंवा नेहमीसाठी नपुंसक बनू शकतो. गाभण गुरांत गर्भपात होतो. बाधित गायी कित्येक महिने फळत नाहीत.
  • बाधित जनावरे दोन ते तीन आठवड्यात बरी होतात. मात्र बरी झालेली जनावरे पुढील ४० ते ४५ दिवसपर्यंत विविध स्त्रावांत विषाणू उत्सर्जन सुरूच ठेवतात.

रोग निदानासाठी नमुने

  • साधारणतः लक्षणांवरून या आजाराचे निदान करता येते. परंतु ‘लम्पी स्कीन डिसीज’, हर्पिस विषाणूमुळे होणाऱ्या ‘प्सुडो लम्पी स्कीन डिसीज’, देवी आणि त्वचेचा क्षय या आजारात गुरे सारखीच लक्षणे दाखवितात.
  • अचूक रोग निदानासाठी विविध नमुने प्रयोगशाळेत तपासून घेणे संयुक्तिक ठरते.
  • त्यासाठी त्वचेच्या व्रणाच्या खपल्या, रक्त, रक्तजल, नाकातील स्त्राव आणि लाळ हे नमुने गोळा केले जाते.
  • नमुने गोळा करीत असतांना एका गावातून कमीत कमी चार नमुने घ्यावेत.
  • निर्जंतुक व्हेक्यूटेनर मध्ये ५ मी.ली. रक्त आणि २ मी.ली. रक्त जल गोळा करावेत. २ मी.ली. वीर्य, त्वचा नमुने, खपल्या, नाकातील स्त्राव आणि लाळ ५ मी.ली. व्ही.टी.एम. द्रावणात गोळा करावेत.
  • आजारी प्राण्यांसोबातच त्यांच्या संपर्कातील निरोगी प्राण्यांचे सुद्धा नमुने घ्यावेत.
  • नमुने गोळा केल्यानंतर बर्फावर ठेऊन प्रयोगशाळेत पाठवावेत.
  • प्रयोगशाळेत पाठविण्यास वेळ लागत असल्यास नमुने – ८०० सेल्सिअस तापमानात साठवून ठेवावे लागतात.
  • नमुन्यांना नियमानुसार लेबल लावावे. लेबल वर जनावराची संपूर्ण माहिती, पत्ता, संपर्क क्रमांक, लक्षणे, लसीकरण, औषधोपचार इत्यादी माहिती असावी. नमुने स्क्रू झाकण असलेल्या असलेल्या डब्यात ठेऊन त्याभोवती दोन अधिकचे आवरण घालून (ट्रिपल लेअर) पाठवावे.

नियंत्रण आणि प्रतिबंध

  • या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा एकमात्र प्रभावी उपाय आहे.
  • सर्व गो वर्गीय आणि म्हैस वर्गीय प्राण्यांचे दरवर्षी नियमित लसीकरण करावे.
  • सध्या आपल्या देशात या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शेळ्यांच्या देवीची लस वापरली जाते.
  • सामान्यतः लसीची मात्रा प्रती जनावर १०३ टी.सी.आय.डी.५० असावी. मात्र उद्रेक तीव्र असल्यास प्रती जनावर १०३.५ टी.सी.आय.डी.५० एवढी मात्रा द्यावी.
  • आजाराच्या उद्रेका दरम्यान जनावरांची वाहतूक करू नये. तसेच खरेदी – विक्री सुद्धा करू नये.
  • बाधीत जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळे करावे. त्यांचा उपचार त्याच ठिकाणी करावा.
  • बाधीत जनावरांना चरण्यासाठी सोडू नये.
  • बाधीत कळपाला इतर कळपाच्या सानिध्यात येवू देवू नये.
  • जनावरांवर किटक, माशा आणि गोचिडींचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. त्यासाठी किटक रिपेलंट आणि किटक नाशकांचा वापर करावा.
  • गोठे आणि प्रक्षेत्र किटक मुक्त ठेवावे.
  • किटकांच्या प्रजनना साठी उपयुक्त जागांचा नायनाट करावा. किटक उत्पत्ती होवू देवू नये.
  • लसीकरणानंतर जनावरांना किमान २८ दिवस चरण्यास सोडू नये.
  • गोठ्याची आणि परिसराची नियमित स्वच्छता आणि निर्जतुकीकरण करावे.
  • मृत जनावरास खोल पुरावे किंवा जाळून टाकावे.
  • जनावरे हाताळणाऱ्या व्यक्ति तसेच पशुवैद्यकांनी वैयक्तिक स्वच्छता पाळावी. बाधित जनावराच्या संपर्कात आल्यास कपडे, पादत्राणे व इतर साहित्य गरम पाण्यात धूवून घ्यावे.
  • संपर्कात आलेल्या वाहनांवर निर्जंतुक द्रावण फवारणी करावी.
  • प्रक्षेत्र आणि गोठ्यात जैवसुरक्षेची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी.

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

स्व च्या ओळखीनंतर भय कसले ?

काका विरुद्ध पुतण्या…

एक पणती उजेडासाठी ही एका राष्ट्रशिक्षकाची प्रेरणादायी कहाणी

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading