May 23, 2024
Narmada Bachav Andolan Leader Medha Patkar Comment
काय चाललयं अवतीभवती सत्ता संघर्ष

अर्बन नक्षल असल्याच्या आरोपावर मेधा पाटकर म्हणाल्या…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडून अर्बन नक्षल असल्याचा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यावर करण्यात आला होता. यावर मेधा पाटकर यांनी दिलेले प्रत्युत्तर…

“गुजरातमध्ये सरदार सरोवर प्रकल्पासाठी गुजरातसह महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील हजारो आदिवासींची घरे आणि गावं पाण्याखाली गेली. या संघर्षाला १६ ऑगस्टला ३७ वर्षे पूर्ण झाली, मात्र अद्यापही अनेक आदिवासींचे पुनर्वसन बाकी आहे. या प्रकल्पातील पाणी आणि विजेवरील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा वाटा त्यांना मिळाला नाही,” असा गंभीर आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला. तसेच अर्बन नक्षल म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. त्या गुरुवारी (१५ सप्टेंबर) धुळे जिल्ह्यातील शहादा येथे नर्मदा बचाव आंदोलनाच्या संवाद यात्रेत बोलत होत्या. यावेळी देशभरातून अनेक सजग नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी या संवाद यात्रेत सहभागी झाले होते.

Medha patkar comment

गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला मतदान होऊ नये म्हणून माझ्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर सुरू आहे. मी आपची मुख्यमंत्री पदाची उमेदवार आहे असा अपप्रचार सुरू आहे. मात्र, यावर आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मेधा पाटकर

मेधा पाटकर म्हणाल्या, “ज्यांना अर्बन नक्षल काय हे माहिती नाही तेच असं वक्तव्य करू शकतात. आम्ही शहरातून आदिवासींच्या लढ्यासाठी आदिवासी भागात आलो आहोत. नक्षल सशस्त्र लढ्याचा मार्ग निवडतात, मात्र आमचा लढा अहिंसावादी आहे. त्यामुळे जे कधीच नर्मदा खोऱ्यात आदिवासींची परिस्थिती समजून घेण्यासाठी आले नाही, त्यांनी अशी विधानं करणं हास्यास्पद आहे. केवळ आंदोलनाला बदनाम करण्यासाठी हे आरोप केले जात आहेत.”

मेधा पाटकर पुढे म्हणाल्या, “सुरुवातीला जेव्हा सरदार सरोवर प्रकल्पाचे काम सुरू झाले तेव्हा आदिवासींना याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. कोणत्याही पुनर्वसनाशिवाय प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलं होतं. मात्र, नर्मदा बचाव आंदोलनाने या अन्यायकारक प्रकल्पाविरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरील संघर्ष केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पाला स्थगिती दिली. तसेच आधी आदिवासींच्या पुनर्वसनाचे आदेश दिले. याशिवाय जागतिक बँकेने आदिवासींच्या लढ्याची दखल घेत या प्रकल्पाला दिलेला निधी रोखला. आंदोलनाच्या प्रयत्नातून आतापर्यंत ५० हजार कुटुंबांचे पुनर्वसन झाले आहे. याशिवाय बाकी असलेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी काम सुरू आहे. केवळ पुनर्वसन नाही तर आरोग्य, शिक्षण या विषयांवरदेखील नर्मदा बचाव आंदोलन काम करत आहे.”

सरदार सरोवर प्रकल्पातील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा पाण्याचा आणि विजेचा अधिकार अद्यापही मिळाला नाही –

मेधा पाटकर

“काही लोकांनी आदिवासींच्या या संघर्षावर अनेक आरोप केले आणि बदनामी करण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांनी प्रत्यक्ष नर्मदा खोऱ्यात येऊन या भागाची पाहणी करावी आणि हे काम पाहावं. आदिवासींशी बोलून वस्तुस्थिती समजून घ्यावी,” असं आवाहन मेधा पाटकर यांनी केलं.

सत्ताधारी भाजपाच्या काही नेत्यांनी मेधा पाटकर यांना अर्बन नक्षल म्हटलं त्यांचा नुरजी वसावे आणि अन्य आदिवासी स्थानिक गाव प्रतिनिधींनी निषेध केला. तसेच आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या मेधा पाटकर नक्षलवादी कशा? असा सवाल आदिवासी नागरिकांनी केला.

जन आंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक, पर्यावरणीय कार्यासाठी आंतरराष्ट्रीय गोल्ड मन पुरस्कार विजेते प्रफुल्ल समंतरा म्हणाले, “जे जे सरकारच्या धोरणांना विरोध करतात त्यांना नक्षलवादी ठरवलं जात आहे. मात्र, आम्ही संविधानातील मूल्यांवर विश्वास असणारे लोक आहोत.”

“निसर्ग विज्ञानाची आई आहे, विज्ञान तंत्रज्ञानाची आई आहे आणि हेच तंत्रज्ञान आज त्याच्या आजीला म्हणजे निसर्गाला नष्ट करत आहे. सध्या तंत्रज्ञान भांडवलदारांच्या हातात आहे आणि ते हवा तसा तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. तंत्रज्ञान कुणाच्या हातात यावरच तंत्रज्ञानाचं भविष्य अवलंबून आहे,” असं मत प्रफुल्ल यांनी व्यक्त केलं.

जीवन शाळा मुलांमध्ये देशप्रेम आणि आपल्या मातीवर प्रेम करायला शिकवत आहेत. आज शिक्षणाचं खासगीकरण सुरू आहे आणि सरकारी शाळांमध्ये शिक्षक नाहीत. त्यामुळे देशभरात जीवन शाळेच्या शिक्षणाचा प्रयोग नेला पाहिजे.

मेधा पाटकर

महाराष्ट्रातून राष्ट्रीय जन आंदोलनाच्या समन्वयक आणि नर्मदा नवनिर्माण अभियानाच्या विश्वस्त सुनिती सुलभा रघुनाथ यांनी मेधा पाटकर यांच्यावरील आरोपांबाबत सरकारला इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या, “नर्मदा बचाव आंदोलन हे कायम सत्याग्रही अहिंसक मार्गाने वाटचाल करत आलं आहे. त्याला अर्बन नक्षल म्हणणे ही बदनामी आहे. कुठल्याही पुराव्याशिवाय नर्मदा नवनिर्माण अभियानाची सुरू असलेली चौकशी ती पूर्णपणे खोडसाळ आणि खोट्या आधारावर आहे. या प्रकरणात आम्ही सत्य समोर आणू. सरकारने मेधा पाटकर यांच्यावर कारवाई केल्यास संपूर्ण देशभरातील जन आंदोलन याविरोधात उभे राहतील.”

३७ वर्षे झाले तरी अनेक आदिवासींचे पुनर्वसन बाकी, महाराष्ट्र, मध्य प्रदेश पाणी विजेच्या अधिकारापासून वंचित –

मेधा पाटकर

यावेळी शहादा येथील अनेक आदिवासींनी मागील ३७ वर्षातील संघर्षाच्या अनुभवांचं कथन केलं. तसेच नर्मदा बचाव आंदोलनाच्या मदतीने कशा पद्धतीने पुनर्वसन झाले याचीही माहिती दिली.

नर्मदा बचाव आंदोलनाने देशभरातील नागरिकांना संवाद यात्रेत सहभागी होऊन हे रचनात्मक संघर्षाचे काम समजावून घेण्याचं आवाहन केलं होतं. याला प्रतिसाद देत देशभरातून अनेक राज्यांमधील नागरिक या संवाद यात्रेत सहभागी झाले. हे सर्व नागरिक ४ दिवसीय अभ्यास दौऱ्यात सरदार सरोवर प्रकल्प बाधित भागाची पाहणी करून काम समजावून घेणार आहेत. यात पुनर्वसनाचे काम पाहणे, विस्थापित आदिवासींशी संवाद करणे, आदिवासी पाड्यावरील मुलांच्या शिक्षणासाठी नर्मदा बचाव आंदोलनाने सुरू केलेल्या जीवन शाळांची पाहणी केली जाणार आहे.

यावेळी शिक्षण क्षेत्रातील रमेश पाटील, समाजवादी महिला सभेच्या वर्षा गुप्ते, दिल्लीचे सामाजिक कार्यकर्ते अमितांशू व देशभरातून १२ राज्यांमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहत नर्मदा बचाव आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला.

Related posts

नाती…

क्रूझ पर्यटन क्षेत्रात 10 पट वाढण्याची क्षमता: जहाजबांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल

खोबऱ्यास प्रति क्विंटल 10 हजार 590 रुपये किमान आधारभूत किंमत

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406