नवलाख झाडी: अंजनाबाईची कविता
झाडीबोलीतील साधे शब्द, अंतःकरणाला हात घालणारी झाडी शब्दकळा आणि वर्णन करण्याकरता वापरलेली ओवी छंद त्यामुळे अंजनाबाईंची कविता थेट हृदयाला भिडते, मनाला मोहून टाकते आणि क्षणिक चित्त शून्य करून जाते.
बंडोपंत बोढेकर
शिवाजीनगर चंद्रपूर
भ्र. 9975321682
देशाच्या कुठल्याही प्रदेशात प्रमाण भाषेच्या वर्चस्वामुळे त्या त्या प्रदेशातील बोलीभाषेला ख-या अर्थाने उजळ माथ्याने वावरता येत नाही. दैनंदिन व्यवहारापुरतेच ती तोंड उघडत असते. उत्स्फूर्त आत्मगुंजन केवळ बोली भाषेतच होऊ शकते, हे अलिकडे बोलीभाषेच्या अभ्यासकांनी सिध्द करून दाखविलेले आहे. खानदेशांच्या बहिणाबाई चौधरींच्या योग्यतेची मोहमयी कविता झाडीपट्टीच्या अंजनाबाई खुणे यांनी रचल्या. त्यांनी रचलेल्या झाडी काव्यातून झाडीबोलीचे आंतरिक सामर्थ्यही अभिव्यक्त झाले. पती श्रीराम खुणे यांच्या प्रोत्साहनामुळे सौ. अंजनाबाई काव्य लिहू लागल्या गाऊ लागल्या. धाबेपवनीत भरलेल्या पाचव्या झाडीबोली साहित्य संमेलनात त्यांनी प्रथमत: काव्यवाचन केले. यावेळी त्यांचे वय होते ५८ वर्ष.
झाडीबोली साहित्य मंडळाचे प्रवर्तक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या प्रेरणेने अंजनाबाई काव्य क्षेत्रात अधिक बहरल्या. पुढे त्यांनी जांभळी (सडक), उमरखेड (जि. यवतमाळ), बेळगाव (कर्नाटक), चंद्रपूर यासारख्या अनेक ठिकाणी झालेले बोली भाषिक साहित्य संमेलने गाजवली. संपुर्ण कविता अंजनाबाईना तोंडपाठ आहे. झाडीकवितेचे स्वतंत्र पुस्तक ‘अंजनाबाईची कविता’ म्हणून प्रसिद्ध झाले. या कवितासंग्रहात त्यांचे अनुभव विश्व भरलेले आहे. बहिणाबाई प्रमाणेच आपल्या निसर्गदत्त काव्यप्रतिभेने अंजनाबाई अक्षर वाङ्मयात झाडीपट्टीच्या बहिणाबाई म्हणून अमर झाल्या. वडेगाव येथील झाडीबोली साहित्य मंडळाच्या महिला शाखेच्या त्या आजही अध्यक्ष आहेत. अंजनाबाईची कविता या त्यांच्या काव्यसंग्रहात एकूण ३२ कविता आहे. कन्या वियोग, गृहस्थ जीवन, दांपत्य जीवन, स्त्रीजन्म, सासु सूनसंबंध, सणवार, नणंद भावजय या विषयांवरील परिचित असे शब्दचित्रे त्यांनी साकारलेली आहे.
अंजनाबाईंना महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त झाला. दारूबंदी मंत्रालयातर्फे त्यांना पुण्यात या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
या संदर्भाची महत्त्वाची कविता तेथे प्रस्तुत केली होती.
‘ दारू पेऊन येते घरी
करते बडबड भारी
रोज रोज नसेमंदी
बेटा बायकोलं मारी !१!
कितीतरी लोकायन
त्यालं जोड्यानं पिटला
परं दारूचा येसन
त्याचा नाही बापा सुटला !२!
‘अंजनाबाईची दारू सोडा’ ही कविता दारूचे दुष्परिणाम कथन करते. दारूच्या आहारी गेलेला माणूस घरी येताच कसा वर्तन करतो, हे सांगते. पौराणिक कथा वाङ्मयातील उदाहरणे देऊन त्या या कवितेतून दारूच्या नशेचे परिणाम सांगते. शुक्राचार्याचे पतन दारूमुळे झाले. राम गणेश गडकरी यांच्या एकच प्याला या नाटकात सांगितल्याप्रमाणे दारूच्या प्याला मुळे संसाराची वाताहात झाली, ही दोन उदाहरणे देऊन युवकांनी दारूपासून दूर राहावे , दारू हे विष आहे ते घेऊ नका, अशी नम्र विनंती ती करते.
‘ मी हे विनंती करता
नको प्या गा जहर हा
येक दिवस दारून
आये धोका मोटा पहा’
आपल्या मृत्यूचा प्रसंग अनेक कवी आपल्या कवितेतून कसा असावा याबाबत लिहून ठेवतात. अगदी त्याचप्रमाणे अंजनाबाई आपल्या अंत्यसंस्कार प्रसंगी दरम्यान कोणते दंडक पाळावेत याबाबत कवितेतून सांगते .
मृत्यूला वाईट घटना मानत असले तरी त्यावेळी कटाक्षाने परिसराची स्वच्छता करूनच पुढील कार्यक्रम करावा असा ती आग्रह करते.
‘ माझ्या मरणाच्या येडी
जमतील आया बाया
माझ्या मुखात ठेवजो
तू कलदार रुपया !!’
माझ्या मरणाच्या येडी
पाच जणी सवासनी
माझ्या मुखात टाकजो
एक सोनियाचा मनी !! काव्यप्रतिभेची देण लाभलेल्या अंजनाबाईंनी आपल्या या कवितेतील ओळीतून मृत्यूप्रसंगाच्या प्रथा सांगितलेल्या आहे. प्रथेच्या केवळ नोंदी न सांगता त्या मागच्या भावनाही स्पष्ट करतात.
त्यांना हे सांगायचे आहे की मृत्यूसमयी बघायला बाया येतील तेव्हा माझ्या मुखात कलदार रुपये ठेवा. माझ्या मुखात सोन्याचा मनी टाका, जेणेकरून उपस्थित असणाऱ्या बायांना वाटेल की, अंजनाबाई काटकसरी होती. जीवन जगतांना परिश्रम घेत उत्तम संसार केला. दोन पैसेही कमावले, घरची संपत्ती समजली जाणारे सोने शाबूत ठेवून इमाने इतबारे घरातील प्रत्येकांचा सांभाळ केला. एकंदरीत जीवनात आलेली जबाबदारी योग्यरीत्या पूर्ण केली, ते उपस्थितींना दिसावे याकरिता प्रथेनुसार घरच्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे असेही त्या सांगायला विसरत नाही.
चंद्रपूर येथे संपन्न झालेल्या बाराव्या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्या आज ८३ वर्षाच्या आहे. झाडी बोली साहित्य मंडळाच्या ३० वर्षाच्या वाटचालीत अंजनाबाईचे योगदान मोठे आहे. त्यांचे आजवर झाडीचा झोलना (आत्मचरित्र), राजा धर्मपाल (कथा), अंजनाबाईच्या गोष्टी, अंजनाबाईच्या कथा हे ग्रंथ प्रकाशित झाले आहे. तसेच अंजनाबाईच्या संबंधित गौरवामृत आणि झाडीकन्या हे दोन संपादित ग्रंथ प्रकाशित झाले आहे. त्यांच्या कविता अलीकडे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत तसेच त्यांच्या कवितांवर संशोधन कार्य सुरू आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आता अनेक गावातल्या अंजना न घाबरता लिहू लागल्या आहेत.
झाडीबोलीतील साधे शब्द, अंतःकरणाला हात घालणारी झाडी शब्दकळा आणि वर्णन करण्याकरता वापरलेली ओवी छंद त्यामुळे त्यांची कविता थेट हृदयाला भिडते, मनाला मोहून टाकते आणि क्षणिक चित्त शून्य करून जाते.
अंजनाबाई वाचकांना उद्देशून म्हणतात,
” माजी अडान्याबाईची कविता आये , हे झाडीपट्टी बायेरच्या आयाबयनीलं अना आणि भाऊबंदाइलं हा झाडी सब्द गोड लागो हेच इनंती.”
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.