स्वप्नातून बाहेर पडणे गरजेचे आहे. जागृती ही महत्त्वाची आहे. वास्तवात राहायला शिकले पाहिजे. वास्तववादी व्हायला हवे. तरच विकास होतो. सत्य काय आहे ? त्या सत्याचा स्वीकार हा करायला हवा. सत्य आत्मसात करायला हवे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तरि स्वप्नौनी जागृती येता । काय पाय दुखती पंडुसुता।
का स्वप्नामांजी असता। प्रवासु होय ।।112।। ज्ञानेश्वरी अध्याय 9 वा
ओवीचा अर्थ – तर अर्जुना, स्वप्नांतून जागृतीत येताना त्याचे पाय दुखतात काय ? अथवा स्वप्नामध्ये असतांना प्रवास होतो काय ?
प्रत्येक व्यक्ती काही ना काही स्वप्ने उराशी बाळगत असतो. स्वप्ने असावीत. त्यातूनच नवनव्या आशा उत्पन्न होतात. विचार सुरू राहतात. प्रगती होत राहते. काही ना काही तरी करण्याची धडपड सुरू राहते. यातूनच विकासाचे खरे मार्ग सापडतात. स्वप्न भंगले तरी निराशा येत नाही. कारण ते शेवटी स्वप्न असते. सत्य परिस्थिती नसते.
स्वप्न हे नेहमी चांगल्या गोष्टीचे असावे. विकासाची स्वप्ने दाखवून राजकर्त्ये मतदारांची फसवणूक करतात. उसाला यंदा चांगला दर देऊ, अशी स्वप्ने दाखवतात. धान्याला चांगला दर देऊ, असेही सांगतात; पण करत काहीच नाहीत. राज्यकर्त्यांची आश्वासने ही आता नुसती स्वप्नेच राहिली आहेत. ती सत्यात कधी उतरतच नाहीत, पण त्यामुळे जग काही विकसित व्हायचे राहिले आहे का ? नाही ना ? आपण आपला विकास करण्याचे त्यामुळे थांबले आहोत का ? नाही ना? कोण कोणासाठी येथे थांबत नाही. थांबला तो संपला.
स्वप्ने दाखविणाऱ्यांचे काहीच नुकसान होत नाही. तो स्वतःच्या स्वार्थासाठी स्वप्ने दाखवत असतो. स्वप्न पाहणाऱ्याचे मात्र यात नुकसान होते. यासाठी स्वप्नात राहणे गैर आहे. याचे तोटेही आहेत. स्वप्नातून बाहेर पडणे गरजेचे आहे. जागृती ही महत्त्वाची आहे. वास्तवात राहायला शिकले पाहिजे. वास्तववादी व्हायला हवे. तरच विकास होतो. सत्य काय आहे ? त्या सत्याचा स्वीकार हा करायला हवा. सत्य आत्मसात करायला हवे. यासाठीच स्वप्नातून भानावर येणे गरजेचे आहे.
रात्री झोपेत सुद्धा आपणास काही स्वप्ने पडतात. ती चांगली असतात, असे नाही. असे म्हणतात की, पहाटेच्या वेळी पडलेली स्वप्ने ही खरी होतात. कोण जाणे! स्वप्न चांगले असेल तर ते खरे मानायला काहीच हरकत नाही. कदाचित त्यामुळेही ते स्वप्न सत्यात उतरेल. काही भीतीदायक स्वप्ने पडतात, पण ते स्वप्न असते. त्यामुळे जागे झाल्यावर त्यातील भीती नसते. अज्ञानाने आपण देहाच्या सुखामागे धावत आहोत. हे मानवाला पडलेले स्वप्न आहे. या स्वप्नातून बाहेर पडण्याची गरज आहे. आत्मज्ञानाची जागृती होणे गरजेचे आहे. डोळ्यांवरची अज्ञानाची झापडे दूर होण्याची गरज आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.