‘ मोंथा ‘ मुळे विदर्भात तर अरबी समुद्रातील तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रात तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२. ‘
मोंथा ‘ –
बंगालच्या उपसागरातील अति तीव्र कमी दाब क्षेत्राचे काल रात्री चक्री वादळात रूपांतर झाले असुन सध्या ते काकीनाडा शहरापासून ५३० किमी. अंतरावर आहे. एम. जे. ओ. च्या त्याचे ‘ मोंथा ‘ असे नामकरण झाले. ‘ मोंथा ‘ चा ‘थाई’ भाषेतील अर्थ म्हणजे ‘ सुवासिक फुल ‘ होय.
उद्या मंगळवार दि. २८ ऑक्टोबर ला रात्री ‘ मोंथा ‘ चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होवून आंध्रप्रदेशातील ‘काकीनाडा’ शहराजवळील किनारपट्टी वरून भू-भागावर आदळण्याची शक्यता जाणवते. तेथून पुढे उत्तर दिशेने ते प्रथम ओरिसा व नंतर छत्तीसगड कडे सरकेल.
एम. जे. ओ. चा परिणाम –
सध्या बंगालच्या उपसागराच्या पूर्वेकडे वि्षुववृत्तीय परीक्षेत्रात म्हणजे फेज ४ व ५ मध्ये मॅडन ज्युलियन ऑसिलेशनच्या साखळीची आम्प्लिट्युड २ च्या दरम्यान आहे. ह्या दोलणामुळे ‘ मोंथा ‘वादळाला वाढीव ऊर्जा मिळत असल्यामुळे तत्याच्या तीव्रतेत वाढ होत आहे.
विदर्भात ३ दिवस(२८, २९, ३० ला) पाऊस –
जेंव्हा ‘मोंथा’ छत्तीसगड मध्ये प्रवेशित होईल तेंव्हा संपूर्ण विदर्भात उद्या पासून तीन दिवस म्हणजे गुरुवार दि. ३० ऑक्टोबर पर्यन्त जोरदार पावसाची शक्यता जाणवते. त्याच्या परिणामातून मराठवाड्यातही त्या तीन दिवसात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवते. त्यातही विशेषतः विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात अति जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
मध्य महाराष्ट्र व मुंबईसह कोकणात तीन दिवस पाऊस-
अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र मुंबईच्या नैऋत्येकडे ६६० किमी. अंतरावर असुन त्याची वाटचाल ईशान्य दिशेकडे होत आहे. त्याच्या परिणामातून आजपासुन पुढील तीन दिवस म्हणजे बुधवार दि. २९ ऑक्टोबर पर्यन्त मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर व कोकणातील मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तीन दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
पावसाळी वातावरण कधी निवळणार ?
बुधवार दि. ५ नोव्हेंबरपासुन महाराष्ट्रात वातावरण निवळण्याची शक्यता असुन त्यापुढे हळूहळू थंडीची चाहूल घेऊ या !
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
