September 24, 2023
Home » आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदची अंग आनंदाचें ॥
विश्वाचे आर्त

आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदची अंग आनंदाचें ॥

हा पूर्णतेचा अभंग आहे. आता यापुढे मिळवायचे काहीही उरले नाही – आता कुठे जायचे नाही का – एक अशी स्थिती बुवांनी गाठलीये की त्या करता किती योगी अनेक आयुष्ये तप करीत आले आहेत, अनेक ज्ञानी जन्मजन्म अथक प्रयत्न करुन थकले आहेत.

शशांक पुरंदरे 

आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदची अंग आनंदाचें ॥१॥काय सांगो जाले काहीचियाबाही । पुढे चाली नाही आवडीने॥ध्रु.॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥२॥काय सांगो जाले काहीचियाबाही । पुढे चाली नाही आवडीने॥ध्रु.॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥३॥काय सांगो जाले काहीचियाबाही । पुढे चाली नाही आवडीने॥ध्रु.॥

बुवांचे पूर्णतेचे जे काही अभंग आहेत त्यातीलच हा एक अभंग. त्यांच्या आंत-बाहेर एक असा अवीट आनंद (ब्रह्मानंद) भरुन राहिला आहे की तो अभंगरुपाने कसा काय प्रगट झालाय हे एक आश्चर्यच आहे. जसं गोड कधीही खाल्लेलं नसलेल्या व्यक्तिला जर काही गोड पदार्थ दिला तर त्याचा चेहरा कसा एका वेगळ्याच आनंदाने फुलून येईल त्याच्या कितीतरी पटीने हा आनंद-कल्लोळ बुवा अनुभवून राहिले आहेत. हा आनंद असा काही आगळावेगळा आहे की त्याचे वर्णन खरं तर शब्दात करता येणारच नाही आणि शब्दात जरी वर्णन केला तरी ज्याला त्या अनुभवाची जाणही नाही त्याला तर ते समजणेही केवळ कठीण.

हा निर्विषय आनंद असल्याने याचे स्वरुप हे असे वेगळेच – एक आनंदच आंत-बाहेर कल्लोळून राहिला आहे असे ते म्हणताहेत. पाण्याच्या लाटा जशा एकमेकांवर आंदोळत असतात तशा लाटाच लाटा बुवा अनुभवताहेत. असा अनुभव यापूर्वी कधीच आलेला नसल्याने त्यांना हे काहीच्या बाही असेही वाटते आहे.

हा पूर्णतेचा अभंग आहे. आता यापुढे मिळवायचे काहीही उरले नाही – आता कुठे जायचे नाही का – एक अशी स्थिती बुवांनी गाठलीये की त्या करता किती योगी अनेक आयुष्ये तप करीत आले आहेत, अनेक ज्ञानी जन्मजन्म अथक प्रयत्न करुन थकले आहेत.

खुंटलीया धावा तृष्णेच्या – अशी एक फार मोठी अवस्था – काहीच मिळवावेसे उरले नाही – परमोच्च अवस्था.पुढे चाली नाही आवडीने…
परमात्म्याचे वर्णन सत् – चित् – आनंद असे करतात. यातील सत् म्हणजे सत्तारुपाने, चित् – चैतन्यरुपाने असा जरी तो असला तरी जीवाला त्याचे स्वरुप कळते ते आनंदरुपाने – सगळीकडे केवळ “तो”च भरुन आहे – इथे जीव हा शिवरुप झाल्यामुळे या अनुभवात दोन नसून एकच “तो” भरुन राहिला आहे – ही ती एक वेगळीच अवस्था – त्याचे वर्णन बुवा आनंदाच्या डोहात आनंदाच्या लाटा असं करुन राहिले आहेत.

गर्भ हा मातेच्या उदरात असल्याने मातेशी अनन्य असतो. भक्त परमेश्वराशी किती अनन्य असतो तर त्याला हेच उदाहरण  ज्ञानेश्वरीतही दिले आहे -पैं सर्वभावेसीं उखितें। जे वोपिलें मज चित्तें।जैसा गर्भगोळु उद्यमातें। कोणाही नेणें ॥९.३३५
आईची हालचाल तीच गर्भाची हालचाल. आईचा श्वास तोच गर्भाचा श्वास. या गर्भाला जर काही आवड उत्पन्न झाली (काही खावेसे वाटले) तर ती आवड मातेच्या ठिकाणी दिसून येते – गर्भाला स्वतःला तर काही खाता येत नाहीये पण आई जे खाईल ते गर्भाला अनायासे मिळणारच आहे – असा तो भक्त देवाशी अनन्य झालाय. हा जिव्हाळा कसा विलक्षण आहे तसा त्या देव-भक्तांचे आता झाले आहे – याला (भक्ताला) जे काही वाटते आहे ते आईकडून भोगले जात आहे. ब्रह्माचा आनंद बुवा आता कसे भोगून राहिले आहेत त्याला या उपमेशिवाय दुसरी कुठली उपमाच देता येणार नाही. गर्भाची आवड ही डोहाळ्याच्या रुपाने प्रगट झालीये आणि तीही आईकडून…

अशा या अनन्यशरण भक्ताचा आतमधे उमटलेला हा ठसा (अद्वैताचा अनुभव) या शब्दरुपाने बाहेर पडलाय…
या इथे तो देव म्हणजे परमात्मा (ब्रह्म) हाच बुवांच्या आत बसून बुवांना त्या आनंदाची जाणीव करुन देतोय – कारण निर्विषय आनंद (केवळ आनंदस्वरुप – परमानंद) हेच त्या परमेश्वराचे रुप बुवा आता असे अनुभवत आहेत की तो न पुसला जाणारा असा ठसा आहे – आणि या गर्भावस्थेत बुवांच्याठिकाणी वसलेल्या ब्रह्माचा आनंद बुवा बाहेर अनुभवत आहेत – इथे बाहेर आणि आत हे केवळे शब्द आहेत – तो आंतबाहेर भरुन राहिलेला आनंद शब्दात कसा काय सांगता येणार ??? पण बुवांनी मांडलाय खरा…

उपनिषदांमधे ते आत्मदर्शी ऋषि “हाऊ हाऊ” असे ओरडत असत असे वर्णन आहे – इतका आनंद होत असे की त्याचे प्रकटीकरण फक्त “ओ हो, ओ हो” असेच करायचे ते … शब्दात सांगता येत नाही तेव्हा काय होते आपले नुसते “अहाहा, अहाहा” असे तरी किंवा नि:शब्दच… बुवा मात्र ते अनिर्वचनीय शब्दात पकडू पहाताहेत…

आश्चर्य जो साच चि ह्यास देखे । आश्चर्य जो देखत ह्यास वर्णी ॥ आश्चर्य जो वर्णन ते हि ऐके । ऐके तरी शून्य चि जाणण्याचे ॥२९॥
दुसर्‍या अध्यायातला हा श्लोक – जो आत्म्याला पहातो (म्हणजे आत्म्याशी एकरुप होईन त्याला अनुभवतो) हे एक आश्चर्यच (अतिशय दुर्मिळ गोष्ट) – त्यापुढे त्या आत्म्याचे तो वर्णन करतो हे अजून एक आश्चर्य – हे वर्णन ऐकणारा हे त्यापुढचे आश्चर्य – कारण असे ऐकून काही कळते का – तर अजिबात नाही – ऐके तरी शून्यचि जाणण्याचे…आपण जर डोळे मिटून शांत बसलो आणि आपल्याच स्वरुपात तल्लीन होऊन गेलो तरच – बुवांचा सगळा अभंग लगेच लक्षात येईल…

शशांक पुरंदरे 
(सौजन्य – संत तुकाराम महाराज अध्यासन )

Related posts

प्रभुंच्या ठायी चित्त ठेवून करावीत सकळ कर्मे 

शास्त्राचा उपयोग चांगल्यासाठी व्हावा

दुसऱ्यात भगवंत पाहाणे हा सुद्धा भक्तीचाच प्रकार

Leave a Comment