विशेष आर्थिक लेख
देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये संगणक प्रणाली व सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या राष्ट्रीय संघटनेने म्हणजे नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज अर्थात “नॅसकॉम्” यांनी 2025-26 या चालू आर्थिक वर्षाचा ” धोरणात्मक पुनरावलोकन अहवाल ” प्रसिद्ध केला. या अहवालात काढण्यात आलेले निष्कर्ष महत्वपूर्ण असून संगणक प्रणाली व सेवा कंपन्यांनी प्रशंसाजनक कामगिरी केली असल्याचा उल्लेख केला असून चालू वर्षात आणखी चांगली कामगिरी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचा घेतलेला वेध…
प्रा. नंदकुमार काकिर्डे
देशातील संगणक प्रणाली विकसन व सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या नॅसकॉम या राष्ट्रीय संघटनेने चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस या क्षेत्राचा महसूल 300 अब्ज डॉलर्सच्या घरात जाईल असा अंदाज व्यक्त केला असून या क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये सव्वा लाख नवीन नोकऱ्यांची भर पडण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
एकंदरीत चालू आर्थिक वर्षांमध्ये भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये विकासामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा वाटा हा अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार असल्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. या क्षेत्राचा वार्षिक विकासाचा दर सहा टक्क्यांच्या घरात राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2025 या कॅलेंडर वर्षामध्ये भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा विकास दर 5.1 टक्के राहण्याची शक्यता असून या काळातील महसूल 282.6 अब्ज डॉलर्स राहील असे नमूद करण्यात आले आहे.
याच वर्षांमध्ये एक लाख 26 हजार नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापर करण्यात येऊन विकसित विकसित करण्यात येणारी वितरण यंत्रणा,क्लाऊड नेटिव्ह तंत्रज्ञान व सायबर सुरक्षा सेवा व जागतिक क्षमतेची केंद्रे (ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स – जीसीसी) यांच्या परिपक्व विस्तारामुळे या क्षेत्रातील विकासाला चांगली चालना मिळणार आहे असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
भारतातील संगणक प्रणाली कंपन्यांची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 4.6 टक्क्यांनी वाढून 224.4 अब्ज डॉलरच्या घरात जाईल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2024 या वर्षांमध्ये या क्षेत्राला जास्तीत जास्त स्थैर्य निर्माण झाल्यामुळे अनेक प्रदेशांमध्ये सुधारित आर्थिक व्यवहार वाढलेले आढळून आले. जागतिक पातळीवर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये गेल्या वर्षात 10.80 टक्के वाढ संगणकाच्या विविध भागांसाठी म्हणजे हार्डवेअर साठी व संगणक प्रणालीसाठी -सॉफ्टवेअरच्या खर्चासाठी करण्यात आली. मात्र माहिती तंत्रज्ञान सेवांमध्ये मात्र फारशी वाढ झाली नाही व ती 4.70 टक्क्यांवर कायम राहिली.
मार्च 2025 अखेर संपलेल्या वर्षांमध्ये भारतीय तंत्रज्ञान उद्योगाने जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान व सर्जनशीलता व नवकल्पना निर्माण करण्याचे केंद्र (इनोव्हेशन हब) असे स्थान निर्माण करण्यात मोठे यश संपादन केले आहे. अमेरिकेसह युरोपातील अनेक देशांमध्ये सार्वत्रिक निवडणुका झालेल्या असतानाही भारतीय उद्योगाने या वर्षांमध्ये केलेली प्रगती ही अत्यंत समाधानकारक झाली. संगणकाचे विविध भाग म्हणजे हार्डवेअर तसेच संगणक प्रणाली यांची विक्री 283 बिलियन डॉलरच्या घरात जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 14 बिलियन डॉलर्सची वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे संगणक प्रणाली व सेवांच्या निर्यातीमध्येही या वर्षात 4.6 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली असून ही निर्यात 200 बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त होऊन 224 बिलियन डॉलर्स होईल असा अंदाज आहे. मात्र देशांतर्गत तंत्रज्ञान क्षेत्राची कामगिरी फारशी वाढलेली नसून ती 58.2 बिलियन डॉलर्सच्या घरात आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या या चांगल्या कामगिरीमुळे या क्षेत्रातील नोकऱ्यांमध्येही लक्षणीय रित्या वाढ झालेली असून या वर्षाखेरीस1.26 लाख नोकऱ्या वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या क्षेत्रातील एकूण रोजगाराचा आकडा 5.80 मिलियन म्हणजे 5 कोटी 80 लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाची ही चांगली कामगिरी होण्यासाठी महत्त्वाचा हातभार लावला लागला आहे तो सायबर सुरक्षा सेवा तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेवांचा विस्तार व क्लाऊड नेटिव्ह तंत्रज्ञान यांचा प्रमुख वाटा आहे. त्याचप्रमाणे संगणक प्रणालींची विविध उत्पादने आणि त्यांचे सखोल तंत्रज्ञान (डीप टेक्नॉलॉजी) यांच्यामुळे आपण नाविन्यता व बदल निर्माण करण्यामध्ये आघाडीवर राहिलो आहोत. भारतातील अभियांत्रिकी व संशोधन व विकास या क्षेत्रामध्ये ही नवनवीन संधी निर्माण झालेल्या आहेत.
भारतीय तंत्रज्ञान क्षेत्राने जागतिक पातळीच्या क्षमतेची केंद्रे निर्माण केल्यामुळे संपूर्ण जगाचे भारताकडे लक्ष आकर्षित झालेले आहे. त्यामुळेच अमेरिकेसह युरोपातील अनेक देशांमध्ये भारतीय मनुष्यबळाची सातत्याने मागणी होताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारतातील मनुष्यबळाला अमेरिकेमध्ये संधी देण्याच्या दृष्टिकोनातून काही नियम शिथिल केल्याचे नुकतेच लक्षात आले आहे. भारतीय तंत्रज्ञांची क्षमता व कुवत यावर मोठ्या प्रमाणावर अनेक देशांनी विश्वास टाकलेला आहे. एवढेच नाही तर भारतातील तंत्रज्ञान उद्योगाने एंटरप्राइज एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जनरेटिव्ह ए आय यांचा अत्यंत सुरेख संगम घडवून आणलेला आहे व तो अलीकडच्या काळात जास्त यशस्वी झाल्याचे दिसले आहे.
देशातील तरुणांमध्ये माहिती तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण देऊन या क्षेत्राला चांगला रोजगार पुरवण्यामध्ये या क्षेत्राने चांगली कामगिरी केल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने गेल्या वर्षभरात केलेली प्रगती ही 2047 मधील विकसित भारत मन होण्याच्या दृष्टिकोनातून टाकलेले यशस्वी पाऊल आहे असेही अहवालाच्या अखेरीस नमूद करण्यात आले आहे.
या भारतीय उद्योगाने केलेल्या भांडवली खर्चाचा अहवालही नेस्कॉमने प्रसिद्ध केला असून त्यात तंत्रज्ञानासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित डिजिटल गोष्टींसाठी जास्त खर्च झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. पुढील वर्षात मागील वर्षापेक्षाही जास्त रक्कम भांडवली खर्चापोटी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला यशस्वी होण्यासाठी को-क्रियेट ( सह तयार), कोलॅबरेट ( अभिसरण), कॉन्व्हर्ज ( एकत्र येणे ) व कॅटेलाईज ( उत्प्रेरक) या चार धोरणात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे अहवालाच्या अखेरीस नमूद करण्यात आले आहे. या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने आगामी काळात टेलिकॉम, किरकोळ बाजारपेठ व आरोग्य सेवा क्षेत्र यामध्ये व्यापक प्रमाणावर पदार्पण केले तर त्यांना जास्त चांगले यश लावण्याची शक्यता असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले आहे.
(लेखक पुणेस्थित अर्थविषयक जेष्ठ पत्रकार असून माजी बँक संचालक आहेत )
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
खूपच छान…!
मनापासून धन्यवाद, सर..!🙏