October 6, 2024
Tukaram values ​​authentic experience Dr Leela Patil article
Home » Privacy Policy » तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे । येरा गबाळ्याचे नाही काम ॥
मुक्त संवाद

तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे । येरा गबाळ्याचे नाही काम ॥

नका दंतकथा येथे सांगो कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ? ॥ १ ॥
अनुभव तेथे पाहिजे साचार । न चलती चार आम्हापुढे ॥ २ ॥
वरी कोण मानी रसाळ बोलणे । नाही झाली मने ओळखी तो ॥३ ॥
निवडी वेगळे क्षीर आणि पाणी । राजहंस दोन्ही वेगळालि ॥ ४ ॥
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे । येरा गबाळ्याचे नाही काम ॥ ५ ॥

हा अभंग शेवटच्या चरणामुळे फार प्रख्यात झालेला आहे. तुकाराम अस्सल अनुभवाला महत्त्व देणारे आणि नुसत्या काल्पनिक कथांचे कवडी किंमत करणारे आहेत. पोकळ गोष्टी करणाऱ्या मंडळींची त्यांना तिडीक आहे. अनुभवाशिवाय शब्दाला मोल नाही अशी त्यांची स्पष्ट विचारप्रणाली आहे. ज्यांना अनुभव नाही ते केवळ लोकांचे मनोरंजन करण्यासाठी पोकळ कहाणी सांगतात. ते अंत:करणापासून नाही व हृदयाला भिडणारे ठरत नाही. खरे तर अनुभवी बोल हेच परिणामकारक ठरतात.

मात्र पोटासाठी पुराण, प्रवचने सांगणाऱ्या पुराणिकाच्या सांगण्यात जनहिताची तळमळ कितीशी ? तुकारामांना शाब्दिक ज्ञानाची मिरास वाटत नाही. रसाळ, अलंकारिक शब्दांच्या मोहात पडून त्या पद्धतीने जनरंजन करण्याचा हेतू साध्य होईलही; पण त्यातून प्रबोधन, वर्तन परिवर्तन तर सोडाच; साधी हितकारकता साध्य होत नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास कोरडा वेदांत म्हणजे घटाकाश, मठाकाश, जीव ब्रह्म याचे ऐक्य, सोपाधिक व निरूपाधिक सत्य, आदी नाना परिभाषिक कल्पनांतून हाती काय मिळणार ? (दैनंदिन तुकाराम गाथा – ले. दिवाकर घैसास) हे विश्वचि माझे घर ! ही ज्ञानदेवांची उक्ती तोंडाने म्हणणारा शेजाऱ्याचा द्वेष करतो ! देव मोठा, परमेश्वराशिवाय अन्य काही नाही म्हणणारे भेदभावाने वागतात. तुकारामांना खरा अनुभव हा भक्तांच्या ठायी अपेक्षित आहे. त्यापेक्षाही प्रवचनकार पुराण कथाकार यांनी तर अनुभवसिद्ध व स्ववर्तनाच्या बळावरच कथा सांगण्याची नैतिकता पाळावी. रसाळ बोलून श्रोत्यांची मने कोणीही हेलावून सोडेल, पण स्वतःच्या मनाला देवाची, खऱ्या सत्यधर्माची ओळख नसेल तर सर्व व्यर्थ !

अनुभवाचे बोल महत्त्वाचे आणि तसा आचार हा तर त्याहून महत्त्वाचा आहे. तुकाराम म्हणतात, चार म्हणजे चाळे नकोत आम्हाला. तशांना आम्ही किंमत देत नाही. त्यांचे ते चाळे आमच्यापुढे चालणार नाहीत. स्वतःच्या मनाला तरी देवाची खरी ओळख करून घ्या. निरपेक्ष, निर्व्याज, निखळ, निस्पृहतेने भक्ती करा. देव जाणून घ्या. मगच त्याबद्दल बोलण्याचा अधिकार प्राप्त होईल. केवळ दुसऱ्याने पाहून मिळवलेले वरवरचे ज्ञान म्हणजे उथळपणा होय, तो काय कामाचा?

पोटार्थी असलेले, उच्च कुळात जन्मल्याचा वृथा अभिमान बाळगणारे अनेक साधू, प्रवचनकार तुकारामांनी पाहिलेले. त्यांचे उथळ ज्ञान, अनुभवाच्या मर्यादा ओळखलेल्या, म्हणून अशांनी तोरा दाखवू नये आमच्यासमोर, असे ते स्पष्ट बजावतात. राजहंस नीर व क्षीर वेगळे काढतो, म्हणजेच दूध आणि पाणी निवडून अलग करतो. (कावळ्यांना ते जमणार काय?) असे करण्यासाठी जातीवंत मनुष्य हवा. म्हणजेच अस्सल अनुभव घेतलेली अनुभवसंपन्नता त्यांच्याकडे हवी. तरच त्याचे प्रवचन, कथन, पुराण पोथी सांगणे हे प्रभावी आणि सत्य वाटणारे ठरेल. तुकारामांना असत्याची तिडीक होती व भोंदूपणाचा तिरस्कार होता. तोच त्यांनी दंतकथा सांगणाऱ्या मंडळींच्या संदर्भात या अभंगात व्यक्त केला आहे.

तुकारामांकडे स्पष्टवक्तेपणा आणि आपला विचार आणि मते अगदी परखडपणे मांडण्याचे धारिष्ट्य होते. त्याचे प्रतिबिंब या अभंगात दिसते. राजहंसाच्या वृत्तीचा दाखला देत ते म्हणतात, अनुभव नसलेले व खऱ्या धर्माचे आचार न करणारे असे परमार्थाचे प्रचारक खूप असतात. त्यांना आम्ही पुरते ओळखतो. आमच्यापुढे त्यांचे काही चालत नाही. खरा जातीवंत संत म्हणजे प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनात व नियमितपणे वर्तनात ‘जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो अपुले’ अशी भावना ठेवणारेच होत. शब्दांचा फुलोरा, रसाळ वाणी काय कामाची ? खोटी स्तुती करणाऱ्या प्रचारकांना त्यांनी फटकारले. भक्ती मार्गात अस्सल विशुद्ध भावनात्मक जीवन हवे. ‘न चलती चार आम्हापुढे’ असे म्हणणाऱ्या तुकारामांची वृत्तीही अहंकारी नसून स्वतःच्या अस्सल भक्तीची निश्चित खात्री व हमी आढळते.

खरे तर तुकारामांनी कीर्तन आणि कवित्व करून वर्णाभिमानविरहित समाजाची रचना करण्यासाठी अखंड परिश्रम, असीम त्याग, अविरत विठ्ठल भक्तीचा ध्यास आणि जबरदस्त निरीक्षणशक्ती समाजजीवनाचा अनुभव घेतला. प्रपंच आणि परमार्थाची सांगड घातली आणि ते करताना शुद्रवृत्ती आणि प्रवृत्तीवर कठोर प्रहार केले. त्याचाच भाग म्हणून या अभंगात दंतकथा, भाकड कथा सांगणाऱ्या प्रवचनकार पुराण- पोथी कथन करणाऱ्यांवर ताशेरे ओढले.

मोराच्या पिसांना डोळे असतात. पण त्यांना दृष्टी नसते. तसेच पढीक पंडितांनाही ज्ञानाचे डोळे आहेत. पण त्याचा योग्य वापर ते करत नसल्याने ते असूनही नसल्यासारखेच आहेत. कारण अनुभवाची जोड नसल्याने ज्ञान शाब्दिक ठरते हा ज्ञानेश्वरांचा विचार अधिक स्पष्ट नव्हे तर कठोर भाषेत आत्मविश्वासाने आणि भक्ती मार्गावर निस्सीम श्रद्धा दाखवून तुकारामांनी वेगळेपण दाखविले.

भक्ती मार्गात अस्सल विशुद्ध भावात्मक जीवन हवे. तोच खरा जातीचा ! अभिजात भक्त ! भक्तीविषयीचे तत्त्वज्ञान कीर्तन, प्रवचनातून खरा भक्तच सांगू शकतो. ते येरा गबाळ्याचे काम नव्हे, असाही समंजस इशारा तुकाराम देतात.

तुकारामांनी त्या काळात पोटार्थी प्रवचनकार, पुराण कथनकाराचा कोरडे बोल सांगणारे म्हणून त्यांच्या मर्यादा दाखवून दिल्या. पण सध्याच्या काळातही अनेक पढीक पंडितांची चलती दिसते. शाब्दिक कोट्या, फालतू विनोद, द्व्यर्थी शब्दांच्या कोट्या करणाऱ्यांनाही आज मागणी आहे. सवंग जनप्रियता व स्तुतीच्या मागे लागणाऱ्यांना भक्ती, आध्यात्म, मूल्ये व नीतीचा अनुभव नसतोच. म्हणून त्यांचे बोल शब्दांचेच खेळ म्हणावा लागेल. हल्लीचे श्रोतेही अज्ञानी त्या क्षेत्रात गाढवाला चंदनाची उटी नकोशी तर उकिरड्यावरची राख हवीशी वाटते. माकडाच्या गळ्यात मौल्यवान मोती घातला तर त्याचे महत्त्व काय? तो चावून थुंकूनच टाकणार, असे सांगून ‘तुका म्हणे खळा नावडे हित । अविद्या वाढवी आपले मत । ढोंगी गुरूंची हजेरी घेणाऱ्या तुकारामांनी उथळ श्रोत्यांवरही आक्षेप घेतला. मागणी तसा पुरवठा करणाऱ्यांची संख्या वाढत आहे ही आजची दुर्दैवी स्थिती होय.

टीव्हीवरही मान्यवर प्रवचनकार आपले कथन करतात. हल्ली तर तालुक्याच्या ठिकाणी यात्रा, जत्रा व धार्मिक सणाच्या निमित्ताने कीर्तन, प्रवचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. काही अपवाद वगळता खरा धर्म, भक्ती, नामस्मरणाचा अभ्यास कितीजणांचा ? अशा मंडळींचे खासगी जीवन हे बऱ्याचदा बहकलेले असते. त्यांची भोंदूगिरी, ऐषारामी राहणी व प्रसंगी अनैतिकतेचे वर्तन उघडे पडते. पोलिसांनी कारवाई केल्याच्याही बातम्या वाचनात येतात. म्हणून ईश्वर भक्ती ही अनुभवसिद्ध व विशुद्ध वर्तन असणाऱ्यांना सामाजिक मान्यता, शिष्यांकडून महत्त्व मिळते का ? याचा शोध घ्यायला हवा. गुरू करून घेऊन त्याचा गंडा बांधणे ही हल्लीची लोकांची प्रवृत्तीसुद्धा वाढत आहे. पण ‘गुरू’ सुद्धा कसे कोणाला निवडावे याचाही विचार व्हायला हवा.

डॉ. लीला पाटील कोल्हापूर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading