June 7, 2023
Home » अणुरेणुया थोकडा । तुका आकाशा एवढा ॥१॥
विश्वाचे आर्त

अणुरेणुया थोकडा । तुका आकाशा एवढा ॥१॥

अनुभूतीची एवढी विशालता व तीव्रता ज्यांना लाभली आहे, ते देह धारण करून जगतात तरी कशासाठी ? याही प्रश्नाचे उत्तर तुकाबांनी या अभंगात दिले आहे. इतर लोकांच्यावर उपकार करण्यासाठी आपण आता उरलेलो आहोत, असे त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे.

डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).

मार्गशीर्ष शुद्ध ११, शके १९४२.
मोक्षदा एकादशी.

अणुरेणुया थोकडा ।
तुका आकाशा एवढा ॥१॥
गिळुनी सांडिले कळिवर ।
भव भ्रमाचा आकार ॥ध्रु.॥

सांडिली त्रिपुटी ।
दीप उजळला घटी ॥२॥
गिळुनी सांडिले कळिवर ।
भव भ्रमाचा आकार ॥ध्रु.॥

तुका म्हणे आता ।
उरलो उपकारापुरता ॥३॥
गिळुनी सांडिले कळिवर ।
भव भ्रमाचा आकार ॥ध्रु.॥

निरूपण : डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).

शब्दार्थ:
अणुरेणुया – अणुरेणू पेक्षाही.
थोकडा – सूक्ष्म.
त्रिपुटी – ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान तिहींचा समुदाय.

अर्थ:
मी तुकाराम तसे पाहिले तर अणुरेणू पेक्षाही सूक्ष्म असूनही आकाशाएवढा विस्तारलेलो आहे.॥१॥

मी देहादी व प्रपंचादिकांचा अभिमान गिळून शरीर सोडून दिल्या सारखेच आहे प्रपंचरूपी भ्रमाचा आकारही मी सोडलेला आहे.॥ध्रु.॥

ज्ञेय, ज्ञाता व ज्ञानाची त्रिपुटी सोडून मी आत्मज्ञानाचा दीप माझ्या देहामध्ये प्रज्ज्वलित केला आहे.॥२॥

तुकोबा म्हणतात, मी आता केवळ दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठीच उरलेलो आहे.॥३॥

विवरण:
या अतिशय प्रसिद्ध अशा अभंगात तुकाराम महाराजांनी आपण अणुरेणू पेक्षाही सूक्ष्म व आकाशापेक्षाही विशाल कसे आहोत, याचे त्यांच्या श्रेष्ठ अनुभूतीवरून वर्णन केले आहे. एकच सूक्ष्म तत्त्व सर्व जगतात भरून राहिलेले आहे, याचा सुंदर आविष्कार जो अणोरणीयान्महतो महीयान् या कठोपनिषदातील सूत्रात झालेला आहे; त्याचा अनुवाद तुकोबांनी सहजासहजी या अभंगात मार्मिकपणे केलेला आहे.

अणुरेणू पेक्षाही सूक्ष्म असलेल्या तत्त्वाचाच सर्व विश्वास भरून राहिलेला अविष्कार असल्याने त्याला सोडून दुसरे काहीच नाही याची जाणीव श्रेष्ठ साधकास नेहमीच होत असते जळीस्थळी ईश्वरतत्त्व पाहाणे व एकाच आत्मतत्त्वाच्या धाग्याने सर्व सृष्टी गुंफिली गेली आहे, असे अनुभवास येणे, हेच ईश्वरी साक्षात्काराचे मर्म होय.

तुकोबांना ही अनुभूती तीव्रतेने आलेली होती:

आत हरी बाहेर हरी । हरीने घरी कोंडिले॥,

नभोमय जाले जळ । एकी सकळ हरपले॥

तुका म्हणे कल्प झाला ।अस्त गेला उदय॥,

कांहीच मी नव्हे कोणिये गांवीचा । एकटा ठायीच्या ठायी एक॥,

आमुचा स्वदेश भुवनत्रयांमध्ये वास।

इत्यादी वचनांतून तुकोबांच्या अनुभूतीची विशालता ध्यानात येण्यासारखी आहे. अनुभूतीची एवढी विशालता व तीव्रता ज्यांना लाभली आहे, ते देह धारण करून जगतात तरी कशासाठी ? याही प्रश्नाचे उत्तर तुकाबांनी या अभंगात दिले आहे. इतर लोकांच्यावर उपकार करण्यासाठी आपण आता उरलेलो आहोत, असे त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे. स्वतःस साक्षात्कार झाल्यानंतर अशी भूमिका तुकोबांसारख्या सत्पुरुषांना घ्यावी लागते. लोकांनी सन्मार्गावर राहावे, केवळ प्रपंच व पैसापैसा न करिता ईश्वराची आठवण ठेवावी, अनाचारांत व व्यसनांत रमू नये, दुष्टांच्या संगतीत राहू नये, म्हणून साधुसंतांच्या एकसारख्या उपदेशाची फार मोठी जरूरी असते.

उपदेशी तुका ।मेघवृष्टीने आइका
असा निर्वाळा दुसऱ्या एका अभंगात त्यांनी दिलेला आहे. मेघांचा स्वभावच सहज वृष्टीचा असून त्याचा फायदा ज्याचा त्याने घ्यावयाचा असतो.

साैजन्य – http://tukaram.com/marathi/gatha/default.htm

Related posts

मानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त

अभ्यासयोग म्हणजे काय ?

प्रेमाचा अंकुर फुटण्यासाठीच झाका दान

Leave a Comment