November 13, 2025
डॉ. सुकृत खांडेकर यांचा बिहार निवडणुकीतील एक्झिटपोलचा सखोल अभ्यास — एनडीए आघाडी, भूतकाळातील चुकीचे अंदाज, जातीय समीकरणे आणि स्थलांतरित मतदारांचा प्रभाव.
Home » एक्झिटपोलचे गौडबंगाल
सत्ता संघर्ष

एक्झिटपोलचे गौडबंगाल

बिहारमधील एक्झिटपोल कधीच खरे ठरले नाहीत. बिहारमध्ये स्थलांतरीत मतदारांची संख्या लाखोंच्या घरात आहे. बिहारमधील लक्षवधी मतदार हे मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबाद, बंगळुरू आदी मोठ्या शहरात रोजगारासाठी असतात व मतदानाला गावी येतात. बिहारमध्ये जातीय समिकरणे गुंतागुंतीची आहे व त्यावर मतदान मोठे होते.

डॉ. सुकृत खांडेकर

बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झाले आणि सतरा संस्थांनी घेतलेल्या मतदानोत्तर पाहणीमधे एनडीएला बहुमत मिळणार अशी आकडेवारी जाहीर झाली आहे. एनडीएला 154 जागांवर विजय मिळणार आणि आघाडीच्या पदरात 83 जागा पडणार असे अंदाज व्यक्त केले गेले आहेत. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला तीन ते पाच जागांवर समाधान मानावे लागेल असे एक्झिटपोलमधे म्हटले आहे. जर एनडीएला बहुमत मिळाले तर पुन्हा नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार की कोणा महिलेला हा सन्मान मिळणार हे भाजप ठरवणार आहे. कारण सर्वाधिक आमदार हे भाजपचे निवडून येतील असे एक्झिटपोलच्या पाहणीत म्हटले आहे.

बिहारमध्ये पहिल्या टप्यात 65 तर दुसऱ्या टप्प्यात 67 टक्के मतदान झाले. मतमोजणी शुक्रवारी 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत झालेल्या जास्त मतदानाचा लाभ आम्हाला होईल असा दावा भाजप व जनता दल युनायटेडने केला आहे. दैनिक भास्कर, मैट्रीज, पीपल्स इनसाईट, चाणक्य, पोल डायरी, यूज 24, न्यूज 18, टाइम्स नाऊ अशा विविध संस्थांनी घेतलेल्या एक्झिटपोलमधे एनडीएचे सरकार पुन्हा स्थापन होणार असे म्हटले आहे. बहुतेक एक्झिटपोलमधे भाजपला सर्वाधिक म्हणजे 60 ते 82 जागा दिल्या आहेत तर जनता दल यु चे 60 ते 70 आमदार निवडून येतील असे म्हटले आहे. भाजप व जनता दल यु ने प्रत्येकी 101 जागा लढवल्या होत्या. या निवडणुकीत राजदने सर्वात जास्त म्हणजे 146 तर काँग्रेसने 59 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. राजदचे 60 ते 80 तर काँग्रेसचे 10 ते 20 आमदार निवडून येऊ शकतात, असे एक्झिटपोलमधे म्हटले आहे.

एक्झिटपोलची आकडेवारी व प्रत्यक्ष निकाल यांत बराच फरक पडू शकतो असे अनेकदा घडले आहे. बिहार विधानसभेच्या सन 2010, 2015 व 2020 अशा तिनही निवडणुकांमधे एक्झिटपोल चुकले होते. 2015 मध्ये भाजपा सत्तेवर येईल असे एक्झिटपोलची आकडेवारी होती प्रत्यक्षात राजद, काँग्रेस व जनता दल यु यांच्या आघाडीला बहुमत मिळाले. सन 2020 मधे आघाडीला बहुमत मिळेल असे एक्झिटपोलने म्हटले होते, प्रत्यक्षात एनडीएला बहुमत मिळाले. यंदाच्या निवडणुकीत ओपनिअन पोल व एक्झिटपोल अशा जनसर्वेक्षणात राज्यात एनडीए सत्तेवर येईल असे म्हटले आहे.

बिहारमधील एक्झिटपोल कधीच खरे ठरले नाहीत. बिहारमध्ये स्थलांतरीत मतदारांची संख्या लाखोंच्या घरात आहे. बिहारमधील लक्षवधी मतदार हे मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबाद, बंगळुरू आदी मोठ्या शहरात रोजगारासाठी असतात व मतदानाला गावी येतात. बिहारमध्ये जातीय समिकरणे गुंतागुंतीची आहे व त्यावर मतदान मोठे होते. गेल्या काही निवडणुकांमधे महिलांचे मतदान पुरूषांपेक्षा जास्त आहे. यावर्षी दिड कोटी महिलांच्या बँक खात्यात नितीश कुमार सरकारने थेट दहा हजार रूपये जमा केल्याने महिलांनी एनडीएला मोठ्या संख्येने मतदान केले असावे. मतदानपूर्व सर्वेक्षण व मतदानोत्तर सर्वेक्षणांनी या वेळी एनडीएला झुकते माप दिले आहे.

गेल्या दिड वर्षात देशात सात विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात एखादा अपवाद वगळता या राज्यात एक्झिटपोल चुकीचे ठरले हे निकालानंतर सिध्द झाले. ओरिसामधे नवीन पटनाईक यांच्या बिजू जनता दलाला 90 ते 100 जागा मिळतील असे एक्झिटपोलने म्हटले होते. तिथे भाजपने 147 पैकी 78 जिंकल्या व सरकार स्थापन झाले. आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस सत्तेवर येईल असे सर्वेक्षणात म्हटले होते प्रत्यक्षात तेलगु देशमने 175 पैकी 164 जागा जिंकल्या व चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री झाले. जम्मू- काश्मीरमधे भाजपा सर्वात मोठा पक्ष येईल असे एक्झिटपोलमधे म्हटले होते. तिथे ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले.

दिल्ली विधानसभेत भाजप येणार हे भाकीत खरे ठरले. भाजपचे 70 पैकी 39 आमदार निवडून आले व आपचा पराभव झाला. झारखंडमधे एखादा एक्झिटपोल वगळता बहुतेक सर्वांनी एनडीए सत्तेवर येणार म्हटले होते, प्रत्यक्षात इंडिया आघाडीने 56 जागा जिंकून सरकार स्थापन केले. महाराष्ट्रात महायुतीला 235 जागा मिळतील असे कोणी सर्वेक्षणात म्हटलेले नव्हते. महाआघाडीला जास्त जागा मिळतील हा अंदाज चुकला. हरयाणात एक्झिटपोलने काँग्रेसच सत्तेवर येणार म्हटले होते पण तिथे भाजपला 48 व काँग्रसला 37 जागा मिळाल्या व भाजपचे सरकार स्थापन झाले. बिहारच्या एक्झिटपोलने एनडीएला पुन्हा सत्ता दिली आहे. पण नेमके काय याचे उत्तर शुक्रवारी दुपारी मिळेल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading