नवी पिढी वृत्तबद्ध कवितांकडे वळते आहे, हे आशावादी आहे. सोशल मीडियावर कविता व्हायरल करण्यासाठी घाई करू नका. तिथे मिळणाऱ्या प्रतिसादावर कवितेचा दर्जा ठरत नाही. कविता आधी आपल्या मनाला भावली पाहिजे, मगच इतरांचा नंतर विचार करा.
विजय जोशी, कवी
इस्लामपूर : कवितेत क्रांती करण्याची क्षमता असते. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय येणे महत्वाचे आहे. फक्त माझेच इतरांनी वाचावे हे चुकीचे आहे. सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद म्हणजे आपल्या कवितेचे मूल्यमापन नव्हे, असे मत सुप्रसिद्ध कवी विजय जोशी यांनी व्यक्त केले.
पेठ (ता. वाळवा) येथे आयोजित तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या कविसंमेलन अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. गझलकार सुधाकर इनामदार प्रमुख उपस्थित होते. श्री. जोशी म्हणाले, ” कवितेच्या अभ्यासातून प्रगती होत जाते. हितशत्रू आणि टीकेकडे दुर्लक्ष करा. उत्तम काव्यनिर्मितीसाठी जाणीवपूर्वक कवितेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कवितेत लय हवा, नाद हवा. कविता आशयसंपन्न हवी. चांगले वाचन हवे. कविता सोपी नसते.
पुरस्कार साहित्यिकांची जबाबदारी वाढवत असतात. तिळगंगा संमेलनाला प्रतिसाद चांगला आहे. अशा ठिकाणी शाळेतील मुलांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करावा. पुढची पिढी घडवण्यासाठी ते आवश्यक आहे. मुलांना पुस्तके वाचायला द्या, त्यांना त्यात काय आवडले याचे रसग्रहण करायला सांगा तरच वाचनाचे अपेक्षित हेतू साध्य होतील.
विजय जोशी
यावेळी वासंती मेरू, रवी बावडेकर, संजय पोळ, नथुराम कुंभार, एकनाथ पाटील, शाहीर पाटील, आर. बी. कोकाटे, डॉ. स्वाती पाटील, अनिल पाटील, संजय नायकवडी, अमृता पवार, सुरेश कुलकर्णी, वसुधा माने, कृष्णा जाधव, विक्रम जाधव, अर्जुन गायकवाड, संजय माने, सुरेश मुळीक, प्रथमेश पाटील, उत्तम सावंत, सुधाकर इनामदार, दिलीप गिरीगोसावी, शिवाजी पाटील, तानाजी नांगरे, भगवान पाटील, विनायक कुलकर्णी, शंकर पाटील, सुहास थोरात, सिंधुताई कचरे, भारती पाटील, प्रा. दीपक स्वामी, शांताराम देशमाने, मयू आनंदराव, महादेव हवालदार, अमर पाटील आदींनी कविता सादर केल्या. मनीषा रायजादे, विद्या पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शंकर पाटील यांनी आभार मानले. अध्यक्ष मेहबूब जमादार, आनंदहरी, एम. एम. जमादार, पंडित लोहार, व्ही. व्ही. गिरी, सूर्यकांत शिंदे, विनायक कुलकर्णी, दिलीप गिरीगोसावी, सिंधुताई कचरे, शंकर पाटील उपस्थित होते.
काल्पनिकपेक्षा वास्तववादी लिहिले तरच ते लोकांपर्यंत पोहोचते – वासंती मेरू
दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक वासंती मेरू यांची मुलाखत झाली. काल्पनिक लिहिण्यापेक्षा वास्तववादी लिहिले तरच ते लोकांपर्यंत पोहोचते. आपलं घर उजाड झालं तरी आपलं कुणी नसतं, याची प्रकर्षानं जाणीव झाली. त्यानंतर रडून चालणार नाही, लढावं लागेल हे लक्षात घेऊन संघर्ष केला, असे मत त्यांनी मांडले. कवयित्री डॉ. स्वाती पाटील आणि रवी बावडेकर यांनी मुलाखत घेतली.
मेरू म्हणाल्या, “आपल्यावर झालेला अन्याय हीच खरी प्रेरणा असते. सासरी गेल्यावर झालेल्या कुचंबनेतून मी नवऱ्याच्या निधनानंतर सावरले. पहिला काळीजखुणा हा संग्रह वैयक्तिक दुःखातून आला. समाज आणि दुःख हेच खरे माझ्या लेखनाचे प्रेरणास्थान आहे. लेखन दर्जेदार असेल तर सन्मान मिळतो.
आता स्त्रिया चांगले लिहू लागल्या आहेत. तरुण पिढीत वाढत चाललेली विकृती आणि महिला आजही सुरक्षित नाहीत याचे दुःख आहे. चारित्र्य चांगले असेल तरच समाजाला भिडण्याची ताकद आपल्यात निर्माण होते. सुमती क्षेत्रमाडे आणि शिवाजी सावंत यांचे साहित्य आवडते.
वासंती मेरू, ज्येष्ठ साहित्यिक
दिवंगत कवयित्री शैला सायनाकर यांच्या हृद्य आठवणी त्यांनी सांगितल्या. लुना गाडीवरून केलेला दिल्लीचा प्रवास आणि इंदिरा गांधी यांच्या भेटीच्या प्रसंगाने उपस्थित भारावून गेले. भास्कर माळी यांनी स्वागत केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
