कोईमतूरच्या विकासामध्ये भर टाकणाऱ्या दहा किलोमीटरच्या उड्डाणपुलास गेल्या शतकात होऊन गेलेला एक अवलिया संशोधक, तंत्रज्ञान विकसित करणारे जी. डी. नायडू यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांचा उल्लेख संपत्तीचे निर्माते या विशेषणाने केला जातो. त्यामुळे दिवाळीचे औचित्य साधून आपण अशा प्रकारे लक्ष्मीपूजन करण्याची प्रेरणा घेणे आवश्यक ठरेल. त्यांची ओळख एडिसन ऑफ इंडिया अशीही आहे.
वसंत भोसले, ज्येष्ठ संपादक
कोईम्बतूर हे आपल्या देशाच्या तमिळनाडू राज्यातील चेन्नई खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. जिल्ह्याचे मुख्यालय आहे. तमिळनाडूच्या पश्चिम भागात सह्याद्रीचा भाग असलेल्या अनामलाई आणि निलगिरी पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेले हे शहर आहे. कोईम्बतूरची पालक्काड खिंड तमिळनाडूला केरळ राज्यासोबत जोडते. कोईम्बतूरपासून उटी हे थंड हवेचे ठिकाण केवळ ८५ किलोमीटर अंतरावर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या १० लाख ५० हजार होती. कावेरी नदीच्या खोऱ्यातील या परिसरात उत्तम जमीन आहे.
कावेरी नदीवर शेजारच्या सेलम जिल्ह्यात मुत्तुर येथे १९२५ मध्ये मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली. धरणाचे बांधकाम मुख्य अभियंता व्हिन्सेंट हार्ट या आयरिश अभियंत्यांच्या देखरेखीखाली करण्यात आले. धरण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नऊ वर्षे लागली. ४८० कोटी रुपये खर्च आला. ९३.५० टीएमसी पाणी साठा असलेले हे धरण म्हणजे कोईमत्तूर परिसरातील एक मोठी हरित क्रांतीच होती. वीस जिल्ह्यातील २१ लाख ४६ हजार एकर शेती सिंचनाखाली आली आहे कापूस आणि ऊस ही मुख्य पिके आहेत. पाणीपुरवठा केला जातो. कापूस उत्पादनामुळे आणि मोठ्या प्रमाणावरील वस्त्रउद्योगामुळे कोईम्बतूरला दक्षिण आशियाचे मॅंचेस्टर असे म्हटले जाते. स्वातंत्र्यानंतर कोईम्बतूरचे झपाट्याने उद्योगीकरण झाले. सध्या ते भारतामधील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या शहरांपैकी एक मानण्यात येते.
कोईम्बतूर शहराची आठवण येण्याचे कारण वेगळेच आहे. या शहराची प्रगती आणि या शहराच्या संपत्ती निर्मितीमध्ये काही प्रमुख लोकांचे खूप मोठे योगदान आहे. कोईम्बतूर परिसराला त्यांनी संपन्न बनवले. कावेरी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या या शहराच्या प्रगतीची वाटचाल ही जवळपास दीडशे वर्षाहून अधिक आहे. प्रसिद्ध ब्रिटिश अधिकारी सर रॉबर्ट स्टेन्स यांनी १८६६ मध्ये कोईम्बतूर नगरपालिकेची स्थापना केली. त्यांनी या शहराच्या विकासाला प्रारंभ केला असे मानले जाते. त्यांच्या बरोबरच एस. एम. श्री रामरामलू नायडू यांनी चित्रपट उद्योगाची सुरुवात केली. सेंट्रल स्टुडिओची स्थापना त्यांनी केली होती. नारायणस्वामी नायडू आणि डी. बाल सुंदरम नायडू यांनी फाउंड्रीमध्ये मोठ्या प्रमाणात काम केले. यामध्ये आणखीन एक नाव ठळकपणे नोंदवले गेले आहे ते गोपालस्वामी दोराईस्वामी नायडू उर्फ जी. डी. नायडू यांचे !
नायडू यांचा सन्मान
त्यांचा सन्मान करण्याची संधी तमिळनाडूच्या सरकारने उत्तम पद्धतीने साधली आहे. कोईमत्तूर शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या अविनाशी रस्त्यावरील उड्डाण पुलाचे नामकरण आणि उद्घाटन मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या हस्ते नुकतेच झाले. या उड्डाणपुलाला शहराच्या संपत्ती निर्मितीमध्ये मोलाचा वाटा उचललेले आणि अत्यंत हरहुन्नरी संशोधक जी.डी. नायडू यांचे नाव दिले गेले. अनेक वेळा उड्डाणपूल असो किंवा क्रीडांगण असो ठराविक नाव देण्याची परंपरा आहे. विशेषता राजकीय व्यक्तीचीच नावे दिली जातात. पण नायडू यांचे ५१ वर्षापूर्वी निधन झाल्यानंतरही त्यांचे स्मरण ठेवून नामकरण करण्यात आलेले आहे. या समारंभास जीडी नायडू यांचे चिरंजीव जी.डी. गोपाळ आणि नातू जी.डी. राजकुमार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री ई. व्ही.वेली उपस्थित होते. कोण आहे ही व्यक्ती..? या व्यक्तीचे वैशिष्ट्य काय…? आणि त्यांनी कोईमत्तूर शहरासाठी काय केले..? याचा दिवाळीनिमित्त धांडोळा घेणे खूप आनंददायी आहे.
दिवाळीनिमित्त आपण श्री लक्ष्मीची पूजा करतो आणि धनसंपत्तीची अपेक्षा करतो धनसंपत्ती निर्माण करण्यासाठी खूप मोठी एक प्रक्रिया असते. समाजाची वाटचाल त्या दृष्टीने चालू असते. उत्पादनाची साधने दिवसेंदिवस बदलत असतात आणि या उत्पादनाच्या साधनांच्या मदतीने आपण संपत्ती निर्माण करतो. नायडू यांनी हेच काम शंभर वर्षांपूर्वी तंत्रज्ञानाच्या साह्याने आणि संशोधनाने सुरू केले आहे. त्यामुळे दिवाळीच्या निमित्त अशा संपत्ती निर्माण करणाऱ्या व्यक्तीची ओळख करून घेणे. हे उड्डाणपुलाला त्यांचे नाव देण्याचे निमित्त झाले. तमिळनाडू सरकारचे खास कौतुक केले पाहिजे की, एखाद्या उड्डाणपुलाला त्या शहराला शोभेल अशा व्यक्तिमत्त्वाचे नाव देणे. हा उड्डाणपूल साधासुधा नसून दक्षिण भारतातील सर्वात मोठा उड्डाणपूल आहे याची लांबी दहा किलोमीटर आहे तो चार पदरी आहे आणि त्या उड्डाणपुलावरून जाताना चार ठिकाणी खाली उतरता येते आणि चार ठिकाणाहून उड्डाणपुलावर चढता येते. कोईमत्तूर या वेगाने वाढणाऱ्या शहराच्या प्रगतीमध्ये या उड्डाण पुलामुळे भरच पडलेले आहे.
जी. डी. नायडू यांचा जन्म २३ मार्च १८९३ रोजी ब्रिटिश भारतातील कोइम्बतूर जवळच्या कलंगल येथे एका तेलुगू शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे बालपण गरिबीत गेले. त्यांना गणित किंवा विज्ञान सारखे विषय सोडून बाकीचे वर्ग आवडतच नव्हते त्यामुळे त्यांनी शिक्षणाकडे फारसे गांभीर्याने पाहिलेच नाही. नायडू यांनी ब्रिटिशांकडून खरेदी केलेले आणि त्यावर असेंबलिंग शिकलेले वाहन मोटारसायकल खरेदी करण्यासाठी पैसे वाचवण्याच्या उद्देशाने नायडू यांनी कोइम्बतूरमधील एका हॉटेलमध्ये सर्व्हर म्हणून काम मिळवले. वाहन मिळाल्यानंतर त्यांनी ते मोडून काढण्यात आणि पुन्हा असेंबलिंग करण्यात वेळ घालवला. नंतर ते मेकॅनिक बनले. त्यांनी १९२० मध्ये ऑटोमोबाईल कोच खरेदी करून त्यांचा वाहतूक व्यवसाय सुरू केला. त्यांनी तो पोल्लाची आणि पलानी दरम्यान चालवला. काही वर्षांत त्यांच्या युनिव्हर्सल मोटर सर्व्हिस (यूएमएस) कडे देशातील सर्वात कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक वाहनांचा ताफा होता. १९३७ मध्ये भारतात उत्पादित होणारी पहिली मोटर जी.डी. नायडू यांच्या कारखान्यात बनवण्यात आली.
तांत्रिक पुनर्रचनाकार
जी. डी. नायडू (गोपालस्वामी दोराईस्वामी नायडू) (२३ मार्च १८९३ – ४ जानेवारी १९७४) हे एक भारतीय तांत्रिक पुनर्रचनाकार आणि औद्योगिक प्रणेते होते. त्यांनी आयात केलेल्या तंत्रज्ञानाचे भारतासाठी व्यावहारिक आणि परवडणाऱ्या नवीन उपक्रमांमध्ये रूपांतरण केले. त्यांना “कोइम्बतूरचे संपत्ती निर्माते” म्हणून संबोधले जाते. भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक मोटरच्या निर्मितीचे श्रेय त्यांना जाते. त्यांचे योगदान प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रात होते. परंतु इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कृषी ( संकरित शेती) आणि ऑटोमोबाईल अभियांत्रिकी या क्षेत्रांमध्ये देखील खूप होते. जी. डी. नायडू यांनी स्वतंत्रपणे चार स्ट्रोक इंजिन विकसित केले. त्यांचे फक्त प्राथमिक शिक्षण होते. परंतु ते एक बहुमुखी प्रतिभा असलेले तंत्रज्ञ होते. त्यांना “चमत्कारिक माणूस” म्हणून देखील ओळखले जाते असे.
हिटलर अवॉर्ड
जर्मनीतील लाइपझिग येथे १९३६ मध्ये झालेल्या प्रदर्शनात रेझर ब्लेडसाठी त्यांनी स्थापन केलेल्या यू.एम.एस. रेझर कंपनीला जर्मनीचे अध्यक्ष ॲडॉल्फ हिटलर यांच्या नावाने असलेले तृतीय क्रमांकांचे पारितोषिक (अवॉर्ड )मिळाले होते. १९२२ मध्ये त्यांनी लंडनमध्ये राजा जॉर्ज पंचम यांच्या अंत्यसंस्काराचे चित्रीकरण केले होते. त्यांची जर्मनीमध्ये अॅडॉल्फ हिटलरशी भेट झाली. नायडू यांच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या भारतीय दिग्गजांमध्ये महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांचा समावेश होता. १९३६ च्या झालेल्या प्रांतीय निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून नायडू राजकारणापासून दूर राहिले. त्यांना रोल्सरॉइस कार भेट देण्यात आली होती आणि त्या काळात ही आलिशान कार त्यांच्याकडे होती. नायडू यांनी १९४४ मध्ये त्यांच्या ऑटोमोबाईल कंपनीतील सक्रिय सहभागातून निवृत्ती घेतली आणि संशोधन शिष्यवृत्ती स्वीकारली. त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि समाजातील वंचित घटकांसाठी कल्याणकारी योजनांसाठी अनुदान यासह अनेक परोपकारी उपाययोजनांची घोषणा केली. १९६७ मध्ये जी. डी. नायडू औद्योगिक प्रदर्शनाची स्थापना झाली.
पॉलिटेक्निक कॉलेज
नायडू यांच्या प्रयत्नांनी आणि देणग्यांमुळे पॉलिटेक्निक कॉलेज, आर्थर होप पॉलिटेक्निक आणि आर्थर होप कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची स्थापना झाली. नंतर हे कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी (GCT) म्हणून ओळखले जाते. तत्कालीन मद्रास प्रांताचे गव्हर्नर आर्थर होप यांच्या नावावरून या कॉलेजचे नाव ठेवण्यात आले. जी.डी. नायडू हे कॉलेजचे प्राचार्य होते. नायडू चार वर्षांच्या अभ्यासक्रमावर समाधानी नव्हते. ते म्हणायचे की, विद्यार्थ्यांसाठी हा वेळेचा अपव्यय आहे. त्यांनी असे सुचवले होते की, एकाग्रतेने समान अभ्यासक्रम शिकवण्यासाठी दोन वर्षे पुरेशी आहेत. तथापि, ब्रिटिश सरकारने त्यांची कल्पना स्वीकारली नाही आणि नायडू यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. कॉलेजच्या मूळ जागेचे नाव होप कॉलेज आजही कोइम्बतूरमध्ये आहे.
४ जानेवारी १९७४ रोजी नायडू यांचे निधन झाले. सर सी.व्ही. रमण यांनी नायडू यांच्याबद्दल म्हटले होते की, “एक महान शिक्षक, अभियांत्रिकी आणि उद्योगाच्या अनेक क्षेत्रातील उद्योजक होते. आपल्या सहकाऱ्यांबद्दल मनात प्रेम भावना असणारे आणि त्यांच्या अडचणींमध्ये त्यांना मदत करण्याची इच्छा असलेले उबदार मनाचे श्री. नायडू खरोखरच लाखो लोकांमध्ये एक माणूस होते. कदाचित हे कमी लेखले जाईल!”
एडिसन ऑफ इंडिया
जी. डी.नायडू यांच्या जीवनावर के रणजीतकुमार त्यांनी एडिसन ऑफ इंडिया- जी.डी. नायडू नावाचा नॉन फीचर माहितीपट तयार केला होता या माहितीपटाला उत्कृष्ट नॉन फीचर प्रवर्गात उत्कृष्ट चित्रपटाचा केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा जी.डी.गोपाळ आणि नातवंडे जी.डी. राजकुमार आणि शांतिनी आहेत. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कोइम्बतूर येथे कायमस्वरूपी औद्योगिक प्रदर्शन भरवतात. त्यांनी १९५० आणि १९६० च्या दशकात अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रात अनेक व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून दिला. जी.डी. नायडू चॅरिटेबल ट्रस्ट देखील स्थापन करण्यात आलेला आहे. या ट्रस्टचे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे घेतले जातात.
जी.डी. नायडू यांनी १९३७ मध्ये डी. बालसुंदरम नायडू यांच्यासोबत भारतातील पहिली स्वदेशी मोटार विकसित केली. या मोटारच्या यशामुळे डी. बालसुंदरम नायडू (ज्यांना टेक्स्टूल बालसुंदरम म्हणून ओळखले जात असे) आणि नंतर लक्ष्मी मशीन वर्क्स (एल.एम.डब्ल्यू) यांनी टेक्स्टूलची स्थापना केली. नायडू यांच्या ‘रसांत’ रेझरमध्ये ड्राय सेल्सद्वारे चालवली जाणारी एक छोटी मोटर समाविष्ट होती. ज्याला हेलब्रॉन म्हणतात. त्यांच्या इतर संशोधानामध्ये सुपर थिन शेव्हिंग ब्लेड, फिल्म कॅमेऱ्यांसाठी अंतर समायोजित करणारा, फळांचा रस काढणारा, रेकॉर्डिंग मशीन आणि केरोसिनवर चालणारा पंखा यांचा समावेश होता. १९४१ मध्ये त्यांनी जाहीर केले की त्यांच्याकडे भारतात फक्त केवळ सत्तर रुपयात पाच व्हॉल्व्ह रेडिओ सेट तयार करण्याची क्षमता आहे. १९५२ मध्ये दोघे बसू शकतील अशी पेट्रोल इंजिन कार (किंमत ₹२००० ) तयार केली. सरकारने आवश्यक परवाना देण्यास नकार दिल्याने उत्पादन नंतर बंद करण्यात आले. त्यांची कल्पकता केवळ यंत्रसामग्रीपुरती मर्यादित नव्हती. त्यांनी कापूस, मका आणि पपईमध्ये संशोधन केले. नव्या संकरित जातींचा शोध लावला. त्यांच्या त्यांच्या या शोधून तिकडे पाहून सर सी. व्ही. रमन आणि सर एम. विश्वेश्वरय्या यांनी त्यांच्या शेतीला भेट दिली होती.
अकरा तासात घर..!
घराचा पाया खाण्यापासून घर पूर्ण करेपर्यंत न थांबता काम करून त्यांनी अकरा तासात घर बांधले होते. घराच्या बांधकामाची सुरुवात सकाळी ६ केली. संध्याकाळी पाच वाजता घर पूर्ण झाले. तमिळनाडू सरकारने जीडी नायडू यांचे स्मरण ठेवून शहराच्या अजूनही आधुनिकीकरणास हातभार लावणाऱ्या शहराच्या आधुनिकीकरणात भर घालणाऱ्या अविनाशी मार्गावरील दहा किलोमीटरच्या उड्डाणपूल त्यांचे नाव देऊन एक उत्कृष्ट पांडा पाडलेला आहे पायंडा पाडलेला आहे शिवाय कोईमतूरच्या विकासामध्ये योगदान दिलेल्या व्यक्तीचा हा सन्मान देखील आहे संपत्तीचे निर्माते या विशेषणाने त्यांचा उल्लेख केला जातो त्यामुळे दिवाळीचे औचित्य साधून आपण अशा प्रकारे लक्ष्मीपूजन करण्याची प्रेरणा घेणे आवश्यक ठरेल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
