शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सूर्यप्रकाशातून ऊर्जा, शेतीला नवी शक्ती !

अॅग्रीव्होल्टाइक्स तंत्रज्ञानातून एकाच जमिनीवर पीक उत्पादन आणि सौरवीज निर्मिती शक्य; शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच हवामानातील अनिश्चिततेचा सामना करण्याची संधी

— प्रल्हाद जोशी, केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री;
शिवराजसिंह चौहान, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री

विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतातील गावांची समृद्धी हा पाया असला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अन्नदात्या शेतकऱ्यांना सक्षम करणे हे सरकारच्या धोरणांचे प्रमुख उद्दिष्ट राहिले आहे. अॅग्रीव्होल्टाइक्स (Agrivoltaics किंवा AgriPV) हे तंत्रज्ञान या उद्दिष्टाला पुढे नेण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून देते. या तंत्रज्ञानामुळे शेतकरी आपल्या जमिनीवर शेती सुरू ठेवतानाच स्वच्छ वीज निर्मितीही करू शकतात.

सिंचनासाठी सौरऊर्जेचा वापर वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या पीएम-कुसुम (PM-KUSUM) योजनेचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. आता या योजनेच्या पुढील टप्प्यात अॅग्रीव्होल्टाइक्ससाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करून सौरऊर्जा निर्मितीला आणखी गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

२१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सातवी जागतिक अॅग्रीव्होल्टाइक्स परिषद आयोजित करण्यात आली. ‘ग्लोबल साऊथला ऊर्जा देणे’ ही या परिषदेची संकल्पना भारताची जबाबदारी आणि भविष्यातील भूमिका अधोरेखित करणारी आहे. कृषी क्षेत्रातील नवकल्पना आणि ऊर्जा संक्रमणाचे लाभ भारतातील अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे आपले ध्येय आहे. देशातील एकूण शेतकऱ्यांपैकी सुमारे ८६ टक्के शेतकरी या गटात येतात.

प्रत्येक पिकामागे अनेक महिन्यांचे कष्ट, गुंतवलेले पैसे आणि कुटुंबाच्या असंख्य अपेक्षा असतात. मात्र, चांगले पीक आले म्हणजे चांगले उत्पन्न मिळेलच, असे नाही. हवामानातील बदल, शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांचा वाढता खर्च आणि बाजारभावातील चढ-उतार यांमुळे शेतकऱ्यांच्या घरगुती अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. या अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांची क्षमता वाढविणे आणि त्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त पर्याय उपलब्ध करून देणे, हे सार्वजनिक धोरणांचे महत्त्वाचे उद्दिष्ट असले पाहिजे.

अॅग्रीव्होल्टाइक्स तंत्रज्ञानामुळे एकाच जमिनीवर शेती आणि सौरऊर्जा निर्मिती एकत्रितपणे करता येते. शेतीला अनुकूल अशी सौरपॅनेलची रचना, त्यांची उंची आणि त्यांच्यातील अंतर यांचे नियोजन करून हे साध्य करता येते. यातून शेतकऱ्यांना वीज निर्मितीच्या माध्यमातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत उपलब्ध होऊ शकतो. डिझेल किंवा विकत घेतलेल्या विजेऐवजी सौरऊर्जेचा वापर केल्यास उत्पादन खर्चातही बचत होऊ शकते.

याशिवाय, सौरपॅनेलमुळे पिकांच्या परिसरात निर्माण होणारे अनुकूल सूक्ष्म हवामान पिकांना उष्णतेचा ताण, दुष्काळ, अतितीव्र सूर्यप्रकाश आणि गारपिटीसारख्या प्रतिकूल परिस्थितींपासून काही प्रमाणात संरक्षण देऊ शकते.

देशांतर्गत सौर उपकरणांचे उत्पादन, पारदर्शक खरेदी प्रक्रिया आणि ऊर्जा पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक यांमुळे या क्षेत्राच्या विकासासाठी भक्कम पायाभूत व्यवस्था तयार झाली आहे. अॅग्रीव्होल्टाइक्समुळे या संधी ग्रामीण अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचू शकतात. सौरपॅनेल बसविणे, त्यांची देखभाल करणे आणि शेतीशी संबंधित सेवा पुरविणे अशा विविध क्षेत्रांत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात.

अॅग्रीव्होल्टाइक्सचा यशस्वी अवलंब करण्यासाठी योग्य पिकांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कमी सूर्यप्रकाशातही चांगली वाढ होणारी, सावलीनुसार स्वतःच्या वाढीच्या स्वरूपात बदल करू शकणारी आणि सूर्यप्रकाशात अधूनमधून घट झाली तरी स्थिर उत्पादन देणारी पिके निवडण्यावर भर दिला पाहिजे.

पिकांची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी योग्य कृषी व्यवस्थापनही आवश्यक आहे. सौरपॅनेलच्या ओळींमधील मोकळ्या जागेत पिकांची लागवड करणे, पुरेसे सिंचन उपलब्ध करून देणे आणि आवश्यक पोषकद्रव्यांचा पुरवठा करणे या बाबींकडे लक्ष द्यावे लागेल. पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी सौरपॅनेलची रचना अशा प्रकारे करावी की पिकांच्या पानांपर्यंत साधारणपणे नैसर्गिक सूर्यप्रकाशाच्या किमान ७० टक्के किंवा त्याहून अधिक प्रकाश पोहोचेल. सूर्यप्रकाशाबाबत संवेदनशील असलेल्या पिकांच्या वाढीच्या विशिष्ट टप्प्यांमध्ये समायोजित करता येणाऱ्या सौरपॅनेलमुळे अधिक लवचिकता मिळू शकते.

यासाठी कृषी आणि ऊर्जा विभागांनी परस्पर समन्वयाने नियोजन करणे आवश्यक आहे. राज्य सरकारे, संशोधन संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनीही या प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे. कारण या सर्व निर्णयांचा प्रत्यक्ष परिणाम एकाच शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला अनुभवावा लागतो. त्यामुळे आपल्या संस्था आणि यंत्रणांनीही एकत्रितपणे काम करण्याची क्षमता विकसित केली पाहिजे.

या संपूर्ण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी शेतकऱ्यांचा विश्वास असला पाहिजे. शेतकऱ्यांना प्रकल्पासंबंधीचे करार सहज समजले पाहिजेत. त्यातून किती उत्पन्न मिळू शकते, कोणत्या जबाबदाऱ्या कोण पार पाडणार आणि कोणत्या अटी लागू असतील, याची स्पष्ट माहिती त्यांना मिळाली पाहिजे. जमिनीच्या मालकीचे हक्क सुरक्षित राहिले पाहिजेत. त्याचबरोबर भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि महिला शेतकऱ्यांनाही प्रकल्पांची आखणी व लाभांच्या वाटपात सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे.

अॅग्रीव्होल्टाइक्स क्षेत्रात पुढे जाण्यासाठी भारताकडे आधीपासूनच उपयुक्त अनुभव उपलब्ध आहे. जोधपूर येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) केंद्रीय शुष्क क्षेत्र संशोधन संस्थेने सौरऊर्जा निर्मिती आणि पावसाच्या पाण्याचे संधारण यांच्यासोबत पीक लागवडीच्या शक्यतांचा अभ्यास केला आहे. पुण्यातील बायफच्या (BAIF) ग्रामीण नवोपक्रम केंद्रात विविध पिकांसाठी सौरपॅनेलच्या वेगवेगळ्या रचनांची चाचणी घेतली जात आहे.

२०२५ मध्ये भारत सरकारने नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्था (ICAR-IARI) येथे १०० किलोवॅट क्षमतेचे अॅग्री-फोटोव्होल्टाइक्स उत्कृष्टता केंद्र (Centre of Excellence — CoE) स्थापन केले आहे. हे केंद्र भारतीय कृषी संशोधन परिषद आणि राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थेच्या (NISE) संयुक्त नेतृत्वाखाली, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे.

या केंद्रातून पुढील दोन वर्षांत संकलित होणाऱ्या माहितीचा उपयोग कोणती पिके या तंत्रज्ञानासाठी अधिक योग्य आहेत, कोणत्या परिस्थितीत त्यांची उत्पादकता टिकून राहते आणि शेती व सौरपॅनेल यांचे एकत्रीकरण कोणत्या पद्धतीने करावे, याबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी होणार आहे. त्यामुळे अॅग्रीव्होल्टाइक्सच्या विस्तारासाठी अधिक शास्त्रीय आणि अनुभवाधारित निर्णय घेता येतील.

जागतिक अॅग्रीव्होल्टाइक्स परिषदेच्या आयोजनामुळे आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक समुदायाला भारताच्या या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत आहे. सौर तंत्रज्ञानातील प्रगतीइतकेच कमी खर्चात उभारता येणाऱ्या रचना आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडणारी वित्तीय व्यवस्था यांनाही महत्त्व दिले पाहिजे.

भारत आणि फ्रान्स यांच्या पुढाकारातून स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (International Solar Alliance) सौरऊर्जेच्या क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी भक्कम पाया उपलब्ध करून देते. अॅग्रीव्होल्टाइक्समुळे या सहकार्याला आणखी व्यापक स्वरूप देण्याची संधी आहे. संयुक्त क्षेत्रीय संशोधन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभवांची देवाणघेवाण यांमधून अनेक देशांना लाभ होऊ शकतो.

जमीन, पाणी आणि ग्रामीण उत्पन्न यांवर वाढता ताण असलेल्या देशांना त्यांच्या स्थानिक परिस्थितीनुसार विकसित केलेल्या उपाययोजना उपलब्ध झाल्या पाहिजेत. भारतातील शास्त्रज्ञ, सौर उपकरणांचे उत्पादक आणि ग्रामीण उद्योजक या जागतिक प्रयत्नांमध्ये महत्त्वाचे योगदान देऊ शकतात.

नवी दिल्लीत जगभरातील प्रतिनिधींचे स्वागत करताना आमच्या अपेक्षा स्पष्ट आणि व्यावहारिक आहेत. या परिषदेतून अधिक चाचण्या व संशोधनांवर आधारित प्रकल्प विकसित व्हावेत, ज्ञानाची देवाणघेवाण करणाऱ्या भागीदारी निर्माण व्हाव्यात आणि शेतकऱ्यांना विश्वासार्ह वाटतील अशा व्यावसायिक व्यवस्था आकाराला याव्यात.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना समृद्धीच्या नव्या स्रोतांमध्ये सहभागी होण्याचा आत्मविश्वास आणि आवश्यक साधने मिळतील, तेव्हाच विकसित भारताचे स्वप्न अधिक वेगाने साकार होईल. शेतीचा पाया कायम ठेवून आणि अन्नदात्याला केंद्रस्थानी ठेवून अॅग्रीव्होल्टाइक्स तंत्रज्ञान या ध्येयाच्या पूर्ततेत महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

अमेरिका-भारत व्यापार करारावरून किसान सभेचा केंद्र सरकारला इशारा; शेतकरी आंदोलनाची हाक

सोयाबीन, दुग्धव्यवसाय, कापूस आणि फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती; २३ ऑक्टोबरच्या दिल्लीतील मोर्चात…

1 hour ago

मराठीचा गौरव, विचारांचा वारसा; सयाजीराजांच्या भूमीतून साहित्यसंस्कृतीचा जागर!

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा गौरवशाली वारसा जपत नव्या पिढीशी साहित्याचे नाते अधिक दृढ करण्याचा…

11 hours ago

‘दयवाराचे दिवस’ : मनाच्या तळाशी साठलेल्या आठवणींचा हळुवार गंध!

तळ ढवळून निसर्गाच्या कुशीत दवबिंदू होऊन विसावलेलं ‘दयवार’ म्हणजे केवळ धुकं नव्हे, तर बालपणीच्या आठवणी,…

1 day ago

राजेशाही थाट, दूरदृष्टी अन् लोककल्याणाचा ध्यास ! राजर्षी शाहू महाराजांच्या आठवणींना उजाळा

अंगावर राजेशाही पोशाख, गळ्यात अलंकारांची माळ, हातात तलवार आणि चेहऱ्यावर करारी व्यक्तिमत्त्वाची छाप… हे केवळ…

1 day ago

मुलींच्या शिक्षणासाठी कायदा, शिष्यवृत्ती अन् संघर्ष! शाहू महाराजांची क्रांतिकारी दूरदृष्टी

स्त्रीला शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवून समाजात समानतेचा अधिकार मिळवून देणे, ही राजर्षी शाहू महाराजांच्या समाजसुधारणेची…

1 day ago

संसाराला तिलांजली देणारे विश्वरूप माधवाचे दर्शन !

तीर्थक्षेत्री स्नान करून शरीर शुद्ध होते; पण सद्भाव, भक्ती आणि आत्मज्ञानाच्या संगमात डुबकी घेतली की…

2 days ago