पुस्तकातील लेखांना दिलेली शीर्षके आकर्षक आहेत. उदा. वेडी नव्हे शहाणी बाभूळ, गोड कडुलिंब, कणखर साग, जांभूळ आख्यान, बोर पुराण इत्यादी. प्रत्येक झाडाबद्दल यामध्ये माहिती देताना त्या झाडाची विविध नावे, त्याची उत्क्रांती, वैज्ञानिक माहिती, उपयोग, त्याचे धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक महत्त्व याची विशेष माहिती दिली आहे. त्यामुळे बांधावरचे प्रत्येक झाड आपले होऊन जाते. या ओळखीच्या झाडांच्या आपणास माहीत नसलेलया गोष्टी या पुस्तकात वाचावयास मिळतात.
डॉ. विनोद कांबळे,
म. ह. शिंदे महाविद्यालय,
तिसंगी, ता. गगनबावडा,जि. कोल्हापूर 416206
मोबा. 9850433807
डॉ. व्ही. एन. शिंदे यांची ओळख विज्ञान लेखक, निसर्गप्रेमी, ललित साहित्यिक अशी आहे. त्यांचे या अगोदर एककांचे मानकरी, हिरव्या बोटांचे किमयागार, असे घडले भारतीय शास्त्रज्ञ, आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया, एककांचे इतर मानकरी, कृषी क्रांतीचे शिलेदार, क्रायोजेनिक्स अँड इट्स ॲप्लीकेशन (सहसंपादन), सक्सेस गाईड फॉर एमएचसीइटी (सहलेखन) अशी महत्त्वपूर्ण पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांना राज्य शासनाच्या विज्ञान साहित्याच्या पुरस्काराबरोबरच इतरही महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त आहेत.
डॉ. शिंदे यांचा प्रत्येक लेखन विषय अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगणारा असतो. त्याचबरोबर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला त्यांचे लेखन वाचण्यास जड जात नाही, इतकी साधी सरळ अशी भाषा असते. त्यांच्या प्रत्येक लेखनामागे तो विषय प्रत्येक वाचकापर्यंत पोहोचवण्याचा हेतू असतो. बदलत चाललेले पर्यावरण, प्रदूषण यामुळे मानवी जीवनास होणारा धोका यांचे महत्त्व ओळखून माणसांना सुसह्यपणे जगता यावे, यासाठी लोकापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी त्यांची नेहमी धडपड असते. या धडपडीतूनच ते विज्ञान विषयक लेखन आत्मीयतेने करतात. याच्या पाठीमागे त्यांची जी भूमिका आहे, ती मानवाने निसर्गाशी एकरूप होऊन जीवन व्यतीत करावे. परंतु मानव जर निसर्गावर आक्रमण करत असेल, तर येणाऱ्या सगळ्या संकटांना सामोरे जाण्याची तयारी देखील त्यांने केली पाहिजे, इतके स्पष्ट विचार ते आपल्या लेखातून मांडतात.
‘बांधावरची झाडे’ हे पुस्तक म्हणजे ‘ओळखीच्या झाडांच्या अनोळखी गोष्टी’ अशा स्वरूपाचे आहे. निसर्गामध्ये अनेक प्रकारची झाडे आहेत. परंतु बांधावरच्या झाडांचे महत्त्व काही औरच आहे. आज-काल माणसांच्या स्वार्थातून बांधावरची झाडे नष्ट होत आहेत. त्या झाडांना जपण्यासाठी, त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी, त्या झाडांचा इतिहास, परंपरा, महत्व, उपयोग, औषधी गुणधर्म इत्यादी जाणून घेण्यासाठी ‘बांधावरची झाडे’ वाचणे क्रमप्राप्त आहे. नुसती ही झाडे वाचून फायदा नाही. त्यांचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असा खटाटोप डॉ. शिंदे आपल्या लेखन आणि कृतीतून सातत्याने करतात. त्यामुळेच त्यांना ‘हिरव्या बोटांचे किमयागार’ असे म्हणतात.
हे पुस्तक कवी वसंत आबाजी डहाके यांच्या ‘झाड’ कवितेस अर्पण केलेले आहे. या कवितेमुळेच त्यांना झाडाच्या अनुषंगाने लेखन करण्याची प्रेरणा मिळाली, हे ते निखळपणे कबूल करतात. मराठीतील ख्यातनाम कवी इंद्रजीत भालेराव यांनी दीर्घ अशी प्रस्तावना लिहिली आहे आणि त्यात लेखकाला ‘झाड कवेत घेणारा माणूस’ अशी उपमा दिलेली आहे.
बोर, हादगा, जांभूळ, शेवगा, चिंच, आंबा, आवळा, कडुलिंब, बाभूळ आणि साग अशा निवडक बांधावरच्या दहा झाडांची नेमकी माहिती या ग्रंथात दिलेली आहे. आंबा वगळता प्रत्येक झाडांची माहिती पंधरा ते वीस पानांमध्ये दिलेली आहे. झाडाच्या जन्मापासून, ते त्याचा जगभर प्रवास कसा झाला आहे, हे सांगताना त्याचे पर्यावरणीय महत्त्वही विशद केले आहे.
‘बोरपुराण’ या लेखात रानमेवा म्हणून या झाडाला ओळखले जाते. बोराला विविध भाषेमध्ये विविध नावाने ओळखतात. त्याची माहिती देऊन बोराची वैशिष्ट्ये स्पष्ट केली आहेत. बोराच्या फळांपासून मद्यनिर्मिती, चटणी, कोशिंबिरी, लोणचे इत्यादी पदार्थ बनवले जातात. लहान मुलांचे बोरन्हान परंपरा कशी आहे, हे ते सांगतात. बोरीचे झाड आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे अतूट नाते वर्णन करताना स्वराज्य निर्मितीसाठी ‘बोराच्या झाडाने पालखी अडवून महाराजांना धनाचे भांडार उपलब्ध करून दिले’ अशी ऐतिहासिक माहितीही ते देतात. देशी बोरे आणि अलीकडे बाजारात मिळणारी बोरे यांच्या चवीतील फरकही ते सांगतात.
हादग्याच्या झाडाला अतिशय देखणी फुले येतात. या फुलांच्या भाजीची चव मांसाहार विसरायला लावते. अनेकांना या झाडाविषयी माहिती नाही. या झाडाचे पदार्थ आणि मानवी आरोग्यासाठी याची उपयुक्तता याबद्दल आपणाला माहिती असू नये, पुस्तक वाचताना याचे आश्चर्य वाटते. काही ठिकाणी ‘हादगा’ उत्सव म्हणून साजरा केला जातो. या झाडाला हेथ, अगाथी, ककनतुरी, अगासे, बकफुल, अविसी नावाने ओळखले जाते. याचे वर्णन करताना पोपटी रंगाच्या शेंगा मन आकर्षून घेतात. हादगा हा उत्सव आणि हादग्याचा पाऊस या नावाशी काहीतरी साम्य असावे, इतका तो बहुगुणी आहे.
‘जांभूळ’ आख्यान’मध्ये ‘फळांचा राजा आंबा असेल, पण झाडांचा राजा जांभूळच’ असे सांगतात. जांभळे मधुमेहींसाठी खास गुणकारी मानली जातात. फळे मधुर, फुले अतिसुंदर असतात. जांभळाचे वैशिष्ट्य सांगताना जांभूळ खाल्ल्यानंतर त्याचा जिव्हेला लागलेला रंग खूप काळ टिकतो आणि यामुळे झालेली फजितीही लिहितात. जांभूळ रक्त शुद्ध करते. साखर वाढीवर उपाय ठरते शिवाय याच्या पानांमध्ये ‘ई’ जीवनसत्व असते. त्याचा चित्रपटातही उल्लेख येतो ‘जांभुळ पिकल्या झाडाखाली…’ अशा गाण्यांच्या उल्लेखाबरोबर लेखकाने आपल्या लहानपणीच्या आठवणी जागृत केलेल्या आहेत.
शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या नाहीत, असा माणूस भेटणे आपल्याला दुर्मिळच म्हणावे लागेल. हे झाड सर्वत्र दिसते. त्याच्या शेंगांची भाजी केली जाते. काही भागात शेवग्याच्या पानांचीही भाजी करतात. याचे साल, मूळ, शेंग, पानांचे औषधी उपयोग आहेत. या झाडाला आईचे झाड, जादूचे झाड अशीही नावे मिळाली आहेत. शेवगा हे जलद वाढणारे झाड. हे झाड बहुपयोगी असल्यामुळे संधिवातावर उपकारक आहे. मात्र आजही अंधश्रद्धेतून याला अनेकजण ‘दारासमोर नको’, असे म्हणतात. तर दुसरीकडे आज विविध कंपन्या शेवग्यापासून औषध तयार करून बाजारात विकतात. शेवग्याची झाडे आपण लावायला हवीत. मात्र फ्लॅट संस्कृतीमुळे झाड लावणे हे शक्य होत नसले, तरी बाजारात शेवग्याच्या शेंगा दिसल्या की घेतल्याशिवाय मन राहत नाही, इतकी प्रांजळ कबुलीही ते देतात.
‘आंबट-गोड चिंच’ नुसते नाव जरी काढले, तरी तोंडाला पाणी सुटते. हे झाड जनावरांना चारा, माणसाला लाकूड आणि सावलीदेखील देते. चिंचेचे झाड कोणा प्रियकराला चिनार वृक्षाप्रमाणे दिसते. ग.दि. माडगूळकर यांचे हे गीत, महेंद्र कपूर यांच्या आवाजात अजरामर झाले. हे झाड दणकट आणि तपकिरी काळपट टणक बुंधा असणारे असते. चिंचेला इमली, अमलिका, टामारिंग म्हणून ओळखतात. बियाना चिंचोके म्हणतात. चिंचेचे झाड मधमाशांची पोळीही नित्यनियमाने जपते. चिंचेची मुळे खोलवर असतात. खडकाळ आणि कमी पाण्याच्या भागातही ते स्वतःला जिवंत ठेवते.
आबालवृद्धांच्या लाडक्या आंब्याचे वर्णन करायलाही शब्द अपुरे पडावेत, असा हा आम्रराज आहे. भारतीय संस्कृतीमध्ये, साहित्यात याचे प्रतिबिंब अनेक ठिकाणी पहावयास मिळते. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये रखरखत्या उन्हात आंबा खाण्याची मजा काही औरच असते. आंब्याची झाडे बियापासून तयार होतात. आंब्याच्या बियांना कोय म्हणतात. ही झाडे काळ्या आणि लाल मातीत चांगली वाढतात. आंब्याचे स्थान लग्न समारंभापासून ते पूजेपर्यंत सर्वत्र महत्त्वाचे असते. दरवर्षी भारतात साधारणत: आंब्याचे उत्पादन दोन कोटी टनापेक्षा जास्त होते. आयुर्वेदामध्येही आंब्याचे महत्त्व आरोग्यदायी फळ असे आहे. मराठी साहित्यात, चित्रपटात तर आंब्याने आपले अढळ स्थान मिळवले आहे. असा हा बांधावर बहरणारा आंबा खरंच वाचनीय आहे.
‘बहुगुणी, औषधी आवळा’ चिंचेसारखाच आहे. त्याचे नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटते. आवळ्याचा रस, आवळ्याचे लोणचे, मुरंबा करतात. बहुगुणी, औषधी मुळापासून पानापर्यंत याचा उपयोग आहे. आवळा हे पूर्णतः भारतीय मूळ असलेले झाड. कार्तिक महिना सुरू झाला की, आवळ्याची फळे खुणावू लागतात. रान आवळा आणि पांढरा आवळा असे आवळ्याचे दोन प्रकार आहेत. मोरावळा आणि रायआवळा असेही दोन प्रकार आहेत. केसाच्या आरोग्यासाठी आवळ्याचा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. औषधी झाड म्हणून याची ओळख आहे. ‘आवळा देऊन कोहळा काढणे’ हा वाक्यप्रचार ज्या कथेवरून आला आहे ती कथाही सुंदर आली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पत्नीचे नाव आवळी सर्वांना परिचित आहे. त्यामुळे आवळी हे आजही स्त्रियांचे टोपण नाव म्हणून वापरतात. अशा या आवळ्याच्या लहानपणीच्या आठवणी सविस्तर आणि सुंदर पद्धतीने येतात.
‘कडुलिंब’ ही एक औषधी वनस्पती आहे. नावावरूनच याचे फळ कडू चवीचे असणार हे लक्षात आहे. मात्र लेखक याला गोड असे म्हणतात. या वनस्पतीच्या पेटंटचा लढाही लढला गेला. या झाडाच्या कोणताही भाग घेतला तरी तो कडूच असतो. याचे पान, फुल, फळ, मूळ, साल, लाकूड एवढेच काय जाळल्यानंतरची राखही उपयोगाची असते. त्यामुळेच लेखक याला गोड म्हणतो. गुढीपाडव्याच्या सणादिवशी डाळ आणि कडुलिंबाची पाने वाटली जातात. ती एकत्रच खायची असतात. हा पाडवा. दरवर्षी येतो आणि कडुलिंबाची भेट घडवतो. लेखकाला कडुलिंब सज्जन माणसाप्रमाणे उभा असणारा वाटतो. धान्य किडू नये म्हणून पोत्यात, डब्यात किंवा कणगीत भरताना या झाडांची पाने खाली आणि वर ठेवतात. ही पाने बुरशीनाशक आणि जंतुनाशक आहेत. आयुर्वेदामध्ये चरकसंहितेत तर कडुलिंबाला सर्वरोगनिवारक किंवा अरिष्ट म्हटले आहे, इतके कडूलिंबाचे महत्त्व आहे.
बाभूळ म्हटल्यानंतर आपल्यासमोर काटेच काटे येतात. याचे काटे धारदार, टोकदार, सर्वांग पांढऱ्या रंगाने झाकलेले, पिवळसर लाल टोकाचे असतात. ‘काट्याने काटा काढणे’, ही म्हण बाभळीमुळेच आली असल्याचे ते सांगतात. ग्रामीण भागात सगळीकडे वेडी बाभूळ म्हणून हिला ओळखले जाते. सात-आठ वर्षानंतर झाडाला फुले येतात. माणसाला मोहवणारी अशी ही फुले असतात. बाभळीच्या झाडाचे महत्व वसंत बापट यांच्या ‘बाभूळ झाड’ कवितेत आलेले आहे.
“अस्सल लाकूड,भक्कम गाठ
ताठर कणा, टणक पाठ
वारा खात, गारा खात, बाभुळ झाड उभेच आहे”, बाभळीच्या कणखरपणाचे हे वर्णन वाचताना रांगड्या बापाचे दर्शन घडते. बाभळाचे झाड हे खूप उपयोगी पडणारे आहे. फक्त ते काटेरी आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. याची पाने आणि शेंगा जनावरांबरोबर पक्षी तसेच माणसाच्या उपयोगाच्या आहेत. याचे लाकूड सागवानापेक्षाही टिकाऊ असते. हे झाड फक्त बांधावरच नाही तर प्रत्येक ठिकाणी जगवले पाहिजे, अशी प्रामाणिक भावना लेखक व्यक्त करतात.
पूर्वीच्या काळी घर बांधकामासाठी लागणाऱ्या लाकडामध्ये सागवानाची चौकट, दरवाजा, खिडकी, कपाटे यामध्ये सगळ्यात जास्त वापर केला जात असे. घराच्या बांधकामात उपयोग होत असल्याने त्याच्या इतर गुणांकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसते. यामध्ये सागवानाच्या बियांचे तेल, लाकडाचे तेल याची लोकांना माहिती नाही. ‘प्रत्येक शेतकऱ्याने हे झाड बांधावर लावावे आणि आपल्या मुलांचे भविष्य निश्चित करावे’, असा हा वृक्ष आहे. याला असणारी मोठमोठी पाने, येणारा झुबकेदार मोहर, गोट्यासारखी दिसणारी फळे यामुळे याचा तोरा काही औरच असतो. याच्या कोवळ्या पानांना चुरगळले तर हात लाल होतात. सागवानाच्या झाडाला सहा वर्षांनी फुले येतात. याची वाढ खूप जलद गतीने होते. सगळ्या लाकडांमध्ये टिकाऊ लाकूड म्हणून याचा उपयोग केला जातो. त्यामुळे याला ‘लाकडातील सोने’ म्हणतात. लोकसंस्कृतीत याचा वापर काही प्रमाणात झालेला दिसतो. आपण गुलमोहराचे सौंदर्य वर्णन करतो, पण सागाचे का करत नाही? असा प्रश्नही लेखकाला पडतो. त्यामुळे या झाडाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी किती सकारात्मक आहे, हे आपणाला कळून येते.
पुस्तकातील लेखांना दिलेली शीर्षके आकर्षक आहेत. उदा. वेडी नव्हे शहाणी बाभूळ, गोड कडुलिंब, कणखर साग, जांभूळ आख्यान, बोर पुराण इत्यादी. प्रत्येक झाडाबद्दल यामध्ये माहिती देताना त्या झाडाची विविध नावे, त्याची उत्क्रांती, वैज्ञानिक माहिती, उपयोग, त्याचे धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक महत्त्व याची विशेष माहिती दिली आहे. त्यामुळे बांधावरचे प्रत्येक झाड आपले होऊन जाते. या ओळखीच्या झाडांच्या आपणास माहीत नसलेलया गोष्टी या पुस्तकात वाचावयास मिळतात.
पुस्तकाचे हिरव्या रंगातील मुखपृष्ठ आणि त्यावर विविध झाडांचे मनोहरी दर्शन आल्हाददायक वाटते. ख्यातनाम चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी पुस्तकाला साजेसे मुखपृष्ठ तयार केले आहे. पुस्तकाच्या आतमधील मजकुरामध्ये सुप्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. श्री.द. महाजन आणि डॉ. मधुकर बाचुळकर यांच्या प्रतिक्रिया वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत. या पुस्तकाची पाठराखण मराठीतील आघाडीचे समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांनी केली आहे. त्यांनी या ग्रंथाला ‘ज्ञानललित माहितीचा लेखसंग्रह’, लोककथा, गाणी, दंतकथा, मिथके व आधुनिक साहित्यातील ही झाडदर्शने, एका अर्थाने मराठी संस्कृतीत उमटलेले झाडांचे हे बिलोरी रंगछायादर्शन आहे,’ अशी महत्त्वपूर्ण मांडणी केली आहे.
पुस्तकाचे नाव – बांधावरची झाडे
लेखक – डॉ. व्ही. एन. शिंदे
प्रकाशक – मनोविकास प्रकाशन, पुणे
किंमत – २६० ₹
पृष्ठ संख्या – १९८
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
