November 8, 2025
डॉ. मनीषा झोंबाडे यांचा वाचनातून लेखनापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास – मराठी साहित्यातील योगदान, संपादन कार्य आणि पुरस्कारप्राप्त यशाची कहाणी.
Home » वाचनातून लेखणाकडे प्रवास..
मुक्त संवाद

वाचनातून लेखणाकडे प्रवास..

खरं तर माझ्या साहित्य निर्मितीचे प्रयोजन फक्त ‘आनंद’ व उद्धबोधन हेच आहे. वर्तमानपत्रे मासिके नियतकालिके यामधील अनेक छोट्या मोठ्या लेखातून माझ्या लिखाणची सुरवात केली. माझे सर्व लेख वैचारिक तसेच उपदेशपर असत. विशेषतः बरेच लेखांमधून मी तरुण पिढीला आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठीच्या युक्त्या सांगितल्या होत्या.

डॉ. मनीषा जगन्नाथ झोंबाडे
बार्शी, जि सोलापूर
संपर्क 8830079432

‘वाचाल तर वाचाल’ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा मूलमंत्र मी इयत्ता तिसरीमध्ये असताना अंगीकरला. तेव्हापासून मला वाचनाची गोडी लागली. शालेय जीवनामध्ये सहसा मराठी हा सर्वांचाच आवडता विषय असतो. त्याला मीही अपवाद नाही. माझे प्राथमिक शिक्षण नगरपालिकेच्या शाळेमध्ये झालेले. त्या काळामध्ये नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणारे बहुसंख्य विद्यार्थी हे गोरगरीब घरचे असतं. शेतकरी, बांधकाम मजूर, सफाई कर्मचारी तसेच भटक्या विमुक्तांची मुले या शाळेमध्ये असायची. त्यामुळे या आर्थिक कुवत म्हणावी तितकी भक्कम नसायची. या मुलांकडे चांगल्या प्रकारचे कपडे तसेच पुस्तकं, दप्तर नसायचे. दर 14 ऑगस्ट दिवशी शिक्षण अधिकारी तसेच विभागातील काही लोक शाळेला येऊन भेट देत व या मुलांना कपडे व पुस्तके वाटप करीत. मुलं खुश व्हायची. या संपूर्ण शाळेमध्ये मी एकमेव अशी होती की माझे वडील पोलीस खात्यामध्ये नोकरीला होते. सर्व शिक्षकांना माझ्या घरची परिस्थिती माहिती होती. वडिलांच्या सांगण्यानुसार, शाळेमध्ये वाटप केली जाणारे गणवेश व पुस्तके मी कधीच स्वीकारली नाहीत. ती एखाद्या गोरगरीब गरजू मुलाला उपयोगी पडतील असा आमचा विचार असायचा.

मी तर सरकारी नोकराची मुलगी आणि नगरपालिकेच्या शाळेत माझा प्रवेश का घेतला? असा प्रश्न लोकांना पडायचा… पण विद्यादेवतेच्या मंदिरामध्ये सर्वांना समान पद्धतीने शैक्षणिक न्याय मिळतो. उलट खाजगी शाळांमध्ये गरीब श्रीमंत, जातीभेद, अभ्यासातील कमकुवतपणा, बुद्धिमत्ता या साऱ्या समस्यांना त्या काळात सामोरे जावे लागते. शिक्षणाला दिलेला उच्च दर्जा हा खास करून सरकारी शाळांमध्येच पहावयास मिळतो. याची जाण माझ्या वडिलांना होती, त्यांचे शिक्षणही याच शाळेत झाले होते. त्यासोबतच या नगरपालिकेच्या शाळेमध्ये असणारा सर्व शिक्षक वृंद हा माझ्या वडिलांचा शालेय मित्र परिवार. त्यामुळे हे सर्व शिक्षक माझ्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देत असत. तशी मी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार… इयत्ता पहिली मध्ये वर्गात प्रथम क्रमांक आलेली विद्यार्थिनी…वाचन, लेखन व सुंदर अक्षर यामध्ये नेहमी अग्रेसर.. अभ्यासाव्यतिरिक्त सांस्कृतिक महोत्सवामध्ये हा शिक्षक वर्ग मला सहभागी करून घेत होता.

माझे पालक सुशिक्षित व त्यात आर्थिक परिस्थिती इतर मुलांपेक्षा चांगली असल्याने माझ्याकडे अभ्यासाव्यतिरिक्त गोष्टींची खूप सारी पुस्तके असायची. ही सर्व पुस्तक नेहमी माझ्या दप्तरात होती. गोष्टीच्या पुस्तकांबद्दल मुलांना उत्सुकता असायची. जो तो माझ्याशी मैत्री करायचा. मैत्री खातीर ही पुस्तके मी त्यांना वाचण्यास देईन ही भावना त्या लहान मुलांच्या मनात असायची. रोज आम्ही दुपारी अडीच वाजता जेवणाच्या सुट्टीमध्ये पटापट जेवण उरकायचो. आणि पुस्तकातील गोष्टी वाचायचो. मुले जेव्हा या गोष्टी वाचत तेव्हा ते वर्गात येणाऱ्या शिक्षकाला कौतुकाने सांगत. ” गुरुजी, हिच्याकडे गोष्टीची खूप सुंदर सुंदर पुस्तके आहेत त्यातील गोष्टी सांगा ना आम्हाला?” मग गुरुजीही आम्हाला फळ्यावर एखादे गणित सोडवा यास देऊन माझी गोष्टींची पुस्तकं हाताळत.

मला बालवयात या कथा फार आवडायच्या. दिवसेंदिवस माझी वाचनाची ही आवड वाढत गेली. सुलाखे हायस्कूल बार्शी येथे माध्यमिक शिक्षण घेत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, साने गुरुजी, दिलीप चित्रे यांच्या साहित्य वाचनाची मला गोडी निर्माण झाली. अनेक मराठी समाज सुधारक, साहित्यिक यांच्या साहित्य वाचनातून माझ्या बालम मनाला मिळणारे बोध ही मला भविष्यात उपयोगी पडले. इयत्ता दहावी मध्ये असताना आम्हाला इंग्रजी मध्ये एक धडा होता. दिलीप चित्रे यांनी तो मराठीमध्ये भाषांतर केलेला आहे. ‘औरफियस आणि युरिडीस’ यांची प्रेमकथा होती.. ऑल फी असा उत्कृष्ट संगीतकार, त्याच्या संगीताच्या जादूने सर्वांना भुरळ घातलेली, संगीता ऐकण्यासाठी बागेमध्ये सर्व प्राणी एकत्र जमा होतात, सत्य प्राण्यांमध्ये एक सापही तेथे असतो, त्याच सापावर त्याची पत्नी युरीडिस हिचा पाय पडतो व तो साप तिला चावतो, युरेडी मृत्यू पावते. पुढे ओरफिस तिच्या आत्म्याच्या मागे स्वर्गात जातो. पुढे काय झाले? हा प्रश्न सतत सतावत राहिला.

शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना महाविद्यालयाचे भव्य दिव्य ग्रंथालय म्हणजे माझ्यासाठी पुस्तकाचा खजिना.आणि हा खजिना आपण आता मनसोक्त लुटायचा. कारण आमच्या काळात मोबाईलचा जमाना नव्हता. मन रमविण्यासाठी बरीचशी तरुण मुलं-मुली वाचनामध्ये गुंतयची. ग्रंथालयात उपलब्ध असणाऱ्या महात्मा फुले लिखित शेतकऱ्यांचा आसूड ( वैचारिक) आणि डॉ. धनंजय कीर लिखित ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर “(चरित्र) तसेच ताराबाई शिंदे लिखित “स्त्री पुरुष तुलना ” या वैचारिक पुस्तकांनी तर मला अक्षरशा वेडच लावले. किती परखड विचार मांडले या महापुरुषांनी. किती मोठी सत्यता समाजापुढे मांडली होती. खरोखरच हे समाजसुधारक माझ्यासाठी व माझ्यासारख्या कित्येक तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत होते.

माझे वाचन म्हणजे केवळ मराठी साहित्य नव्हते तर इंग्रजी व हिंदी भाषांमधील कित्येक साहित्याची पुस्तकं मी वाचत होते. शाहू फुले आंबेडकर तसेच वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, प्रेमचंद, शेक्सपियर अशा दिग्गज साहित्यिकांच्या साहित्याची वाचन मी करीत होते. बी. ए. पदवीला असताना मराठी साहित्यची इतकी आवड निर्माण झाली की, महाविद्यालयाच्या लायब्ररीत हाती लागणारी मराठी साहित्याची सर्व पुस्तके मी रोजच्या रोज वाचत असे.

एक खास बात इथे आवर्जून सांगावीशी वाटते की माझ्या वाचनाच्या या छंदामुळे माझे पदवी अभ्यासाकडे मुळीच दुर्लक्ष झाले नाही. उलट माझ्या ज्ञानात भर पडत गेली. मराठी साहित्याची जितकी पुस्तक मी वाचली त्याचाच लाभ मला सेट नेट परीक्षेच्या वेळी झाला. परीक्षेमध्ये येणाऱ्या कित्येक कठीण प्रश्नाची उत्तरे मला सहज व अचूकपणे सोडविता आली. पोस्ट ग्रॅज्युएशन पास केल्यानंतर अगदी पहिल्या प्रयत्नातच मी नेट उत्तीर्ण झाले. त्या काळामध्ये नेट-सेट ही परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे फार मोठे यश समजले जाई.

तेव्हापासून मी पुणे गेले की स्वतःसाठी जितक्या पैशाची कपडे खरेदी करायचे तितक्याचं पैशाची पुस्तके ही खरेदी करायचे. आप्पा बळवंत चौक मधील ‘रसिक साहित्य’ हे माझे आवडते पुस्तकांचे दुकान.. आजही या दुकानांमध्ये गेले की मी अनेक पुस्तके खरेदी करत असते. या पुस्तकाच्या सानिध्यात मी स्वतःची सेल्फी काढत असते. कारण मी आजही पुस्तकांवर भरभरून प्रेम करतेय. मराठी साहित्यातील कित्येक पुस्तके आजही माझ्या घरामध्ये माझ्या छोट्याशा ग्रंथालयात संग्रहित करून ठेवलेली आहेत. यामध्ये मराठी साहित्याची जवळपास 700 ते 800 पुस्तकांचा संग्रह आहे. त्यामध्ये कथा, कादंबऱ्या, कविता, आत्मचरित्र, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकाराची पुस्तक उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन साठी उपयुक्त असणारी जवळपास 400 ते 500 सामान्य ज्ञानाची पुस्तके, प्रश्नसंच माझ्या घरी उपलब्ध आहेत. पुस्तक खरेदी करणे हा माझा आवडता छंद..

पुस्तकाच्या सानिध्यात राहून अक्षरांशी मैत्री जमली खरं. या मैत्रीतून मला लेखनाची आवड निर्माण झाली. वाचनाच्या सातत्याच्या सवयीमुळे माझा शब्द संग्रह खूप वाढला. विशेष म्हणजे मला लेखन जमू लागले. त्याचबरोबर मी उत्कृष्ट व्याख्याता म्हणून विद्यार्थ्यांच्या मनावर छाप पाडली. मी उत्कृष्ट प्रकारे लिहू व बोलू शकते हे मला लोकांकडून समजले. सुरवातीला मी छोटे छोटे वैचारिक लेख लिहीत असतं. ते लेख माझी मित्र मैत्रिणी वाचत आणि मला अभिप्राय देत. ते अभिप्राय माझा लेखणाचा उत्साह दुप्पट वाढवीत.

कोरोना काळातील भयाण परिस्थितीने मला मानसिक नैराश्य आले. एकाकीपण माझ्या मनाला कमकुवत करीत होते. माझ्या मनाचा एकाकीपणा व नैराश्य घालविण्यासाठीच मी लेखनासारखा पर्याय निवडला. लेखन करताना मी एका वेगळ्या विश्वात जातेय, त्या विश्वाशी मी खूप एकरूप होते, आणि खरोखर जादूच झाली. माझी नैराश्य व एकाकीपणा कुठे पळून गेला मला समजलेच नाही. आणि त्यातूनच माझ्या हातून एवढी मोठी साहित्य निर्मिती होतोय आणि ते साहित्य निर्मिती बद्दल वाचकांचे कौतुकास्पद अभिप्राय याचा आनंद तर काही औरच होता.

खरं तर माझ्या साहित्य निर्मितीचे प्रयोजन फक्त ‘आनंद’ व उद्धबोधन हेच आहे. वर्तमानपत्रे मासिके नियतकालिके यामधील अनेक छोट्या मोठ्या लेखातून माझ्या लिखाणची सुरवात केली. माझे सर्व लेख वैचारिक तसेच उपदेशपर असत. विशेषतः बरेच लेखांमधून मी तरुण पिढीला आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठीच्या युक्त्या सांगितल्या होत्या.

पर्यटन हा माझा आवडता छंद. माणसांच्या गर्दीत रमण्यापेक्षा निसर्गाच्या कुशीत रमायला मला फार आवडतं. म्हणून मी एका पर्यटन स्थळी मी प्रवास केल्याची कहाणी ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ या प्रवासवर्णनाच्या रूपात मांडली आहे. त्यानंतर अभ्यासकांना व संशोधकांना उपयुक्त असा अभ्यासपूर्ण संदर्भ ग्रंथ ‘ प्रवासवर्णन साहित्य : संकल्पना, स्वरूप व व्याप्ती’ हा ग्रंथ देखील मी लिहला. मराठी भाषेवर असणाऱ्या निस्सीम प्रेमामुळे मी साहित्य सेवेचे कार्य हाती घेतले.

मराठी विषयाचे मी करीत असलेले उत्कृष्ट अध्यापन तसेच साहित्यसेवा या कार्याची दखल घेऊन अहिल्यानगर येथील श्रीराम तालुक्यातील टाकळीभान येथील एका संस्थेने मला ” उत्कृष्ट मराठी अध्यापन कार्य व साहित्य सेवा” 2024 या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले. अण्णा भाऊ साठे हे मराठी साहित्यातील कोहिनुर. मराठी भाषेला सात समुद्र पलीकडे घेऊन जाणारे ते पहिले मराठी साहित्यिक आहेत. त्यांच्या साहित्याची नव्याने समीक्षा व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी अनेक प्राध्यापक व अभ्यासकांना तसेच संशोधकांना अण्णा भाऊ साठे यांच्या समग्र साहित्यावर शोधनिबंध लिहिण्यास प्रवृत्त केले ते माझ्या संपादित पुस्तकांमधून. ‘अण्णा भाऊ साठे समग्र साहित्य व चिंतन’ हा तब्बल साडेतीनशे पानांचा संपदित ग्रंथ देखील मी प्रसिद्ध केला आहे. वाचकांच्या पसंतीस उतरलेला हा ग्रंथ एक उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ म्हणून नावारूपास आला आणि मातंग साहित्य परिषद यांच्या वतीने देण्यात येणारा “अण्णाभाऊ साठे उत्कृष्ट वाड्मय राष्ट्रीय पुरस्कार 2024” या ग्रंथास प्राप्त झाला.

राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त संपादित केलेला “राजश्री शाहू महाराज : सामाजिक न्यायाची भूमिका” या ग्रंथांच्या माध्यमातूनही मी अनेक नवसंशोधकांना व अभ्यासकांना लेखनास प्रवृत्त केले. या शोधनिबंधातून राजश्री शाहू महाराज यांच्या समग्र सामाजिक कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. या ग्रंथासाठी लेखन पाठविण्याचे आव्हान मी संपूर्ण महाराष्ट्रातील लेखकांना व नव संशोधकांना केले असता योगायोगाने जून 2024 मध्ये छत्रपती संभाजी नगर येथे राजश्री शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्कारासाठी माझी निवड झाली 29 जून 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मला हा पुरस्कार देण्यात आला. अशा सन्मानाने व पुरस्काराने माझ्या लेखनाचा व संपादन कार्याला गती मिळत आहे. ग्रामीण साहित्यावर माझे आगामी संपादित पुस्तक येत आहे. तसेच गंगाधर गाडगीळ यांच्या निवडक प्रवास वर्णनांचे पुस्तकाचे सध्या लेखन करीत आहे. येत्या जानेवारीपर्यंत ही दोन पुस्तक पूर्ण होतील.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading