आयुष्यातील काही धडे जसे आपण शाळेतून शिकतो, तसें काही धडे निसर्गातून ही शिकत असतो. ते धडे घेण्यासाठीच तर घराच्या चार भिंती ओलांडून बाहेर पडायचे असते. तेव्हाच कुठं निसर्गाचं अमाप सौंदर्य आणि अतुलनीय प्रेम अनुभवायला मिळते. खरंच निसर्ग मानवास खूप काही देतो, पण आजचा मानव हा निसर्ग संपत्तीकडे दुर्लक्ष करुन भौतिक सुखाच्या मागे लागला आणि आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य हरवून बसला. निसर्ग दर्शनामुळे खरोखरच आपली सकारात्मक ऊर्जा वाढते परिणामी आपले शारीरिक स्वास्थ्यही निरोगी राहते. हा माझा वैयक्तिक अनुभव..म्हणून तर निसर्गाच्या सानिध्यात, सुखाच्या मिठीत, एका मस्त प्रवासात मी ह्या सुंदर पाणस्थळी आले आहे. हे पाणस्थळ माझ्यासाठी तसें नवीन नाही, कित्येक वेळा बार्शी वरून पुण्याला जाताना सोलापूर-पुणे हा रस्ते महामार्ग असो अथवा कुर्डुवाडी-दौंड हा रेल्वे मार्ग असो कितीही नाही म्हटलं तरी या स्थळाचे चौफेर दर्शन घडतेच….
डॉ. मनीषा जगन्नाथ झोंबाडे
बार्शी, जि. सोलापूर, संपर्क : 8830079432
सोलापूर-पुणे एनएच -६५ या राष्ट्रीय महामार्गावर फ्लेमिंगो या पक्षासाठी प्रसिद्ध असलेले भिगवण पक्षी अभयारण्य, ( bhigvan bird Sactuary ) या ठिकाणाला मी दरवर्षी नित्यनियमाने भेट देते. तसे पाहता हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे आहे. पुण्यापासून सोलापूरच्या दिशेला ९५ किमी अंतरावर आहे. भिगवण हे गाव या महामार्गावरील प्रमुख व मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असल्याने तेथे नेहमीच लोकांची व वाहनांची गर्दी असते. विशेष हे पुनर्वसित गाव आहे. उजनी धरणाचा पाणीफुगटा गावालगत आहे. याच धरणाच्या परिक्षेत्रामध्ये हे एक अतिशय महत्त्वपूर्ण पर्यटन केंद्र आहे. जे पर्यटन केंद्र भिगवन बर्ड सेंचुरी या नावाने ओळखले जाते. पुणे जिल्हा वनविभागाच्या हद्दीमध्ये ते येते. विविध प्रकारच्या पक्षांसाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. हे पक्षी अभयारण्य म्हणजे पक्षीनिरिक्षकांसाठीएक संशोधनाचे ठिकाणच. नाना प्रकारचे पशुपक्षी येथे पहावयास मिळतात म्हणून या अभयारण्यपरिक्षेत्रास महाराष्ट्राचे भरतपूर असे देखील म्हटले जाते.
भिगवण हे इतर पशुपक्ष्यांप्रमाणेच विशेषतः फ्लेमिंगोंसाठी प्रसिद्ध आहे. डिसेंबरची कडाक्याची थंडी त्यात नदीच्या पात्रावर जमा झालेले पांढरीशुभ्र धुके आणि भल्या मोठ्या पाण्याचा जाणवणारा गारवा हे सगळं अनुभवताना मन अगदी रोमांचित होते. वास्तविक पाहता या ठिकाणाशी माझा ऋणानुबंध, काही आठवणी आहेत. आपल्या काही गोड स्मृतींमुळे त्या स्थळाबद्दल जास्तच आकर्षण आहे. दरवर्षी डिसेंबर सुरू झाला की, या स्थळी पर्यटन करण्यासाठी माझा ओढा असतो. कारण मला एकांत फार आवडतो. माणसांपेक्षा निसर्गाच्या सानिध्यात रमायला आवडते.
भिगवण पासून जवळच म्हणजे सोलापूर हायवेच्या पूर्व बाजूस पाच किमी अंतरावर आतील बाजूस ‘कुंभारगाव’ हे छोटस गाव डोंगर व नदीच्या किनाऱ्यांनी वेढलेले आहे. या गावातूनच या पक्षी अभयारण्यकडे वाट जाते. उजनी धरणाच्या परिक्षेत्रामध्ये हे पक्षी अभयारण्य असून ते पाहण्यासाठी नावेतून किंवा होडीतूनच जलप्रवास करावा लागतो. हे ऐकून माझ्या काळजात धसधस्स झालं. मला पाण्याची प्रचंड भीती वाटते. क्षणभर वाटले कुठून आपल्याला इथे येण्याची दुर्बुध्दी सुचली. वास्तविक पाहता मला पोहता येत नाही, पण हा प्रवास तर आपल्याला पाण्यातून करायचाय त्यामुळे फार अस्वस्थ वाटत होत. साध्या पाण्याच्या डबक्यात जरी उडी टाकायची म्हटलं तरी मी फार विचार करते. पण या ठिकाणाचे वैशिष्ट्य असे की आपण इथे कितीही घाबरलो तरी येथील नावाडी लोक आपल्याला लाइफ जॅकेट परिधान करावयास देतात. ते आपल्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असतात. त्यांनी माझ्यासोबत सर्व सहप्रवाशांना लाईफ जॅकेट परिधान करावयास देऊन आमचे मनोधैर्य वाढवले. ते त्यांच्या जीवाची परवा न करता येणाऱ्या पर्यटकांच्या जीवाची काळजी घेत असतात. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ते सदैव तत्पर असतात.
आम्ही सर्वांनी लाइफ जॅकेट परिधान करून तीन चार प्रवाशांसोबत मीही पटकन नावे मध्ये बसले. आता खऱ्या अर्थाने आमचा जलप्रवास सुरू झाला होता. सहप्रवाशांच्या लहान मुलांना या जलसफरीची मजा वाटू लागली. मुले टाळ्या वाजवू लागले, कोणी शिट्या फुंकू लागले. नावेमध्ये एकच गलका सुरू झाला. फ्लेमिंगो..! फ्लेमिंगो..! फ्लेमिंगो या विदेशी पाहुण्यांचे दर्शन आपणास होणार हा एकच विचार अंतर्मनात घोळत होता. त्यामुळे इतका वेळ वाटणारी पाण्याची भीती केव्हा नाहीशी झाली हे मला समजले सुद्धा नाही. नाव संथ गतीने हळूहळू पुढे जात होती. आजूबाजूला फक्त निळ्याभोर आकाशाचे प्रतिबिंब पाण्यात उमटल्याने पाणी निळे भोर दिसत होते. जणू काही समुद्रातूनच आपण प्रवास करतोय असे भासू लागले. मनामध्ये फक्त एक अनामिक ओढ होती. विदेशी पाहुण्याला भेटण्याची उत्सुकता होती. आत्तापर्यंत ‘फ्लेमिंगो’ या विदेशी पक्षाबद्दल फक्त ऐकले होते, वाचले होते. पण आज मात्र प्रत्यक्षात फ्लेमिंगो मला भेटणार या आतुरतेने माझे मन सुखावले होते.
भौगोलिक दृष्ट्या या स्थळाचा विचार करता हे स्थळ पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी ऑक्टोबर – नोव्हेंबर ते फेब्रुवारी – मार्चपर्यंत येथे देश विदेशातील विविध प्रकारच्या पक्षांचा मेळावा भरलेला असतो. या मेळाव्यातील पक्षांचे दर्शन नाव किंवा होडी मध्ये बसून दुर्बिणीच्या साहाय्याने केले जाते. आमची नाव जसजशी पुढेजाऊ लागली तस तसे नदीच्या पात्रामध्ये मोठमोठाली काटेरी झुडपे, अर्धवट पाण्यात बुडालेली मोठं मोठी झाडे दिसू लागली. त्या झाडांवर फ्लेमिंगो पक्षांचे असंख्य थवे बसलेले होते. विशेष म्हणजे या पक्षांनी भरलेल्या झाडांचे प्रतिबिंब पाण्यामध्ये पडले होते. देशभरातील विविध प्रजातीच्या पक्षांनी येथे हजेरी लावलेली होती. त्यामुळे या परिसरात पक्षांचे संमेलन भरले आहे असेच वाटत होते. हे सर्व पक्षी पाहून सोनूच्या तोंडातून जोर जोरात शब्द बाहेर पडले, ” woww….flemingo flemingo… Beautiful flemingo” फ्लेमिंग दिसल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर उमटला होता. फ्लेमिंगोच्या दर्शनाने तिला काव्य स्फूर्ती झाली किती मोठा योगायोग…. मला वाटले तिने हे गीत कुठे तर ऐकले असेल आणि तेच शब्द लक्षात ठेवून ती आज इथे गात आहे. परंतु माझे मत चुकीचे निघाले. ज्यावेळी या काव्याबद्दल मी तिला विचारले त्यावेळी ती मला म्हणते, ” अगं मी सहज म्हणाले, फ्लेमिंगो सुंदर दिसतात ना ! म्हणून मी त्यांना ब्युटीफूल, ब्युटीफूल असे म्हटले.”
या ठिकाणी फ्लेमिंगो या पक्षांसोबत इतर हजारो जातीचे पक्षी पहावयास मिळतात. पण सोनूच्या बालबुद्धीच्या दृष्टीने हे सगळे फ्लेमिंगो पक्षीच होते. त्यामुळे ती दिसेल त्या पक्षाला ‘फ्लेमिंगो’ असे म्हणायची. या बालिशपणाचे लोकांना हसू यायचे.
या पक्षी अभयारण्याचे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे येथील हजारो पक्षांच्या प्रजातींमध्ये ‘फ्लेमिंगो’ ही प्रजाती विशिष्ट महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण मुळात हा पक्षी विदेशी आहे, अन्नाच्या शोधार्थ तो भारतामध्ये पाणथळी जागी येतो. भिगवन या गावाला भीमा नदी वरदायिनी ठरलेली असल्याने फ्लेमिंगो हे पक्षी भिगवण या ठिकाणी दरवर्षी मुक्कामी असतात. भारतातून कितीतरी पक्षी संशोधक या ठिकाणाला भेटी देतात. फ्लेमिंगो या पक्षाची रचना त्याच्या प्रजाती याविषयी जर सांगावायचं झाले तर फ्लेमिंगो ला मराठीत ‘रोहित पक्षी’ अशी ओळख आहे. फ्लेमिंगो पाणी असणाऱ्या ठिकाणी राहणे पसंत करतो म्हणून त्यास पाणपक्षी असेही म्हटले जाते. या पक्षांची शरीर रचना आकर्षक व सुबक असते. विशेष म्हणजे या पक्षाचा आकार मोठा असतो.. ते मोठे का दिसतात तर त्याच्या लांब मानेमुळे, पाय एकदम काठी सारखे, आणि पंखाचा रंग तर गुलाबी किंवा लाल…फ्लेमिंगोचे पाय त्यांच्या शरीरापेक्षा खूप लांब असतात आणि अनेक वेळा हे फ्लेमिंगो एका पायावर उभे राहतात, पण ते एका पायावर का उभे राहतात याचा शोध मात्र अद्यापही लागला नाही. परंतु माझ्या निरीक्षणानुसार ज्यावेळी फ्लेमिंगो आपले अन्नशोधत असतो त्यावेळी जवळ येणाऱ्या माशांना व कीटकांना फ्लेमिंगोच्या दोन्ही पायांचा अंदाज लागू नये. दोन पाय कोणत्यातरी प्राण्याचे असतात हे कीटकांना सुद्धा अवगत असणार. जर दोन्ही पायाचा अंदाज लागला तर पाण्यातील हे प्राणी अथवा कीटक फ्लेमिंगोच्या जवळपास ही भटकणार नाहीत. आणि दुसरे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे नर आणि मादी एकत्र असतात. त्यावेळी नर हा उत्साहाच्या भरामध्ये एका पायावर उभा राहतो असा अंदाज मी लावला.
जगभर फ्लेमिंगो पक्षाच्या 6 प्रजाती आढळतात. यापैकी लार्ज फ्लेमिंगो म्हणजेच ग्रेटर फ्लेमिंगो ही सर्वात मोठी प्रजाती आहे, ज्यांची उंची 5 फूट व वजन जवळपास 3 किलो म्हणूनच ही प्रजाती सर्वात मोठी मानली जाते. येथे हे सर्व पक्षी विश्व जवळून अनुभवताना त्या पक्षांचे रंग रूप, त्यांचे विविध आकार, त्यांची किलबिल या सर्व गोष्टींनी मला मोहित केले. माणसांच्या विश्वापेक्षा कितीतरी पटीने सुंदर असलेले हे पक्षी विश्व. खरोखरच हा माझ्यासाठी एक विलक्षणीय अनुभवच होता. या ठिकाणी मला प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे निसर्ग आणि मानवाचे अतूट नातं. येथे फ्लेमिंगो या पक्ष्यासोबतच इतर असंख्य जातीचे पक्षी, त्या पक्षांची ऐकू येणारी किलबिल. किती रोमांचित हे दृश्य. हे सगळं दृश्य अनुभवताना क्षणभर असे वाटले की, हे सर्व पक्षी होडीतून त्यांना भेटावयास आलेल्या माणसांचे स्वागतच करत आहेत. नाना प्रकारचे पक्षी आपल्या मनाला भुरळ पाडतात. फ्लेमिंगो हे अत्यंत एकत्रित पक्षी आहेत जे मोठ्या वसाहतींमध्ये विविध संवादांसह राहतात. ते लॉकस्टेपमध्ये कूच करताना आणि त्याच वेळी दिशा बदलताना आढळले आहेत. प्रजनन जोड्या वारंवार एकपत्नीक असतात, आणि त्या बर्याच हंगामात एकत्र राहतात. फ्लेमिंगोच्या प्रजनन जोड्या त्यांच्या वसाहतींमध्ये राहतील, परंतु त्यांच्या घरट्यांभोवती लहान प्रदेश स्थापन करतील आणि वारंवार भांडण करू शकतात.
क्षणभर का होईना आपण त्या पक्षी विश्वामध्ये रमून जातो. सायंकाळच्या क्षणी तर हा देखावा इतका सुंदर असतो. फ्लेमिंगो पक्षाची नर आणि मादी दोघे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून चोचीला चोच भिडवितो. काय ते विलक्षण प्रेम..! त्यांचा मिलनाचा हा अनोखा नजराना…. किती रोमँटिक….! दिवसभराची भटकंती आणि सायंकाळी आपल्या प्रिय व्यक्तीच्या सानिध्यात घालविलेला क्षण खरोखरच किती सुखदायक असतो. हे माणसांमध्येच नव्हे तर पशुपक्षांमध्ये देखील पाहायला मिळते. फ्लेमिंगो आपल्या जोडीदारासोबत रोमँटिक मूड मध्ये असे हे दृश्य या ठिकाणी योगायोगानेच पाहायला मिळते आणि हे दृश्य मी अगदी देहभान हरपून पाहत होते. माझ्यासारखेच ज्यांनी ज्यांनी हे दृश्य अनुभवले ते सर्व खरोखरच नशीबवान आहेत.
मी कित्येक वेळा बार्शीहून पुण्याला रेल्वेने जायचे. सोलापूर -पुणे हुतात्मा एक्सप्रेस म्हणजे आम्हा सर्व बार्शीकरांची आवडती रेल्वे. ही सुपरफास्ट रेल्वे. कुर्डूवाडी ते पुणे अवघ्या अडीच तासात अंतर काटते. कुर्डूवाडी ते पुणे रेल्वे मार्ग हा भीमा नदीच्या पात्रावरून जातो. या नदीपात्राचा रेल्वे मार्ग “उजनी धरणाचा पूल” म्हणूनच ओळखले जाते. करमाळा तालुक्याची सीमा ओलांडली की भीमा नदीच्या पात्राचे दर्शन होऊ लागते. मूळ भीमाशंकर, जि. पुणे येथून उगम पावणारी भीमा नदी घोड, दौंड, भिगवण या मार्गाने वाहत सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश येते. या जिल्ह्यात माढा तालुका हद्दीमध्ये भिमाचे पाणी अडवून उजनी नावाचे धरण स्थापन करण्यात आले आहे. उजनी धरणाच्या रेल्वे पुलावरून दृष्टीस पडणारे भीमा नदीचे भले मोठे निळेशार पात्र, जणू काही एखाद्या चित्रकाराने आपला निळ्या रंगाचा कुंचला स्वच्छ करण्यासाठी पांढरे शुभ्र पाण्यात बुडविला आणि ते स्वच्छ शुभ्र पाणी क्षणात निळे झालेय तसें ते पाणी फिक्कट निळसर दिसतेय. तसाच या भल्या मोठ्या नदीचा तट निळ्याभोर आकाशाचे प्रतिबिंब पडल्यामुळे निळसर भासतो. खूप आल्हाददायक हे दृश्य… डोळ्यांना सुख देणारे…निळसर पाण्यावर उडणाऱ्या असंख्य पांढऱ्याशुभ्र फ्लेमिंगो पक्षांचे थवेच्या थवे मनसोक्त हुंदडत आहेत. कधी नागमोडी तर कधी एका सरळ रेषेत सैरभर उडतात. किती हे विहंगम दृश्य, मानवी लोचनांना सुख देणारे…” रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी ” हे नयनरम्य, मनोहरी दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकास सुखदायक अनुभवांची प्रचिती येत आहे.
नदीच्या आजूबाजुला बारमाही हिरवे गर्द असलेले भरगच्च गवत.. वाऱ्यावर डोलणारी गवताची पाती..हा सगळा देखावा मनाला मोहित करून टाकते. या ठिकाणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यामध्ये भीमा नदीच्या पाण्याची पातळी कमी होते, कधी कधी नदी संपूर्ण आटलेली दिसते, पाणी गायब झाल्याने रेताड जमीन आपलं डोकं वर काढते. ही रेताड काळी जमीन आपल्याला खुणावत आहे, आपल्याला काहीतरी आवाहन करते. हे येथील शेतकरी कित्येक वर्षापासून जाणतात. आणि याच संधीचा फायदा घेऊन परिसरातील शेतकरी आपापल्या शेतामध्ये पेरणीची लागवड करतात. मऊ, लुसलुशीत, पाण्याने मुरलेली काळीभोर वाळू मिश्रित जमिन आपल्या पोटामध्ये बिजांकुर वाढविते. त्या जमिनीच्या उदरामधून बिजांकुर हळूच बाहेर तोंड काढते. पुण्याकडे दुसरी फेरीच्या वेळी सहज खिडकीतून बाहेर नजर टाकली तर बघता बघता ही पिकं अगदी जोमात वाढलेली दिसतात. उजनी धरण परिक्षेत्राचा पाच ते दहा मिनिटाचा छोटासा रेल्वे प्रवास माझ्यासाठी एक सुखद प्रवास असतो. पाच ते दहा मिनिट याच्या प्रवासामध्ये नदीचे सौंदर्य मी माझ्या डोळ्यात टिपते.
नदीचा पूल जवळ येण्यापूर्वी त्या रेल्वे मार्गावरती काही संकेत असतात. एकतर रेल्वे क्रॉसिंगसाठी थांबते किंवा मग करमाळा जिल्ह्याच्या हद्दीतील माझ्या हातातील मोबाईलचा कॅमेरा पटापट क्लिक होतो. मुळातच निसर्गाची फोटोग्राफी करणे हा माझा आवडता छंद. त्यामुळे साहजिकच या निसर्गरम्य परिसरात मला ‘स्व’ चा विसर पडतो. माझ्या स्वछंद मनाचा प्रवास सुरु होतो. या परिसराचे मी कितीतरी फोटो क्लिक करते. कधीकधी मोबाईलची मेमरी फुल्ल होऊन जाते. असा हा लोभसवाणा परिसर विविध प्रकारच्या पक्षांना आपल्या कवेमध्ये घेऊन वर्षानुवर्ष आबादी आबाद आहे. पावसाळ्यात मात्र ही नदी भरभरून वाहत असते. तिचे उग्र रूप पाहून काळजात धडकी भरते. पर्यटनाच्या दृष्टीने हिवाळ्यात हा परिसर जितका गजबजलेला असतो तितकाच पावसाळ्यामध्ये सुनसान असतो. कारण नदीच्या पाण्याची पातळी वाढली की, आजूबाजूच्या गावांना देखील धोका निर्माण होतो. त्यामुळे पावसाळ्यात या परिसरात कोणी पर्यटक सहसा फिरकत नाहीत. फक्त मासेमारी करणारे मच्छीमार दिसून येतात. हिवाळ्यामध्ये भीमा नदीचे पाणी 40 ते 50 टक्क्यांनी कमी झालेली असते. कडाक्याची थंडी त्यात दाट धुके अशा वातावरणात ही नदी संथपणे वाहत असते. शांतचित्ताने दरवर्षीप्रमाणे परदेशी पाहुण्याची वाट पाहत असते. परदेशी पाहुणे तिला वर्षातून एकदा भेटायला येतात. कडाक्याची थंडीत भीमा नदी आणि परदेशी पक्षी यांच्या भेटीचा सोहळा वाव्वा वाह…! हा योग वर्षातून फक्त एकदाच येतो.
भिगवणची खाद्य संस्कृती मला फार आवडते. माशांसाठी हे गाव खूप प्रसिद्ध आहे. भीमा नदीच्या पात्रात विविध प्रकारचे मासे पहावयास मिळतात. या गावातील व आजूबाजूच्या खेडेगावातील बहुतांशी लोक मासेमारीच्या व्यवसाय करतात. येथील तरुणांना एक चांगली व्यवसायाची संधी आहे. भीमा नदीच्या या परिसरामुळे येथील बऱ्याच लोकांचा रोजगाराचा प्रश्न मिटला आहे. मासेमारी करण्यासाठी हे लोक भल्या पहाटे नावेमध्ये बसून नदीपात्राच्या मध्यभागी जातात. मासेमारी करून तो माल बाजारपेठेत आणला जातो. भिगवणची मच्छी बाजारपेठ भारतात 2 नंबरची बाजारपेठे आहे. येथून पुणे परिसरातील जवळपास सर्वच हॉटेल्सना या बाजारपेठेतून मासे नेले जातात. या परिसरामध्ये जर आपण गेलो तर आपणास माशांसाठी प्रसिद्ध असलेली भरपूर हॉटेल्स रस्ते महामार्गावर येथे दिसतात. बाजरीची भाकरी, भात, फ्राय फिश, फिश रस्सा त्यात तिखट व अळणी दोन्हीही प्रकार, सोबत चवीला मस्तपैकी कांदा, लिंबू व लोणचे… फ्राय माशासाठी व तिखट रश्यासाठी या परिसरातील बरेच हॉटेल्स प्रसिद्ध आहेत. खरंच किती सुग्रास भोजन ! म्हणून आयुष्यात एकदा तरी भिगवनच्या माशांचा आस्वाद घ्यावा असे उगाच म्हणत नाहीत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
