विशेष आर्थिक लेख
कोरोना महामारीच्या काळामध्ये जास्त लोकप्रिय झालेली ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजे ‘घरून काम करण्याची’ संकल्पना जागतिक सर्वेक्षणात अडचणीची झालेली दिसते. जगातील 40 प्रमुख देशांमधील 16 हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची पाहणी केली असता त्याचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. या पाहणीचा घेतलेला वेध…
प्रा नंदकुमार काकिर्डे
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी व जर्मनीतील आयएफओ इन्स्टिट्यूट यांनी 2024-2025 या वर्षात 40 देशांमध्ये ‘जागतिक कामकाज व्यवस्था सर्वेक्षण’ पहाणी केली. त्यात 16 हजार पेक्षा जास्त पदवीधर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. एकेकाळी कामगारांचे भविष्य म्हणून ओळखली जाणारी ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पना अधिक गुंतागुंतीची होत असून काही देशांमध्ये अडचणीची ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी दशकांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पना मोडीत निघून पारंपारिक पद्धतीने नुसार कार्यालयांमध्ये जाऊन काम करण्याची पद्धती सुरू झाली तर आश्चर्य वाटायला नको.
आज जगभरातील लाखो कर्मचारी काम करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य व लवचिकता यामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ ही स्वप्नवत संकल्पना राबवत आहेत. प्रत्यक्षात खूप थोडे कर्मचारी त्याचा खराखुरा आनंद घेत असल्याचे आढळते. समाजातील सांस्कृतिक आशाअपेक्षा, व्यवस्थापनाचा मुलतः असलेला विरोध किंवा त्याबाबतची साशंकता, त्यातील अदृश्य खर्चाची दाट गुंतागुंत यामुळे ‘वर्क फॉर्म होम’ बाबतच्या अपेक्षा व प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात खूप अंतर आहे. त्यामुळेच ‘ वर्क फ्रॉम होम’ एक दुधारी शस्त्राचे फायदे-तोटे स्पष्ट झाले असून ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीतील गुंतागुंत वाढल्याचे दिसत आहे.
भारतासह चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि अन्य काही देशांमध्ये अजूनही प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन जागेवर काम करणे म्हणजे कंपनीशी निष्ठा, शिस्त आणि गांभीर्य मानले जाते. या अहवालात अमेरिका किंवा कॅनडा, इंग्लंड या देशांमध्ये जे सर्वेक्षण करण्यात आले. तेथील कामगारांना आठवड्यामध्ये किमान 1.60 दिवस तर आशिया खंडात 1.1 दिवस “वर्क फ्रॉम होम” करावेसे वाटते. 21 व्या शतकातील कामगारांच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर “वर्क फ्रॉम होम” आधुनिक कामाचे वैशिष्ट्य मानावे लागेल. कोरोना महामारीच्या आधीपासूनच 1970 च्या दशकात काही देशांमध्ये या संकल्पनेचा प्रारंभ झाल्याचे दिसते. जगातल्या सर्वोत्कृष्ट ‘फॉर्च्यून 500 ‘कंपन्या आहेत, त्यातील 80 टक्क्यां पेक्षा जास्त कंपन्या ‘वर्क फ्रॉम होम’ आणि कंपनीत जाऊन काम करण्याच्या संकरित वेळापत्रकाला म्हणजे हायब्रिड पद्धतीला जास्त प्राधान्य देत आहेत. आठवड्यातील तीन दिवस ऑफिस मध्ये जाऊन काम करावे तर दोन दिवस घरून काम करावे असे त्यांना वाटते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पाहणीनुसार 12 टक्के कर्मचारी, अधिकारी वर्गाला कंपनीत जाऊन काम करण्याची जबरदस्त इच्छा आहे.
या पाहणीत कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ चे फायदे तोटे विचारण्यात आले. कोरोना महामारी अत्युच्च पातळीवर असल्यापासून गेल्या तीन-चार वर्षात स्थिर होत असलेली कामाची ‘हायब्रीड’ पद्धत कर्मचाऱ्यांना फायदेशीर झाल्याचे आढळले. ‘वर्क फ्रॉम होम’ शब्द जगभरात ‘रिमोट वर्क’ म्हणून ओळखला जातो. ‘रिमोट वर्क’ साठी आघाडीवर युरोपातील देश असून त्यात एस्टोनिया, स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी, नेदरलँड्स, अमेरिका, न्युझीलँड, आयर्लंड, बेल्जियम व कॅनडा यांचा समावेश आहे. या देशात डिजिटल पायाभूत सुविधा व्यापक प्रमाणात, चांगल्या दर्जाच्या आहेत. मात्र जागतिक पातळीवर या वर फ्रॉम होम किंवा रिमोट वर्क यातील गुंतागुंत मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आपल्याकडे अजूनही प्रत्यक्ष कामावर हजर असण्याची ‘संस्कृती’ हट्टीपणाने टिकून आहे.
कर्मचाऱ्यांचे आकुंचित होत असलेले राहणीमान, घरामध्ये ‘कामासाठी’ ठरवण्यात येणाऱ्या जागेची कमतरता, आणि अविश्वासार्ह इंटरनेट सेवा सुविधा यामुळे शहरातील कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम ही पद्धती जास्तीत जास्त अव्यवहार्य किंवा अप्रिय होत असल्याचे या पाहणीत आढळले आहे. कोणत्याही भौगोलिक परिस्थितीपेक्षा या पद्धतीवर मोठे सावट आढळले आहे ते लिंग भेदाचे. आजही अनेक देशांमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांना वर्क फ्रॉम होम सुविधा जास्त आवडणारी असून पुरुष वर्गाला मात्र त्याची ‘अडचण’ जाणवत असल्याचे किंवा वाढत असल्याचे दिसते.
घरकाम करणाऱ्या महिलांना आठवड्यातून जवळजवळ तीन दिवस तर मुलेबाळे नसलेल्या महिलांना दोन ते अडीच दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ करावेसे वाटते. मात्र कुटुंब वत्सल पुरुषांना घरून काम करण्यामध्ये फारशी आवड नसल्याचे आढळले आहे. यामागे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगभरातील बहुतेक सर्व कुटुंबातील महिलेला कोणताही मोबदला न मिळता करावे लागणारे घरकाम हा कळीचा मुद्दा आहे. बहुतांश महिलांना घर कामाच्या जोडीलाच नोकरीच्या कामाची साथ मिळाली तर ती निश्चित हवी असते. मात्र नोकरी व घरकाम या दोन्ही पूर्ण वेळच्या भूमिका पार पाडणे ही महिलांसाठी तारेवरची कसरत ठरते असेही आढळले आहे.
नोकरी करणाऱ्या पुरुषांची मानसिकता अद्यापही घरकाम करणाऱ्या महिलेला मदत करण्याची किंवा सहकार्य करण्याची नाही हे या पाहणीमध्ये जास्त स्पष्ट झालेले आहे. पुरुषांचा विचार करायचा झाला तर त्यांना स्वतःचे आरोग्य किंवा छंद जोपासता येतात. ऑफिसच्या वातावरणापासून त्यांना सुटका हवी असते. त्यांची कार्यक्षमता वाढते असे निरीक्षण आहे. काही कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ जास्त पसंतीचे, आवडीचे आहे. तरीही गेल्या एक दोन वर्षांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’चे सरासरी प्रमाण कमी झालेले आहे.
अनेक व्यवस्थापनांना ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पना फारशी प्रिय नाही. त्यांना त्याबाबत अस्वस्थता आहे.कारण कोणत्याही कंपनीमध्ये एकत्रित काम केल्यामुळे निर्माण होणारी संघ भावना या ‘वर्क फ्रॉम होम’ मुळे कमी होताना दिसते. एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांवर देखरेख करणे किंवा कर्मचाऱ्यांमध्ये नाविन्यता निर्माण होण्याचा अभाव दिसायला लागलेला आहे.अनेक उद्योगांमध्ये कर्मचाऱ्यांच्या घरी कामाची हत्यारे किंवा अन्य सुविधा देणे शक्य नसते. त्यामुळे कार्यालयात जाऊन प्रत्यक काम करण्यासारखी शक्तिशाली पद्धती नाही असे व्यवस्थापनांचे आग्रही प्रतिपादन आढळते. ‘वर्क फ्रॉम होम’ सुविधेमध्ये कर्मचाऱ्यांचे आजारपण हा गंभीर विषय आहे.
गेल्या काही वर्षात या कर्मचाऱ्यांना शारीरिक आजार, दृष्टीदोष किंवा सांधेदुखी याच्या जोडीलाच मानसिक आजारपण वाढत्या प्रमाणावर येत असल्याचे पाहणीत आढळले आहे. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची घरे अधिक सुरक्षित व कार्यक्षमता वाढवण्यासाठी मोठी गुंतवणूक केली पाहिजे. प्रत्येक कर्मचाऱ्याची मानसिक व शारीरिक आरोग्य स्थिती उत्तम राहील याची दक्षता घेतली पाहिजे. गेल्या काही वर्षात मानसिक ताणामुळे आयुष्य संपुष्टात आलेल्या कर्मचाऱ्यांची आत्महत्यांची संख्या चिंताजनक रित्या वाढलेली दिसत आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांचे स्वातंत्र्य त्यांच्यावरील नियंत्रण,त्यांच्यावरील विश्वास,त्यांची स्वायत्तता, त्यातून निर्माण झालेल्या एकाकीपणाच्या समस्या यात प्रतिबिंबित झाल्याचे दिसते. त्यावर गांभीर्याने मार्ग काढण्याची गरज आहे.
(लेखक पुणे स्थित अर्थविषयक जेष्ठ पत्रकार असून माजी बँक संचालक आहेत)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.