जन्माआधीपासून अनेक भारतीयांवर कर्ज हे असतेच. विशेषत शेतकरी आणि ग्रामीण भागात ही परिस्थिती खूपच गंभीर आहे. ही कविता कर्जाचे उदात्तीकरण करणारी कविता नाही. तर ही उपरोध किंवा ज्याला आपण उपहास म्हणतो अशी ही कविता कवी गोविंद पाटील यांनी शब्दबद्ध केली आहे.
कर्ज कर्जात जन्मलो आम्ही, कर्जात नदीवर जाऊ जमीनीवरच्या कर्जाला, स्वर्गातून जामीन देऊ! ! कर्जात जन्मली पोरे, त्यांच्या त्या हौसा मौजा खाण्याचे रोज हजार, पिण्याचे डबल मोजा पोरीला बाईक देऊ, पोराला सेंट्रो घेऊ!!१!! कर्जात जन्मली आई, कर्जात जन्मला बाप हा कोण भिकारी म्हणतो, कर्जास वाढते पाप खोट्याच सह्या मारूनी, खोटेच उतारे देऊ!!२!! बँकांचे मेंबर भोळे, हे कर्जामधले भाऊ कर्जाचा भाऊ कर्ज, आम्ही एकजुटीने राहू जे ज्यास हवे ते देऊ, बँकेवर निवडून जाऊ !!३!! कर्जात जन्मला गाव, कर्जात बुडाला देश कर्जातच जगताना का उगाच हा आवेश धरतीचा लिलाव होता, तारांगण तारण देऊ!!४!! ही जात आमची कर्ज, हा धर्म आमुचा कर्ज हे बीज कसे सरकारी, कर्जात जन्मते कर्ज कर्जाच्या लिहूनी गाथा कर्जाची गीते गाऊ!!५!! कवी - गोविंद के. पाटील, ९८८१०८१८४१
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.