तंत्रज्ञानाच्या विकासाने मानवाला खऱ्या अर्थाने ज्ञानी केले आहे. झपाट्याने होणारा हा बदल निश्चितच वेगळ्या सामाजिक बदलाची क्रांती घडवणार. या बदलत्या काळाशी सुसंगत जो राहील तोच टिकेल. बदलांना सामोरे जाऊन स्वतःमध्ये परिवर्तन घडवणे ही काळाची गरज झाली आहे. पण या बदलातून नव्यापिढीत आंतरिक ओढ, प्रेम, आपुलकी हे कमी होताना पाहायला मिळत आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
जी भृगू्चा कैसा अपकारु । कीं तो मानूनि प्रियोपचारु ।
तोषोचिना शार्ङ्गधरु । गुरुत्वासी ।। २६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा
ओवीचा अर्थ – महाराज, भृगूचा अन्याय कसा चीड आणण्यासारखा होता ? पण भृगूने मारलेली ती लाथ हा प्रेमाचा उपचार समजून, भगवान् तो लत्ताप्रहार म्हणजे गुरुंचा अनुग्रहच आहे असे मानून संतोष पावले नाहीत काय ?
वाटेतून जाताना मांजर आडवे गेले तर तो अपशकुन मानले जात होते, असे नव्यापिढीला सांगितले तर तो मोठा विनोद ठरू शकतो. असले काही शकून अपशकून असतात का ? असे विचार सहजच ही तरुणपिढी व्यक्त करते. त्यामुळे अंधश्रद्धा, शकुन-अपशकुन, ज्योतिष असले काही आता उरले नाही. विज्ञानाच्या प्रगतीने मोठ्या समाज सुधारणा झाल्या आहेत. ज्योतिषशास्त्र यावर आता नव्या पिढीला विश्वास राहीलेला नाही. एका दृष्टीने ही खूप चांगली गोष्ट म्हणावी लागेल. नव्यापिढीच्या दृष्टीकोनातून या सर्व गोष्टी आता गमतीदार, मनोरंजनाच्या झाल्या आहेत. सण-वार म्हणजे आता केवळ औपचारिकता उरलेली आहे. सणाचा खरा अर्थ समजला तरच ही पिढी ते साजरे करेल अन्यथा आता पुढच्या पिढ्या हे काही सणवार मानतील असे वाटत नाही. इतका बदल आज समाजात झालेला पाहायला मिळत आहे. हे एकादृष्टीने उत्तमच आहे.
तंत्रज्ञानाच्या विकासाने मानवाला खऱ्या अर्थाने ज्ञानी केले आहे. झपाट्याने होणारा हा बदल निश्चितच वेगळ्या सामाजिक बदलाची क्रांती घडवणार. या बदलत्या काळाशी सुसंगत जो राहील तोच टिकेल. बदलांना सामोरे जाऊन स्वतःमध्ये परिवर्तन घडवणे ही काळाची गरज झाली आहे. पण या बदलातून नव्यापिढीत आंतरिक ओढ, प्रेम, आपुलकी हे कमी होताना पाहायला मिळत आहे. मुलांचा स्वभाव हट्टी होताना पाहायला मिळत आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात हा झालेला बदल भारतीय संस्कृतीसमोर तितकेच मोठे आव्हान उभे करणारा आहे. नव्यापिढीला अध्यात्म म्हणजे थोतांड वाटणे स्वाभाविक आहे. वेळ फुकट घालवण्याचा प्रकार असेही वाटणे स्वाभाविक आहे. कारण झपाट्याने होत असलेल्या बदलात हळूहळू होणारी अध्यात्मिक प्रगती नव्यापिढीला पटकण रुचणार नाही. हेही तितकेच खरे आहे. अध्यात्माकडे नवीपिढी कशादृष्टीने पाहाते हे फार महत्त्वाचे आहे. अध्यात्माचा विचार करता अनुभवाशिवाय व अनुभुती आल्याशिवाय हे शास्त्र कधीही समजत नाही. त्यामुळे हे शास्त्र शिकवून सुद्धा कोणी शिकले याची शाश्वती नाही. या विषयाची ओढ असेल तरच हे शास्त्र आत्मसात होते. या सर्व बदलांकडे आपण कसे पाहायला हवे ? याचे उत्तर शोधणे आवश्यक वाटते.
भृगूने भगवान विष्णूना लाथ मारली. याकडे भगवान विष्णू कशा दृष्टीने पाहातात ? या उत्तरातच त्यांचे श्रेष्ठत्व ठरते. ब्रह्मा आणि शिव यांच्यापेक्षा विष्णू श्रेष्ठ ठरले कारण त्यांनी या घटनेकडे सकारात्मकदृष्टीने पाहीले. वाईट घडले तरी त्याकडे एक आव्हान म्हणून पाहाणे. ती एक संधी समजून त्यावर तोडगा काढण्यासाठी परिश्रम करणे. या कार्यातूनच, या विचारातूनच खरा विकास घडू शकतो. कोणत्याही समस्येवर मात करण्याचे सामर्थ्य अशा व्यक्तीला प्राप्त होते. आरे ला कारे ने उत्तर देणे म्हणजे स्वतःचा वेळ व्यर्थ घालवण्यासारखे आहे. कारण शब्दाने शब्द वाढत जातो आणि यातून हाती काहीच लागत नाही. वाटेने जाताना रस्त्यात उभ्या असलेल्या कुत्र्याकडे पाहीले तर ते आपल्याकडे पाहून गुरगुरते. प्रसंगी ते तुमच्यावर धावून सुद्धा येऊ शकते. यावर तुम्ही बचावात्मक पवित्रा घेत रस्त्याने पुढे जाता किंवा त्याच्यावर दगड मारत त्याला लांब पळवून लावता. हे फक्त तुमच्या पाहण्यामुळे झाले. जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले असते तर तो कुत्रा तुमच्यावर गुरगुरलाही नसता अन् तुम्ही सुद्धा तुमच्या वाटेने पुढे निघून गेला असता. यासाठी भुकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष न देता आपण आपला रस्ता पुढे चालायचा असतो. तरच आपल्या रस्त्यात अडथळा होत नाही. भुंकणाऱ्या कुत्र्याकडे सकारात्मक विचाराने दुर्लक्ष केल्यानेच आपण विनाअडथळा जाऊ शकलो, हे विचारात घेणे आवश्यक आहे.
नव्यापिढीमध्ये सुरु असणाऱ्या बदलांकडे सुद्धा आपण सकारात्मकदृष्टीने पाहायला हवे. तुमच्यावेळी असे नव्हते म्हणून त्याला अक्कल शिकवायला जाल तर तो तुमची अक्कल निश्चितच काढेल. त्यांना काय करायचे आहे ते खुशाल करू द्यावे. चांगले काय, वाईट काय हे जेंव्हा त्यांच्या लक्षात येईल तेंव्हाच त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने बदल घडेल. हा बदलच त्यांचे जीवन घडवू शकेल. यासाठी सकारात्मक विचारांनी याकडे पाहून नव्यापिढीला प्रोत्साहन देण्यातच त्याचा विकास दडलेला आहे. यासाठी सकारात्मक विचारांची गुढी उभारून या कार्याचा प्रारंभ करायला हवा.