August 21, 2025
Governor C P Radhakrishnan addressing the audience during Maharashtra and Gujarat Foundation Day celebration at Raj Bhavan Mumbai
Home » महाराष्ट्र व गुजरात राज्ये भिन्न परंतु आत्मा एक : राज्यपाल सी पी राधाकृष्णन
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र व गुजरात राज्ये भिन्न परंतु आत्मा एक : राज्यपाल सी पी राधाकृष्णन

महाराष्ट्र राजभवन येथे महाराष्ट्र व गुजरात राज्य स्थापना दिवस साजरा

मुंबई – महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच जनतेमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागविण्यात अनन्यसाधारण असे योगदान आहे. भाषावार प्रांतरचनेनंतर महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्ये निर्माण झाली असली तरी उभय राज्यांचा आत्मा एकच आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी येथे केले.

केंद्र सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र तसेच गुजरात या दोन राज्यांचा राज्य स्थापना दिवस राज्यपाल आणि राज्य विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे गुरुवारी (दि. १ मे) साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.

महाराष्ट्र व गुजरात या देशांनी भारताला अनेक महान राष्ट्रपुरुष दिले असून आज त्यांची ओळख त्यांच्या मूळ राज्यापुरती मर्यादित न राहता राष्ट्रव्यापी झाली आहे. महाराष्ट्र भूमीचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाकरिता आदर्श आहेत, तर गुजरातचे सुपुत्र महात्मा गांधी यांचे अहिंसेचे तत्वज्ञान आज संपूर्ण जगाकरिता मार्गदर्शक ठरले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर नसते तर देशात लोकशाही टिकून राहिली नसती असे राज्यपालांनी सांगितले. आज गुजरात व महाराष्ट्र ही राज्ये देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देत आहेत असे राज्यपालांनी सांगितले.

महाराष्ट्र व तामिळनाडूच्या संबंधांचा ऐतिहासिक दाखला देताना राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी तामिळनाडू येथील जिंजी, वेल्लोर येथील किल्ले जिंकले होते तसेच तिरुवन्नामलै येथील शिव मंदिराची प्रतिष्ठापना करून धर्म रक्षणाचे कार्य केले होते, असे सांगितले. तंजावर येथील भोसले राजांनी आपल्या ‘सरस्वती महाल’ ग्रंथालयात दुर्मिळ असे तामिळ साहित्य जपून ठेवले. या सांस्कृतिक एकीमुळे आज भारत महान राष्ट्र झाले आहे असे सांगताना देशाने आपली एकात्मता यापुढेही कायम राखली तर देश जगातील पहिल्या क्रमांकाचे राष्ट्र होईल, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

विविध धर्म व पंथांचे पंथाचे लोक, विभिन्न भाषा बोलणारे लोक या देशात राहत असून देखील भारत एकसंध राष्ट्र कसे आहे असा अनेक जागतिक नेत्यांना प्रश्न पडतो. परंतु भिन्न भाषा, भिन्न पोशाख व भिन्न खाद्य संस्कृती असली तरी देखील या देशाला धर्म व संस्कृतीचे अधिष्ठान आहे, असे सांगून एकात्मतेचे हे अधिष्ठान जपले तर भारत विकसित राष्ट्र होईल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र व गुजरात राज्यांचे लोकनृत्य व गीते यांचा उत्कृष्ट कार्यक्रम सादर केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या संगीत विभागातील शिक्षक – कलाकारांनी देखील यावेळी एक पोवाडा सादर केला.

सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य, वाघ्या मुरळी व दिंडी नृत्य ही राज्याची तर तिप्पाणी हे लोकनृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी ‘जय जय गरवी गुजरात’ हे राज्यगीत देखील सादर केले. राज्य स्थापना दिवस कार्यक्रमात महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यांचा इतिहास, वारसा, लोककला व संस्कृती दर्शविणारे माहितीपट दाखवण्यात आले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांचा सत्कार करण्यात आला तर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वागतपर भाषण केले तर अवर सचिव (शिक्षण) विकास कुलकर्णी यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. पराग केळकर, राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती तसेच विद्यापीठाचे व्यवस्थापन समिती सदस्य, कला दिग्दर्शक आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading