July 27, 2024
Sant Tukaram Abhanga related to Bhandara Dongar
Home » तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाची वाद आपल्यासी ।।
विश्वाचे आर्त

तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाची वाद आपल्यासी ।।

कुणी समाजात विरोध केला की चित्त विनाकारण प्रक्षुब्ध होते. निरोधाचे मज न साहे वचन असे तुकोबांनी म्हटले आहे. जनसंग सोडून बैसता एकांत गोड वाटे हा अनुभव तुकोबांनी येऊ लागला.

डॉ. प्रल्हाद नरहर जोशी
 माघ शुद्ध ११, शके १९४२. जया एकादशी.

वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे।
पक्षी ही सुस्वरे आळविती ॥१॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥

 आकाश मंडप धरणी आसन ।
रमे तेथे मन क्रीडा करू ॥२॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥

 कंथा कुमंडल देह उपचारा।
जाणवितो वारा अवस्वरु ॥३॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥

 हरिनामे भोजन परवडी विस्तार ।
करुनी प्रकार सेवू रुची ॥४॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥

 तुका म्हणे होय मनासी संवाद ।
आपुलाची वाद आपल्यासी ॥५॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥ 

निरूपण : डॉ. प्रल्हाद नरहर जोशी (१९२४-२००४).

शब्दार्थ:
वनचरे – वनात चरणारी श्वापदे, प्राणी.
धरणी – पृथ्वी.
कंथा – वाकळ, जाडेभरडे वस्त्र.
परवडी – प्रकार.

अर्थ:
या वनातील अनेक प्रकारचे वेल, वृक्ष आणि वनात राहणारे प्राणी सुस्वर स्वराने ईश्वरास आळविणारे पक्षी हेच आता आमचे सोयरेधायरे बनले आहेत.॥१॥

या सुखानेच आम्हाला या एकांताचा निवास प्रिय झाला आहे. यामुळे कोणताही गुणदोष आमच्या अंगास कधी येत नाही.॥ध्रु.॥

आम्हाला वर डोक्यावर आकाश हे मंडपाप्रमाणे असून पृथ्वी हे आमचे बसण्याचे आसन आहे. आमचे मन जेथे रमेल तेथे आम्ही मनसोक्तपणे क्रीडा करू.॥२॥

जाडीभरडी वाकळ, पाण्यासाठी कुमंडल ही आमच्या देहाच्या उपचाराची दोनच साधने भरपूर आहेत आणि या चिंतनात किती वेळ गेला हे वाऱ्यामुळे आम्हांस जाणवते.॥३॥

या ठिकाणी आमच्या भोजनास हरिनाम असून आम्ही तिचे नाना प्रकार करून तिचे सेवन मोठ्या आवडीने करू.॥४॥

तुकोबा म्हणतात एकांताच्या अवस्थेत माझा माझ्या मनाशीच संवाद होत असतो, मी आपल्या स्वतःशीच वादविवाद करीत असतो.॥५॥

विवरण:
या अतिशय प्रसिद्ध व मर्मग्राही अभंगात तुकोबांनी निसर्गरूपी परमेश्वरात विलीन झालेल्या आपल्या वृत्तीचे मोठे बहारदार वर्णन केले आहे. संसाराची वाताहत झाली, व्यवसाय बुडाला आणि आधीच परमार्थप्रवण असलेले तुकोबांचे मन संसारपाशातून निसटले त्यांना हरिकथेचा वेध लागला. सत्संगाची गोडी त्यांना लागली, कीर्तनभजनात त्यांचे मन रमू लागले ज्ञानेश्वरी व एकनाथी भागवत यांची पारायणे करण्यात ते रमून गेले. एकांतवासाची त्यांना गोडी निर्माण झाली.

भंडारा भामनाथ या डोंगरांवर वृक्षवल्ली पक्षी व इतर प्राणी यांच्या सहवासात त्यांचे मन रमून गेले. वरती आकाश हे आच्छादन व खाली पृथ्वी हे आसन अशा विस्तीर्ण पार्श्वभूमीवर तुकोबांचे मन परमार्थ चिंतनात व प्रभुप्रेमात रमून गेले. श्रीहरीच्या नामस्मरणाचे निरनिराळे प्रकार करून याच भोजनावर ते संतुष्ट झाले आपल्याच मनास वक्ता व श्रोता अशा भूमिकांनी त्यांनी रमविले.

तुकोबांना हा एकान्तवास व निसर्गसहवास फार उपकारक झाला. संसारतापाने तप्त झालेल्या चित्तास लोकसमुदायात आणखी प्रक्षोभ येतो. तो टाळण्यासाठी एकान्तवासाचे सुख फार महत्त्वाचे असते. ज्ञानी माणसाचे अरतिर्जनसंसदि सामान्य माणसांची गर्दी न आवडणे हे एक मुख्य लक्षण गीतेने सांगितले आहे म्हणून तुकारामांसारखे साधुसंत एकांतवास पत्करतात. कुणी समाजात विरोध केला की चित्त विनाकारण प्रक्षुब्ध होते. निरोधाचे मज न साहे वचन असे तुकोबांनी म्हटले आहे. जनसंग सोडून बैसता एकांत गोड वाटे हा अनुभव तुकोबांनी येऊ लागला.

तुका म्हणे आता एकलेची भले । बैसोनि उगले राहावे ते. या एकान्ताची आवड निर्माण झाल्यामुळे ज्ञानी मनुष्य फारच संतुष्ट होतो आणि तीर्थे धौतें तटें । तपोवने चोखटें। आवडत कपाटें। वसवू जया ॥ शैलकक्षांचीं कुहरें । जळाशयपरिसरें। अधिष्ठी जो आदरें। नगरा न ये ॥ बहु एकान्तावरी प्रीती । जय जनपदाची खंती। जाण मनुष्याकारें मूर्ती। ज्ञानाची तो॥ अशा या ज्ञानी माणसाप्रमाणेच तुकोबांचे वागणे होते.

भंडारा डोंगराच्या पश्चिमेस असणाऱ्या गुहेजवळील पाण्याच्या झऱ्यानजीकची वृक्षवेली व वनचरे तुकोबांनी सुखवीत असावीत. तुकोबांच्या वास्तव्याने त्या डोंगरासही तपोवनाचे स्वरूप प्राप्त झाले. वृक्षलता पशुपक्षी पाषाण इत्यादींनी तुकोबांचे हे प्रसन्न व ईश्वरचिंतनात तल्लीन झालेले रूप पाहिले असावे एकान्तवासात चित्ताची पवित्रता वाढते. वैराग्यबळ दुणावते आणि मनाची एकाग्रता वाढते. एकान्तवासात चित्ताची प्रसन्नताही वाढते. एकान्तामध्ये आपले आपण मुक्त असतो.

रमे तेथे मन क्रीडा करी अशी वृत्ती असल्यामुळे सौख्यराशी अपार निर्माण होतात. तुकोबांनी दुसऱ्या एका अभंगात म्हटले आहे एकान्ताचे सूख जडलें जिव्हारीं । वीट परिचारी बरा आला लोकसमुदायाचा वीट आल्यामुळे आपण एकान्तवास पत्करला. आता या एकान्तात आपणच आपल्या मनाशी वादविवाद करू संवाद करू अशी त्यांची वृत्ती बळावली. खेळो मनासवे जीवाच्या संवादे । कौतुके विनोदे निरंजनी असे त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे.

( साैजन्य – http://tukaram.com/marathi/gatha/default.htm )


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार

छत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग

संत तुकारामांच्या अभंगामध्ये वैचारिक वारसा टिकवण्याचे सामर्थ्य – रमेश वरखेडे

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading