ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंत थोरात यांच्या ‘काही वाटा, काही वळणं’ आणि ‘नवी वाट नवे क्षितीज’ या पुस्तकावर डॉ. रघुनाथ कडाकणे यांचे मनोगत…
डॉ. थोरात हे आपल्यातील सुप्त अनुवादकाचे जन्मदाते असल्याचे सांगून डॉ. रघुनाथ कडाकणे म्हणाले, भारताचे संविधान ज्या व्यक्तीला गोष्टीरुपात वाचावयाचे असेल, त्याने डॉ. थोरात यांची पुस्तके वाचावीत. डॉ. यशवंत थोरात म्हणजे अखंड अस्वस्थता आहे. अविश्रांत अभ्यासातून त्यांनी त्यांचे व्यासंगी व्यक्तीमत्त्व घडविले आहे. वडिलांच्या निष्ठूर प्रेमाने त्यांना घडविले. त्यांच्या समग्र व्यासंगाचे दर्शन त्यांच्या लेखनातून घडते. अर्थशास्त्रासह, नीतीशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, ऊर्दू कविता, काव्यशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहास अशा अनेकविध विषयांचा त्यांचा व्यासंग स्तिमित करणारा आहे. आपल्या अवघडातील अवघड इंग्रजीचा सोप्यात सोप्या मराठीत अनुवाद व्हावा, याकडे त्यांचा कटाक्ष असतो. त्या अर्थाने ते ‘शब्दांचे उत्तम कारागीर’ आहेत. त्यांच्या या कौशल्याचे प्रत्यंतर ललित लेखनातून येते.