स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांच्या समाधीकडे शासनाचे दुर्लक्ष – विश्वास पाटील
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिताश्री आणि राजमाता जिजाऊ यांच्या कुंकवाच्या धन्याची समाधीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत एस्कवर पोस्ट केली आहे.
एक्सवरील पोस्टमध्ये विश्वास पाटील म्हणतात, दूर कर्नाटकामध्ये दावणगिरी जिल्ह्यात होदीगीरे या गावात शहाजी महाराज यांची समाधी आहे. महाराष्ट्राचे ते महातीर्थ ऊन्हापावसात करपते आहे. भिजते आहे. 360 वर्षांपूर्वी याच ठिकाणी शिवरायांचे महापिता शहाजीबाबांचे घोड्यावरून पडून अपघाती निधन झाले होते. एखाद्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या, तेही शिवरायांसारख्या महापुरुषाच्या जन्मदात्याच्या समाधीकडे महाराष्ट्राने जे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. तसे बेच्छूट उदाहरण जगाच्या इतिहासात कुठेच पाहायला मिळणार नाही. स्वातंत्र्यानंतर अनेक नेत्यांच्या वडिलांची कोटी कोटी रुपयांची स्मारके सरकारी खर्चाने या महाराष्ट्रभूमीत बांधली गेली. मात्र आमच्या शहाजीराजांच्या नशिबी हे असे काय यावे.
कोण होते शहाजीराजे ?
- ज्यांनी शिवरायांना जन्म दिला.“गनिमी काव्या” ची दीक्षा दिली. बेंगलोरच्या किल्ल्यात शिवरायाना लष्करी शिक्षण दिले.. स्वतः ज्यानी ती शिवरायांची सुप्रसिद्ध “राजमुद्रा” लिहिली.
- औरंगजेबाचा आजोबा जहांगीर याच्या फौजांच्या विरोधात 1624 ची भातवडीची लढाई जिंकली.
- औरंगजेबाच्या बापाच्या शहाजानच्या फौजांना इतके सळो की पळो करून सोडले की, त्याला ताजमहालचे बांधकाम बाजूला ठेवून 1634 मध्ये शहाजीबाबांच्या विरोधात स्वतः लढाईसाठी महाराष्ट्रात यायला भाग पाड पाडले.
- “ज्या भूमीत शहाजी राहतो तिथल्या पहाडांना आपोआप पाय फुटतात”असे अनुमान काढून दिल्लीचा बादशहा शहाजहानने 31 मे 1635 च्या माहुलीच्या कराराच्या तिसऱ्या कलमानुसार शहाजीराजांना महाराष्ट्रातून हद्दपार केले होते. म्हणून त्यांना दीर्घकाळ कर्नाटकात राहावे लागले.असा तो स्फूर्तीचा झरा, पेटता वारा, मराठ्यांच्या महापराक्रमाचा तुरा, जिजाऊंच्या कपाळीचा कुंकुमहिरा आज दूर कर्नाटकात गेली 360 वर्ष तसाच वैराण माळावर पहुडलेला आहे. “फक्त निवडणुका लढवण्याची आणि जिंकण्याची चटक हेच जीवनध्येय” मानलेला आजचा महाराष्ट्र दुर्दैवाने आपला खरा इतिहास, संस्कृती आणि माणुसकीही विसरून चालला आहे. “दुश्मनांच्याही स्मृतीस्थळांकडं आदराने पहा” असं सांगणाऱ्या शिवरायांच्या जन्मदात्याच्या स्मृतीस्थळाची ही अशी दुर्दैवी अवस्था पाहून काळजाला चटके बसतात.
तीन वर्षापूर्वी मी हा विषय महाराष्ट्रासमोर मांडला होता. पण प्रश्न आमच्या शिवरायांच्या पित्याचा असतानाही मेलेल्या महाराष्ट्राने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. ज्यांनी आधुनिक महाराष्ट्र खऱ्या अर्थी घडवला, त्या जिजाऊ साहेबांना स्वर्गात काय वाटत असेल ? “खूप इज्जत आणि इभ्रत ठेवलीत हो तुम्ही आमच्या कुंकवाच्या धन्याची आणि आमच्या शिवबाच्या परमपूज्य पित्याची”. काळाच्या पाठीवर असामान्य कर्तुत्वाचे ठसे उमटवणाऱ्या या महापुरुषाकडे हा ‘इलेक्शनमग्न’ महाराष्ट्र थोडे ध्यान देईल का?
विश्वास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक
कर्नाटकातली सामान्य माणसे कशीबशी या समाधीची देखरेख करत आहेत. या संदर्भात दावणगिरी शहाजीराजे ट्रस्टचे अध्यक्ष मल्लेशराव शिंदे यांनीही समाधीवर छप्पर बांधून परिसराचे सुशोभिकरण राजांचा योग्य सन्मान राखला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या संदर्भात कर्नाटक सरकारकडून होत असलेले दुर्लक्ष याचीही खंत त्यांनी व्यक्त केली. या संदर्भात ते मल्लेशराव शिंदे यांनी दिलेली माहिती ऐकण्यासाठी लिंकवर क्लिक करा….
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
अत्यंत आवश्यक अशी अशी माहिती आपण देत आहात आवडले अशीच माहिती देत जावे ही विनंती