मुले ही देवाघरची फुले आहेत. ती भगवंताची रूपे आहेत. असे समजूनच त्यांच्याशी तेवढ्याच आत्मीयतेने, प्रेमाने व्यवहार करायला हवा. यामुळे मुलांवर उत्तम संस्कार होऊ शकतील.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
आता भय आणि निर्भयता । अहिंसा आणि समता ।
हें मम रूपची पंडुसुता । ओळख तूं ।। ८५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय 10
ओवीचा अर्थ – आता अर्जुना, भय आणि निर्भयपणा, अहिंसा आणि समबुद्धि ही माझीचं रुपे आहेत, हें तू जाण.
लहान मुलांना अनेक गोष्टी समजत नाहीत. त्याच्या हातून चुका घडत असतात. पण हळूहळू त्याला समजायला लागते. जसा जसा तो मोठा होईल तसे सर्व गोष्टींचे ज्ञान त्याला अवगत होते. मुळात भीती ही त्याला नसते. पण त्याने वाईट गोष्टी करू नयेत, यासाठी आपण त्याला भीती दाखवतो. त्याला न आवडणाऱ्या गोष्टीवर ते चिडत असते. नाक मुरडत असते. आवडीचा पदार्थ, वस्तू हवी असेल तर ते हट्ट करते. त्या गोष्टीसाठी ते रडते. मागून मिळत नसेल तर ते हिसकावून घेण्याचाही प्रयत्न करते. त्याच्या या कृतीला अनेकदा रागावून, ओरडून गप्प बसवावे लागते.
भीती नसणाऱ्या त्याच्या मनात भीती उत्पन्न करावी लागते. अशा गोष्टींचा त्याच्या बालमनावर परिणाम होतो. कधीकधी त्याची ही भीती कायमस्वरूपी राहू शकते. काही मुले शाळेच्या दारात गेल्यानंतर रडायला लागतात. त्याच्या बालमनात भीती उत्पन्न होते. ही त्यांची भीती घालवावी लागते. त्याला निर्भय करण्यासाठी, त्याला शाळेत जाण्याची सवय लावावी लागते. एकदा त्याला शाळेत जाण्याची सवय लागली की तो मग रडत नाही. आनंदाने शाळेत जाऊ लागतो. त्याला चांगल्या गोष्टींची सवय लागावी, यासाठी आपले प्रयत्न सुरू असतात. त्याला मारून, भीती घालून, शिक्षा करून त्याच्यात सुधारणा होते पण वारंवार असे केल्याने त्याचा वाईट परिणामही होऊ शकतो. यासाठी त्याला प्रेमाने, अहिंसेने सर्व गोष्टी शिकविण्याची गरज आहे.
सत्याचा आग्रह त्याने जरूर धरावा पण तो त्याने प्रेमाने अहिंसेने करावा. याची शिकवण त्याला द्यायला हवी. हव्या त्या गोष्टी त्याने प्रेमाने मागाव्यात. कोणताही दंगाधोपा न करता त्याने त्याचा आग्रह धरावा. अशी सवय लागण्यासाठी प्रथम आपण त्याच्यावर प्रेम करायला हवे. प्रेमाने सर्व गोष्टी त्याला समजायला हव्यात. शिकवायला हव्यात. अहिंसेचा मार्ग त्याला शिकवायला हवा. यासाठी प्रथम स्वतःमध्ये हे गुण असायला हवेत. तरच ते आपण त्याच्यामध्ये उतरवू शकू.
घरात दोन मुले असतील तर त्यांच्यात भेदभाव करून चालत नाही. एकाला फळ दिले तर दुसऱ्यालाही ते हवे असते. दोघांच्यात समानता ठेवावी लागते. अन्यथा एकावर अन्याय होऊ शकतो. असा अन्याय सातत्याने होत राहिल्यास बालमनावर वाईट परिणामही होऊ शकतात. अशी मुले मोठी झाल्यावर वाईट संगतीत जाऊ शकतात. यासाठी व्यवहारात समानता हवी. मुले ही देवाघरची फुले आहेत. ती भगवंताची रूपे आहेत. असे समजूनच त्यांच्याशी तेवढ्याच आत्मीयतेने, प्रेमाने व्यवहार करायला हवा. यामुळे मुलांवर उत्तम संस्कार होऊ शकतील.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.