मोशी येथे १८-१९ नोव्हेंबरला होणार दुसरे इंद्रायणी साहित्य संमेलन..
संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक सोपान खुडे, स्वागताध्यक्षपदी गणेश सस्ते यांची निवड
इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने येत्या १८ व १९ नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथे दुसरे “इंद्रायणी साहित्य संमेलन” आयोजित करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्ष संदीप भानुदास तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मोशी येथील जय गणेश लॉन्सच्या सभागृहात हे दोन दिवशीय साहित्य संमेलन होणार असून ज्येष्ठ साहित्यिक आणि लोकसाहित्याचे अभ्यासक सोपानराव खुडे यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांनी मांडलेल्या या प्रस्तावास उपस्थित सर्वांनीच संमती दिली.
तसेच या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते गणेश साहेबराव सस्ते यांची निवड करण्यात आली. अशोक ढोकले यांनी मांडलेल्या निवडीच्या प्रस्तावास बैठकीत सर्वांनी मान्यता दिली. दोन दिवस होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले साहित्यिक सोपान खुडे हे लोकसाहित्याचे अभ्यासक असून त्यांच्या कथा, कादंबऱ्या, आकाशवाणी नभोनाट्य, लोकनाट्य, चित्रपट पटकथा संवाद इत्यादी क्षेत्रात विपुल लेखन केले असून त्यांची तीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. साहित्य अकादमीचे सदस्य, मराठी विश्वकोश मंडळ, भाषा सल्लागार समिती, राज्य सांस्कृतिक पुरस्कार समिती आदी शासकीय समित्यांवर त्यांनी जबाबदारी पाहिली आहे.
यावर्षीच्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष गणेश साहेबराव सस्ते हे बांधकाम व्यावसायिक असून साहित्य आणि कला रसिक आहेत. त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. ते जगद्गुरु शिक्षण संस्थेचे संस्थापक असून, राहुल अर्बन सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आहेत. ग्राहक संरक्षण चळवळीतही ते कार्यरत आहेत.
संमेलनाध्यक्ष आणि स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पहिल्या इंद्रायणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांच्या हस्ते सोपान खुडे आणि गणेश सस्ते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लेखिका डॉ. सीमा काळभोर, डॉ. पौर्णिमा कोल्हे, सचिव राम सासवडे, दामोदर वहिले, सुनिल जाधव, श्रीहरी तापकीर, माणिक सस्ते, योगेश कोंढाळकर, अलंकार हिंगे, काळूराम भाऊ सस्ते, गणेश शशिकांत सस्ते, अशोक ढोकले इत्यादी इंद्रायणी साहित्य परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.