राजा दौलतराव यादवांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सैन्याने भुलेश्वर टेकडीवर तळ ठोकला. पुर्वी या टेकडीला भेलणचा डोंगर म्हणूनही संबोधले जायचे. बळीराज्याच्या काळात या टेकडीवर शिवभक्त खंडोबाने लिंगाची स्थापना करुन पुजा केली होती. हे लिंग जागृतम्हणून प्रसिद्ध होते. बळीराजा हा आपला पुर्वज आहे, त्यांच्याबाबत समाजात मोठी आदराची भावना होती. त्यामुळे यादवराजांच्या काळात देशभर महादेवाच्या मंदिराची भव्यदिव्य अशी उभारणी केल्याचे दिसते. भुलेश्वर हे ही त्यातील एक मंदिर होय.
दशरथ यादव
संपर्क – 9881098481
देवगिरीकर यादवांनी १२ व्या शतकात बांधलेल्या भुलेश्वर मंदिराची रचना मूळता यादवकालीन शैलीची होती. मंदिराची मूळ बांधणी १३ व्या शतकातील असून, सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे १८ व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य प्राकार होता. नंदीचा मंडप स्वतंत्र होता. १८ व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले. तुकोजी होळकर यांच्या काळात पुढील नगारखान्याचे बांधकाम झाले. पहिले बाजीराव पेशवे व सातारचे शाहू छत्रपती यांचे गुरु ब्रम्हेंद्रस्वामी यांनी अनेक यादवकालीन हेमाडपंथी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. १७३७ मध्ये स्वामींनी एक लाख रुपये खर्चून तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन चुनेगच्ची शिखरे बांधली. हे बांधकाम संभाजी व व्यंकोजी नाईक या गवड्यांनी केले. असे अभ्यासकांचे मत आहे, परंतु चुनेगच्ची शिखरे पूर्वीच यादवांनी बांधली होती, नगारखान्याचे काम स्वामींच्या काळात झाले असावे. देवळाच्या बांधकामात स्वामी जातीने लक्ष पुरवित असत. दमाजी गायकवाड या सरदाराने पवारांवर मिळविलेल्या विजया प्रित्यर्थ जीर्णोद्धारास पंचवीस हजार रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरिता १२५ रुपये व सव्वाशे सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद आहे. जीर्णोद्दारामुळे मंदिर हेमाडपंथी-मराठा समिश्र वास्तुशैलीचे झालेले आहे. मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. नंदीच्या उजव्या बाजूला एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता असावा ते समजत नाही
व्यंकटेश हँचरीज कंपनीच्या अर्थिक मदतीने पुरातन खात्याच्या मार्गदर्शनाखाली सन २०१४ साली भुलेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु करण्यात आले. पुरातत्व विभाग जुन्नर (विभाग) क्षेत्रिय अधिकारी बी.बी.जंगले, स्मारक परिचर राहुल बनसोडे यांच्या देखरेखीखाली मंदिराच्या दुरुस्तीचे काम झाले. साईनाथ जंगले ( औरंगाबाद), विजय चव्हाण (राजुरी), संतोष खेंगरे (माळशिरस) व शंकर चव्हाण (राजुरी) हे कामगार पुरातत्वविभागाच्या वतीने देखरेख करीत होते. मंदिराचे शिखर हे चुनखडीच्या साह्याने बांधले आहे. मूळ गाभारा, ओव-या, मंडपाचे सगळे खांब, छत भिंतीवरील कलाकुसर हे सगळे काम भव्यदिव्य शिल्पात कोरलेले आहे. मंदिराचे तीन शिखरे व नगारखान्याचा छताचे काम हे चुनखडीच्या साह्याने केले आहे. मंदिराचा जीर्णोद्धार यापूर्वी तुकोजी होळकरांच्या काळात झाला होता. त्यावेळी जेजुरीच्या मंदिराचेही कामही सुरु होते. भुलेश्वरला चुना चांगला होत नाही म्हणून जेजुरीहून मागविला होता. ब्रम्हेंद्रस्वामीं धावडशीकर यांना माळशिरस गाव इनाम दिले होते. त्यावेळी पेशव्यांचा कारभार सुरु होता. जुन्या कागदपत्रात तशा नोंदी आहेत. त्यानंतर होणारा हा जीर्णोद्धार हा पुरातन खात्याच्या माध्यामातून प्रथमच होत आहे.
१९८५ च्या दरम्यान राष्ट्रीय संरक्षक म्हणून मंदिराची देखभाल पुरातन खात्याच्या कडे देण्यात आली. त्यापूर्वी मंदिराच्या दक्षिणबाजूची ओव-या असलेली भिंत ढासळली होती. या भिंतीचे काम माळशिरस ग्रामस्थ व वाघापूरचे शिवभक्त कुंजीर यांनी केले. दक्षिणबाजूची पश्चिमेची अर्धी भिंत त्यावेळी दुरुस्त करण्यात आली होती. मंदिराच्या डोंगराला पायथ्याजवळील पाण्याच्या टाक्यापासून मंदिरापर्यंत दगडी पाय-या माळशिरस ग्रामस्थांनी बांधल्या आहेत. सध्या दुरुस्तीचे काम सुरु असून, मंदिराचा जुना बाज तसाच ठेवत त्याला पुरक साहित्य वापरले जात असून, चुनखडीसाठी मंदिराच्या दक्षिणबाजूला चुनखडी भिजविण्यासाठी खड्डा खोदला होता. तसेच मागील बाजूस उत्तरेला चुनखडी मळण्यासाठी दगडीचाक आणि गोलाकार जुन्या पद्धतीचा घाणा तयार करुन शिखराच्या कामाला त्याचा उपयोग करण्यात आला. गाभा-यावरील उंच शिखर दुरुस्ती करताना अगोदर जुना रंग धुवून काढून लहान मोठ्या चीरा, भेगा भरुन मुर्तींना बळकटी देण्यासाठी चुनखडीचा वापर केला आहे.
ऊन, वारा व पावसापासून संरक्षण होणारा चुनखडीचा माल चूनखडी मिश्रण बनविताना त्यामध्ये बेल, वाळू, गूळ, हिरडा, मेथी पावडर, उसाची काकवी, उडीद डाळ, भेंडी, रंग, केमिकल व चुनखडी एकत्रित करुन मिश्रण करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. चुना मळण्यासाठी नाना जाधव व प्रकाश बाबुराव यादव यांचे बैल जुंपले होते. तीन ट्रक वाळू लागली. २२ टन चुना एका शिखराच्या कामासाठी लागला. हा सगळा चुना राजस्थानवरुन मागविला होता. या शिखराचे काम दीड वर्षे सुरु होते. हे काम पुण्याचे कारागीर दत्तात्रय शिंदे, बाबुअण्णा म्हेत्रे व प्रसन्न म्हेत्रे यांनी केले. मदतनीस म्हणून वर्धा येथील महेश चौधरी होते. शिखराचे जुनेडाग, जळमटे खरवडून काढण्यासाठी माळशिरस येथी मजूर दादा कामठे, राजेंद्र गायकवाड, टेकवडीचे इंदलकर यांनी काम केले. मुख्य पिंडीवरील चुनेगच्ची शिखराचे काम २०१५ साली पूर्ण केले, या कामाला एक वर्षे लागले. शिखराचे रंगकाम आणि तुटलेल्या मुर्तीची दुरुस्ती करण्यासाठी कारागीरांनी थप्पी, नैला, छोठी हातोडी, ब्रश ही हत्यारे वापरली. शिखरावरील जुना मुख्य कळस तसाच ठेवला. बाकी ४८ छोटे लाकडी कळस नव्याने बसविले आहेत. मंदिराच्या छतावर दगडी पन्हाळीसाठी पणदरे येथून दगड मागविला होता. पन्हाळीसाठी ९ दगड बसविले. हे कामासाठी आबा निगडे यांनी दगड बनवून दिले. मंदिरावरील छताची दुरुस्ती करुन बळकटी देण्यासाठी त्यामध्ये सिंमेटचा वापर केला. पावसाचे पाणी छतातून न गळता ते बाहेर काढून देण्यासाठी त्यावर सिंमेटचा माल वापरला आहे.
नंदी मंडपातील दुरुस्ती
मंदिराच्या छताखालील काही मुर्ती सरकल्या होत्या त्या बसविण्यात आल्या. त्यामध्ये हत्तीच्या मुर्ती होत्या. नंदी मंडपातील नंदीच्या भव्य मुर्तीचे तोंड तुटलेले होते. वशिंडाच भाग तुटला होता. नंदीच्या मुर्तीचे काम करताना हिपाँक्सी अँरेल्ड पद्धतीचा वापर करुन तुटलेला भाग चिकटवून नंदीच्या पाठीवरील झुलीचे नक्षीकाम, कान, शिंगाची दुरुस्ती केली. हे काम पुण्याच्या दत्तात्रेय शिंदे, सुधीर सोनवणे या कारागीरांनी केले. गाभा-यातील जुना ओटा काढून टाकला. पिंडीच्या सभोवती बाजूला दगडी सुरक्षा कवच (गोलाकार दगडी पट्टी) बसविले.
मंदिरातील ओव-यात चार ठिकाणी खिडकीच्या जागा भिंत बांधून बंद केल्या होत्या. त्या भिंती काढून खिडक्या खुल्या केल्या त्यामुळे हवा व प्रकाश मंदिरात खेळू लागला. उत्तरेच्या दरवाजात बाहेर जाताना दगडी फरशी टाकून लाकडी दरवाजा नव्याने तयार केला. नंदीमंडपाजवळ ओव-यातील स्लँबचा एक भव्य दगडाला चीर गेल्याने त्याठिकाणी स्लँबला धोका पोहचू नये म्हणून चीर गेलेल्या दगडाला सपोर्ट दिला. खिडक्यांचे दरवाजे पुण्यातील भवानी पेठेतून आणले. मंदिरात प्रवेश केल्यानंतर मुख्य दरवाजातून आता गेले की समोर मारुतीची मुर्ती दिसते. त्याठिकाणी दगडीफरशी बसवून दुरुस्ती केली आहे. नंदी मंडपात शिरताना दोन्ही बाजुनी दगडी पाय-या चढून वर जावे लागते. मंदिराचा जीर्णोद्धार करताना अनेक लहानमोठ्या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.
थंड पाण्याचे कुंड
भुलेश्वर डोंगराच्या बुरजाजवळ मुख्य दरवाजालगत असलेल्या थंड पाण्याच्या तीन टाक्यातील गाळ उपसून टाकी स्वच्छ करुन घेतली. भुयारी टाक्यात नेहमी पाणी थंड असते. हे पाण्याचे कुंड स्वच्छ करण्यासाठी टेकवडीचे राजेंद्र वाळके, इंदलकर, झिंजुरके, माळशिरसचे ललिता आबा जाधव, सुनिता जाधव, दादा कामठे या मजुरांनी काम केले. या पाण्याच्या कुंडाचा वापर पुर्वी पिण्याच्या पाण्यासाठी केला जात होता. एका कुंडाचा अंघोळीसाठी वापर व्हायचा. कुंडाच्या स्वच्छतेसाठी वीस दिवस काम सुरु होते.
मंदिर चौथारा
भुलेश्वर मंदिराच्या मुख्य सभोवतालच्या चौथा-यावर पूर्वी मातीचा थर होता. तो काढून त्यावर सभोवताली घडीव दगडी फरशी बसविली आहे. हा दगड भोर येथून आणला आहे. चौथा-यासाठी आठ हजार दगडी फरशी लागली हे दगड घडविण्याचे काम श्रीमंत पवार, आकाश पवार, विष्णू पवार, अजय पवार (रा.वाई जि.सातारा) यांनी रोजंदारीने केले. दगडी फरशीच्या खाली वाळू व चुनामिश्रीत माल कोबा म्हणून टाकला आहे. मंदिराच्या सभोवती बसविलेली दगडी फरशीचे कामासाठी चार महिन्याचा काळ गेला. मंदिराच्या दक्षिणेला दगडी चौथा-याच्या बाजूला खडक होता. या खडकातून भाविकांना मंदिराकडे जाण्यासाठी पायवाट होती. या वाटेवर दगडी फरशी बसवून ही वाट मुख्य महाद्वार रस्त्याला जोडण्यात आली. भिंतीलगत चा ओबड धोबड खडक फोडून वाटेच्या पाय-यावर दगडी फरशी बसविण्यात आली आहे. या वाटेच्या कामासाठीचे दगड भोर येथून आणले होते. चौथा-याला बळकटी येण्यासाठी घडीव दगड बसवून पाच फुटाची रेखीव भिंत नव्याने बांधली आहे, या भिंतीचे काम २०१७ साली श्रावण महिन्यात केले आहे. आठ दिवसात या भिंतीचे काम पुर्ण केले. वीस ते बावीस कारागीर राबत होते. दगडाची घडाई कर्नाटक राज्यातील बसवकल्याण व गुलबर्गा येथील कारागीर जुम्मा धोत्रे, तिम्मा धोत्रे, अशोक इंगळे (मिस्त्री), नागप्पा, यल्ल्पा, राजू, गुरु, इस्माईल, तुळशीराम या मजुरांनी केली. तसेच डोंगराच्या पश्चिमेला बुरजाच्या बाजूला जुन्या बाजाचे रेखीव दगडाचा वापर करुन शौचालय बांधण्यात आले आहे.
दीपमाळ अंगण
मंदिराच्या पुर्वेला चौथा-या लगत मातीच्या जमिनीवर दीपमाळेजवळ रिकामी जागा होती. मंदिराच्या चौथा-याजवळील मुख्य घंटेपासून पुर्वेला दगडी पाय-याचा जीना होता. या जिन्याचा वापर लोक करीत होते. परंतु दोन दीपमाळा आणि पिंपळाचा चौथरा असलेल्या या परिसरात मंदिराच्या पुर्वेला दीपमाळ चौथरा गार्डन बांधताना उत्तरेला आखीव रेखीव दगडात पाया खोदून भिंत बांधली आहे. ही भिंत मुख्य चौथ-यापासून पुर्वेला असलेल्या छोट्या मंदिराला समांतर अशी भिंत बांधून मंदिरालगतच पाय-या केल्या आहेत. भिंतीच्या आतील भागात अंगणात घडीव दगडी फरशी बसविल्याने ही आकर्षक फरशीबाग भाविकांच्या पसंतीला उतरली आहे. पुर्वी या दगडी फरशी बसविलेल्या जागेत माळशिरस ग्रामस्थ अखंड हरिनाम सप्ताह करीत असत. तसचे पिंपळ पाराच्या चौथ-याचा उपयोग महिन्यातील दर सोमवारी व पौर्णिमेच्या दिवशी भंडारा (अन्नदान) करण्यासाठी होत होता.
पिंपळाच्या चौथ-यालगत उत्तरेला अन्नदानाचा स्वयंपाक करण्यासाठी चुलांगण होते. आता या जागेत दगडी फरशी बसविण्यात आली. आहे. हे काम तेरा दिवस सुरु होते. अंगणाची फरशीचे दगड अगोदरच घडवून ठेवण्यात आले होते. २५ आँक्टोबर २०१७ रोजी दगडी फरशीच्या अंगणाचे काम पुर्ण झाले. अंगणाच्या मुख्य दरवाजातील पाय-या शेवटी बसविण्यात आल्या.
डोंगरावर वृक्षारोपण
मंदिराच्या सभोवताली बुरजांच्या आत असलेल्या जमिनीवर वृक्षारोपण करुन परिसर सुंदर राखण्याचे काम पुजारी दादासाहेब गुरव यांनी केले. भक्तांच्या मदतीतून डोंगर हिरवा करण्याचे काम तसेच माळशिरस गाव ते भुलेश्वर मंदिरापर्यंत रस्त्याचे कडेला वीजेचे खांब टाकून वीज दिवे बसविण्यातही त्यांचा व तत्कालीन सरपंच सुनील अभिमन्यू यादव व उपसरपंच काकासाहेब यादव, माजी उपसरपंच हिरालाल यादव यांचा मोठा वाटा आहे. भुलेश्वर डोंगराच्या पायथ्याला असलेल्या माळशिरस गावाच्या गायरान जमिनीवर वनखात्याने १९८५ मध्ये वृक्षारोपण करुन परिसरात जंगल निर्माण केले. गावची गायरान जमीन करारावर झाडे लावण्यासाठी वनखात्याला दिली होती. ती अजून वनखात्याकडेच आहे. वनखात्या मार्फत माजी वनमंत्री बबनराव पाचपुते व ना. पतंगराव कदम यांच्या मार्फत तीन कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. बोरबन परिसरात झाडा लगतचे ओटे, जंगलाचे कुंपण, व भुलेश्वरला जाणारे माळशिरस गावाकडून येणारा व यवतमार्गे येणा-या दोन्ही रस्त्यावर कमानी उभारल्या आहेत. भुलेश्वर डोंगरावर ख़डकात खड्डे खोदून त्यात वृक्षारोपण करुन परिसर झाडा झुडपांनी हिरवागार करण्यासाठी निधी खर्च केला. भाविक, पर्यटकांना सावलीला बसण्यासाठी झाडालगत ओटे, जंगलातील प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या बनविण्याचेही काम करण्यात आले. भुलेश्वर परिसरात विकास करण्यात आता वनखात्याच्या ताब्यात दिलेली जमिनच अडथळा झाली आहे. वनखात्याकडून काही जमिन परत घेऊन गेस्ट हाऊस, भक्तनिवास, पार्कींग, शाँपिंगगाळे बांधण्यासाठी ग्रामपंचायतीने घेतली तर अनेकांना रोजगार उपलब्ध होऊन पर्यटन विकासाला चालना मिळेल. पर्यटकांनाही सोयी सुविधा मिळतील. सध्या शासकीय विकास निधी खर्च करुन कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे जमीन नाही. त्यामुळे अनेक विकासकामाचा कोट्यावधी रुपयाचा निधी परत जात आहे, ही शोकांतिका आहे. डोंगरावर भाविकांसाठी ३७ लाख रुपये खर्च करुन भाविकांसाठी शौचालयाचे बांधकाम केले आहे. हे शौचालयाचे बांधकाम करताना घडीव दगडाचा वापर करुन जुना लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. ३२ लांबी आणि १७ फूट रुंदीचे हे शौचालयाचे काम डोंगराच्या पश्चिमेला केले आहे. शौचालया पर्यंत दगडी फरशी बसवून रोड करण्यात आला आहे.
दौलतमंगळ किल्ला आणि समज गैरसमज
श्री भुलेश्वर हे यादवकालीन मंदिरापैकी एक शिल्पवैभव. भारतभर विखुरलेले यादवसाम्राज्य लयाला गेले ते अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी केल्यानंतर. तत्पुर्वी यादवांचे या भारतात ३९४ वर्षे राज्य होते. देवगिरी ही यादवांची राजधानी होती. यादवराजांची एकेक शाखा महाराष्ट्राच्या वेगवेगळया प्रांतात राज्य करीत होती. त्यातील राजा दौलतराव यादव यांच्या नेतृत्वाखाली एक शाखा पुण्याच्या परिसरात स्थिरावली. दहाव्या शतकात यादवांचे पायदळ मजल दर मजल करीत एकेक प्रदेश काबीज करीत पुण्यात येऊन ठेपले. वाटेत अनेक छोट्या मोठ्या लढाया झाल्या. कधी त्यांना विजय मिळाला तर कधी पराभव स्वीकारावा लागला. पुणे परिसरात आलेली दौलतराव यादवांच्या नेतृत्वाखालील शाखेने पश्चिम महाराष्ट्रात पुर्वीच्या राजवटीसमोर आव्हान उभे करुन प्रदेश काबीज केला. शिखर शिंगणापुरला यादव राजा सिंधणाने स्वारी करुन कोल्हापूरपर्यंतचा प्रदेश आपल्या राज्यात आणला. दरम्यान सिंधनाच्या सैन्याचा तळ शिखर शिंगणापूरला होता. त्यांनी येथे भव्य असे महादेवाचे मंदिर बांधले. राजा सिंधनाच्या नावावरुनच या वसाहतीला शिंगणापूर हे नाव पडले.
राजा दौलतराव यादवांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सैन्याने भुलेश्वर टेकडीवर तळ ठोकला. पुर्वी या टेकडीला भेलणचा डोंगर म्हणूनही संबोधले जायचे. बळीराज्याच्या काळात या टेकडीवर शिवभक्त खंडोबाने लिंगाची स्थापना करुन पुजा केली होती. हे लिंग जागृतम्हणून प्रसिद्ध होते. बळीराजा हा आपला पुर्वज आहे, त्यांच्याबाबत समाजात मोठी आदराची भावना होती. त्यामुळे यादवराजांच्या काळात देशभर महादेवाच्या मंदिराची भव्यदिव्य अशी उभारणी केल्याचे दिसते. भुलेश्वर हे ही त्यातील एक मंदिर होय. यादवराजांनी पुणे परिसरात आपला तळ स्थापन केला. दरम्यान सुरक्षित ठिकाण म्हणून त्यांनी निवड केलेल्या भुलेश्वर डोंगरावर त्यांनी यादवशैलीचे भुलेश्वराच्या देवालयाचे काम हाती घेतले. दौलतरावाच्या नेतृत्वाखाली अंजिठा, वेरुळच्या कोरीव लेण्यासारखी शिल्पकला भुलेश्वर मंदिरात साकारली. कलाकारांच्या छन्नी हातोड्यांनी मुक्या दगडांना बोलके केले. आखीव रेखीव शिल्पातून रामायण, महाभारतातील प्रसंग कोरले. हत्ती, उंट, घोडे, नर्तकी, वाद्य, रथ, देवकुलिका, देवता यांच्या मुर्ती कोरून एक भव्य शिल्पवैभव येथे उभे केले. दौलतमंगळ गडावर यादव सैन्याच्या वसाहती होत्या. पायथ्यालाही लोकवस्ती होती. येथूनच त्यांनी परिसरावर राज्य केले. दरम्यानच्या काळात क-हापठारावर शिल्पकलेचा अमोल ठेवा असणारी मंदिरे यादव काळातच आकाराला आली. नारायणेश्वर, वटेश्वर, संगमेश्वर, पांडेश्वर, शंकेश्वर, ही क-हानदी आणि परिसरातील मंदिरे यादव काळातच उभी राहिली. बीचन बोपदेव या यादव सेनापतीच्या नावावरूनच बोपगाव नाव पडल्याचे दिसते.
पूरच्या शिलालेखात हेमाद्रीला श्रीकरणाधिपती ही पदवी दिल्याचा उल्लेख आहे. अकराव्या शतकात देवगिरीच्या य़ादवांची एक उपशाखा दक्षिणेत स्वारीच्या उद्धेशाने महाराष्ट्रातील पुणे येथील पूर्वभागात आली. बारामती (सुपे) भुलेश्वर, ढवळेश्वर, कानिफनाथगड व हवेलीच्या भागात आली. या फौजेतील सरदारांनी काही लढाया जिंकल्या काही हरल्या. त्या सैन्यातील काही सरदारांनी मागे रहायचे ठरविले आणि ते तेथेच स्थायिक झाले. पाटील म्हणून त्या गावात राहिले. भुलेश्वर येथे दौलतराव यादव सरदाराने फौजेसह तळ ठोकला. त्यावेळी सैन्यांना लढाईच्या व्यतिरिक्त वेळेत भक्ती करण्यासाठी मंदिर बांधण्याचे काम दिले जाई. भुलेश्वर मंदिराचे काम यादवशैलीचे असून, डोंगरावर मंदिराच्या रक्षणासाठी आणि सुरक्षित ठिकाणासाठी त्यांनी भुलेश्वर डोंगरावर बुरुज आणि तटबंदी बांधली. या डोंगराला किल्ल्याचा आकार देण्याचे काम त्यांनीच केले. भुलेश्वर डोंगरावरील गड बांधकामाबाबत मतभिन्नता आहे. काही संशोधकांच्या मते आदिलशाही सरदार मुरारजगदेव याने १६३४ साली गडाचे बांधकाम केले असावे असे मत व्यक्त केले आहे. (शिवचरित्र प्रदीप-१९२५) निजामाने पुणे जाळल्यावर मुरार जगदेवाने भुलेश्वरच्या दौलत मंगळगडावरुन कारभार केल्याचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. मामले दौलतमंगळ ठाणे अशी कागदपत्री नोंद आहे. परंतु भुलेश्वर मंदिर बांधतानाच या गडाचे काम सुरु होते. सरदार दौलतराव यादवांचे येथे वास्तव्य होते. स्वसंरक्षणासाठी त्यांनीच गडाचे काम केल्याचे दिसते. या गडाची बांधणीही यादवशैलीची व जुनी आहे. या गडाला नावही दौलतमंगळ हे सरदार दौलतराव यादव यांच्या नावावरुनच पडले आहे, असे संशोधनातून पुढे आले आहे. माळशिरस गावाकडच्या रस्त्यावरील बुरुजाच्या मागच्या बाजूस बुरुजातच मंदिर बांधून मंगळाई देवीची मुर्ती व पिंड बसविण्यात आली आहे. मंगळाई देवीच्या नावाने व दौलतराव यादव सरदार यांच्या नावाने या गडाला दौलतमंगळ असे नामाभिधान झाले. मात्र मंगळाई देवीचे पुढे कालांतराने जानाई असे नामकरण झाल्याचे दिसते.
देवीच्या भक्तांनी जानाई देवी म्हणूनच पुन्हा पुजा केली. मात्र ही मूळता मंगळाई देवी आहे. मुरारजगदेव आणि ब्रम्हेंद्रस्वामी यांचा गडबांधणीच्या कामात कुठेही सहभाग नव्हता. पेशवाईत गडांच्या वापराचे प्रमाण कमीच होते. स्वसंरक्षणासाठी गडांचा उपयोग चालुक्य, यादव, मोगल आणि शिवाजीमहाराजांच्या काळात गरजेचा होता. त्यावेळी ती गरजही होती. पुढे पेशवाईत सत्ता चालविण्याचे सूत्र बदलले होते. त्यामुळे दौलतमंगळ गडाचे काम मुरारजगदेव याने केले या म्हणण्याला पुष्टी मिळत नाही. त्याउलट मुरार जगदेव याने निजामाने पुणे लुटल्यावर संरक्षणाच्या दृष्टीने सोयीचा असलेल्या दौलतमंगळ गडाची प्रांताचा कारभार पाहण्यासाठी निवड केली असावी. ज्यावेळी दौलतमंगळ गडावर पुणे प्रांताचा कारभार हलविला त्यापूर्वीच गडाचे काम झालेले होते, हे स्पष्ट होते. पेशव्यांचे गुरु ब्रम्हेंद्रस्वामी यांनी तर मंदिराचे बांधकाम केल्याचा काही त्यांच्या हितचिंतकांनी १७३७ साली शोध लावून इतिहासाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र स्वामींच्या काळात मंदिराच्या नगारखान्याचे काम झाले ते तुकोजी होळकर यांनी केले.
स्वामींनी काही ठिकाणी विहिरी बारवांना मदत केल्याच्या नोंदी आहेत. देवगिरीकर यादव फौजेतील काहीजण हत्तीदलात होते, हत्तीला कुंज म्हणतात. हत्तीदलाचे प्रमुखांना कुंजर म्हणत. पुढे कुंजरचे कुंजीर झाले. वाघापूर हे कुंजीर यांचे मूळ गाव. ते मुळचे देवगिरीच्या यादव घराण्यातीलच आहेत. कालांतराने काही कुंजीर मध्यप्रदेश व महाराष्ट्रातही पांगले. पाटील किंवा सरपाटील या ते पदावर कार्यरत राहिले आहेत. पेशवाईत सासवडच्या अंबाजीपंत पुरंदरे यांना वाघापूरगाव इनाम म्हणून देण्यात आले होते. वाघापूरची पाटीलकी बाळोबा सुभानराव कुंजीर यांच्याकडे असल्याने पुरंदरे आणि कुंजीर यांचे चांगले सख्य होते. त्यांच्यामुळेच ते सासवडला आले. बाळोबा कुंजीर पेशव्यांच्या दप्तरात परिचित झाले ते पुरंदरे य़ांच्यामुळेच.
दुस-या बाजीराव पेशव्यांना पेशवेपदावर आरुढ करण्यात बाळोबा कुंजीर यांनी जिकिरीने अवघड जबाबदारी पार पाडली. या हुशार व्यक्तीचे कार्य लक्षात घेऊन दुस-या बाजीरावाने कारभारी पदाची सुत्रे बाळोबा कुंजीर यांच्या हाती सोपवली. कारभारी पदाचा मान मराठा व्यक्तीने मिळविण्याची ही पहिलीच वेळ होती. विठोजी व यशवंतराव होळकरांच्या बंडाचे पारिपत्य करण्याची जबाबदारी बाळोबांवर सोपविण्यात आली. ती त्यांनी चोख बजावली. पेशवाईच्या डबघाईच्या काळात बाळोबाने महत्वाची भूमिका बजावून बाजीरावांचा विश्वास संपादन केला. पुढे पेशवे आणि इंग्रजांच्या वसई तहात पेशव्यांवर खूप जाचक अटी लादल्या. त्यामुळे पेशवे फक्त नावाला राहिले मात्र बाळोबा हरले नाहीत. गुप्तपणे पेशव्यांची मदत घेऊन त्रिब्यंकजी डेंगळे यांच्या मदतीने सैन्यांना प्रशिक्षण देऊन नीरेच्या पठारावर स्वतःची फौज उभारण्याचा प्रयत्न बाळोबांनी केला. ही बातमी इंग्रजांना कळाली त्यावेळी त्यांनी पेशव्यांना दम भरला. बाळोबांना फोडण्यासाठी इंग्रजांनी मोठी योजना आखली होती. ते मराठी साम्राज्याचे खंदे पुरस्कर्ते होते. अशा या महान योद्ध्याचे पंढरपूर येथे ९ मे १८९७ मध्ये देहावसन झाले. सासवड मध्ये बाळोबांनी बांधण्यास काढलेला कुंजीर वाड्याचे काम त्यांच्या निधनामुळे पुर्ण होऊ शकले नाही.
सुपे (बारामती) परगण्यातील चांदगुडे हे मुळचे यादवच आहेत. सैन्यदलात त्यांच्या कडे चांदीची गुढी (ध्वज) धरण्याचे काम होते. पुढे त्यांचे आडनाव चांदीची गुढी धरण्याचे काम करीत म्हणून ते चांदगुडे झाले. टेकवडीचे झिंझुरके, थेऊर, कुंजीरवाडीचे कुंजीर, हवेलीतील उरुळीकांचन, हडपसर परिसरातील तुपे, खुटवड हे देखील मुळचे यादवच आहेत. गावोगावचे जाधव हे मूळचे यादवच आहेत. देवगिरीचे यादव हे स्वतःला श्रीकृष्णाचे वंशज समजत. यादवांचे गोत्र अत्री व वंश हा चंद्रवंश आहे. देवक पाणकणीसाचे आहे. देवकावरुन भावकी ओळखण्याची ही जुनी परंपरा व सूत्र आहे. पिढ्या न पिढ्या ऋषीचे गोत्र लावून वैदिक संस्कृतीमधील धर्म मार्तडांनी परशुरामाने पृथ्वी नि क्षत्रिय केली या दंतकथेला पुष्टी देण्यासाठी मूळ गोत्राची खोटी कथा रुढ करुन ब्राम्हण कसा श्रेष्ठ हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. मूळ निवासी भारतीयांचे गोत्र हे बळीराजाच्या वंशजाचे आहे. कानिफनाथ गडाच्या परिसरातही यादवांची वसाहत होती याचा उल्लेख जुन्या इतिहासात आहे. येथील घाटे हे सुद्धा यादवच आहेत. जाधवगढी बांधुन स्वराज्याचे काम करणारे सरदार पिलाजी जाधवराव हे सुद्धा मुळचे यादवच आहेत. क-हाकाठावर ५२ सरदार होते. क-हाकाठावर होळकर, पुरंदरे, कुंजीर, जाधवराव, कामठे, जगदाळे, भिंताडे, जगताप, इंगळे, पानसे, बोकील, विंचुरकर, भुतकर, इंदलकर, बडदे, खैरे,पोमण, पवार, शिर्के, नाईक, सरदेशमुख,टिळेकर आदी सरदारांनी पेशवाईला साथ देण्याचे काम केले. शंभर मैलाचा क-हेपठार हा यादवांच्या अदिपत्याखाली होता. बहमनीकडून पुरंदर किल्ला यादवांनी ताब्यात घेतला होता. किल्ल्याच्या पायथ्याला पूर आणि पोखर गावाजवळ नारायणेश्वराचे मंदिर यादवांनीच बांधले.
( दशरथ यादव यांच्या “यादवकालीन भुलेश्वर” या संशोधनपर पुस्तकातून )
संपर्क- 9881098481
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.