July 19, 2024
Researcher Opinion on Where Dnyneshwar wrote Dnyneshwari
Home » ज्ञानेश्‍वरी कोठे लिहिली ? संशोधकांचे मत काय ?
संशोधन आणि तंत्रज्ञान

ज्ञानेश्‍वरी कोठे लिहिली ? संशोधकांचे मत काय ?

संत ज्ञानेश्‍वरांनी नेवासे येथील ज्ञानेश्‍वर (करवीरेश्‍वर) मंदिरात खांबाजवळ बसून ज्ञानेश्‍वरी सांगितली. येथेच ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी लिहिली आहे, हे सर्वपरिचित आहे. पण ज्ञानेश्‍वरी अन्य ठिकाणी लिहिल्याचे पुरावे संशोधनात सादर झाले आहेत. या संदर्भात शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. याबद्दल…

– राजेंद्र कृष्णराव घोरपडे

ज्ञानेश्वरी ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी नेवासे येथे लिहिला व करवीरेश्वराच्या (ज्ञानेश्वर) मंदिरातील खांबाजवळ बसून हा ग्रंथ सांगितला. मूळ शंकराचे मंदिर असलेल्या मंदिराच्या एका खांबाचे (पैस) आता ज्ञानेश्वर मंदिर झाले आहे. येथेच ज्ञानेश्वरी लिहिली गेली, असा इतिहास सांगितला जातो. पण संशोधक गोपाळ चांदोरकर यांनी यावर काही पुरावे सादर करत ज्ञानेश्वरी आपेगाव-पैठण येथे लिहिल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी असा दावा केला आहे की, ज्ञानेश्वरांनी नेवाशाला करवीरेश्वराच्या मंदिरात प्राकृत गीता हा 368 ओव्यांचा ग्रंथ लिहिला आहे. त्यात काही फार्सी शब्दही आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते प्राकृत गीता म्हणजे सर्वसामान्यांना समजेल, अशी गीता. भारत इतिहास संशोधन मंडळाच्या जुलै 2015 ते एप्रिल 2016 या कालावधीत प्रकाशित पुस्तिका 92 मध्ये चांदोरकर यांचा हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

पुराव्यासाठी ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा आधार

ऐसें युगें परी कळीं । आणि महाराष्ट्र मंडळी ।

श्री गोदावरीचांकूली । दक्षिणिलीं ।। 1802 ।। अध्याय 18 वा

त्रिभुवनैकपवित्र । अनादि पंचक्रोश क्षेत्र ।

जेथ जगाचे जीवन सूत्र । श्री महालया असे ।। 1803 ।। अध्याय 18 वा

सोनोपंत दांडेकर यांनी या ओव्यांच्या दिलेला अर्थ असा – याप्रमाणे युगांपैकी कलियुगात आणि महाराष्ट्र देशात श्री गोदावरीच्या दक्षिण तीरावर त्रैलोक्‍यामध्ये जे पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र आहे व जेथे जगातील सर्व जीवांची चालक श्री महालया (श्री मोहिनीराज) आहे. चांदोरकर यांच्यामते या ओव्या ज्ञानेश्‍वरी लिखाणाचे ठिकाण स्पष्ट करणाऱ्या आहेत. गोदावरी नदी, त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र व महालया हे या ओव्यात आलेले उल्लेख यासाठी महत्त्वाचे आहेत.

ज्ञानेश्वरी लिहिण्याचे ठिकाण नेवासे नसल्याचा दावा

पैठण हे राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या व सांस्कृतिकदृष्ट्या (धार्मिक) गोदावरीकाठचे पवित्र क्षेत्र होते. नेवाशाला त्रिभुवनैकपवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र असा मान कधीच नव्हता. त्यामुळे ज्ञानेश्वरी लिहिण्याचे ठिकाण नेवासे हे नाही, असा दावा चांदोरकर यांनी शोधनिबंधात केला आहे. त्यांच्या मते, नेवाशामध्ये प्रवरा नदी आहे. ज्ञानेश्वरीत आलेल्या काही उल्लेखांनुसार हा ग्रंथ गोदावरी तिरी लिहिला आहे आणि पैठण पंचक्रोशीतील आपेगाव गोदावरी काठी आहे. दुसरा मुद्दा असा की, गोदावरीत स्नान करावे व प्रवरेचे पाणी प्यावे, अशी म्हण प्रचलित आहे. त्यामुळे प्रवरा नदीचे महत्त्व हे आहेच. मग ज्ञानेश्वरांनी गोदावरीचा उल्लेख केला तसा प्रवरेचा उल्लेख का केला नाही ? असा सवालही त्यांनी शोधनिबंधात केला आहे.

महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचा मुक्काम नेवाशाला असताना त्यांच्या शिष्येने म्हाळसेच्या मूर्तीचे वर्णन केलेले आढळते. संत नामदेव यांनी नेवाशासंबंधात अभंगात लिहिताना म्हाळसेचाच उल्लेख केला आहे. ज्ञानेश्‍वरांनी प्राकृत गीतेत मोहिनीराजाचा उल्लेख केला आहे. येथे कोठेही महालयाचा संबंधच येत नाही. या अशा संदर्भावरूनच चांदोरकर यांनी ज्ञानेश्‍वरी लिहिण्याचे ठिकाण हे नेवासे नाही, असा दावा केला आहे. गोदावरीकाठी त्रिभुवनैकपवित्र अनादी पंचक्रोश क्षेत्र पैठण हे आहे. जेथे महालया हे ठिकाण म्हणजे आपेगाव आहे. आपेगावात ज्ञानदेवांच्या पूर्वजांच्या समाध्या आहेत. त्यामुळे ज्ञानेश्‍वरी ही नेवाशात लिहिली गेली नाही, असे त्यांनी संशोधनात म्हटले आहे.  


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

सण-उत्सवांचे संवर्धन योग्यरितीने झाले तरच खऱ्या आनंदाची प्राप्ती

भारूड : नृत्यनाट्याद्वारे सोप्या शब्दांत अध्यात्माची शिकवण देणारा काव्यप्रकार

तुकारामांचा शोध ही निरंतर चालणारी गोष्ट – प्रा. समीर चव्हाण

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading