लेखक अवास्तव वर्णनात अडकून पडत नाहीत. जे वास्तव आहे तेच मांडतात. सरळ साधी सोपी वाक्य रचना, अलंकार, उपमा आदी अलंकारान अडकून पडत नाही. संवाद हि फारसे नाहीत. तरी हि कथा वाचकांची उत्कंठा वाढवतात.
योगीराज वाघमारे,
ज्येष्ठ साहित्यिक, सोलापूर
डॉ. शंकरराव खरात स्मृती साहित्य संमेलन आटपाडी जि. सांगली येथे झाले. या संमेलनात आयु. विलास खरात यांच्या “आकुबा आणि इतर कथा” व “माणदेशाचे मानबिंदू” ह्या दोन ग्रंथाचे प्रकाशन झाले आहे. विलास खरात यांची ओळख महाराष्ट्रात एक सामाजिक कार्यकर्ता, दलित पँथर आणि दुष्काळी अवर्णग्रस्त आटपाडी, माण, जत, सांगोला तालुक्यांच्या जमिनीसाठी ‘पाणी’ मिळावे म्हणून चळवळ उभी करणारा कार्यकर्ता अशी आहे. आता त्यांनी दोन ग्रंथांच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात पाऊल टाकलेले आहे.
डॉ. कुलगुरू शंकरराव खरातांचा सहवास, त्यात सामजिक कार्याची आवड, दलित पेंथरची बंडखोर वृती आणि माणदेशाच्या मातीशी, माणसांच्या प्रश्नाशी जोडलेली नाळ, असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे विलास खरात त्यांचा पहिला कथा संग्रह “आकुवा आणि इतर कथा” वाचताना त्यांचा प्रत्यय येतो. मनोगतात लेखक आपली भूमिका मांडताना म्हणतात, “वास्तविक हा कथासंग्रह माणदेशातील अवर्षणग्रस्त दुष्काळी भागातील गावखेड्यातील लोकांच्या कथा, हालअपेष्ठा, त्यांची परवड, जगण्याची धडपड निसर्गरुपी व मानवरुपी संकटे यांच्याशी मुकाबला करून जिद्दीने, धाडसाने व स्वाभिमानाने उभे राहणारे लोक त्यांच्यावर आधारित हा कथासंग्रह आहे”.
माणदेशावर निसर्गाने केलेला अन्याय तेथील माणसांचा जगण्यासाठीचा संघर्ष, परिस्थितीवर मात करण्याची जिद्द, मनाचा मोठेपणा, उदारता माणुसकी जपण्याची आंतरिक ओढ, पोटभरण्यासाठी मुंबई-पुण्याला कारखाना कंपनीत गेलेला माणदेशी माणूस सणासुदीला, जत्रेला हमखास गावच्या ओढीने येणारी साधी माणसं या पूर्वीच्या अनेक साहित्यकांनी कथा-कादंबरी-चित्रपटातून साकारलेली आहेत. विलास खरात यांनी ही या कथासंग्रहात असाच गोतावळा शब्द बध्द केलेला आहे.
जेवढी माणसं तेवढ्या प्रवृत्ती असतात. अशा प्रवृत्तीच्या माणसांचे स्वभाव वैशिष्ट्याचे दर्शन सदर कथा संग्रहात लेखकाने अत्यंत सहज आणि वास्तवादी रंगविलेले आहे. साधेपणा, भाषेचा अवडंबर नाही की उपमा उत्प्रेक्षांचा भडीमार.
“वाटणी” म्हणजे विभाजन हा कळीचा मुद्दा असतो. जागा, घर, शेत इस्टेटीची वाटणी घराघरामध्ये वैरभाव निर्माण करते. “वाटणी” सहज होत नसते. भावाभावाने, बाप लेकात, बायकांत आणि भावकीत वैर, भांडण, दुरावा निर्माण करते. वाटणीसाठी मारामारी होतात. कोर्ट कचेरी होते. घरातलं भांडण गावात, ग्रामपंचायत आणि शेवटी कोर्टात जातं. शेजारी किंवा हितशत्रू कुणालातरी भरीस्त्र घालून घरात वैरत्व निर्माण करतात.
वाटणी कथेतील सोपान सज्जन माणूस आहे. पण त्याचा धाकटा भाऊ ज्ञानु विशेषतः त्यांची बायको गावातल्या उचापतीखोर महिपतरावाचे एकूण परस्पर वडिलोपार्जित शेत स्वतः च्या नावावर करून घेतो. शेवटी कारस्थान उघडकीला येते. थोरला भाऊ सोपानला वाईट वाटते. गावातील शहाण्या माणसांपुढे गाऱ्हाणे मांडतो. गावात काही माणसं न्यायी असतात. ते तालुक्याला जाऊन अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती सांगतात. अधिकाऱ्यांना कळून चुकते की सरळ मार्गी सोपानची धाकट्या भावाने फसवणूक केलेली आहे. ते सोपानला जमीन परत करतात. सोपान आपल्या धाकट्या भावाला म्हणजे ज्ञानुला म्हणतात, “अरे, मला जर बोलला असता तर मी तुझ्या नावे जमीन केली असते, तुला वारस केले असते”. अडाणी माणसं मनाने आणि अंतःकरणाने निर्मळ असतात. हेच खरे आहे.
“परवड” हि कथा जीवाला चटका लावते. मुलांनी शिकून मोठं व्हावं, आई-वडिलांचे म्हातारपणाचे दिवस सुखात जावेत एवढीच अपेक्षा असते. पण मुलं शिकून मोठी होतात, नोकरीला लागतात, लग्ने होतात, पण पुढे गावाकडे येत नाहीत, शिक्षणासाठी वडिलाने शेती विकलेली असते. किंवा बँकेचे कर्ज काढलेले असते, त्याचे तगादे लागतात. बाप कळवळून सांगतो पण पोरं स्वतःच्या अडचणी सांगून जबाबदारी झटकतात. आई-वडील खचून जातात. एकीकडे दुष्काळ, बँक-सरकार छळीत असतात. ज्यांच्या आशेवर जगायचे तेच जबाबदारी झटकतात. अशा वावटळीत सापडलेले आई-वडील स्वतःला सावरतात आणि खंबीरपणे गावीच राहण्याचे ठरवितात. जगण्यासाठी केलेली तडजोड म्हणजे “परवड” कथा.
“दारू आणि राजकारण” हे दोन विषय गावगाड्याच्या नाशास कारणीभूत आहेत. हे लेखकाच्या नजरेतून सुटलेले नाहीत. त्यांचे समाज निरीक्षणातून काही कथा अवतारल्या आहेत. त्यापैकी एक “केराप्पा गवंडी” आणि दुसरी “रानाप्पा केराप्पा” बायको वारल्यानंतर उध्वस्त होतो. दारूच्या आहारी जातो, मुलाकडे लक्ष देत नाही. तेव्हा गावातील समजदार माणसं त्याला समजावून सांगतात आणि केराप्पाला दारूपासून मुक्त करतात. त्यामुळे त्याचा मुलगा सुभाष शिकून मोठा होतो. अशी जीव लावणारी माणसं गावात असतात. हे लेखकाला भावते. तर दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकीत रानाप्पाचा भाऊ “खंडू” बिन विरोधी निवडून येतो. ते काही दुष्ट्प्रवृतीच्या व्यक्तींना सहन होत नाही ते वेगळ्या पध्दतीने डाव टाकतात. एकाची जमीन रानाप्पाने विकत घेतली होती ती मला घ्यायची होती म्हणून तंटा केला जातो. प्रकरण कोर्टात जातं. पण रानाप्पाला त्यांचे काही वाईट वाटत नाही पण विरोधकाच्या मुलाला शिक्षणासाठी मदत करतो, वैर विसरतो. आणि कोर्टातून केस काढून घ्यायला लावतो. “वैराने वैर शमत नाही ते प्रेमाने शमते” हे मानवतेचे तत्वज्ञान आहे. हेच सिध्द होते. चांगुल पणाने विरोधकावर मात करता येते.
बौद्ध समाजातील अंतविरोधातली ‘भावकी’ हि कथा आहे. “भावकी हि वाटेवरची उणेकरी असते” हे जरी खरे असले तरी भावकीतली एकजूट म्हणजे संघटन महत्वाचे आहे. तेच आनंद आणि पडत्या काळात मदत करीत असते. सुरेश हा कोंडीबा आणि अनुसया यांचा मुलगा मोठ्या हालअपेष्ठा यातना सहन करून त्याला शिकविले पण पुढे लग्न झाल्यावर आई बापाला विसरला. लग्न सुध्दा आईबापाला समाजाला विचारून केलं नाही. त्याचा राग अर्थातच भावकीला आला. जेव्हा सुरेशची आई वारली तेव्हा दारात प्रेत तसचं राहिलं. कोणीसुद्धा मदतीला आलं नाही. तेव्हा सुरेशला भावकीची आठवण झाली. तो भावकीला म्हणाला, “आमच्या कडून काय चुकलं ते सांगा. प्रेताला खांदा का देत नाही” त्यावर ; भावकी म्हणाली तु शिकला म्हणजे समाजापेक्षा मोठा झालास कां ? लग्नात आम्हाला बोलावलं नाही. परस्पर लग्न केलं, “एकवेळ पात सोडली तरी चालेल पण भावकी कधी सोडू नये” सुरेशला पश्चाताप झाला आणि त्याने माफी मागितली. लेखक सहजपणे संघर्ष मांडतात. आणि प्रत्येक कथेत शेवट आनंददायी तथा सकारात्मक करतात. पर्यावसन दुःखदायी करीत नाहीत.
“दरवेशी” हि कथा या संग्रहातली प्रभावी कथा आहे. जात, धर्म यापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे. नातेवाईक, मुलंबाळांचे वागणं स्वार्थापोटी असते. पण या कथेत दरवेशी म्हणजे भटक्या उपेक्षित माणसाने दाखविलेली माणुसकी, मैत्री महत्वाची आहे. बाबूलाल दरवेशी हा अस्वलाचा खेळ करून उपजीविका करणारा जेव्हा दामु आण्णाच्या गावी येतो. तेव्हा तो तापेने आजारी पडतो. सोबतचे दरवेशी पुढे निघून जातात. बाबुलालचे कुटुंब म्हणजे पालं मागे राहते. दामु आण्णा सहज त्या एकट्या पालाकडे उत्सुकते पोटी येतात तेव्हा त्यांना बाबूलाल ची तब्बेत बिघडलेली समजते. ते लगेच तालुक्याच्या डॉक्टरांना घेऊन येतात. औषधपाणी होते. बाबूलाल बरे होतो. त्याला दामु अण्णाचे उपकार कसे फेडावेत ते समजत नाही. पुढे काही दिवसानंतर बाबूलाल दामु अण्णाच्या गावी येतो तेव्हा कळून येते की, त्यांना त्यांच्या मुलाने आणि सुनेने घराबाहेर काढून शेतात झोपडीत ठेवलेले असते. त्यांना त्वचा रोग झालेला असतो. ते त्यांना खायला सुध्दा देत नसतात. बाबूलाल वैद्याकडून झापालाचे औषध देऊन बरे करतो. दामु आण्णा म्हणतात मी मुलाकडे जाणार नाही. त्यांनी खूप छळ केला आहे. मी तुमच्या बरोबर येतो. बाबुलालला आनंद होतो. दरवेशी म्हणून ते गावोगाव भटकतात. रक्ताच्या नात्यापेक्षा दरवेशाचे नाते चांगले आहे.
कथा संग्रहाची शीर्षक कथा म्हणजे “आकुबा” आकुबा शिकलेला नसला तरी चांगल्या स्वभावाचा व संकटाला घाबरून न जाणारा होता. म्हणून त्याच्यावर आलेल्या संकटावर त्याने मात केलेली आहे. घराला आग लावली. सगळा प्रपंच जळाला. येकुबाने मदत केली. थोड्याच दिवसात थोडी जमीन मेंढर विकून घर बांधलं. जळीतांना घरासाठी सरकारी मदत म्हणून त्याचा भाचा रघूने तालुक्याला नेऊन अर्ज दिला. आकुबाच्या सह्या घेतल्या. त्याची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली गावातले बळवंतराव आणि रघु असेच कटकारस्थान करून लोकांना फसवितात. सुभानाला बळवंतरावाच्या शेतात सालगडी म्हणून नोकरीला लावतात. त्याला २०० रु. इसार देतात. पण दहा हजार दिले असे लिहून घेतले जाते. अशा अनेक भानगडी पाहून आकुबा कोर्टात जातात त्यावेळी सगळं कारस्थान उघडकीला येतं. आकुबाच्या धैर्याची परीक्षाच होते. गावोगाव अशा प्रवृत्तीची माणसे असतात. ते सज्जनांना जगु देत नाहीत हे खरे आहे.
लेखक अवास्तव वर्णनात अडकून पडत नाहीत. जे वास्तव आहे तेच मांडतात. सरळ साधी सोपी वाक्य रचना, अलंकार, उपमा आदी अलंकारान अडकून पडत नाही. संवाद हि फारसे नाहीत. तरी हि कथा वाचकांची उत्कंठा वाढवतात. व्यक्ती चित्रण आटोपशीर जसे, रानाप्पाचा पेहराव साधारण डोक्याला फटका, अंगात बंडी, धोतर, गळ्यात मोठा गमजा, कानात कुंडल होती. उंची साधारण सहा फुटापर्यंत, चेहरा राकट, वर्ण काळा सावळा, झुबकेदार मिशा, दाढी, पायात कातडी चप्पल, हातात उंची पुरी काठी, खांद्यावर घोंगड अशा पेहरावात तो वाडी वस्त्यावर प्रसिध्द होता. “केराबाई सुध्दा रंगाने उंचीने साधारण होती. अंगात नऊवारी साडी, इरकल साडी चोळी पायात चांदीच्या साखळ्या, हातात बाजूबंद घालत होती”. –
म्हणी वाक्यप्रचाराने कथेला सौष्टव प्राप्त होतं. संग्रहात मोजकेच म्हणी वाक्यप्रचार आहेत, जसे “ताकाला जाऊन मोगा कशाला दडवायच” लंचाड मागं लागणे, पै-पाव्हणे गबर गंड, बिचकून राहणे, फैसला.
‘आरं, पाय धु तर साखळ्या कितीच्या म्हणायचे कारण काय’?
‘भावकी वाट्याचे उणेकरी’
‘पायात पाय घालणे, रंडकी-मुंडकी, कावरे-बावरे होणे’
‘लहान तोंडी मोठा घास, माडगं’
“घरात लोखंडी पेटी, चार भांडी, खापराच्या घागरी, रांजण, वाकळा इत्यादी सामान होतं एक शेळी चार कोंबड्या पाळल्या होत्या”.
‘झोपडीत चान्या वाळत घातलेल्या त्या हंड्यात टाकल्या कथा संग्रह वाचल्यानंतर काही गोष्टी प्रकर्षाने दिसून येतात ते म्हणजे
‘माणसं माणदेश सोडून जगण्यासाठी मुंबई-पुणे कंपनीत जातात. फॅक्टरी किंवा साखर कारखान्यात जातात. जमीन असून हि पिकत नाही म्हणून परदेश जवळ करतात. मुलांच्या शिक्षणासाठी एकर दीड एकर शेत विकतात, सावकार टपलेले असतात. जमिनीचा फेरफार तलाठी करतात, त्यामुळे शेतकरी नडला जातो कोर्टाच्या वाऱ्या सुरु होतात. जमिनीचा व्यवहार, घरातली भांडण, लग्न समारंभात भावकीचा सल्ला घेतला जातो. चावडी तथा ग्रामपंचायत मध्ये न्यायनिवाडा होतो. हि चांगली गोष्ट आहे. प्रत्येकांची एकच ओरड आहे पोरं नीट बघत नाहीत. सुना सांभाळीत नाहीत. नंतर वृद्धाश्रमात पाठवितात. तरी हि त्याचं गावावरचं पर्यायाने माणदेशावर प्रेम कमी होत नाही. शेवटी लेखकाने जे समाज दर्शन घडविले आहे त्याला प्रत्येकजण सहमत होईल असे वाटते.
सद्याच्या आधुनिक युगात कुटुंब पध्दती बदलत चाललेल्या आहेत. परिवारातला एकोपा, संस्कृती, विचार, आचार जीवन पद्धतीत बदल दिसत आहेत. कुटुंबातील पवित्र नात्यात शब्दाने, माना-पानाने, शंका-कुशंकांने भेद होत आहेत. शहरी ग्रामीण रिवाजात अंतर पडलेले आहे. एखाद्या सदस्याच्या वेगळ्या भूमिकेमुळे परिवाराची घडी विस्कटली जाते. ज्यांनी आख्ये आयुष्य आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी खर्ची घातलेले असते. हाल अपेष्ठा सहन करून त्याला उभे केलेले असते. अशा आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणात वृद्धाश्रमात सोडले जाते. रक्ताच्या नात्यातील हक्काची माणसे असतानाही त्यांना बेवारशासारखे अनाथाश्रमात जीवन कंठावे लागते. समाजातलं वास्तव विलास खरातांनी मांडलेले आहे.
पुस्तकाचे नाव – आकुबा आणि इतर कथा
लेखक – विलास खरात,
प्रकाशक – चेतक बुक्स, पुणे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.