September 12, 2024
Govind Patil book review by Ravindra Gurav
Home » आबालवृद्धांच्या मनाचा काठ चिंब करणारं ‘थुई थुई आभाळ’
मुक्त संवाद

आबालवृद्धांच्या मनाचा काठ चिंब करणारं ‘थुई थुई आभाळ’

असं हे थुई थुई आभाळ वाचून आबालवृद्ध वाचक चिंब झाल्यावाचून राहात नाहीत. मनाचं आभाळ व्यापून उरणार हे आभाळ एकदा नजरेखालनं घालावंच असं आहे तेही सदैव गुनगुणतच… आपलं मत, म्हणणं दांडगाईनं मुलांवर न लादता, उपदेशाचे डोस न पाजता त्यांच्या अंगानं, कलेन त्यांच्याशी प्रांजळपणे एकरूप होत एक एक काव्य थेंब सांडत तो फसा म्हणता म्हणता अगदी थुई थुई आभाळभर करत हे आभाळ साकारलं आहे‌.

रवींद्र शिवाजी गुरव

‘थुई थुई आभाळ’ हा कविवर्य गोविंद पाटील यांचा बालकविता संग्रह सृजन प्रकाशन सांगली यांनी प्रकाशित केला आहे. सुप्रसिद्ध चित्रकार पुंडलिक वझे यांच्या कुंचल्यातून साकारलेले मुखपृष्ठ ते मलपृष्ठ व्हाया आतील सर्व चित्रं असं हे दिमाखदार रूप थुई थुई आभाळ कवेत घेऊन आलं आहे. ६८ पानांचा हा देखणापान संग्रह साहित्य प्रांतात आभाळाएढ्या उंचीचा झाला आहे शिवाय हातात घेताक्षणी वाचकांनं त्याच्या प्रेमात पडावा असाच आहे. गुरूवर्य डॉ. राजन गवस यांची संग्रहाच्या मलपृष्ठावरील भक्कम पाठराखण आणि अनेक नामवंत साहित्यिकांच्या प्रतिक्रिया घेऊन दाखल झालेलं हे आभाळ कवी मनोगतापासूनच वाचकाला आत आत ओढून घेत जातं.

गंमत ते माळी टोल अशा एकीला एक सरस ५६कविता या संग्रहात सामील झाल्या आहेत.
गंमत मधील सोनू सकट अन्वीही जबलातच झाली आहे. मुलगा आणि चांदोबाचा संवाद बोलका आहे. हुमान मधली फळभाजी खाता खाता पळायची पाळी येते. झुरळाची चटपटीत खबर एकदम जोर लगाके हैया… बेगमी करणारी अशीच ती कामकरी मुंग्या मधून…. कोल्हापुरात चप्पल घेणार बदक एकदम हुशार निघाला..नाव काढणाराच. टोल टोलाचा खेळ बाळाचाही एकदम बेस्टच.
आंब्याच्या सिझनला
तिची खूप चैन असते
पिकलेल्या फळांची
तिला आधीच चाहूल लागते हे खारुताई सांगते. दुधाचा टँकर घेऊन जाणारा सरडा तर राव एकदम चमत्कारीक‌..
इतक्यात तिथं एक मुंगूस कडमडलं की ड्रिंकर..
सरड्याने एका दमात पिऊन टाकला टँकर…
खिशातला माल विकून गब्बरसिंग झालेले टोळ टोळमधून नजरेस पडतात.
दाणे टिपणारी चिऊ, पेरू खाणारा पोपट, गाणे गाणारा कोकीळ, पिसारा फुलवणारा मोर मित्र माझे मध्ये भेटतात. मासोळी मनात फिरते ती एकदम चमकदार ठरतंच. ढगांची चित्रकारी तर ढगांची विविधांगी चित्रकारिता कला टिपणारी आहे.
काळे पांढरे ढग
मिळून झाले गोळा
आभाळाच्या फळ्यावर
चित्र काढली सोळा.
पावसाळा, उन्हाळा असे ऋतुचक्रही मनात घर करते. शेळ्या राखणारा धुळा आजोबा धनगरी पायताणासह मनात रुतून बसतो ते..‌
आजोबा राखतात शेळ्या
खडसून घालतात
बाभळीच्या डहाळ्या
असे गुणगुणतच….
देश म्हणजे एकेक बांधलेली मोटच.
आपला देश जपूया
त्याच्यासाठी खपूया…
खिडकी म्हणाले मधील दार खिडकीचा संवाद काच फुटत मनात घुसतोच.

जिऊ आजोबा
जिऊ आजोबा, नानू आजी शेतामध्ये पिकवतात भाजी… त्यांच्या कष्टाने फुललेला वरणा, जगदाळा, पोकळा, मेथी, शेपूनं तर पोटच भरतं. आणि मुळ्यांच्या प्रकाराचंही गणित सहज सुटतं.
मुळ्याचे किती
प्रकार सांगा
एक जमिनीत
दुसऱ्याला शेंगा

मोठ्यांचं सगळं चालतं कसं हे विचारणा करणारी आम्ही छोटे ना?
कम्प्युटरचा खेळही भन्नाट झाला. तळ्यात पडलेला चेंडू काढण्यासाठी बाबा मला पोहायला शिकवा म्हणणारा मुलगा भारीच चकवा देतो. काय करावं आणि काय नको सांगणारी मानवतेची दीप तेवणारी दिवाळी आली‌..
मानवतेचे दीप लावू
पर्यावरण वाचवू…
धडामधूडूक मधली खुडूक कोंबडी
उपस पीस
शोध नाक करीत नाकात जाते. सूर्योबा, वारोबा, ढगोबा आपापली गाऱ्हानीच मांडणारे तरीही मला नाही उगवून कसं चालेल म्हणणारा सूर्य मनात तळपतच राहतो. आपले प्राणी मित्र वाघ्या कुत्रा, गजा मांजर, सगुना गाय, लाडू वासरू, हाणमं बैल हे घरचेच सदस्य
दारात उभे ट्रॅक्टरोबा
डिझेल वाढलं लय बाबा म्हणत महागाईवर ताशेरे ओढत प्राण्यांच्या कष्टाचं चीज करते.

टोलापूरच्या चौकातला पांढरा बगळा पोलीस भन्नाटच.
चॉकलेटम्
मात्र हवी असते
गरमागरम भाकर
भाजी संगे खाताना
मस्त येतो ढेकर

बापलेक
मधला बाप मनात घर करतो तो लेकाला दूध पोट भरून
बापाला चहा कप भरून हे सांगतच.
कॅप्टन लियो आजोबा तर एकदम जिंदाबाद
कायम तुमची राहील याद..
शाळेला सुट्टी मध्ये तर माझा पाय मोडला, मांजर खाते माऊस तर एकदम लै भारी…

बंडोबा ने घेतलेला दादाचा मोबाईल तर झिंगालाला झिंगालाला झिंग झिंग झिंगच.

लोककलावंत तर भूतकाळात घेऊन जातात
गावांमध्ये कोणीच आता फिरकेनासे झाले
आजी म्हणते
सगळे गाव शहरात उठून गेले..
कल्पनेच्या दुनियेत तर
कल्पनेच्या दुनियेत आज वाटेल खोटे
यातून लागतील ना शोध मोठे मोठे…यातल्या संशोधक कल्पना तर भन्नाटच शास्त्रज्ञ घडवणाऱ्या आहेत.

इंग्लिश विंग्लिश वाचून तर शेळीला गोठ म्हणायचं
म्हणाल्या वर्गात बाई
सहज कळत इंग्रजी
जड वाटत नाही…

कशापासून काय? तर
भाजी भाकरी खाऊ
शाळेत पळत जाऊ
फास्ट फुड वर मातच करते.
मैफिल जमते ती मोबाईलच्या माध्यमातून‌

नवीन वासरू तर अगदी पुढ्यातच जन्म घेतं.‌‌
हळुवार आलं बाहेर
मुंडकं आणि पाय
आजीने जोर लावून
मोकळी केली गाय…

वर्गात आले प्राणी तर गंमतच भारी करते.
पावसानं घातला
धिंगाना काल
तरीबी बाबा
पिकवत जाई
बाजारात कोणी
विचारत नाही..
ही खंत आमच्या शेतात मधून उरी दाटते..
दे ..तर तुझा वसा
दाही दिशा
पसरू दे …म्हणतच.
गाणी गाऊ, माझ्या शाळेत,
टोलापूर, माळी टोळ तर टोलापूर हे नवं टोलेजंग शहरच मनात वसवते.
दंमत, चित्लं, दंपती, जबलाट दिलबाट असे बोबडे बोल…

चांदोमामा ते अलीकडचं राफेल, कॉम्प्युटर, मोबाईल इथं पर्यंत भ्रमंती घडवणारं हे आभाळ खूप दांडगा आवाका असलेलं असलं तरीही आबालवृद्धांनी नजरेसह मोठ्या मनानं ते कवेत घ्यावंच असं अवखळ आहे. मुंग्या अन्य किटक पाळीव तसेच जंगली प्राणी यांच्याशी एकरूप होत मातीशी नाळ जोडणारं आहे. डल्ला, शिवाशिवी, मासोळी, दंगा शेळ्यांचा खांड, डहाळ्या, उफराटे, उकीर, खुडूक, भांडकुदळ अशा भुदरगडच्या सुपीक मातीतील मायबोलीतले शब्दांचे भांडार तर वाचकाचं मन आभाळ व्यापून टाकतं. अशात इथं लोक कलावंतही डोकावतात. टोलापूर, वारोबा, सूर्योबा, ढगोबा अशी नावे दांडगी दुंडगी उपमा घेऊन मिरवतात. आपलं अनोखंपण सजवून धजवून बसतात.

असं हे थुई थुई आभाळ वाचून आबालवृद्ध वाचक चिंब झाल्यावाचून राहात नाहीत. मनाचं आभाळ व्यापून उरणार हे आभाळ एकदा नजरेखालनं घालावंच असं आहे तेही सदैव गुनगुणतच… आपलं मत, म्हणणं दांडगाईनं मुलांवर न लादता, उपदेशाचे डोस न पाजता त्यांच्या अंगानं, कलेन त्यांच्याशी प्रांजळपणे एकरूप होत एक एक काव्य थेंब सांडत तो फसा म्हणता म्हणता अगदी थुई थुई आभाळभर करत हे आभाळ साकारलं आहे‌. मुलांसाठी सकस बाल साहित्य काही मिळत नाही असा टाहो फुटणाऱ्या काळात हे आभाळ असं ओथंबून आलंय ते वाचक नजरेखालनं वळीव, मौसमी रूपं घेऊन असं जिथं तिथं थुई बरसत राहील हे नक्की….

पुस्तकाचे नाव: थुई थुई आभाळ (बालकविता संग्रह)
कवी: गोविंद पाटील, मोबाईल – ९८८१०८१८४१
प्रकाशक : सृजन प्रकाशन सांगली
मुखपृष्ठ आणि आतील चित्रे: पुंडलिक वझे
□ आर्ट पेपर | फोर कलर प्रिंटिंग पृष्ठे-६४+४ | मूल्य– १६० ₹


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

अब की बार; महाराष्ट्र मोलाचा…

अध्यात्माबरोबरच पर्यावरणाचाही समतोल राखायला हवा

“बीएसएनएल” आर्थिक सक्षमतेबरोबरच आमुलाग्र सुधारणांची  गरज !

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading