April 20, 2024
Importace of Agriculture in Economic Crises period
Home » भावी काळात शेतीचे महत्त्व वाढणार
विश्वाचे आर्त

भावी काळात शेतीचे महत्त्व वाढणार

अर्थव्यवस्था कधी ढासळेल याचा नेम नाही. अशा या अर्थव्यवस्थेत शेती हाच एकमेव उद्योग आहे जो सर्वांना तारणारा आहे. यासाठी शेतीला उत्तम दिवस येणार आहेत हे लक्षात ठेवा आणि शेती करा.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

किंबहुना कृषी जिणें । गोधनें राखोनि वर्तणें ।
कां समर्घींची विकणें । महर्घी वस्तु ।। 881।। ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ – फार काय सांगावे ! शेतकीने जगणे, गायी सांभाळूण राहणें. अथवा स्वस्त वस्तू घेऊन महाग विकणे.

शेती आणि अध्यात्म याची उत्तम सांगड माऊलीने ज्ञानेश्वरीत घातली आहे. पूर्वीच्याकाळी ऋषी-मुनी जंगलात राहायचे. स्वतः शेती कसायचे आणि जीवन जगायचे. अध्यात्मात स्वतः कष्ट करण्याला महत्व आहे. स्वयंपूर्ण झाले तरच अध्यात्मात प्रगती करता येते. शेती हा उद्योग स्वयंपूर्ण करणारा आहे. मठांना, मंदिरांना याचसाठी जमिनी दिल्या जात होत्या. मठ स्वयंपूर्ण असावा. तेथे अभ्यास करणारा साधकही स्वयंपूर्ण व्हावा हा त्या मागचा उद्देश होता. मठामध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही हेच शिक्षण दिले जायचे. स्वयंपूर्ण व्हायला शिकवले जायचे. मंदिराला कोणी देणगी दिली नाही तरी कोणासमोरही हात पसरायला लागू नयेत. यासाठी शेतीचा आधार मंदिरांतील पुजाऱ्यांना दिला गेला होता. सेवा हा धर्म सांभाळला जावा हा त्यामागचा उद्देश होता.

अध्यात्मात सेवेला महत्त्व आहे. स्वयंपूर्णतेला महत्त्व आहे. हे जाणे ओळखले आणि हस्तगत केले तो अध्यात्मात निश्चितच प्रगती करू शकतो. शेतकऱ्यांनीही हा विचार लक्षात घेऊन शेती करायला हवी. गोधनाचे महत्त्व जाणून घ्यायला हवे. देशी गायींचे संगोपनाचे फायदे लक्षात घ्यायला हवेत. स्कंदपुराणात, देवी पुराणात, ब्रह्मपुराणात, आदित्यपुराणात, विष्णुधर्मोत्तर पुराणात, पद्मपुराणात, मत्स्य पुराणात गोपालन संरक्षण, संवर्धनाबाबतचे उल्लेख आढळतात. पराशर कृषी संहिता, काश्यपीय कृषी संहिता, कृषिसंग्रह इत्यादी प्राचीन ग्रंथात बैलाच्या चार वर्णाची गुणधर्माप्रमाणे विभागणी केल्याचेही उल्लेख आहेत. प्राचीन काळी पशू चिकित्सालये असल्याचेही उल्लेख आढळतात. शेतीचा, पशुधनाचा विकास हा त्याकाळात झाला आहे. वृष कल्पद्रुम या ग्रंथात गोपालनाविषयी सविस्तर माहिती आढळते.

शेतीच्या विकासातच प्रगती आहे. याला दुय्यम लेखणे हे चुकीचे आहे. शेतकऱ्यांनी या सर्व ग्रंथांचा अभ्यास करण्याचीही गरज आहे. संशोधक वृत्ती ठेवून शेती केल्यास प्रगतीच्या वाटा सहज मिळू शकतात. शेतीला अध्यात्माची जोड मिळाली तर सुखाचा हा सागरच तयार होईल. सध्या शेतीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. पशुधनाचे महत्त्व कमी झाले आहे. यांत्रिकीकरणाने शेतीतील पशुधनच गायब केले आहे. यांत्रिकीकरण जरूर व्हावे. प्रगतीचा वेग, उत्पादकता टिकविण्यासाठी शेतीत यांत्रिकीकरणाची गरज आहे.

आज महाराष्ट्रात यांत्रिकीकरण न झाल्याने तुलनेत पंजाब, हरियाना या राज्यांच्या मागे आहे. उत्पादकता टिकविण्यासाठी यांत्रिकीकरण आवश्यक आहेच. पण या बरोबरच पशुधनाचेही महत्त्व विचारात घ्यायला हवे. यांत्रिकीकरण जमिनाचा पोत राखू शकत नाही. जमिनीचा पोत राखण्यासाठी सेंद्रिय खताची गरज भासते. हे सेंद्रिय खत केवळ पशुधनामुळेच उपलब्ध होते. गांडूळ खतातही शेणखताची गरज भासते. जमिनीची घडण सुधारण्यासाठी, जलधारणाशक्ती वाढविण्यासाठी, रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर व्हावा यासाठी तसेच जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रिय खताची गरज आहे. शेणखताची आवश्यकता लक्षात घेऊन पशुसंवर्धन ही काळाची गरज आहे.

आज रासायनिक खते आपण परदेशातून आयात करतो. तसे सेंद्रिय खतही परदेशातून आयात करावे लागेल. ऑस्ट्रेलियामध्ये गोधन अधिक आहे. हा देश आपणास सेंद्रिय खताचा पुरवठा करू शकेल. चाऱ्याची मुबलकता असणारे देश सेंद्रिय खताची निर्मिती करू शकतात. हा नवा उद्योग त्यांच्यासाठी उपलब्ध होईल. ते देश असे उद्योग उभारण्याचीच तर वाट पाहतात. त्यांना असे उद्योग उभारून प्रगती साधायची आहे. पण आपण आपल्याकडे असणारे पशुधन जोपासले तर याची गरज भासणार नाही. शासनानेही देशाच्या स्वयंपूर्णतेसाठी पाऊल उचलायला हवे.

आयातीपेक्षा निर्यात अधिक व्हावी हा प्रगतीचा नियम आहे. प्रगती साधायची असेल तर आपणावर आयात करण्याची वेळ येणार नाही याचा विचार करायला हवा. त्यासाठी आत्तापासूनच त्याचे नियोजन हे असायला हवे. जमीन उत्तम तर शेती उत्तम. जमिनीसाठी तरी पशुपालन करावेच लागेल. लोकसंख्येचा वेगही वाढत आहे. प्रत्येक दिवसाला दोन लाख 30 हजार बालकांचा जन्म होत आहे. जगभरात वाढीचा दर असाच राहिला तर 2050 मध्ये अन्नधान्य उत्पादन आत्ताच्या दुप्पट असावे लागणार आहे. नाहीतर कुपोषण, भूकबळीची संख्या वाढणार आहे. सध्यस्थितीत प्रत्येक तासाला 1800 मुले कुपोषणामुळे मृत्युमुखी पडत आहेत. हे एक मोठे आव्हान आजच्या शेतीसमोर आहे. यातूनच उत्पादनवाढीसाठी नवनव्या पद्धती विकसित होत आहेत. पण विकसित होणाऱ्या पद्धती आरोग्यास पोषक आहेत का हेही तपासणे गरजेचे आहे. फक्त उत्पादनाचे आकडे पाहून उत्पादन घेणे योग्य नाही. उत्पादित शेतमाल खाण्यायोग्य असायला हवा. आरोग्यावर याचे परिणाम होणार असतील तर असे उत्पादन रोखणे गरजेचे आहे. हव्यासापोटी अशी उत्पादने घेणे आणि विकणे हा शेतीच्या सेवेला कलंकित करणारे आहे.

भावीकाळात शेती उत्पादनातही अशी भेसळ होणार आहे. फसवणूक होणार आहे. ही फसवणूक, भेसळ शेतकरीच रोखू शकतो. अशा प्रकारावर आळा कसा घालता येईल? कोणते उपाय योजले जाऊ शकतील? हे पाहणे गरजेचे आहे. दुधाची भेसळ आता सर्वत्र पाहायला मिळते. अशाने शेती व्यवसाय बदनाम होतो आहे. शेतकरीच याला कारणीभूत धरला जात आहे. असे होणार नाही. याची काळजी घ्यायला हवी. केवळ कायदे करून हे प्रश्न सुटणारे नाहीत. व्यापारी वृत्ती शेतीत हवी हे खरे आहे. पण व्यापाऱ्याप्रमाणे अधिक नफा कमविण्यासाठी फसवणूक हे योग्य नाही.

अफूला जास्त दर मिळतो म्हणून अफूची शेती करणे कितपत योग्य आहे. देशाची समृद्धी टिकवायची असेल तर प्रथम शेतकरी टिकवायला हवा. शेतकरी उत्तम स्थितीत असेल तर देश उत्तम स्थितीत राहील. शेतकऱ्यांनीच आता आरोग्यास अपायकारक ठरणारी उत्पादने घेणार नाही असा संकल्प करायला हवा. अन्न हे पूर्णब्रह्म आहे. ते अमृत आहे. हे उत्पादन अमृताचेच होईल. विषाचे उत्पादन होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी ही शेतकऱ्याची आहे. शेतकऱ्यांनी विषाचे उत्पादन घेणार नाही. असा निर्धार करायला हवा. सध्या जनुकीय बदलाने शेतीत नवनव्या जाती विकसित केल्या आहेत. या जातींची उत्पादने दुप्पट आहेत. पण अशी महागडी उत्पादने घेणे आपल्या शेतकऱ्याला परवडत नाही. नुकसान झाले तर रसातळाला जातो. त्यातच अशी उत्पादने हे आरोग्यास घातक असल्याचेही स्पष्ट होत आहे. पण तरीही भारतात अशा उत्पादनांना परवानगी दिली जात आहे. लोकसंख्येचा विचार करून अशा उत्पादनांची गरज असल्याचे सांगितले जात आहे. पण आरोग्य धोक्यात घालणारी उत्पादने शेतकऱ्यांनीच रोखायला हवीत. आपण काय उत्पादित करत आहोत. कशा पद्धतीने उत्पादित करत आहोत याचा विचार व्हायला हवा.

आज भारतातील आंबा परदेशात घेतला जात नाही. हापूसची चव जगभरात प्रसिद्ध आहे. पण हव्यासा पोटी आपण त्यावर अनेक रसायनांचा मारा केला. नैसर्गिकरीत्या हे फळ पिकवूनच दिले नाही. हंगामाअगोदरच हे फळ बाजारात आणण्याचे प्रयत्न झाले. पण याचा परिणाम या फळावर झाला. त्यावर फवारण्यात आलेले रासायनिक अंश त्या फळात राहिले. युरोप, अमेरिकेने या फळांना नाकारले. ही फळे खाण्यायोग्य नसल्याने त्यांनी ती परत पाठवली. आपणाकडे मात्र आपण ही अशी विषारी फळे खात आहोत. आरोग्य धोक्यात येत आहे याचा विचारच होत नाही. आपल्याकडे कायदा आहे. पण त्याचा वापरच होत नाही. फळांचे उत्पादन शेतकरी घेतो. पण फळे व्यापारी पिकवतात. व्यापारी या फळावर कार्बाईड फवारतात. यात शेतकरी दोषी आहे की व्यापारी हे तपासणेही गरजेचे आहे. अशी विषारी फळे बाजारात विकली जात आहेत. यावर निर्बंध हा लावायलाच हवा. विदेशाने नाकारल्यानंतर तरी आपण आता जागे होणार की नाही? फळेच नव्हेतर भाजीपालाही ते आता नाकारत आहेत.

कीडनाशक कंपन्या त्यांची उत्पादने खपावीत यासाठी विविध युक्ता वापरत आहेत. पण याला शेतकरी बळी पडत आहे. सेंद्रिय पद्धतीने उत्पादन कमी आले तरी चालेल पण हेच पिकवणार आणि खाणार असा निर्धार आता शेतकऱ्यांनीच करायला हवा. विष पिकवणार नाही व दुसऱ्यालाही विष खायला देणार नाही. अशी शपथ आता शेतकऱ्यांनी घ्यायला हवी. आता शेतकरी म्हणतील प्रत्येक वेळी आम्हीच का शपथ घ्यायची. नुकसान झाले तर भरपाईही मिळत नाही. केवळ घोषणा होतात. प्रत्यक्षात काहीच मिळत नाही. आत्महत्याही वाढत आहेत. शेती कर्जात बुडाली आहे. कर्जमाफीतही भ्रष्टाचार झाला आहे. उसाचे पीक भरघोस पैसा देते म्हणून तेही घेतले. पण कारखानेही बिले वेळेवर देत नाही. काट्यात फसवणूक केली जात आहे. सहकार आता उरलेला नाही. शेतकरी सर्वबाजूंनी लुटला जात आहे. शेतमालाला दर नाही. व्यापारीमात्र शेतमाल वाट्टेल तसा विकतात. विक्रीची व्यवस्था उभी करण्याची ताकद नाही. गटाने विक्री करण्याची कल्पना उत्तम आहे. पण एकत्र यायला कोणाजवळ वेळ नाही. अशी आजची शेतीची स्थिती आहे. तेव्हा शेतकरी असे निर्णय घेण्यास तयार होणार नाही. हे जरी खरे असले तरी शेतकऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार करून तरी सेंद्रिय शेती करायला हवी.

जे शेतात पिकते तेच घरचेही खातात. घरच्यांचेही आरोग्य धोक्यात येत आहे. याचा विचार व्हायला नको का? स्वतःच्या घरच्यांचा विचार करून तरी कोणती उत्पादने व कशा पद्धतीने उत्पादने घ्यायला हवीत. दिलेल्या मात्रा योग्य प्रमाणात द्यायला नको का? हव्यासापोटी वाट्टेल तशा फवारण्याकरून उत्पादने काढणे कितपत योग्य आहे. जमिनीलाही आरोग्य असते. याचा विचार नको का? घरच्यांच्या आरोग्याचा विचार नाही तिथे जमिनीच्या आरोग्याचा विचार तो केव्हा करेल. हे ही तितकेच खरे आहे. कृषि मूलश्च जीवनम् या साऱ्या जीवनाचे मूळ हे शेती आहे. शेती हा असा व्यवसाय आहे जो कधीही संपणारा नाही. पण आता शेतीचा असा प्रवास राहिला तर हा व्यवसाय धोक्यात येऊ शकतो. पूर्वीच्या काळी उत्तम बागायतदार म्हणून अनेकांचा गावात रुबाब असायचा. मान असायचा. पण अशी उत्तम शेती आता होताना दिसत नाही. उत्तम उत्पादने घेणारा अशी ओळख तरी शेतकऱ्यांनी निर्माण करावी. सेंद्रिय उत्पादने घेणारे, आरोग्यास उपयुक्त उत्पादनाचे शेतकरी अशी ओळख शेतकऱ्यांनी समाजात निर्माण केल्यास व्यापारी तुमचे उंबरे झिजवतील.

पूर्वी व्यापारी शेतकरी शोधत यायचे. आता शेतकरी व्यापाऱ्यांचे उंबरे झिजवत आहे. असा उलटा प्रवास सुरू झाला आहे. जर मनात आणले तर शेतकरी व्यापाऱ्यांना नमवू शकतो. फक्त उत्पादनाची हमी हवी. सेंद्रिय उत्पादनांना मागणी आहे. पण त्यातही भेसळ होत आहे. जर खऱ्याने उत्पादन घेऊन हमी निर्माण करता येणे शक्य आहे. देशातील विविध कंपन्यांची उत्पादने केवळ ब्रँड पाहूनच तर आपण घेतो. तसे रामूचा आंबा, विजूची केळी, संजूचा दुधी भोपळा, सखूचा फ्लॉवर असा ब्रँड का विकसित होऊ शकणार नाही. पानाचे दुकानदार पानासाठी प्रसिद्ध असतात. तसे शेतीच्या उत्पादनाचे ब्रँड का होणार नाहीत. हे शक्य आहे. केवळ तशी इच्छा शक्ती हवी. नामवंत व्हेपर्स तयार करणाऱ्या कंपन्या तुमच्याचकडून बटाटे विकत घेतात. मग नामवंत बटाटा उत्पादक का होता येणार नाही. आपण उत्पादनात नामवंत होत आहोत. उच्चांकी उत्पादन केवळ पाहात आहोत. पण उत्तम प्रतीचे शेतमाल उत्पादक अशी ओळख कायम टिकते. त्यासाठी उत्तम प्रतीच्या शेतमालाचे उत्पादन कसे घेता येईल यावर भर द्यायला हवा. पेढेवाले, बर्फीवाले, बटाटेवडेवाले, भेळवाले प्रसिद्ध होतात. मग गाववाले शेतकरी का प्रसिद्ध होणार नाहीत?

चला उठा जागे व्हा…….आता सेंद्रिय शेतीकडे वळा. सेंद्रिय शेती स्वतः करा. सेंद्रिय शेतीचे तंत्र स्वतःच विकसित करा. आरोग्यास पोषक उत्पादने घेऊन सेंद्रिय भारत निर्माण करा. जगात तुमची उत्पादने घेईल अशी उत्तम दर्जाची उत्पादने घ्या. अध्यात्मही हेच शिकवते. ज्ञानेश्वरांनी शेतीच्या उदाहरणातून अध्यात्म शिकवले. मुळाशी पाणी घाला. पाण्याची बचत होते. झाडही उत्तम वाढते. वाया जाणारे पाणी वाचवा. ठिबक सिंचनाचा विचार त्याकाळातही होता. फक्त आता उत्पादने घेताना हा विचार ठेवा. पाणी वाचविणार, कमी पाण्यावर जास्तीत जास्त उत्पादन देणारे असे तंत्रज्ञान वापरणार, असा निश्चय करायला हवा. यासाठी शासनाचे अनुदानही आहे. पण तरीही शेतकरी हे तंत्र वापरत नाही. कमी खर्चात जास्त उत्पादन देते तरीही हे तंत्र शेतकरी वापरत नाही. राज्यात केवळ काही टक्केच शेतकरी ठिबकचा वापर करतात. 80 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. ते ठिबक वापरत नाहीत. वापरणार कसे क्षेत्र कमी. अशाने शेती देशात कशी टिकणार? शेतीचा विकास देशात व्हायचा असेल तर प्रथम अल्पभूधारक शेतकरी विचारात घ्यायला हवा. सर्वाधिक कष्ट तो करतो. पण त्याला योग्य मोबदला मिळत नाही. अशाने शेतीकडे आता कोणी वळत नाही.

शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने घटते आहे. कष्ट करण्याचीही मानसिकता आता उरलेली नाही. कंपन्यांत काम करून दुप्पट पगार मिळत असेल तर शेतीच्या अशाश्वत उत्पादनावर कोण भरवसा ठेवेल. तरुणांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे. जवळपास 60 टक्के जनता शेती व शेतीशी निगडित उद्योगावर अवलंबून आहेत. पण तरीही शासनाचे धोरण शेतीच्या विकासाच्या बाजूचे दिसत नाही. शेतीसाठी वेगळा अर्थसंकल्प हा याचसाठी हवा आहे. दरवर्षी आर्थिक पाहणी अहवाल निघतो. त्यात रासायनिक खताचा, कीडनाशकांचा खपाचा चढता आलेख दिला जातो. पण सेंद्रिय खताचे घटते उत्पादन का सांगितले जात नाही. सेंद्रिय खताची स्थिती काय आहे याचा आढावा का घेतला जात नाही. सेंद्रिय खत शेतीसाठी आवश्यक घटक आहे. याचा आर्थिक पाहणीत साधा विचारही केला जात नाही. कशाची आर्थिक पाहणी केली जाते. सेंद्रिय खताचे देशातील उत्पादनच माहित नसेल तर शेतकरी खते किती वापरतात हे कसे समजेल.

धान्य उत्पादन वाढते आहे हे पाहिले जाते. पण नेमके घट कशात आहे हे पाहिले जात नाही. जातींचा विकास करताना उत्पादन विचारात घेतले जाते. पण उत्तम वाढीसाठी आवश्यक असणारे सेंद्रिय खत पिकांना किती वापरले हे पाहिले जात नाही. सध्यस्थितीत बहुसंख्य शेतकरी सेंद्रिय खतच वापरत नाहीत. कारण ते उपलब्धच नाही. ही आजच्या शेतीची खरी अवस्था आहे. मग जमीनीचे आरोग्य कसे उत्तम राहील. येणारे उत्पादन भरघोस कसे असेल. भरघोस आलेच तर रासायनिक खतांच्या वापराने उत्पादन खर्चात वाढ झालेले असेल. अशाने शेतकरी तोट्यातच असतो. खर्च वाढला. हाती भोपळा आला. हे आजच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे चित्र आहे. असे देशात 80 टक्के शेतकरी आहेत. शेतात आपण काय पिकवतो. हे आपण का पिकवतो याचीच त्यांना कल्पना नाही. पाण्याची टंचाई आहे तरी उसाचे पीक घेतो. का घेतो? फक्त त्याला दर मिळतो. हेच कारण आहे. परवडतो का? माहीत नाही. कारण बिले येईपर्यंत दुसरे पीक तयार झालेले असते. पहिल्याचे हिशोब विसरलेले असतो. अशी स्थिती आजच्या शेतीची आहे. अशाने विकास कसा होणार? तरीही उत्तम शेतीची स्वप्ने आपण पाहत आहोत. खरेच आहे.

शेतीला आता चांगले दिवस येणार आहेत. आहे ती शेती फक्त टिकवा. शेती असेल तर कुपोषित तरी राहणार नाही याची हमी देता येईल. कुपोषणापासून तरी आपली सुटका होऊ शकेल. फसवे अर्थशास्त्र, चंगळवादी संस्कृती यामुळे वाढत चाललेली गरिबी कोणाच्याही लक्षात येणारी नाही. अर्थव्यवस्था कधी ढासळेल याचा नेम नाही. अशा या अर्थव्यवस्थेत शेती हाच एकमेव उद्योग आहे जो सर्वांना तारणारा आहे. यासाठी शेतीला उत्तम दिवस येणार आहेत हे लक्षात ठेवा आणि शेती करा. आरोग्यदायी उत्पादने घेऊन निरोगी राहा. देशी गायी, सेंद्रिय शेती हीच आता तारणार आहे. याचाच अवलंब करा. घरोघरी एकतरी देशी गाय पाळा.

Related posts

प्रभुंच्या ठायी चित्त ठेवून करावीत सकळ कर्मे 

किती खरे किती खोटे…

भोवतालाच्या अंधारगर्भातून उगवून येणारे ‘मातीविश्व’

Leave a Comment