दर वर्षी 23 सप्टेंबरला साजरा होणार आयुर्वेद दिवस
नवी दिल्ली – भारत सरकारने अधिकृतपणे दरवर्षी 23 सप्टेंबर हा दिवस ‘आयुर्वेद दिन’ म्हणून साजरा करण्यासाठी निश्चित केला आहे. 23 मार्च 2025 च्या राजपत्रित अधिसूचनेद्वारे अधिसूचित केलेला हा बदल, हा दिवस जागतिक स्तरावर लक्षात राहण्यासाठी आणि साजरे करण्यात सातत्य ठेवण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे. यापूर्वी धनत्रयोदशीला आयुर्वेद दिन साजरा करण्यात येत होता. मात्र, चांद्र दिनदर्शिकेनुसार धनत्रयोदशीची तारीख बदलत असल्याने हा महत्त्वाचा बदल करणारा हा निर्णय आहे.
प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि निरामयतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी आयुर्वेद ही एक शास्त्रीय, परिणाम-सिद्ध आणि सर्वंकष औषध प्रणाली म्हणून तिचा प्रसार करण्यासाठी दरवर्षी आयुर्वेद दिवस साजरा केला जात आहे. आतापर्यंत आयुर्वेद दिवस धनत्रयोदयीच्या दिवशी साजरा केला जात होता. मात्र, हा सण हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्यात येत असल्याने सामान्यतः तो ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो त्यामुळे तो दरवर्षी साजरा करण्यासाठी एकच निश्चित तारीख ठरवता येत नव्हती.
आगामी दशकात धनत्रयोदशीच्या तारखेत 15 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या दरम्यान खूपच जास्त बदल होणार असल्याने हा दिवस राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यासाठी लॉजिस्टिक आव्हाने निर्माण होऊ शकतील, असे देखील मंत्रालयाच्या लक्षात आले.
सातत्यामधील हा अभाव दूर करण्यासाठी आणि राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर साजरा करण्यासाठी एक स्थिर संदर्भ बिंदू स्थापित करण्यासाठी आयुष मंत्रालयाने योग्य पर्याय सुचवण्यासाठी एका समितीची स्थापना केली. तज्ञांच्या या समितीने चार संभाव्य तारखा सुचवल्या होत्या, ज्यापैकी 23 सप्टेंबर या तारखेला सर्वाधिक पसंती देण्यात आली. व्यावहारिक आणि प्रतीकात्मक या दोन्ही दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला.
निवड करण्यात आलेली 23 सप्टेंबर ही तारीख ‘शरद संपाता’सोबत जुळत आहे. या दिवशी दिवस आणि रात्र समसमान असतात. ही खगोलीय घटना निसर्गातील समतोलाचे प्रतीक आहे, जे मन, शरीर आणि आत्म्याच्या समतोलावर भर जोर देणाऱ्या आयुर्वेदिक तत्त्वज्ञानाशी पूर्णपणे सुसंगत आहे. वैश्विक तादात्म्यचे प्रतिनिधित्व करणारा संपात निसर्गाशी समतोल साधून जीवन जगण्याच्या आयुर्वेदाच्या साराला अधोरेखित करतो.
आयुष मंत्रालय ही नव्याने निश्चित केलेली तारीख स्वीकारण्याचे आणि 23 सप्टेंबर रोजी आयुर्वेद दिन साजरा करण्यासाठी सक्रीय सहभाग घेण्याचे सर्व व्यक्ती, आरोग्य व्यावसायिक, शैक्षणिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांना आवाहन करत आहे. मंत्रालय या बदलाकडे जागतिक आरोग्य कथनांमध्ये आयुर्वेदाला अधिक दृढपणे समाविष्ट करण्याची आणि प्रतिबंधात्मक आणि शाश्वत आरोग्य सेवा प्रणाली म्हणून त्याचे कालातीत मूल्य वाढवण्याची संधी म्हणून पाहात आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.