October 25, 2025
अजय कांडर लिखित बाया पाण्याशीच बोलतात या कवितेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याचे इचलकरंजी येथे आयोजन. डॉ. रणधीर शिंदे, प्रा. रफिक सुरज आदींचा सहभाग.
Home » मराठी माणसांच्या आकलनाचा परीघ विस्तारणारी कविता ‘बाया पाण्याशीच बोलतात’
काय चाललयं अवतीभवती

मराठी माणसांच्या आकलनाचा परीघ विस्तारणारी कविता ‘बाया पाण्याशीच बोलतात’

बाया पाण्याशीच बोलतात कवितेने इतिहास निर्माण केला – डॉ. रणधीर शिंदे
अजय कांडर लिखित कवितेचा इचलकरंजीत रौप्यमहोत्सवी सोहळा
डॉ. रणधीर शिंदे, प्रा. रफिक सुरज, प्रा. एकनाथ पाटील, प्रा. संजीवनी पाटील आदी अभ्यासकांचा सहभाग

इचलकरंजी – कवी अजय कांडर लिखित ‘ बाया पाण्याशीच बोलतात’ ही कविता मराठी माणसांच्या आकलनाचा परीघ विस्तारणारी असून तिचा रौप्यमहोत्सवी सोहळा इचलकरंजीत होणे हा या कवितेने निर्माण केलेला इतिहास आहे. ही कविता स्त्रियांचे पसायदान ठरु शकते इतकी महत्त्वाची आहे. या प्रकारची कविता अनेकांना लिहायचा हेवा होणे हे या कवितेचे सर्वाधिक यश आहे असे प्रतिपादन नामवंत समीक्षक तथा शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख रणधीर शिंदे यांनी केले.

‘बाया पाण्याशीच बोलतात’ या बहुचर्चित कवितेला यावर्षी 25 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठान आणि नाईट कॉलेज यांच्यावतीने डॉ. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नाईट कॉलेजच्या सभागृहात रौप्यमहोत्सवी सोहळा विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले. प्रा. रफिक सुरज, प्रा. एकनाथ पाटील, प्रा.संजीवनी पाटील आणि अजय कांडर आदी मान्यवरांच्या सहभागाने झालेल्या या चर्चासत्रात डॉ शिंदे यांनी ‘ बाया पाण्याशीच बोलतात’ ही कविता अजय कांडर यांच्या आवानओल काव्यसंग्रहातली असल्यामुळे यावेळी त्यांनी या संग्रहातील कवितेंचाही धांडोळा घेतला.

अमरसिंह माने यांनी उद्घाटन केलेल्या या कार्यक्रमाला संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर कांबळे, सल्लागार मधुकर मातोंडकर, नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉ. विरुपाक्ष खानाज, संस्कृती प्रतिष्ठानचे पदाधिकारी अनुराधा काळे, पंडित कांबळे, संजय रेंदाळकर, प्रा. सौरभ पाटणकर, सुनिल कोकणी, मच्छिंद्र आंबेकर, दामोदर कोळी, फक्रुद्दीन पटेल आदी उपस्थित होते. यावेळी गोपाळराव दुखंडे पुरस्कार मिळाल्याबद्दल मधुकर मातोंडकर यांचा तसेच कवी अजय कांडर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रत्येक कविता एक सामाजिक कलाकृती असते. ‘बाया पाण्याशीच बोलता’ ही कविता एक सामाजिक कृती आहे. बाई पाणी आणि बोलणे या तीन शब्दांच्या संदर्भातून ही कविता कथनात्मकतेच्या अंगाने येते. ही कविता आपल्या हातून का लिहिली गेली नाही याचाही हेवा वाटतो.

प्रा. रफिक सुरज

सुचकता आणि अनेकार्थता याची एकेक पायरी चढणारी ही कविता पंचवीस वर्षापूर्वीच्या कोकणातील चाकरमानी आणि त्याची पत्नी यातील वास्तव मांडते. तिचा होणारा भावनिक कोंडमारा, शारीरिकतेचे दमन करणारी ही स्त्री तहानलेली आहे. या अर्थाने स्वतःवरच पहारा ठेवणारी ती आणि मुका होत जाणारा झरा हे सूचन अधिक बोलके होते.

प्रा. एकनाथ पाटील

या कवितेतून पाणी आणि स्त्री याचा सहबंध उलगडत ज्या अर्थाने व्यक्त होत जातो; त्यामध्ये जसे वास्तवाचे चित्र येते तसेच प्रतीकात्मक अर्थसूचनही येते. सामाजिक , सांस्कृतिक आणि भावनिक संवेदन ताकदीनिशी व्यक्त करणारी ही कविता अधिक अर्थवलयांची नांदी ठरते. अवघ्या आठ ओळींच्या रचनाबंधामध्ये कवितेतून हे चित्र उभे करताना कवी अजय कांडर यांनी निसर्गातील पाणी हा केंद्रबिंदू वापरून स्त्रीविषयक जाणीवांचा एक प्रदेशच अधोरेखित केलेला आहे.

प्रा. संजीवनी पाटील

यावेळी अजय कांडर यांनी पाया पाण्याशीच बोलतात या कवितेची निर्मिती प्रक्रिया उलघडून दाखविली आणि हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. अनुराधा काळे यांनी सूत्रसंचालन केले. महावीर कांबळे यांनी प्रास्ताविक तर संजय रेंदाळकर यांनी आभार व्यक्त केले. चर्चासत्रावेळी अशोक दास, पांडुरंग पिसे, अनिल होगाडे, अशोक जाधव, शांताराम कांबळे, कृष्णात करपे, यशवंत चव्हाण, रमेश साळुंखे, राजाराम कोठावळे उपस्थित होते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading