April 19, 2025
"Dark clouds forming over a green Indian village, symbolizing the arrival of monsoon 2025 with above-average rainfall"
Home » मान्सूनच्या आगमनाचा अंदाज कसा बांधला जातो ?
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मान्सूनच्या आगमनाचा अंदाज कसा बांधला जातो ?

यंदाचा २०२५ चा पावसाळा  सरासरीपेक्षा अधिकच कोसळणार

 बंगालच्या उपसागरातील, बांगला देश, इंडो्नेशिया, दरम्यानचा, पण साधारण १० किमी. उंचीवरील वाहणारा वारा अश्या ह्या ६ घटकांचे सतत निरीक्षणावरून हा मान्सून आगमनाचा अंदाज बांधला जातो. ३१ मे च्या दुसऱ्या टप्प्यातील सुधारित अंदाजात मॉन्सून आगमना संबंधी सविस्तर खुलासा केला जातो.

माणिकराव खुळे
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

देशात जून -सप्टेंबर ४ महिन्याच्या कालावधीत देशात ९६ ते १०४% श्रेणीत पडणारा पाऊस हा सरासरी इतका पाऊस मानला जातो. तर १०५ ते ११०% श्रेणीत पडणारा पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या शक्यतेच्या श्रेणीत मोडतो.

          भारतीय हवामान विभागाने आज दिलेल्या अंदाजानुसार ह्या वर्षी येत्या पावसाळ्यात, जून -सप्टेंबर २०२५ ह्या चार  महिन्याच्या कालावधीत देशात गुणात्मकदृष्ट्या (क्वान्टीटेटिवली) १०५%±५% पाऊस अपेक्षित आहे, कि जो (१०५ ते ११०%) श्रेणीत म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या श.क्यतेच्या श्रेणीत मोडतो. मागील वर्षी २०२४ च्या मॉन्सून वर्षात ही शक्यता जवळपास इतकीच म्हणजे १०६% होती.

          त्यामुळे अंकानुसार नकारात्मक शक्यतेच्या जरी विचार केला तरी ही शक्यता (१०५% वजा ५%) म्हणजे तरीदेखील ती १००% येते,  कि जी सरासरीइतक्या म्हणजे  (९६ ते १०४%) पावसाच्या श्रेणीत मोडते. तर त्याचबरोबर अंकानुसार सकारात्मक शक्यतेचा विचार केल्यास ही शक्यता (१०५+५) ११० % येते,  कि जी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे(१०५  ते ११०%) पावसाच्या श्रेणीत मोडते.

          आता ‘पूर्वानुमान(भाकीत) संभाव्यता’ व ‘वातावरणीय (वातावरणीय)जलवायु संभाव्यता’ म्हणजे काय ? ह्या दोन्हीही संभाव्यतां(शक्यतां) ची संकल्पना स्पष्ट करतांना, असे म्हणत येईल की,

          संपूर्ण २०२४-२५ वर्षात जागतिक पातळीवरून गेल्या ८ महिन्यापासुन भाकीतासाठी आवश्यक असलेली जागतिक स्थरावरील सर्व हवामान घटकांची माहिती गोळा करून केलेल्या निरीक्षणांची नोंद व त्यावरून निष्कर्षांप्रत आलेली शक्यता म्हणजेच ‘पूर्वानुमान(भाकीत) संभाव्यता’ होय. तर आतापर्यंत उपलब्ध असलेल्या डेट्यावरून सांखिकीच्या आधारावरून निष्कर्षांप्रत आलेली शक्यता म्हणजे ‘जलवायु(वातावरणीय) संभाव्यता’ होय.     

    

          ह्या दोन्हीही संभाव्यता ह्या  वरील रकाण्यात दाखवल्या आहेत. परंतु मान्सून च्या अंदाजातील उपलब्ध वरील  डेटा रकाण्यावरून  ‘पूर्वानुमान(भाकीत) संभाव्यता’  च्या पाच ही श्रेणीतील आकडे पहिले असता असे जाणवते की,  आता सरासरीपेक्षा अधिक व अत्यधिक पावसाची शक्यता असलेल्या पूर्वानुमान संभाव्यता ह्या रकाण्यातील शेवटच्या ओळीत ३३+२६ अशी ५९% म्हणजे अत्यधिक शक्यता मानली जाते. म्हणजेच देशात सरासरीपेक्षा अधिक असलेला १०४% पेक्षा अधिक श्रेणीतील पाऊस होण्याची शक्यता ही ५९% आहे. आणि ही शक्यता खुपच बळकट असल्याची जाणवते. त्यामुळे देशात जून -सप्टेंबर २०२५ ह्या ४ महिन्याच्या कालावधीत  सरासरी पेक्षा अधिक पावसाचीच  शक्यताच अधिक आहे, हे येथे समजून घेण्याची गरज आहे.

          ह्यावर्षी २०२५ च्या पूर्वमोसमी काळात म्हणजे मार्च एप्रिल व मे २०२५ पर्यन्त ‘एल -निनो-साऊथ ओसिलेशन्स ’ म्हणजे ‘एन्सो ‘ विषुववृत्तीय प्रशांत महासागरीय परिक्षेत्रात तटस्थ अवस्थेत कार्यरत आहे. परंतु एकंदरीत हवेच्या दाबाचे व वाऱ्यांचे पॅटर्न पाहता असेच दिसते की अजूनही ‘ ला-निना ‘ चा प्रभाव ह्या कार्यक्षेत्रात काहीसा टिकून आहे. असे जरी असले तरी पावसाळ्यातील चार महिन्यात ‘एल -निनो-साऊथ ओसिलेशन्स ’ म्हणजे ‘एन्सो ‘ ची ही अवस्था तटस्थच  राहण्याची शक्यता अधिक आहे. अशी अवस्था म्हणजेच ना ‘ला-निना’ किंवा ना ‘एल-निनो‘. म्हणजे येत्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडण्यासाठी कोणताही वातावरणीय घटकांचा अटकाव होण्याची शक्यता ह्या अंदाजात जाणवत नाही.

          पावसाळ्याच्या जून -सप्टेंबर ४ महिन्याच्या कालावधीतील ह्या वर्षी एन्सो तटस्थेचा काळ कि जो मान्सूनला पूरक ठरणारा असल्यामुळे पावसास अनुकूल असणार आहे. परंतु पूर्वार्धात म्हणजे जून व जुलै ह्या दोन महिन्याचा हा काळ  मान्सूनच्या आगमनाच्या संक्रमणाचा काळ असतो. त्यात पूर्व- मान्सून सरीही कोसळत असतात. परंतु मान्सूनच्या वाटचालीत मान्सून करंट काय असेल, ते त्या वेळच्या प्रणालीवर अवलंबून असेल.

          ‘ भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता ‘ (इंडियन ओशन डायपोल)ची  जेंव्हा धन अवस्था असते म्हणजे अरबी समुद्र पाण्याचे तापमान अधिक तर  बंगालचा उपसागर पाण्याचे तापमान कमी असते तेंव्हा भारतात पावसाळ्यात पाऊस पडण्यासाठी  ही स्थिति अधिकच  पूरक असते. परंतु  ह्या दोन्हीही सागरीय पाण्याच्या  पृष्ठभागाचे तापमान जेंव्हा समसमान असते तेंव्हा ति तटस्थ अवस्था मनाली जाते.

           ‘ भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता ‘ (इंडियन ओशन डायपोल) आयओडी हा सुद्धा  भारत देशाचा अधिक पाऊस पाडणारा ‘ ला-निना ‘च  समजला जातो,

          ह्यावर्षी २०२५ सध्याच्या पूर्वमोसमी काळात म्हणजे मार्च एप्रिल व मे २०२५ भारतीय महासागरात ‘ भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता ‘ (इंडियन ओशन डायपोल) तटस्थ अवस्थेत आहे. येत्या जून -सप्टेंबर ४ महिन्यातही अवस्था तटस्थच राहण्याची शक्यता सध्या जाणवत आहे.

          ह्या घटकामुळे येत्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडण्यासाठी अरबी समुद्र व बंगालचा उपसागर ह्या दोन्हीही सागरीय पाण्याच्या  पृष्ठभागाचे तापमान समसमान राहून ही स्थिति संपूर्ण पावसाळ्यात ह्या वर्षी पाऊस पडण्यास पूरक नसली तरी कमीत कमी अटकाव करणारी नाही, ही जमेची बाजू समजावी.

          शिवाय २०२५ च्या ह्या गेलेल्या  जानेवारी ते मार्च  तीन महिन्यात पृथ्वीच्या म्हणजे पृथ्वीच्या उत्तर अर्ध गोलार्धातील अमेरिका-कॉन्टिनेन्टल ,आर्टिक सर्कल, अलास्का, डेन्मार्क(ग्रीनलॅंड) तसेच यूरेशिया म्हणजे ४५ डिग्री उत्तर  अक्षवृत्ताच्या उत्तरेकडील  चीन, रशिया युरोप तिबेटचे पठार हिमालयाच्या उत्तर भागातील बर्फाळ परिक्षेत्रात  सरासरीपेक्षा कमी झालेली हिमवृष्टीची  अवस्था देशातील मान्सूनला अधिक पूरक असून देशाला सरासरीपेक्षा  अधिक पाऊस देण्याची शक्यता जाणवत आहे. ह्या भागातील कमी हिमवृष्टी म्हणजे भारत देशात अधिक पाऊस पडण्यासाठी  अनुकूलताच  मानली जाते.

          महाराष्ट्रासाठी काय?

                        महाराष्ट्र हा मध्य भारत विभागात मोडतो. टरसाइल’ श्रेणी प्रकारनुसार संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी पेक्षा अधिक म्हणजे १०५ % पेक्षा अधिक पावसाचीच शक्यता असुन ही शक्यता सर्वाधिक म्हणजे ५५% जाणवत आहे. मराठवाडा व कोकणात ही स्थिति ६५% जाणवत आहे. मात्र ह्या सरासरी पेक्षा अधिक पावसाच्या शक्यतेमुळे  हा अधिक पावसाचे वितरण कसे होते ह्यावरच पडणारा पाऊस लाभदायी कि नुकसानदेही ह्याचे उत्तर येणारा काळच देईल, असे वाटते.

मॉन्सूनच्या आगमनासंबंधी

          सरासरी तारीख १ जूनला केरळात दाखल होणारा मान्सून त्याच्या सरासरी तारीख म्हणजे साधारण १० जूनला मुंबईत सलामी देतो. अर्थात केरळात आगमन झाल्यानंतरच मुंबईतील त्याच्या आगमनाची तारखेचा अंदाज बांधता येतो. मॉन्सून आगमन कालावधीत खालील ६ वातावरणीय घटकांच्या निरीक्षणानुसार मॉन्सूनच्या आगमनाची स्थिति त्या त्या वेळेस सांगितली जाते.

          खरं तर मुंबईतल्या आगमनानंतरच तो उर्वरित महाराष्ट्रात त्याचा प्रवेश ठरवता येतो. हे जरी खरं असले तरी मान्सूनचे आगमन व ४ महिन्यात पडणारा मान्सून ह्या दोन स्वतंत्र गोष्टी असुन त्यांच्या भाकीतांचे निकषही स्वतंत्र आहेत.

i)वायव्य भारतातील पहाटेचे किमान तापमान,

ii) दक्षिण भारतातील ४ राज्यातील पूर्वमोसमी पावसाचे वर्तन,

iii) दक्षिण चीन समुद्रातून रात्रीच्यावेळी बाहेर पडणारी दिर्घलहरी उष्णता ऊर्जा,

iv) मलेशिया थायलंड पश्चिम कि. पट्टीवर १ ते दिड किमी. दरम्यानचे वाहणारे वारे

v) वायव्य प्रशांत महासागरावरील हवेचा दाब

vi) बंगालच्या उपसागरातील, बांगला देश, इंडो्नेशिया, दरम्यानचा, पण साधारण १० किमी. उंचीवरील वाहणारा वारा अश्या ह्या ६ घटकांचे सतत निरीक्षणावरून हा मान्सून आगमनाचा अंदाज बांधला जातो. ३१ मे च्या दुसऱ्या टप्प्यातील सुधारित अंदाजात मॉन्सून आगमना संबंधी सविस्तर खुलासा केला जातो. तेंव्हाच अंदाजे मुंबईमध्ये मान्सून कोणत्या तारखेला दाखल होईल, हे कळते.

          एकंदरीत देशात ह्या २०२५ च्या वर्षी ‘ एन्सो ‘ व आय.ओ.डी. ची तटस्थ अवस्था आणि पृथ्वीच्या उत्तर अर्ध गोलार्ध तसेच  यूरेशियातील कमी हिमवृष्टीने आच्छादलेले परिक्षेत्र पावसासाठी अनुकूलता दर्शवून सरासरी पेक्षा अधिक पाऊस होण्याच्या शक्यतेमुळे  देशातील शेतकऱ्यांच्या आशा अधिकच पल्लवीत केल्या आहेत. 


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading