आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
प्रश्न – आठवड्याभरात महाराष्ट्रात वातावरण कसे राहील ?
माणिकराव खुळे – संपूर्ण मुंबई शहर, ठाणे, खान्देश, नाशिक अश्या ६ जिल्ह्यात, तसेच उत्तर नगर जिल्ह्यातील अकोला, संगमनेर, कोपरगांव, राहता, श्रीरामपूर तालुके आणि उत्तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, कन्नड, सोयगांव तालुक्यात अश्या एकूण आठ जिल्ह्यात, उद्यापासून तीन दिवस म्हणजे ११ ते १३ फेब्रुवारी (मंगळवार ते गुरुवार) तसेच १७ व १८ फेब्रुवारी (सोमवार-मंगळवार) दोन दिवस असे एकूण पाच दिवस किंचित थंडीची शक्यता जाणवते. उर्वरित महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यात मात्र वातावरणात विशेष बदल जाणवणार नाही.
प्रश्न – ह्या पाच दिवसात थंडीची शक्यता कशामुळे निर्माण झाली?
माणिकराव खुळे – बदलत्या वाऱ्याचा पॅटर्ननुसार उत्तरेतील थंड वारे, फक्त उत्तर व उत्तर-वायव्य महाराष्ट्रापर्यंतच पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पहाटे ५ चे किमान तापमान काहीसे घसरून, ह्या आठ जिल्ह्यात किंचित थंडी जाणवेल, असे वाटते.
प्रश्न – गेले दोन आठवडे कश्यामुळे थंडी जाणवली नाही ?
माणिकराव खुळे – आतापर्यंतच्या दोन आठवडयाच्या काळात, अधून-मधून ठराविक दिशा न घेणारे, तर कधी वारंवार दिशा बदलणाऱ्या, अश्या, पण कमकुवत वाऱ्यांचे अस्थिर वहन महाराष्ट्रावर टिकून राहिले. ह्याशिवाय अधून-मधून महाराष्ट्रावर हवेच्या उच्चं दाबातून, प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे उत्तरेतील थंड वाऱ्यांना भिंतीसारखा अटकाव केला गेला. पर्यायाने उत्तरेतील थंड वारे, महाराष्ट्रात पोहचलेच नाही . त्यामुळे काहीसे निरभ्र आकाश असूनही, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून विशेष खास अशी थंडी जाणवली नाही. पहाटेचे किमान तापमान भागपरत्वे जवळपास सरासरीपेक्षा १ ते २ डिग्री से.ग्रेड ने अधिक राहूनही महाराष्ट्रात, चढ- उताराच्या थंडीसह सकाळच्या वेळेस हवेत केवळ माफकच गारवा जाणवला.
प्रश्न – ह्यापुढे थंडी कधी जाणवू शकेल ?
माणिकराव खुळे – जोपर्यंत सध्याचा महाराष्ट्रावरील वारा-वहनाचा पॅटर्न बदलत नाही, व थंडीपूरक उत्तरेकडून वारा वहन होत नाही तोपर्यंत थंडीची शक्यता जाणवणार नाही, असे वाटते. वातावरणात बदल झाल्यास कळवता येईल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.