“मुंबईचं लंडन होणं – हे स्वप्न अनेक पिढ्यांनी पाहिलं आहे, पण ते प्रत्यक्षात आणायचं असेल, तर प्रत्येक नागरिकाने शिस्त, जबाबदारी, सौजन्य आणि संवेदनशीलतेने योगदान दिलं पाहिजे. लंडन हे केवळ इमारतींच अभियांत्रिकी शहर नसून, मानसिकतेचं शहर आहे. आणि लंडनची मानसिकता आपल्यात रुजवली, तर ‘मुंबईचं लंडन होणं’ हे केवळ स्वप्न नव्हे, तर शक्यताही आहे!
महादेव पंडित,
स्थापत्य अभियंता
प्राथमिक शाळेत असताना १५ ऑगस्ट हा दिवस आम्ही उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत होतो. सकाळी प्रभातफेरी, शाळेच्या प्रांगणात राष्ट्रध्वजाला मानवंदना, आणि मग शिक्षकांचे तसेच विद्यार्थ्यांचे भाषण. “गोऱ्या साहेबांनी आपल्या देशावर १५० वर्षे राज्य केलं” हे त्या भाषणांमध्ये वारंवार ऐकायला मिळायचं. पण लहान वयातसुद्धा मनात एक प्रश्न सतत घर करून राहायचा — हे गोरे साहेब भारतात आलेच कसे? आणि एवढ्या सहजतेने प्रदीर्घ काळ राज्य कसे काय गाजवू शकले? याचे उत्तर एकाच वाक्यात दडलेलं आहे, गोरे साहेब ईस्ट इंडिया कंपनी मार्फत व्यापारी म्हणून आले आणि राजकर्ते बनले.पण यामागचा हेतू आणि परिणाम खूप खोलवर गेलेले होते, ज्याची पूर्ण जाणीव मला खऱ्या अर्थाने लंडनमध्ये फिरताना झाली.
ब्रिटिश साम्राज्याने भारतावर जवळजवळ दीडशे वर्षे इतके प्रदीर्घ राज्य केल्यामुळे आजही आपल्या नागरी, प्रशासकीय,आर्थिक व कायदेशीर व्यवस्थेत साहेबी वारशाचा प्रभाव दिसतो. परंतु भारताच्या तुलनेत, लंडन – हे शहर आपल्या शिस्तबद्ध नागरी व्यवस्थेमुळे जगभरात आदर्श मानले जाते. लंडन शहराचा अनुभव घेताना मुंबईसारख्या भारतीय महानगरांची तुलना न करता मन राहूच शकत नाही.
ब्रिटिश राजवटीत बांधलेल्या व्हीजेटीआय, जीपीओ, मुंबई महानगरपालिका मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, टाईम्स ऑफ इंडिया बिल्डिंग, गेट वे ऑफ इंडिया आणि मुंबई पोलीस मुख्यालय या ऐतिहासिक वास्तू आजही सुस्थितीत असून पर्यटकांचे आणि इतिहासप्रेमी नागरिकांचे विशेष आकर्षण ठरतात.विशेषतः मुंबई फोर्ट परिसरातील अनेक इमारती एक दिड शतकानंतर सुध्दा, आजही कार्यरत आहेत.यावरून हे स्पष्ट होते की ब्रिटिश वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केवळ तत्कालीन गरजांनुसार नव्हे, तर दीर्घकाळ उपयोगात राहील अशा दृष्टीने अत्यंत अभ्यासपूर्वक आणि दूरदृष्टीने शहराचं नियोजन केलं होतं.
लंडनमध्ये फिरताना सर्वप्रथम डोळ्यात भरणारी बाब म्हणजे स्वच्छ व प्रशस्त फूटपाथ. फूटपाथवर कोठेही अनधिकृत फेरीवाले व खाद्यपदार्थांच्या गाड्यांचे अतिक्रमण आढळून आले नाही, चौकात तसेच रस्त्यावर बॅनरबाजी कुठेही दृष्टीस पडली नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अख्ख्या लंडनमध्ये विखुरलेला कचरा कुठेही नजरेस आला नाही. रस्त्यांच्या कडेने आकर्षक रो-हाऊसेस, उतरती छप्परं, सुंदर प्रशस्त फूटपाथ आणि प्रेक्षणीय वृक्षलागवड यामुळे लंडन शहराला एक नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं आहे.
त्याउलट मुंबईसारख्या शहरांमध्ये सर्वत्र वर्षाचे बाराही महिने नेत्यांची तसेच सनासुदींचे बॅनर्स, भारतीय विविध उत्पादनांच्या मोठाल्या होर्डिंगवर वारेमाप जाहिराती, जाहिरातींवर विद्युत रोषणाई, टेलिव्हिजनच्या केबलचे आडवे-उभे वेडेवाकडे जाळे, उघडी गटारे, चेंबर्स आणि अनधिकृत थांबे शहराच्या रचनेवर अतिक्रमण करताना दिसतात. महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी तर राजकीय नेत्यांचे मोठाले कटआउट्स आणि जाहिराती झळकत असतात. हे बकाल दृश्य लंडनमध्ये कुठेही दिसत नाही.
लंडनची वाहतूक व्यवस्था म्हणजे अंतर्गत वाहतूक नियोजनाचा सर्वोत्तम आदर्श नमुना आहे. इथलं प्रसिद्ध ट्यूब नेटवर्क – म्हणजेच अंडरग्राउंड मेट्रो – हे शहराच्या अंतर्गत हालचालींचं प्रमुख साधन आहे. ११ मेट्रो लाईन्स, ४०० पेक्षा जास्त किलोमीटरचा विस्तार आणि २७२ स्थानकं – या सर्वांचं अचूक समन्वयाने संचलन होतं. प्रवाशांची प्रचंड संख्या असूनही गर्दी, ढकलाढकली, रेटारेटी, उशीर किंवा बेशिस्तपणा जाणवत नाही. अंतर्गत वाहतूक व्यवस्था आणखी सुलभ करण्यासाठी ब्रिटिश महापालिकेने ट्यूबसोबत शहरात डबल डेकर बस वाहतूक सेवा कार्यरत आहे. याच्या बरोबर विरुद्ध दिशेला आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत कार्यरत असलेली पुर्वीची नावाजलेली बेस्ट सेवा आता रडकुंडीला येऊन धापा टाकत आहे असेच चित्र सध्या मुंबई शहरात पाहायला मिळत आहे.
या उलट, मुंबईत लोकल गाड्यांमधून गर्दीचा रेटा कधी कधी इतका वाढतो की एका पंजात कसेबसे पकडून ठेवलेले हँडेल निसटते आणि गाठ पडते थेट मृत्यूंशीच. सकाळी लोकल गाड्यांमधील श्वास गुदमरून टाकणारी प्रवाशांची गर्दी तर कधी कधी जीव नकोसा करून टाकते. भारताच्या आर्थिक राजधानीत आतापर्यंत फक्त पहिल्या अंडरग्राउंड अक्वा लाईन ३ चा पहिला टप्पा आरे कॉलनी ते आचार्य अत्रे चौक वरळीपर्यंत चालू आहे. अद्याप दुसरा टप्पा – वरळी ते कफ परेड – दरम्यान एकंदरीत १० स्थानकं जोडणारा हा भाग ऑगस्ट २०२५ मध्ये लोकसेवेत दाखल होणार आहे. यावरून आपण मेट्रो ट्यूब या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये लंडनच्या कितीतरी पटीनं मागं आहोत, हे लक्षात येते. मुंबईत प्रमुख रस्त्यावरील मोठमोठाले खड्डे, एकाच रस्त्यावरून विविध वाहतूक साधनांमुळे होणारी वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, नवीन प्रस्तावित उड्डाणपूलांच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि सतत वाजणारे हॉर्न – यामुळे नागरी जीवन अधिक त्रस्त होत आहे.
लंडन मधील ट्यूब तसेच रेल्वे स्टेशन परिसर आणि गाड्यांतील प्रसाधनगृहेही स्वच्छ आणि सुस्थितीत आहेत. लंडन मधील आसपासच्या परिसरात धावणाऱ्या रेल्वेचे सर्व दरवाजे स्वयंचलित आहेत तसेच लोकल रेल्वे मध्ये प्रसाधनगृहाची सुविधा देखील उपलब्ध आहे. याउलट आपल्याकडे आजही लोकल गाड्यांमध्ये मॅन्युअली ऑपरेट होणारे दरवाजे वापरात आहेत. कर्जत कसारा या लांब पल्ल्याच्या लोकल मध्ये खरेतर प्रसाधनगृह असणे अत्यंत गरजेचे आहे पण सध्या तरी उपलब्ध नाही. अनेक स्थानकांवरील प्रसाधनगृहे अत्यंत गलिच्छ स्थितीत असून, काही ठिकाणी भिंतींवर धूम्रपान करून रंगकाम केल्याचे चित्रही दिसते. हे दृश्य केवळ व्यवस्थेचे अपयश नाही, तर नागरिकांच्या उदासीनतेचेही निदर्शक आहे. स्वच्छता राखणे हि शासनाची जबाबदारी जितकी महत्त्वाची, तितकीच नागरिकांचीही आहे. लंडनप्रमाणे आपल्या देशातही स्वंयशिस्त अंगीकारली गेली, तर सार्वजनिक ठिकाणांनाही आपण ‘राष्ट्रीय संपत्ती’ म्हणून जपू शकतो.
लंडनमध्ये झेब्रा क्रॉसिंगजवळ पादचाऱ्यांना पहिला सन्मान दिला जातो. प्रत्येक क्रॉसिंगवर वाहन थांबवण्यासाठी स्वतःचं बटण असतं, जे पादचाऱ्यांच्या सोयीसाठी काम करतं. मुंबईत ही संस्कृती अजून रुजलेली नाही. जेष्ठ नागरीक मंडळीने रस्ता ओलांडत असताना हात दाखवला तरीही वाहन चालक बिलकुल थांबत नाहीत.
लंडनच्या रस्त्यांवर फारच कमी वेळा लंडन पोलीस दिसतात, कारण ब्रिटिश नागरिक स्वतःहून शिस्त पाळतात. कुठेही हॉर्नचा अतिरेक नाही, रस्त्यावर थुंकणं, कचरा टाकणं नाही, फूटपाथ अडवणं नाही – आणि हे सर्व स्वअनुशासनातून घडतं. सर्व पर्यटक, नोकरचाकर तसेच ब्रिटिश नागरिक मेट्रो स्टेशनवरील सरकत्या जिन्यावर फक्त डाव्या बाजूने स्टेशनवर ये-जा करत असतात.
मुंबईत आणि भारतात मात्र, शिस्त लादावी लागते. रस्त्यांवर सतत पोलीस गस्तीत असले तरी येथील वाहनचालक चौकातील वाहतूक नियंत्रण सिग्नल तोडून धूम ठोकतात. झोपडपट्टीमधील स्वयंघोषित दादा लोक स्थानिकांना खाद्यपदार्थ विकण्यासाठी फूटपाथवर तसेच रस्त्यावर गाड्या उभ्या करून अडथळे निर्माण करण्यास प्रवृत्त करतात. मुंबईत अनधिकृत स्टॉल्स आणि फेरीवाल्यांचं प्रमाण खुपच मोठं आहे.
मुंबईतल्या मिठी नदीकाठी किंवा पुण्यातल्या मुळा-मुठेच्या काठी, तिथल्या राजकीय वरदहस्तातून उभ्या राहिलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांमुळे आपण चालत जाऊच शकत नाही. पण लंडनच्या थेम्स नदीकाठी मात्र, सर्व पर्यटक मनसोक्त फिरण्याची मजा घेतात. भारतात नदीला देवी मानतात, पण नदीकाठी मनसोक्त फिरता येत नाही. याउलट लंडनवासी नदीला देव मानत नाहीत, पण नदीकाठी मनमोकळा फेरफटका मारत जीवनाचा मनमुराद आनंद घेतात. भारतीय परंपरेत नदीपात्रात दीप, नैवेद्य तसेच निर्माल्य अर्पण करतात. त्यामुळे नदी दूषित झालेली असते. पण थेम्स नदीत कोणीही काहीही अर्पण करत नाही. ब्रिटिश मंडळी नदीचे पावित्र्य पर्यटनासाठी जपतात, हे लक्षात येते. लंडनमध्ये नदी पवित्र मानली जात नाही, पण ती सार्वजनिक संपत्ती समजून तिची काळजी घेतली जाते. नदी पर्यटन, पोहणे, बोट राईड्स यासाठीच वापरली जाते, म्हणून ती स्वच्छ ठेवणं गरजेचं मानलं जातं. लंडनमध्ये नदीचा उपयोग धर्मासाठी न करता सार्वजनिक मालमत्तेसारखा केला जातो. याउलट मुंबईतील मिठी नदीचा उपयोग कचरा टाकण्यासाठी केला जातो. वाराणसीला तर गंगेच्या काठावर वर्षाचे बाराही महिने सतत धर्मप्रचारासाठी गंगा आरती केली जाते आणि आरतीनंतर फुले आणि दिवे गंगेत सोडले जातात, ज्यामुळे गंगा दूषित होऊन जाते.
लंडनमधील हाइड पार्कसारखी सार्वजनिक बाग म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेलं प्राणवायूचे नैसर्गिक केंद्र. ३५० एकरमध्ये पसरलेली ही बाग जॉगिंग, सायकलिंग,विश्रांती, जलक्रीडा आणि पक्षीनिरीक्षणासाठी आदर्श ठिकाण आहे. येथे सार्वजनिक स्वच्छता आणि देखभाल उत्तम प्रकारे पाळली जाते.
आपल्या मुंबईतही अशी नैसर्गिक प्राणवायू केंद्रं उभारण्याची संधी होती – तुलसी व विहार तलाव, आरेचं जंगल आणि पवई तलाव ही ठिकाणं लंडनच्या हाइड पार्कसारखी विकसित करता आली असती. पण आज दुर्दैवाने पवई तलाव हिरव्यागार कर्दळीने व्यापून गेलेला असून, एकेकाळी शक्य असलेली नौकाविहाराची संधी आता दुर्गंधीमुळे अशक्य झाली आहे. आरे जंगल, जे एकेकाळी मुंबईच्या फुफ्फुसासारखं होतं, ते आज मेट्रो कारशेडमध्ये परिवर्तित झालं आहे. यावरून आपण नैसर्गिक प्राणवायू स्त्रोत किती सहजपणे कार्बन डायऑक्साइडमध्ये रूपांतरित करतो, हे स्पष्टपणे लक्षात येतं. याउलट लंडनमध्ये झाडांची लागवड, हरित पट्टे आणि जैवविविधतेसाठी सातत्याने प्राधान्य दिलं जातं.
मुंबईमध्ये अशा बागा खूपच कमी आहेत. शिवाजी पार्क, हॅगिंग गार्डन आणि राणीची बाग – पण त्यांचीही देखभाल अपुरी असते. सार्वजनिक बागांमध्ये गर्दी, बेशिस्त खेळ, प्लास्टिकच्या पिशव्या, अर्धवट तुटलेले बसायचे बेंच – यामुळे विश्रांतीऐवजी गोंधळ उडतो.
टॉवर ब्रिज हा लंडन शहरातील थेम्स नदीवरील एक ऐतिहासिक व प्रसिद्ध पूल आहे. हा ब्रीज तीन स्पॅनचा असून, त्यातील मधला सर्वात लांब स्पॅन दोन उंच टॉवरमधून कॅंटिलिव्हर पद्धतीने तयार केलेल्या बीम्सवर आधारित आहे. मोठ्या जहाजांना वाट मोकळी करून देण्यासाठी हे दोन्ही बीम्स हायड्रॉलिक यंत्रणेच्या साहाय्याने वर उचलले जातात. त्या वेळी रस्तावाहतूक आणि पादचारी मार्ग तात्पुरते थांबवले जातात. टॉवर ब्रिज हा स्थापत्य अभियांत्रिकीचा एक अप्रतिम आविष्कार आहे कारण हा ब्रिज त्याच्या अद्वितीय संकल्पनेमुळे जल व रस्ते वाहतुकीसाठी उपयोगी येतोच आणि विलक्षण पर्यटनासाठी सुद्धा एक आदर्श आकर्षण ठरतो. अशी अद्वितीय संकल्पना आपल्या मुंबईत सुद्धा वरळी–बांद्रा सागरी सेतूवर किंवा कोस्टल रोड वर साकारता आली असती.
थेम्स नदीच्या काठावरील लंडन आय हे युनायटेड किंग्डममधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. लंडन आयच्या वेगवेगळ्या कोनांतून लंडन शहराचं तसेच थेम्स नदीचं विहंगम दृश्य पाहून डोळ्याचं पारणं फिटतं. मुंबई रेसकोर्सच्या २२५ एकरात हाइड पार्कसारखं महामुंबई सेंट्रल पार्क उभारण्यात यावं आणि त्या महामुंबई सेंट्रल पार्कच्या पश्चिमेकडे मुंबई आय नियोजित केलं तर त्यातून विशाल अरबी समुद्र, गिरगाव चौपाटी, राजभवन, ब्रीच कँडी, मरीन ड्राईव्ह, वरळी वांद्रे सागरी सेतू,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पॅरशूटच्या उंचीवरून मरिन लाइन्स रेल्वे स्टेशनच्या फलाटावर थांबलेली लोकल पाहण्याचं सुखद स्वप्न पूर्ण होईल.
विंडसर कॅसल आणि ब्रिटनचे नेते विन्स्टन चर्चिल यांचे जन्मस्थळ ब्लेनहाइम पॅलेस पाहताना मनात एक विचार नकळत डोकावून गेला – आपल्या हिंदूस्थानात देखील हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ शिवनेरी आणि राजधानी रायगड या किल्ल्यांचे जतन अशाच भव्य आणि योजनाबद्ध स्वरूपात केलं गेलं असतं, तर पुढच्या अनेक पिढ्यांना त्यांच्या नेतृत्वगुणांचा, कार्यशैलीचा आणि दूरदृष्टीचा अनुभव घेता आला असता. जगभरातील पर्यटकांसाठीही हे ऐतिहासिक ठिकाण एक प्रेरणास्थान बनलं असतं.
लंडनचं सौंदर्य ही केवळ भव्य इमारतीमुळे किंवा थेम्स नदीच्या दोन्ही काठावरील रमणीय लँडस्केपिंगमुळे नाही, तर शिस्त, नियोजन, सार्वजनिक सहभाग आणि जबाबदारी यामुळे आहे. ब्रिटिशांनी जे सुंदर शहर वसवलं, ते त्यांनी तितक्याच चिकाटीनं टिकवलं आहे.भारतात, विशेषतः मुंबईसारख्या शहरात, नागरिकांची इच्छा आहे की आपलं शहरही जागतिक दर्जाचं असावं. पण त्यासाठी केवळ सरकार नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचा शिस्तीचा व स्वच्छतेचा सहभाग आवश्यक आहे.
भारतात लंडनसारखं शहर उभं करणं अशक्य नाही. पण त्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती, लोकशिक्षण, नागरी जबाबदारी, प्रदूषणमुक्ती, नियोजनबद्ध वाहतूक, बॅनरमुक्त सार्वजनिक स्थळं आणि नागरिकांचा सकारात्मक सहभाग ही पावलं तातडीने उचलायला हवीत. त्याचप्रमाणे राजकीय हस्तक्षेप आणि स्थानिक दबाव या दोन बाबी मात्र कायमस्वरूपी बंद केल्या पाहिजेत.आपली मुंबई पण लंडनसारखी जगप्रसिद्ध होईल का?, हा प्रश्न अनुत्तरित असला तरी, प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली तर हे स्वप्न नक्की साकार होईल.
माझी ही लंडनवारी खास कारणामुळे घडली. माझ्या कन्येच्या पदवीप्रदान समारंभात सहभागी होण्यासाठी मी लंडनला गेलो होतो. तिच्या यशाचा साक्षीदार होण्याचा आनंद हा माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा क्षण ठरला. यामुळेच मला हे सुंदर शहर जवळून अनुभवता आलं आणि मुंबईसारख्या आपल्या महानगराशी तुलना करत विचारमंथन करण्याची ही संधी मिळाली.
आपल्याकडे संसाधनांची कमतरता नाही, पण विकासात्मक दृष्टीकोन, दुरदृष्टी, नियोजन, इच्छाशक्ती आणि अंमलबजावणी यांचा अभाव आहे. लंडनप्रमाणे शिस्तबद्ध आणि जबाबदार नागरिकत्व अंगीकारलं, तर आपल्या शहरांचाही कायापालट नक्की शक्य आहे. मुंबईचं लंडन होणं हे अजिबात अशक्य नाही — फक्त स्वप्न न ठेवता त्या दिशेने पावलं उचलायला हवीत.
“मुंबईचं लंडन होणं – हे स्वप्न अनेक पिढ्यांनी पाहिलं आहे, पण ते प्रत्यक्षात आणायचं असेल, तर प्रत्येक नागरिकाने शिस्त, जबाबदारी, सौजन्य आणि संवेदनशीलतेने योगदान दिलं पाहिजे. लंडन हे केवळ इमारतींच अभियांत्रिकी शहर नसून, मानसिकतेचं शहर आहे. आणि लंडनची मानसिकता आपल्यात रुजवली, तर ‘मुंबईचं लंडन होणं’ हे केवळ स्वप्न नव्हे, तर शक्यताही आहे!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.