जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – ५
३ जानेवारी २०२५ ते १२ जानेवारी २०२५ पर्यंत सावित्री ते जिजाऊ दशरात्रोत्सव अंतर्गत १० कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज निर्मला चव्हाण यांच्या कार्याचा परिचय…ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244
निर्मला चव्हाण
‘प्रगती बालक मंदिर आळंदी’ असं पंचक्रोशीत कोणालाही म्हटलं की चव्हाण बाईंची शाळा हे समीकरण झालेलं आहे. टेल्को समाज विकास केंद्राच्या शाळेत सुरूवातीला बाईंनी काम केले परंतु ते बंद झाल्यावर सन १९९४ मधे घरातच लोकांच्या आग्रहास्तव स्वतःची शाळा चालू केली. तेव्हा भीती वाटत होती चालेल का नाही ? आपल्याला जमेल का ? पण लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आणि शाळा बघता बघता खूप मोठी झाली. कित्येकदा प्रवेश बंद म्हणून सांगावं लागायचं एवढी मुलं यायला लागली.
या गोष्टीला ३० वर्ष झाली. आज तीन बॅचमधे शाळा भरत आहे. आळंदीसारख्या ठिकाणी भरपूर शाळा सुरू असताना आजही बाईंच्या शाळेला चांगला प्रतिसाद आहे. ‘आता क्रीडो इंग्लिश मीडियमला सुध्दा चांगला प्रतिसाद आहे. सेमी इंग्लिश मीडियमपण चालू आहे. मला वयाकडे बघता असं वाटलं आपल्याकडे आता मुलं कमी येतील पण उलट मुलं जास्तच यायला लागली.’
शाळेविषयी बोलताना बाई भरभरून बोलत होत्या. आज त्यांच्या शाळेतील मुलं मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. आज ती सक्षम झाल्याने या शाळेला काही मदतही करत आहेत. निर्मला चव्हाण या शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक क्षेत्रात आळंदी येथे कार्यरत आहेत. बालवयात मुलांना संस्कार देण्याचे व घडविण्याचे महत्वाचे काम त्या अव्याहतपणे करत आहेत.
तसं पाहिले तर फार कमी महिलांची जन्मभूमी व कर्मभूमी ही एकच असते. त्यांपैकी चव्हाण बाई या एक. यांचा जन्म आळंदी येथील ग्रामीण रुग्णालयात १९५६ साली झाला. त्यांचे वडील हे मूळ गाव कोळे, ता. कराड येथून व्यवसायासाठी येथे आले. त्यांची आई कर्नाटक मधली. ते पूर्वी आळंदीत पिठाची गिरणी चालवत. त्यानंतर त्यांच्या वडीलांनी अतिशय कष्टाने चाकण येथे मोठ्या कंपन्यांचे काही स्पेअर पार्ट बनवायचा छोटा कारखाना सुरु केला. शून्यातून विश्व निर्माण करणारे ताईंचे वडील पुढे मोठे उद्योजक म्हणून नावारूपास आले. ताईंना दोन भाऊ व दोघी बहिणी. ताई मोठ्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण नगरपरिषद आळंदी शाळा व पूर्वीची जुनी अकरावी श्री ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी येथे झाले.
पुढे त्यांचा विवाह आळंदीतील श्री ज्ञानेश्वर महाराजांचे वंशपरंपरागत चोपदार कै. कृष्णराव चोपदार गुरूजी यांचे भाचे कै. तुकाराम चव्हाण यांचेशी झाला. ताईंचा हा प्रेम विवाह. जातीने मराठा असूनही नातेसंबंध लागत नाहीत या कारणाने चव्हाणांच्या आजीचा या लग्नाला विरोध होता. त्यांना आईवडील नसल्याने त्यांचा सांभाळ हा त्यांच्या आजीने व मामांनी केला होता. कालांतराने विवाह झाला. तुकाराम चव्हाण हे टेल्को कंपनीत नोकरीला होते. तसेच ते नववी ते अकरावी गणिताचे क्लासेस घेत होते. विद्यादान करताना चव्हाण सरांचे वैशिष्ट्य म्हणजे गोरगरीब पालकांना फी चा आग्रह न करणे, ते देतील तेवढे पैसे घेणे. गणित हा त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या क्लासला प्रचंड गर्दी असायची. चव्हाण सर जाऊन आता १३ वर्ष झाली. ‘मरावे परी किर्ती रूपी उरावे’ असेच त्यांचे कार्य राहिले आहे. निर्मलाताई तशा तर त्यांच्या विद्यार्थिनीच..! ताईंना दोन मुली व एक मुलगा. सर्व उच्चशिक्षित व विवाहित आहेत.
चव्हाण पतीपत्नींना शिक्षणाची व शिकवण्याची आवड असल्याने अवघ्या काही विद्यार्थ्यांना घेऊन सुरु झालेला हा प्रवास आज १५० ते २०० एवढी पटसंख्या कायम असते. आज शाळेत ४ शिक्षक व १ शिपाई असा स्टाफ आहे. हे सगळं करत असताना मुलं, त्यांची शिक्षणं, संसार पाहून ग्रामीण भागात स्वतःची शाळा चालवणे ही सोपी गोष्ट नाही. पण चव्हाण बाई मुलांमध्ये तर लोकप्रिय आहेतच परंतु पालकांमध्येही त्या आदरणीय आहेत. चव्हाण सरांचे शैक्षणिक कार्य बाईंनी बालवाडीच्या रूपाने चालू ठेवले आहे. चव्हाण बाई सुध्दा पालकांना समजून घेऊन प्रसंगी गरीबांना मदत करणाऱ्या आहेत.
प्रगती बालक मंदिर मधे वर्षभर मुलांना सर्व धर्मीय सण, उत्सव, महापुरूषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या या निमित्ताने विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन केले जाते. मुलांना अभ्यासाबरोबरच देशप्रेम, राष्ट्रप्रेम व दैनंदिन संस्कार दिले जातात. तसेच खेळ, व्यायाम, योगा याचीही ओळख करून दिली जाते. बहुआयामी मुलं घडण्यासाठी विविध स्पर्धा, विविध गुणदर्शन यांचेही आयोजन केले जाते.
काही वर्षांपूर्वी बाईंना मोठ्या आजाराला सामोरे जावे लागले. त्यांना चालणे व काम करणेही मुश्कील झाले होते परंतु त्यावर मात करून बाई आज पुन्हा नव्या जोमाने कार्यरत आहेत. मुलं-मुली आपापल्या संसारात रममाण आहेत पण बाईंनी एकटी राहून मुलांमध्ये रमणे स्वीकारले आहे.
जीवात जीव आहे तोवर हे हाती घेतलेले शैक्षणिक कार्य त्या करतच राहाणार आहेत. स्त्रीने स्वतःच्या पायावर उभे राहायला हवे हा संदेश त्या सतत इतर महिलांना देतात. या सोबतच महिलांचे बचतगट, भिशी, त्यांचे वाढदिवस साजरे करणे, महिलांच्या सहलींचे नियोजन करणे तसेच श्री ज्ञानेश्वर चरित्र समितीच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी व हरिपाठाचा अभ्यास व प्रचार प्रसार विविध शाळांमधून करायचे कामात त्या सक्रिय सहभागी असतात. या उपक्रमांत आळंदी पंचक्रोशीतील अनेक शाळा सहभागी झाल्या आहेत.
सेवानिवृत्तीचे वय ५८ असताना त्या वयाची सत्तरी आली तरीही तरूणाईला लाजवेल अशा पध्दतीने लहान मुलांना गाणी, गोष्टी, खेळ शिकवतात. पूर्ण शाळेचे नियोजन त्या स्वतः करतात. शाळा हेच त्यांचे जीवन बनलेय.
‘मी आज जे काही करतेय याचा मला खूप आनंद ,अभिमान वाटतो. मी माझ्या विश्वात पूर्ण रमलेली आहे.’ असे त्या आनंद व समाधानाने सांगतात. अशा या सत्तरी गाठलेल्या आज्जी झाल्या तरीही सर्वांच्या बाई असलेल्या, दुसरी पिढी घडवणाऱ्या, बालगोपाळांमधेच रमणाऱ्या या जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा..!!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.