वाचन चळवळ वृद्धींगत होण्यासाठी….लेखमाला भाग १
वाचनाच्या बाबतीत आजच्यापेक्षा सारंच काही पूर्वी आलबेल होतं; अशातलाही भाग नाहीच. साहित्याचं वाचन हे माणसाचं पोट भरण्याचं आणि त्याहीपेक्षा आपलं आणि समाजाच्या सर्वांगिण उन्नतीचं सर्वात सुंदर प्रयोजन आहे; हे मान्यच केले पाहिजे. पण या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे आजकाल आपलं अक्षम्य दुर्लक्ष होतं आहे, हेही आपण आपल्या मनाशी कबूल केलं पाहिजे.
रमेश साळुंखे
…काय वाढून ठेवलं असेल पुढ्यात कुणास ठाऊक? असा विचार डोक्यात घोळवतच त्या ग्रंथालयाकडे आपसूकच मी मला ओढून घेऊन जात होतो. पाऊस नव्हता पण वर आभाळात मळभ दाटून आलेलं होतं. महापूरही बराचसा ओसरला होता. तरीही त्या पठ्ठयानं आपलं बरं वाईट अस्तित्व साऱ्या शहरभर विस्कटून टाकलं होतं. सैरभैर. घरं, माणसं, दुकानं, देवळं सारं काही परत एकदा स्थिरस्थावर होत असल्यासारखं वाटत होतं. गल्ली बोळातल्या घरांमधील भिजलेला सारा बाडबिस्तरा रस्त्यारस्त्यांवर ऊन खात तसाच पडून राहिला होता. विचित्र अशी दुर्गंधी गावभर पसरली होती. माणसं एकमेकांशी बोलत नव्हती. मूकपणानं आवरत-सावरत होती.
अशातच एका खूप जुन्या आणि माझ्या अत्यंत आवडत्या अशा सार्वजनिक ग्रंथालयात जाण्याचा योग आला. मुद्यामच आणला तो योग. महापुराच्या तडाख्यातून वाचलेल्या त्या घनिष्ठ मित्राच्या सांत्वनासाठी. जवळपास पंधराएक वर्षांचं जिवाभावाचं नातं या वाचनालयाशी होतं माझं. नंतर नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं लांब जावं लागलं. तरीही सुरुवातीची तीन-चार वर्षे हटकून ते नातं सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला मी. पण नंतर तेही अशक्यच वाटू लागलं. प्रत्येक आठवड्याला शंभर सव्वाशे किलोमिटर पुस्तक बदलण्यासाठी जाणं आणि नावावर घेतलेलं पुस्तक निम्याहूनही कमी वाचून होणं; हे असं सुरू झालं. शिवाय काॅलेजमधलं ग्रंथालयही चांगलंच समृद्ध होतं. तिथंही मिळायची हवी ती पुस्तकं. मग अनिच्छेनच ताटातूट करून घेतली मी त्या ग्रंथालयाची. पण आब राखून असलेल्या या सार्वजनिक ग्रंथालयाशी असलेलं नातं मात्र अद्यापही तसंच राहिलं आहे.
तर त्या दिवशी संध्याकाळ झालेली. सातएक वाजले असतील. बाहेर रस्त्यावर दिवे लागलेले होते. वाचनालयाचा पॅसेज ओलांडून आत गेलो. तर भपकन् भिजल्या पुस्तकांच्या कुंद वासानं हे असं स्वागत केलं. महापुरानं त्याच्या कसल्याबसल्या पाण्यानं कितीतरी पुस्तकं नासवून टाकली होती. अवकळा सगळी. समोर भल्यामोठ्या काचेच्या कपाटात मांडलेली नवी पुस्तकंही आत्मगंध विसरून अंग चोरून, थिजून उभी असल्यागत दिसत होती. साऱ्या वातावरणातच एक उदासवाणा झाकोळ पसरून राहिला होता. एखाद दुसऱ्या वाचकाची चाहूल सोडली तर त्या भल्या थोरल्या ग्रंथालयात सारा शुकशुकाटच. सारा उत्साहच पार मावळून गेलेला.
ग्रंथालयाच्या प्रवेशद्वारावर तेवढा जेमतेम उजेड. प्रकाशाकडून अंधाराकडे. आता पुन्हा एकदा सगळ्याच गोष्टींचा उलटा प्रवास सुरू झाला आहे की काय ? की आपल्या आजूबाजूला घडणारं अगदी सुतासारखं ठीकठाक चाललं आहे आणि आपल्यालाच ही अशी एकटं पाडणारी निराशा वेढून राहिली आहे ? विषण्ण अगदी ! पूर्वीही अनेकदा तसं वाटायचं. पण ग्रंथालयात आल्यावर मनावरचं ओझं पळून जायचं कुठंतरी. अगदी हलकं हलकं तरंगल्यासारखं वाटायचं. पुस्तकांच्या कपाटांसमोरून फिरताना राजमहालात हिंडल्याला भास व्हायचा. उगीचच अंगात दहा हत्तींचं बळ आल्यागत वाटायचं. पुस्तकं म्हणजे थकल्या भागल्या जीवाला म्हणजे बुडत्याला केवळ काडीचा नव्हेत; तर भल्या मोठ्या ओंडक्यांचा आधार असल्यागतच की. पण हा असला आधार आता हवाय कुणाला आणि कितपत ? काय गत करून टाकली आहे आपण पुस्तकांची ? ग्रंथालयांची ? आत सगळा व्याकूळ करणारा अंधार. आणि हात पाय दुमडून घेऊन ओल्या दमट काळोखात वाचकांकडे डोळे लावून बसलेली, पुराच्या पाण्यातून कशीबशी जगली वाचलेली हजारो सर्द पुस्तकं. अंधार, काळं मांजर आणि त्याचे विलक्षण चकाकणारे तेजस्वी डोळे. पुस्तकं हाताळून, पाहून, स्पर्श करून नावावर घेऊन जाण्याची सुंदर रीत तर इथेही केव्हाच हद्दपार झालेली.
हव्या त्या पुस्तकाचं नाव संगणकावर टाकायचं. नंबर घ्यायचा, शिपायाकडं द्यायचं मग तो दिवा लावून पुस्तकाच्या कपाटाआड जाणार, शोधल्यासारखं करून दिवा बंद करून मख्ख चेहऱ्यानं चिठ्ठी परत करत ‘नाहीय ते’ इतकंच म्हणणार. हे असं अदृश्य पिंजरे वाचकांसमोर उभे केल्यामुळं पूर्वी हवं ते पुस्तक समजा नाहीच मिळालं; तरीही आपसूकपणानं दुसरंच एखादं सुंदर पुस्तक नकळत हाती लागायचं. आणि मन अगदी हरखून जायचं. आता तोही मार्ग बंद. आधीच असलेल्या उल्हासातला हा असला फाल्गुन मास. बऱ्याच ठिकाणी थोड्याफार फरकाने हा असलाच अनुभव उरल्यासुरल्या वाचकांना सातत्याने येणारा.
खूप वर्षे तुटपुंज्या पगारावर राबणारा लाकडी स्टुलावर आक्रसून बसलेला ओळखीचा राजाभाऊ शिंदे नावाचा हसरा शिपाई भेटला. प्रामाणिक. पापभिरू. हवं ते पुस्तक चटकन शोधून देणारा. थकून गेलेला वाटला अगदी. उदासवाणं हसला. सावकाश उठून जवळ आला. हातात हात घेऊन भरभरून बोलला. ‘आलास बरं झालं रे. कालपास्नच उघडलं आहे बघ ग्रंथालय. काहीच राहिलं नाही. बरीच पुस्तकं वर वाळत घातली आहेत. ऊन तर कुठं पडतय नीट. लाईटपण सकाळीच जोडली आहे. सगळं बंद होतं. हे इथं गळ्यापर्यंत पाणी होतं. पुस्तकं वरच्या मजल्यावर नेईर्पर्यंत पिठ्ठा पडला. वाचतील तेवढी वाचवली. लगदा झालेली गाडीभर पुस्तकं टाकून दिली आहेत बाहेर. बरं, मग बरा आहेस ना? ओळख ठेव बाबा गरिबाची. आता तीनच महिने राहिली आहे नोकरी माझीपण, मग काय… बघू पुढं काय करायचं ते. पुन्हा कधी आलास तर ये बाबा घराकडं. चहा घेऊया ? चल !’ काय बोलायचे ते सुचेचना. गप्पच उभा राहिलो. न बोलताच डावीकडं पाहिलं तर पुढ्यातच एका काऊंटरमागे पुस्तकांची देवघेव करणारी वाचकांची वाट पहात बसलेली एक सौभाग्यवती. आणि स्वच्छ काचेसमोर ठीकठाक बसलेला क्लार्क नावाचा नव्यानं भरती केलेला रोजंदार माणूस. ‘इथंच राबू पूर्णवेळ, होईल काम आपलं’ या आशेवर सेवानिवृत्त झालेली कितीतरी माणसं आपल्याही नजरेसमोरून निघून गेलेली. काही मूकपणानं कायमचीच या जगातून निघून गेलेली. पुस्तकांच्या उंचच उंच कपाटांमधून जेमतेम प्रकाशात पुस्तकं पाहताना हे असलंच काहीबाही डोक्यात भिरभिरत राहिलं…
आणि आताशा कितीदा जातो आपण ग्रंथालयात ? पुस्तकांशी, पुस्तकांशी निगडित असलेल्या माणसांशी कितपत नातं राहिलं आहे आपलं ? असे कितीतरी प्रश्न सहज चाळवले गेले मनात आणि झरकन शहारूनच गेलो. पंचवीस एक वर्षे होऊन गेली असतील. थोडं बहुत शिक्षण झालं आणि शिकण्या-शिकविण्याच्या हेतूनं दिवसभरात पाच सहा कॉलेजवर जायचो. वर्षातून दोनदा पगार. एक दिवाळीला आणि दुसरा मे महिन्याच्या सुट्टीत. यासाठीही लाचार करून घ्यायचे लोक. ‘चिरिमिरीपुढं माणूस किस झाड की पत्ती’ पण असे हात ओले करूनही आपल्याला काही कमी पडतय असं नव्हतं वाटत तेव्हाही. तर मुलांना शिकवून झालं आणि वेळ मिळाला, आणि मिळायचा बरं का वेळ तेव्हाही. तर हटकून त्या प्रत्येक कॉलेजमध्यल्या ग्रंथालयात एखादी तरी फेरी न चुकता असायचीच. तसा तेव्हाही न वाचणारा लाब्ररीयन आणि पुस्तकांचा ढीग पुढ्यात घेऊन, मोबाईलमघ्ये तोंड खुपसून गप्पा मारत काम करतो आहोत, असं भासवणारे बरेच शिपाईमामा बऱ्याच ठिकाणी हमखास असायचेच. हे असं सार्वत्रिक चित्र आजही कुठंही आणि केव्हाही हटकून पहायला मिळतं. वाढच झालीय त्यांच्यात आता वाचणारा ग्रंथपाल आणि पुस्तकांवर मनापासून प्रेम करणाराही एखादा दुसरा असायचा; नाही असं नाही. पण ते तोंडी लावण्यापुरतंच वा हाताच्या बोटांवर मोजता येण्यापुरतंच.ग्रंथालयात जाणारे वाचकही विशेषत: पन्नाशी-साठीच्या वयाचे खूप असायचे. आजही असतात पण त्यांचीही संख्या आता रोडावली आहे, हे नक्की. मनगटावर छोटीशी रंगीबेरंगी कापडी पिशवी अडकवून कपाटांच्या सांदरीत पुस्तक चाळत उभे असलेले खूपदा दिसायचे. उंच, सडपातळ, सोनेरी किंवा पूर्ण काळ्या फ्रेमचा स्वच्छ चष्मा घातलेले, शुभ्र विजार घातलेले अथवा पॅन्टीला बेल्ट न लावता नीट इनशर्ट केलेले, डोक्यावरचे विरळ होत चाललेले पांढरे केस तेल लावून नीट मागे फिरवून बसवलेले, तोंडात बचाळी बसवलेले असे मोजकेच पण दिसायची माणसं वाचनालयात. स्त्रियाही दिसायच्या अधूनमधून पण त्यांचीही संख्या तेव्हाही तशी तुरळकच. वाचनाच्या बाबतीत आजच्यापेक्षा सारंच काही पूर्वी आलबेल होतं; अशातलाही भाग नाहीच. साहित्याचं वाचन हे माणसाचं पोट भरण्याचं आणि त्याहीपेक्षा आपलं आणि समाजाच्या सर्वांगिण उन्नतीचं सर्वात सुंदर प्रयोजन आहे; हे मान्यच केले पाहिजे. पण या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे आजकाल आपलं अक्षम्य दुर्लक्ष होतं आहे, हेही आपण आपल्या मनाशी कबूल केलं पाहिजे.कोणत्याही काळात अगदी मन लावून एक आंतरिक गरज म्हणून वाचणारी माणसं तशी कमीच होती. आतून उर्मी असेल आणि वाचनातल्या आनंदाची ज्याला इज्जत असेल; तो माणूस वाचनाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं खोटं समर्थन कधीच कुणापुढं करणार नाही; हे मुद्याम सांगायला नकोच. तरीही आजकाल वाचणाऱ्या माणसांचं वाळवंट झपाट्यानं वाढू लागलं आहे. एवढं मात्र निश्चित. गंमत म्हणजे हा संवाद मी वाचणाऱ्या माणसांसोबतच करतो आहे. न वाचणाऱ्या माणसांपर्यंत हे सारं कसं पोहोचवायचं; हा खरा मूलभूत प्रश्न आहे. मारून मुटकून, जुलूम जबरस्तीनं करण्याचा आणि करवून घेण्याचा हा उद्योग नव्हेच. अगदी ज्ञानोबांचे शब्द उसणे घेऊन बोलायचं तर ‘अति हळूवारपण चित्ता आणूनिया…’ असंच सांगितलं आणि बोललं पाहिजे. पण कधी, कसं आणि कुणाशी असाच हा एक भला मोठा प्रश्न होऊन बसला आहे आपल्यासमोर.सरकारी अनुदानावर चालणारी जी काही वाचनालयं माझ्या वाट्याला आली किंवा मी त्यांच्या वाट्याला गेलो तिथेही चित्र काही फारसं वेगळं आहे; अशातला भाग नाही. अपवाद सोडला तर पुस्तकांच्या कपाटांसमोर उभं राहून कोणतंही पुस्तकं हाताळून हवं ते पुस्तक, तेव्हा घेऊन घरी जाता यायचं. असं कोणतंही पुस्तक विशेषत: नाटकांचं दररोज एक घरी वाचनासाठी म्हणून मी घेऊन जायचो. पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते वाचून परत द्यायचा आणि दुसरं आवडतं पुस्तक घरी आणायचा. हा रतीब बहुतेकदा मे महिन्यात आणि दिवाळीच्या सुट्टीत माझ्याकडून हमखास घातला जायचा. आता इतकं वाचन होतं का आपल्याकडून ? तर अर्थातच नाही. अखंडीत वाचीत जावे… सोडाच. छोडो कल की बातें… पण खंडित का होईना, हवं ते वाचायला थोडीशी उसंत मिळते आहे. तर या अशा आधुनिक काळाचे उपकारच मानले पाहिजेत नाही का ?
( क्रमशः )
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.