थंडीच्या दिवसात आपणास थंडी वाजू नये यासाठी स्वेटर घालतो. स्वेटर थंडीपासून आपले संरक्षण करते. थंडीत फिरूनही आलो तरी आपणाला थंडी बाधत नाही. तसे विषय वासनांच्या क्षेत्रात आपली भटकंती झाली तरी मनाची स्वच्छता या विषयांपासून आपले संरक्षण करते. त्या गोष्टीकडे पाहाण्याचा आपला दृष्टिकोनच बदलते…
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406
तरी विषयांतुही कांही । आपणपें वाचुनि नाहीं ।
मग विषय कवण कायां । बाधितील कवणा ।। ३३५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा
ओवीचा अर्थ – आणि विषयांतहि ( ज्याला ) आत्मस्वरुपावाचून दुसरे कांही दिसत नाही, त्याला विषय कसले काय ? आणि कसली कोणाला बाधा करणार ?
मन स्वच्छ असावे म्हणजे आपोआपच मनात चांगले विचार उत्पन्न होतात. विषयांचा विचार आला तरी स्वच्छ मनाने त्याकडे पाहील्यास त्याची बाधा होत नाही. कचऱ्यापासून पिकांच्या वाढीसाठी पोषक खत बनवता येते. घाणीकडे पाहाण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे यावर हे अवलंबून आहे. यासाठी आपल्या आचरणातही मनाची स्वच्छता असावी. तसे असल्यास विषयांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. दुर्गंधीतही सुगंध कसा निर्माण करता येईल याकडेच चांगला विचार करणाऱ्यांचा कल राहातो.
एखादी सुंदर स्त्री पाहिल्यानंतर आपल्या मनात अनेक विचार येतात. तिच्या सौंदर्याने आपण मोहित होतो. तिच्या बोलण्यात मृदुता, प्रेम असेल तर आपल्या मनाची कोंडी होऊ शकते. मन भरकटू शकते. मनात अनेक वासनेचे विचार उत्पन्न होऊ शकतात. कदाचित त्या महिलेची तशी भावना नसतेही पण आपण मात्र वासनेने उताविळ होतो. अशा परिस्थितीत मन स्वच्छ असेल तर मनाचा तोल कधीही ढळत नाही. त्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकतो. इतकेच काय साधा स्पर्श करण्याचीही इच्छा नियंत्रणात राहाते. कारण आपल्या मनातील स्वच्छता या विषयीची वासनांना धुवून टाकते. स्वच्छ मनाच्या विचारांच्या कप्प्यात मग वाईट नजरही राहात नाही. म्हणजेच विषय वासनांवर मात करायची असेल तर मन स्वच्छ अन् निर्मळ असायला हवे.
थंडीच्या दिवसात आपणास थंडी वाजू नये यासाठी स्वेटर घालतो. स्वेटर थंडीपासून आपले संरक्षण करते. थंडीत फिरूनही आलो तरी आपणाला थंडी बाधत नाही. तसे विषय वासनांच्या क्षेत्रात आपली भटकंती झाली तरी मनाची स्वच्छता या विषयांपासून आपले संरक्षण करते. त्या गोष्टीकडे पाहाण्याचा आपला दृष्टिकोनच बदलते.
एखादी वासनेची कथा वाचल्यानंतर आपल्या मनातही वासनेची लालसा निर्माण होऊ शकते. अश्लिल चित्रे पाहील्यानंतरही आपले मन विचलित होऊ शकते. मनामध्ये वेगळ्या भावना उत्पन्न होऊ शकतात. पण आपले मन स्वच्छ असेल तर त्याकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. वासनेच्या कथेतून किंवा तशा पद्धतीच्या घटनेतून, प्रसंगातून आपणास वेगळाच बोध होऊ शकतो. अश्लिलतेकडे कसे पाहायला हवे हे स्वच्छ मन आपणास शिकवते. वासनेचा उपभोग आपण घ्यायचा की त्यातून बोध घ्यायचा हे मनातील स्वच्छतेचे विचार आपणास सांगतात. घटनेतील पिडीतेचा, असहाय्य स्त्रीचा उपभोग घ्यायचा, त्याचा लाभ उठवायचा की त्या पिडीतेला, असहाय्य स्त्रीला आधार द्यायचा, मदत करायची ही मानसिकता मनाच्या स्वच्छतेवर अवलंबून असते. आपल्या या कृतीत आपल्यातील आत्मज्ञानाचा विकास अवलंबून आहे, हे लक्षात घ्यायला हवे. भारतीयत्व अर्थात भारतीय संस्कृती मनाची स्वच्छता शिकवते. कमळ चिखलात उमलते पण त्या चिखलाचा वास त्या कमळात नसतो. विषय वासनात जरी आपण वावरलो, अश्लितेच्या वातावरणात आपली भटकंती झाली तरी आपल्या मनाच्या स्वच्छतेच्या कमळाला दुर्गंधी स्पर्श करत नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.