October 18, 2024
Remembering journalist Nitin Chavan article by Ajay Kandar
Home » Privacy Policy » पत्रकार नितीन चव्हाण नाही रे वर्गाचा आवाज
विशेष संपादकीय

पत्रकार नितीन चव्हाण नाही रे वर्गाचा आवाज

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये समाज साहित्य प्रतिष्ठानचे चौथे समाज साहित्य विचार संमेलन, दादर, मुंबई ग्रंथ संग्रहालयात आयोजित करण्यात आले. त्यावेळी तब्येत बरी नसतानाही नाकाला कृत्रिम श्वासनलिका लावून ते पूर्ण संमेलनाला उपस्थित राहिले आणि आजारपणाच्या संघर्षामुळे आर्थिक टंचाई असतानाही त्यांनी या संमेलनासाठी दहा हजाराचा मदत निधीही दिला.

अजय कांडर

आयुष्यभर परोपकारी भावना जपणारे आणि सचोटीने पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार नितीन चव्हाण वयाच्या पन्नाशीत गेले. हे फार त्रासदायक आहे. नितीन चव्हाण यांच एकूणच जगणं हे अभावग्रस्त परिस्थितीशी दोन हात करणारे होते; पण त्यांनी जगण्याच्या कोणत्याच संघर्षात हार मानली नाही. तरी निसर्गाने त्यांना अल्पायुषी ठरवले. ही घटना नितीन यांच्या निखळ माणूसपणावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या अनेक मित्रांना त्रासदायक ठरली आहे. पत्रकार म्हणून त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे पत्रकारिता केलीच; परंतु सदैव मदतीसाठी तत्पर राहणाऱ्या या गुणी व्यक्तीने अनेकांना मदतीचा हातही पुढे केला. तेही स्वतःचं मोठं अर्थबळ नसतानाही! नितीन यांच्या जाणाने ‘माणसाने माणसावर सतत प्रेम करत राहिलं पाहिजे’ या सहृदयी भावनेचा एक सच्चा साथी हरपला आहे.

मुंबईतील साखळी वृत्तपत्रांमध्ये नितीन यांनी सुमारे 30 वर्ष नोकरी केली. ते मूळचे कणकवली ओसरगाव येथील. कोकणच्या लाल मातीचा अंश आणि मालवणी बोलीचा शब्द त्याच्या नसानसात भिनलेला होता. हे त्याच्याशी बोलताना सतत जाणवायचं. पंधरा-वीस वर्षांपूर्वी त्यांनी गावी कुटुंबाचे एकत्र घर बांधलं. त्या घराचं काम करणाऱ्या काँट्रॅक्टरने त्या घराचं काम नीट केलं नाही, असं त्यांच म्हणणं. त्यामुळे घर काही वर्षातच पावसाळ्यात गळायला लागलं तेव्हा ते म्हणाले, या काँट्रॅक्टरवर केस दाखल केली असती; परंतु त्या बिचार्‍याने तरी कुठे घर बांधण्याचं इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलं असेल. पोटार्थी लोक आपल्याला जमत नाही तीही काम करतात आणि त्यांना आपण बळी जातो. या त्यांच्या बोलण्यातील जो समंजसपणा होता तो भल्याभल्यांना शक्य नाही. नितीन एका घटनेचा चारी अंगाने विचार करायचे.म्हणून त्याचं कधीच कुणाशी दीर्घकाळ भांडण राहिलं नाही. या अर्थाने ते अजातशत्रू होते.

पत्रकारितेची नितीन यांची वाटचाल अभिमान बाळगावी अशी होती. पत्रकारितेचे सपाटीकरण चालू असणाऱ्या या काळातही त्यांनी प्रत्येक वेळी शोषित वर्गाचीच बाजू लावून धरली. अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेचे बीट सांभाळताना त्यांनी जवळून त्या व्यवस्थेतील खाच-खळगे पाहिले.

महानगरपालिका स्तरावरून न्याय देताना शोषिताला कसं डावललं जात आणि शोषिताला अजून शोषित कसं बनवलं जायचं, याचे ते अनुभव अनेक वेळा सांगायचे. त्यांचा पत्रकारितेमधील आवाज नाही रे वर्गाच्या बाजूचा होता. पत्रकारितेमुळे प्रशासकीय व्यवस्थेतील पाळीमुळे त्यांना माहीत होती. त्यामुळे मुंबईत नोकरीसाठी आलेल्या किंवा प्रशासनातून नोकरी देतो म्हणून सांगून फसवल्या जाणाऱ्या अनेक तरुण होतकरू नोकरी शोधणाऱ्या मुलांना ते सावध करायचे. अगदी दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. कणकवली तालुक्यातील एक तरुण नोकरीसाठी मुंबईत गेला.

महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याशी त्याची ओळख झाली. त्या अधिकाऱ्याने महानगरपालिकेत नवी भरती असून आपण तुझ्यासह तुझ्या मित्रमंडळींना नोकरीला लावतो असं सांगितले. त्या तरुणाला महानगरपालिकेतील नोकरीचं कन्फर्म पत्रही दिल आणि कुठल्यातरी भागात त्याला हजर करूनही घेतलं. नितीन यांना हे कळल तेव्हा त्यांनी हे सगळं बनावट असल्याची माहिती त्या तरुणाला दिली. तरी तो तरुण त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. त्या तरुणाने पुढे आपल्याला नोकरी लागलीच आहे तर आपण इतरांनाही नोकरीला लावूया असं ठरवून सुमारे 25 लाख रुपये गोळा करून त्या अधिकाऱ्याला दिले. ते 25 लाख मिळाल्यावर त्या अधिकाऱ्याने नोकरी देण्याबद्दल हातवर केले. जर नितीन यांनी आधीच सावध केलेले त्या तरुणाने ऐकले असते, तर आयुष्यभर पश्चाताप करायची त्याच्यावर वेळ आली नसती. शेवटी गावची जमीन विकून त्या तरुणाने नोकरीसाठी मित्रांचे घेतलेले पैसे परत केले.नितीन यांनी अशा प्रकारे कायमच बातमीच्या पलीकडे जावून शोषितांचा आवाज बनून आपली भूमिका बजावली.

मोठी गुणवत्ता असणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांबद्दल कायमच त्यांच्या मनात आदर राहिला. त्याचे सहकारी श्रेष्ठ कथाकार, नाटककार जयंत पवार असो किंवा कथा लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा जोशी असो यांच्याबद्दल ते भरभरून बोलायचे. या दोन्ही व्यक्ती मूळच्या आपल्या सिंधुर्गातल्या आहेत याचा त्यांना अभिमान होता. त्यांच्याकडे बऱ्याच वेळा ते आपलं मन मोकळे करायचे. सांस्कृतिक क्षेत्राची त्यांना प्रचंड आवड होती. सिंधुदुर्गातील कार्यक्रम मुंबईत होत असतील, तर ते संपर्क ठेवून त्याचे वृत्तांत मुंबईतल्या सर्व माध्यमांना देण्याचा प्रयत्न करायचे. समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या चळवळीतील सर्व पदाधिकरी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. एका निश्चित ध्येयाने ही चळवळ काम करते म्हणून ते सतत इतरांना सांगायचे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये समाज साहित्य प्रतिष्ठानचे चौथे समाज साहित्य विचार संमेलन, दादर, मुंबई ग्रंथ संग्रहालयात आयोजित करण्यात आले. त्यावेळी तब्येत बरी नसतानाही नाकाला कृत्रिम श्वासनलिका लावून ते पूर्ण संमेलनाला उपस्थित राहिले आणि आजारपणाच्या संघर्षामुळे आर्थिक टंचाई असतानाही त्यांनी या संमेलनासाठी दहा हजाराचा मदत निधीही दिला. दुसरीकडे कोणत्याही गरजू व्यक्तीला इतरांकडून मदत मिळवून देणे हे ते आपले कर्तव्य मानायचे. काही वर्षांपूर्वी त्यांचा एक मित्र लिव्हरच्या आजाराने त्रस्त होता. लिव्हरचे ऑपरेशन करण्यासाठी लाखो रुपयांची गरज होती. तर नितीन यांनी त्याच्यासाठी आपल्या पत्रकारितेचा उपयोग करून दोन लाखाचा निधी उभारला आणि त्याला मदत म्हणून दिली. वर मित्राला सांगितलं ही घटना तुही विसरून जा आणि मी ही विसरून जातो. नितीन यांची ही परोपकाराची भावना दुर्मिळ अशीच होती. त्यांचं मालवणी भाषेवर खूप प्रेम होत. मालवणी बोलीत साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे, असं त्यांना वाटे. पहिलं मालवणी साहित्य संमेलन कथाकार मनोहर कदम यांनी आयोजित केलं याविषयी ते सतत बोलायचे. माणसाची संवेदना ही त्याच्या भूमीतील प्रत्येक गोष्टीवर प्रेम करण्यातून अधिक वाढत जाते, असं ते सांगायचे. आज मात्र ते त्यांच्या भूमीलाच परके करून हे जग सोडून गेले आहेत!

लेखक विख्यात कवी,व्यासंगी पत्रकार आहेत.९४०४३९५१५५


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading