कवी सफरअली इसफ यांचा नागराज मंजुळे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण काव्य पुरस्काराने गौरव
पुणे येथील कार्यक्रमाला अभिनेते अशोक सराफ, डॉ.मोहन आगाशे, कवी रामदास फुटाणे यांची उपस्थिती
पुणे – राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री साहित्यिक यशवंतराव चव्हाण यांच्या जन्म दिनानिमित्त देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण स्मृति काव्य पुरस्कार सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कवी सफरअली इसफ यांना त्यांच्या दर्या प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘अल्लाह ईश्वर’ या काव्यसंग्रहाला सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. पुणे टिळक स्मारक मंदिर येथे रोख ११ हजार रुपये, स्मृतीचिन्ह आणि शाल अशा स्वरूपाचा हा पुरस्कार प्रदान करताना ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, कवी तथा माजी आमदार रामदास फुटाणे उपस्थित होते.
पुणे येथील प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रामदास फुटाणे यांच्या संयोजनाखाली यशवंतराव चव्हाण यांच्या जन्म दिनी दरवर्षी मराठीतील उत्कृष्ट साहित्य कृतीला यशवंतराव चव्हाण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी साहित्य विभागात कवी सफरअली इसफ यांच्या अल्लाह ईश्वर या काव्यसंग्रहाला यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार देऊन यथोचित गौरव करण्यात आला.कवी सफरअली इसफ यांचा अल्लाह ईश्वर हा काव्यसंग्रह सध्या बहुचर्चित असून यापूर्वी त्यांना समाज साहित्य प्रतिष्ठानचा प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार, इचलकरंजी येथील संस्कृती काव्य पुरस्कार, प्रभा प्रकाशनाचा प्रभा प्रेरणा पुरस्कार, मास्तरांची सावली काव्य पुरस्कार, सम्यक संबोधी काव्य पुरस्कार आदी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यानंतर आता सदर यशवंतराव चव्हाण पुरस्काराने अल्लाह ईश्वर या काव्यसंग्रहाचा गौरव करण्यात आला आहे. अल्लाह ईश्वर या काव्यसंग्रहाला ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखडे यांची प्रस्तावना लाभली असून त्यात ते म्हणतात, अल्लाह ईश्वर मधील कविता आजच्या धार्मिक उन्मादाविरोधात आवाज आहे. कवीला अनेक प्रसंगातून जावं लागलं आणि धर्माच्या आडून त्रास देणाऱ्यानाही सहन करावे लागले तरीही कवीने कवितेत कुणाबद्दल अपशब्द व्यक्त केला नाही. अशी मानव्याची आस लागलेली ही कविता मराठी कवितेत दुर्मिळ अशी आहे.
भेदाच्या भिंती उभ्या केल्या जात असताना त्या जोडण्याची इच्छा ही कविता बाळगते. माणसाने माणूस म्हणून जगायला पाहिजे त्याची धर्मात,जातीत विभागणी होता नाही असे आवाहनही ही कविता करते. आजच्या जातीय धार्मिक ध्रुवीकरणाकडे निर्देश करताना माणूस कसा विभागला गेला आहे.याचे भेदक वास्तव सांगते. माणसाचा माणसावरचा विश्वास उडून जावा इतका माणूस अधिक वर्चस्ववादी झाला आहे. या वर्चस्ववादी वृत्तीचा बळी अल्पसंख्यांक गट ठरत असून या सगळ्याची चिकित्सक मांडणी करताना या कवितेत कुणाबद्दलही कटुता नाही हे या कवितेचे सर्वात महत्वाचे मोल आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘अल्लाह ईश्वर’ काव्यसंग्रहाला यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार लाभला हा या कवितेचा यथोचित गौरवच आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.