कृषी संस्कृतीत लहानाचा मोठा झालेल्या, मातीशी इमान राखून स्वकर्तृत्वाच्या जोरावर ज्ञानसाधना आणि शब्द साधना करणाऱ्या डॉ. शिवाजी शिंदे यांचा ‘कैवार’ हा कवितासंग्रह असाच कृषिनिष्ठ जाणिवांचा आविष्कार करणारा आहे.
डॉ. श्रीकांत श्री पाटील
कोल्हापूर
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक,
राज्यशासन पुरस्कार प्राप्त साहित्यिक
प्रतिभा शक्ती ही दैवी देणं आहे. ती ज्याला लागते तो साध्या ही शब्दात मोठा आशय व्यक्त करण्याचे सामर्थ्य बाळगून काव्यलेणी कोरतो. उत्तम शब्दांची सूचक योजना करतो. त्याला लयबद्धतेची जोड देतो. त्यात वाड्मयीन नवरसांचा परिपोष करतो. आपल्या मनातील भाव-भावना, व्यथा-वेदना, सुख-दुःख, विचार विवेकाने ध्वनित करतो त्यातून कविता साकारते. कवितेतून कवीची व्यक्ती प्रतिमा, भाव प्रतिमा आणि वाङमयीन प्रतिमा डोकावते. अन मग अपार सात्विकभाव आणि नऊ रसांच्या सुंदर मिलाफातून एक उत्तम काव्य निर्माण होते.
कवितेला विषयाचे बंधन नसते. परंतु कवीची जडण-घडण ज्या सामाजिक पर्यावरणात झालेली असते तेच त्याला विषय पुरवितात. कृषी संस्कृतीत लहानाचा मोठा झालेल्या, मातीशी इमान राखून स्वकर्तृत्वाच्या जोरावर ज्ञानसाधना आणि शब्द साधना करणाऱ्या डॉ. शिवाजी शिंदे यांचा ‘कैवार’ हा कवितासंग्रह असाच कृषिनिष्ठ जाणिवांचा आविष्कार करणारा आहे. बळीराजाचा कैवार घेणारा आहे. वाचकाला शेतशिवार आणि गावशिवाराच्या फेरफटक्याचा अनुभव देणारा आहे.
गावगाड्यातील लोकांच्या वृत्ती-प्रवृत्तीवर भाष्य करणारा आहे. अस्मानी, सुल्तानी संकटाबरोबर मानवनिर्मित दंभाच्या वर्मावर बोट ठेवून समाधान आणि संतोषाच्या मर्माचे विधान करणार आहे. रिती-रिवाज, सण आणि संस्काराची पाठराखण करीत ‘जुनं ते सोनं’ पण याच बरोबर ‘नवं ते हवं’ याचा सुंदर मेळ साधणारा आहे.
मातीच्या लेकरांचे रगतरोटीतले सर्जनतत्त्व रचनासत्त्व बनते. या जाणिवांच्या गर्भ तपासणीचे वास्तवसुक्त डॉ शिवाजी नारायणराव शिंदे यांच्या कैवार मध्ये आपणास दिसेल. कवी जेव्हा पोटतिडकीने दुःख मांडतो, तेव्हा उगीचच लिहिलेल्या प्रासंगिक उपदेशात्मक किंवा प्रबोधनात्मक कवितेपेक्षा हीच कविता अधिक खरी असते. वारापाणी सोसणारेच या जगाला पोसणारे असतात. त्यांच्याच वळचणीला दुष्काळ, नापिकी, प्रकल्पग्रस्तता, सरकारचे दुर्लक्ष, समाजाकडून उपेक्षा येते. या वेदनाअंशाचा आणि वेदनादंशाचा कैवार ही कविता घेते. माणसांच्या जगातील दुःखे मांडणारा हा कवी शेतकऱ्याला चांगले दिवस येतील, असा आशावाद बाळगून आहे. हे या कवितेचे सद्चिन्ह मला वाटते.
नागराज मंजुळे
15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण आनंदात, उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला. स्वातंत्र्याने निश्चितपणे आम्हाला मूलभूत अधिकार दिलेत. आमच्या हक्काची जाणीव करून दिली. लोकशाहीचा मूलमंत्र दिला. पण आजही शेतात जनावरांच्या बरोबर ढोरकष्ट उपसून राबराब राबणाऱ्या, हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करुन धनधान्याची मळे फुलविणाऱ्या आणि तरीही भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी घालविणाऱ्या बळीराजाला जेव्हा आपण पाहतो, तेव्हा आजही प्रश्न पडतो की तो स्वतंत्र आहे का ? अन्याय – अत्याचार, दुःख, दारिद्र्य, संकट, कर्ज, सावकारी व अस्मानी आणि सुल्तानी संकटाच्या वरवंट्याखाली आजही त्याची जाते भरड होत आहे. या बळीराजाचा कैवार डॉ. शिवाजी शिंदे यांनी घेतला असून कैवार हे एक प्रकारे बळीराजाचे पसायदानच आहे.

कवीची जडण-घडण ही शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांच्या सुख-दुःखांचा, व्यथा वेदनांचा कवीला जवळून परिचय आहे. काळ्या आईची निस्सीम भक्तीने सेवा करणारा आणि निढळाच्या घामाने मातीतून सोने निर्माण करणारा ‘बाप’ कविचा आदर्श आहे. आज आदर्श कुठे शोधायचे ? असा जनमानसात प्रश्न असताना मुलांसाठी राबणारा, प्रसंगी सावकारी कर्ज काढणारा, गावकी आणि भावकीत अपमान सहन करणारा, प्रसंगी उपाशी राहून मुलांना काही कमी पडणार नाही याची काळजी घेणारा शेतकरी बाप कवी ‘बाप नावाचा माणूस ’ या कवितेतून चित्रित करतो. कैवार मधून शेतकरी दुःखाला वाचा फोडण्याचे आणि कणखरपणे ते समाजासमोर मांडण्यावे पवित्र कार्य डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले आहे.
इंग्रज अधिकाऱ्यांसमोर शेतकरी वेशात हजर राहून शेतकऱ्याची कैफियत मांडणाऱ्या महात्मा फुल्यांचा वारसाच त्यांनी एक प्रकारे पुढे चालविला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. त्याच्या जगण्याचेही वांदे झाले आहेत. अस्मानी आणि सुल्तानी संकटाच्या दुष्टचक्रात तो सापडला आहे. आपल्या पोरीच्या लग्नाच्या चिंतेने त्याची झोप उडाली आहे. तो पावसानं पिचला असून कर्जाने दबला आहे. या संकटाची मालिकाच कवी काव्य शृंखलेत गुंफतो आणि शेतकरी दुःखाची करुण कहाणी काव्यरूपात प्रकट करतो.
“शेतकऱ्यांच्या शेतमालाला कधीच नसतो रास्त भावतरीही शेतकऱ्यान सारं शिवार कष्टानं पिकवाव. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांनं शेतकऱ्याचं होतं नव्हतं समदं न्यावंमला सांगा, जगाच्या पोशिंद्यानं कसं जगावं” लहरी निसर्गाशी दोन हात करताना कधी कर्जमाफी तर कधी पॅकेजच्या नावाखाली त्याला झुलवत ठेवलं जाते. पंचनाम्याच नाटक केलं जातं. पण यातून हाती काहीच लागत नसल्याने त्याला मरणाला जवळ करावे लागते हे विदारक वास्तव सत्य कवी सांगतो.
शेतकऱ्यांच्या जगण्याचे वांदे, शेतकऱ्यांचे दुःख पोरीचं लगीन या कविता त्याच्या हतबलतेचे दर्शन घडवितात. चिंता आणि चिता बिंदू मात्र विशेष आहे. चिंता माणसाला जिवंतपणी जाळते तर चिता त्याला मेल्यावर जाळते. व्यापाऱ्यांकडून फसवणूक, सरकारी उदासीनता आणि निसर्गाची अवकृपा यामुळे पोरीचं लगीन कसं होईल ? या चिंतेने तो जिवंतपणी जळतो आहे.
“संसाराला कंटाळला, प्रश्न बापाला पडला सावकाराचं कर्ज कसं फिटंल ? सांगा बरं यंदा, कसं व्हईलमह्या पोरीचं लगीन ?” शेतकऱ्यांच्या सनातन प्रश्नांवर प्रकाशझोत टाकण्यासाठीच ‘सांग माझ्या सरकारा’ या कवितेची निर्मिती झाली असल्याचे जाणवते. सरकारच्या अजब कारभारावर कोरडे ओढताना कर्जमाफीनंतर शेतकरी आत्महत्या होणार नाहीत याची हमी, गारपीट, अवकाळी, दुष्काळात मिळणारी तुटपुंजी मदत, शेतमालाला भाव ठरविण्याचा शेतकऱ्याला अधिकार, धरणग्रस्त, पूरग्रस्त, प्रकल्पग्रस्तांना मदत, सरसकट कर्जमाफी यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घालत कवीने सरकारवर प्रश्नांची सरबत्तीच केली आहे. तर दुष्काळ, कर्ज, दुबार पेरणी व मुलांच्या भविष्याची चिंता यामुळे पावसाला हुलकावणी न देण्याचे आवाहन हुलकावणी या कवितेत केले आहे.
“अवकाळी पाऊस” मध्ये अवकाळीने उन्मळून पडलेल्या बळीराजाची केविलवाणी अवस्था मांडली आहे. “कुणाच्या ध्यानीमनी नसताना धो-धो बरसला शेतकऱ्याच्या आशा अपेक्षांचा भ्रमनिरास झाला.लेकरावानी सांभाळलेल्या द्राक्ष – आंबा – डाळींब बागामातीमोल झाल्याने बळीराजा पार उन्मळून पडला” शेतात राबणारा बाप, घरात राबणारी आई यांच्याविषयी कवीच्या मनात नितांत आदर व कृतज्ञता आहे. कवीची कौटुंबिक पार्श्वभूमी शेती संस्कृतीचीच आहे.
आई-वडीलां विषयाची श्रद्धा, भक्ती, त्यांच्या कष्टाची जाणीव, “बाप नावाचा माणूस”, “माझा कष्टकरी बाप”, “माझी आई” या कवितांतून प्रतीत होताना दिसतो. समाज म्हणजे लोकांचा समुदाय. ज्यावेळी एखादे वादळ येते तेव्हा सारा समाज ढवळून निघतो. समाजात निर्माण झालेल्या प्रश्नांनी कवीमन अस्वस्थ होतं. हीच अस्वस्थता कारुण्याचा पदर पांघरून “कोवळ्या अर्भकाचा काय दोष” या कवितेत जाणवते. आपली कृष्णकृत्ये लपवण्यासाठी अभागी जीवांना फेकून देणाऱ्या नीच प्रवृत्तीचा कवी निषेध करतो. तर हरवलेल्या माणुसकीला जपण्याचे “माणुसकी” या कवितेतून आव्हान करतो.“ना प्रेम ना आपुलकीही दुनिया मतलबी झालीयना विश्वास ना स्नेहआपलीच माणसे परकी झालीत
हरवत चाललेल्या माणुसकीला जपायची वेळ आलीय ”समाजातील दीनदलितांना दुखी पीडितांना मानवाप्रमाणे वागविण्याचा सल्ला ‘मानवा’ या कवितेतून त्यांनी दिला आहे. “”जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले || तोचि साधू ओळखावा | देव तेथेची जाणावा ” या संतोक्तीस अनुसरुन सत्कर्माचे, लोकांना आपलेसे करुन आधार देण्याचे आवाहन कवी करतो आहे. ‘’माणसाकडून’ या कवितेत माणूसच माणसाला कसा छळतो, पिळतो, फसवितो, नागवितो बदनाम देखील करतो. पण शेवटी माणूसच माणसाच्या मदतीला धावून येतो, हे असंख्य प्रश्नांच्या शृंखलेतून कवी उत्तरादाखल दाखवून देतो.
“शेवटी माणूसच येतो माणसाच्या मदतीला धावून ! हे देखील शिकावं माणसांनी… माणसाकडूनचं सोडून द्यावेत आपापसातील मतभेद आणि मनभेद गुणदोषासह स्वीकारला जावा माणूस… माणसाकडूनच !!” ‘कृतघ्न मुले’ या कवितेत कुटुंबाच्या दुभंगलेपणाचे विदारक चित्र मांडताना आईबापाला एकाकी वाऱ्यावर सोडून परदेशी परागंदा होणाऱ्या मुलांचा समाचार कवीने घेतला आहे.
कैवारमध्ये कवीने पाहिलेल्या, साहिलेल्या, आठवणी आणि अनुभवांची घट्ट अशी बांधणी आहे. प्रचलित समाज परिघातील विविध घटना प्रसंगाच्या अनुरोधाने मार्मिक असे भाष्य करताना त्यांनी तत्वचिंतकाची भूमिकाही ताकदीने पार पाडली आहे. वास्तविकता, आजकाल, प्रवृत्ती, माणसाकडूनच, शब्द, माणूसकीच्या शोधात मी, तू वागला नाहीस तर या कवितातून मानवी वृत्ती-प्रवृत्तीवर, सुष्टता-दुष्टतेवर भाष्य करीत कवीने तत्वचिंतकाची भूमिकाही पार पाडली आहे.
प्रवृत्ती या कवितेत मानवी प्रवृत्तीवर बोलताना,“बोलणारा बोलू दे की… जळणारा जळू दे की…तू मात्र निश्चिंत रहा… ध्येयाप्रती ठाम रहा”असा सकारात्मक संदेश दयायला कवी विसरत नाही. “विनाअनुदानीत धोरणापायी” या कवितेत विद्यार्थी परायण आणि ज्ञानपरायण असणाऱ्या साने गुरुजींचा वारसा जपणाऱ्या विद्यार्थी हितैषी गुरुजींची भूमिकाच कवीने मांडली आहे. शिक्षणाची शोकांतिका पहायला मिळत असताना. “विनाअनुदानित धोरणापायी, विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही” अशी भूमिका घेणाऱ्या शिक्षकाचे चित्र रेखाटून कवी निराशेतही आशेचे किरण शोधतो आहे.
शेती म्हणजे बऱ्याच प्रमाणावर पावसाचा खेळ असतो. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याला वेठीस धरतो. दुष्काळी पट्टयात लोकांना घोटभर पाण्यासाठी तडफडायला लावतो. तर धरणक्षेत्रातील पट्टयात अतिवृष्टीचा मारा करुन महापूराच्या वेढयाने बेजार करतो. नापिकी, दुबार पेरणी, अवकाळी, अतिवृष्टी, अनावृष्टी या नैसर्गिक तर कर्ज, पॅकेज, सावकारी या सुल्तानी संकटानी शेतकरी बेजार होतो. महापुरानंतरचं उध्वस्त गाव, पुरग्रसताचे मनोगत, या कविता पुरात बुडालेल्या गावातील शेतकऱ्याची खिन्न मनस्कता व्यक्त करतात. गतवर्षापासून कोरोना या वैश्विक महामारीने संपूर्ण जगाला वेठीला धरले आहे. या काळात चाचणीत निगेटिव्ह येणे व मनाने पॉझिटिव्ह रहाणे आवश्यक आहे. याबाबतचे प्रबोधन, चला, सर्व एकजुटीने कोरोना विषाणूशी लढू, जरा एका ना होss, कोरोना … तू हे मात्र चांगलं केलंस !, या कवितेतून केले असून वर्दीतल्या दर्दी माणसाला माझा सलाम म्हणून कोरोना योद्ध्याचे गुणगाण गायीले आहे.
राष्ट्रभक्ती हा कवीच्या जिव्हाळयाचा विषय आहे. देशसेवा करताना शहिद झालेल्या कुटुंबाची विरहव्याकूळता, आर्तता “तुम्ही येणार आहात म्हणून” या कवितेत मांडून एकप्रकारे कवी शहीदाला आदरांजलीच वाहतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठीच “भीमा तुझ्या रुपानं” राजे, आपण आज हवे होतात ! या कवितांची निर्मिती झाल्याचे जाणवते.
शेतकऱ्यांचा कैवार घेणारा, महापुरुषांचे गुणगाण गाणारा, सामाजिक स्थितीगतीवर भाष्य करणारा कवी प्रीतीच्या डोहात डुंबतानाही आढळतो. प्रेम म्हणजे काय ? आठवणीच्या पुस्तकामध्ये, मुकं मन, सांग ना सखे, ओढ, अन् मला वाटतयं या कवितातून प्रीतीतील भक्ती, ओढ, निव्यार्जता, निष्पापता प्रतिबिंबित झाली आहे. कवी हा शब्द साधक आहे. तो शब्दांची साधना करुन काव्यवेली फुलवितो, शब्दांचे गुणगुण गातो. प्रबोधनासाठी शब्दशास्त्राचाच आधार घेतो.“शब्दांची महती जाणून सर्वांनीच शब्दांचे मोल जपातरच निर्माण होईल. पाहा माणसांमाणसामध्ये एकोपा” या शब्द साधनेतून समाजमनाला सकारात्मकतेबरोबर, एकात्मतेचा, स्त्रीपुरुष समानतेचा, सावधानतेचा संदेश देतो. संकल्प महिला दिनाचा, शब्द, वास्तव, सरते वर्ष, तुम्ही म्हणता, ती कुठं काय करते या कवितातून समाजमूल्यांची सकस पेरणी करतो.
मनाच्या स्थिरतेसाठी, सुख, समाधान, संयम आणि शांततेसाठी अध्यात्मिक बैठक असावी लागते. ती कविच्या ठायी आहे. श्री दत्तगुरु, श्री स्वामी समर्थ ही त्यांची श्रध्दास्थाने आहेत. सेवेकऱ्यांनो या हो ! या हो, दत्ता धाव रे, स्वामी समर्था यातून त्यांची गुरुभक्ती व स्वामीनिष्ठा दिसून येते. एकूणच शेतकऱ्यांचा कैवार हा मुख्य केंद्रिभूत विषय घेऊन कवीने यातून सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक बाबींवरही कविता साकारल्या आहेत.
कैवारमध्ये शेतकरी जीवन हा विषय केंद्रीभूत असला कवितासंग्रह कृषीनिष्ठ जाणिवाचा अविष्कार करणारा असला तरी प्रीती, भक्ती, सामाजिक समस्या, तत्वचिंतन असे विषय वैविध्यही आढळते. काव्य लेखनासाठी मुक्तछंदाचा प्रभावी वापर करुन आपल्या मनातील भाव-भावनांना यातून त्यांनी वाट मोकळी करुन दिली आहे. साधी, सोपी, आकलन सुलभ भाषा, प्रवाही लेखन, ग्राम बोली आणि सहजसुंदर शैलीने नटलेली कैवारमधील कविता वाचकमनाचा ठाव घेते.
पुस्तकाचे नाव – कैवार
कवी – डॉ. शिवाजी नारायण शिंदे
प्रकाशक – शब्द शिवार प्रकाशन