October 18, 2024
Shaheer Sheetal a rebellious thinker and presenter
Home » Privacy Policy » विद्रोही विचार करणारी अन् मांडणारी शाहीर शीतल
मनोरंजन

विद्रोही विचार करणारी अन् मांडणारी शाहीर शीतल

ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! ..

सांस्कृतिक चळवळीत तिचे मोठे योगदान आहे. नवयान महाजलसा कला प्रबोधन प्रशिक्षण व संशोधन संस्थेमार्फत लोक कलावंत मध्ये काम करण्याचा दोघांचा प्रयत्न सुरु आहे. लोकसंगीत, लोककला, लोकपरंपरा, लोकवाद्य ही काळाच्या ओघात विसरली जाऊ नयेत यासाठी जलसा म्युझिक अकादमीच्या माध्यमातून लोकवाद्यांचे प्रशिक्षण देण्याचे काम जलसा स्टुडिओ करत आहे.

ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, समुपदेशक, व्याख्याता
अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे
मो. 9823627244

‘साऊ पेटती मशाल साऊ आग ती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचे पाऊल ॥’

गीतकार व गायक दोन्हीही शीतल साठे. क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे हे एक प्रचंड गाजलेले गीत. शीतल साठे व सचिन माळी हे नाव चळवळीत, शाहीरांच्या यादीत ऐकले नसेल असे महाराष्ट्रात कोणी नसावे. बहुतेक तळागाळात काम करणाऱ्या चळवळीतील अनेकांचं आयुष्य हे साध, सरळ, सोप कधीच नसतं. समोर येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायची हिंमत धमक अंगी असावी लागते. ही हिंमत व धमक शीतल मधे आहे असे ठामपणे म्हणता येते. शीतल आज एक उत्कृष्ट गीतकार व शाहीर म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळखली जाते. नवयान महाजलसा या नावाने शीतल साठे व सचिन माळी कार्यक्रम सादर करतात. गेल्या वर्षी जलसा स्टुडिओची निर्मिती करून यूट्यूब चॅनेल सुरू करून एक पुढचं पाऊल शीतलने टाकले आहे. त्यांचं जगणं म्हणजे-
‘’भीमा तुझ्या निळाईची मी ओवी गायील गं
समतेच्या युगाच चाक म्होरं जाईल गं’’
अशी अनेक क्रांतीची, चळवळीची, विद्रोही गीतांची निर्मिती शीतल व सचिनने केली आहे.

आज एका यशस्वी टप्प्यावर शीतल उभी आहे पण यामागील तिचे जीवन संघर्षमय व वेदनादायी आहे. तिच्या गायनात आर्तता आहे. शब्द हृदयाला भिडणारे आहे. आवाजात करूणा आहे तसाच विद्रोह सुध्दा आहे.

शीतलने समाजशास्त्र या विषयातून एमए बीएडची पदवी मिळवली आहे. तिला चांगली नोकरी मिळाली असती पण तिने सामाजिक चळवळ व समाजप्रबोधनाचा मार्ग स्वीकारला. शाहिरांनी कायमच क्रांती केली आहे असा इतिहास आहे. घरावर तुळशीपत्र ठेवून शाहीर क्रांतीची, चळवळीची, समतेची, देशातील प्रश्नांवर गाणी गातो. भाष्य करतो. प्रसंगी तुरूंगातही जातो हा इतिहास आहे पण वर्तमानसुध्दा आहे. सुरक्षित छपरात राहून संसार करता येतो पण शीतलने शाहिरी जलसा हा व्यवसाय म्हणून स्वीकारला.

महाविद्यालयीन जीवनात सांस्कृतिक चळवळीत एकत्र आल्यावर कुटुंबाच्या विरोधाला तोंड देत शीतल व सचिनचा आंतरजातीय विवाह २००५ साली पुण्यात फुलेवाड्यात सत्यशोधक पध्दतीने झाला. माहेरची परिस्थिती बेताची होती. सासरचीही तशीच होती. दोन्ही कुटुंबाचा कसलाच आधार व पाठिंबा नसताना दोघांचा चळवळीचा संसार सुरु झाला.

प्रबोधनाच्या चळवळीत २००४ सालापासून शीतल कार्यरत आहे. वैचारिक लेखन, गाणी, कविता लेखन या माध्यमातून तिचे प्रबोधन सुरुच आहे. शाहिरांचे शब्द म्हणजे धगधगता अंगार व तळपती तलवार असते असे म्हटले जाते. अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक अशा अनेक शाहिरांचा वारसा घेत शीतल लिहिते आहे, गाते आहे.

चळवळीच्या माध्यमातून शाहिरीचे कार्यक्रम करत असताना काही क्रांतीकारी गीतांमुळे नक्षलवादी असल्याच्या खोट्या आरोपावरून शीतल व सचिनला गुंतवण्यात आलं होत. तिला अटक झाली तेव्हा ती ४ महिन्यांची गरोदर होती. कलाकार म्हणून हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा मोठा घाला होता. अनेक कलाकार, चळवळीचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी होते. शीतल ३ महिन्यांनी बाहेर आली. तिला मुलगा झाला. अभंग त्याचे नाव. आज तो १२ वर्षांचा आहे. परंतु सचिन सुमारे ४ वर्ष मुंबईच्या ॲार्थर रोड जेलमधे होता. तेथे त्याने ३ पुस्तके लिहिली व प्रकाशित केली. मुलगा झाला तरीही सचिन काही वर्ष मुलाला बापाचे प्रेम देऊ शकला नाही. मुलाच्या प्रेमात सचिनने तुरूंगात असतानाच एक गीत लिहिले.
काय सांगू तुला माझ्या पिला रे
तुला वादळात जन्म दिला रे
वादळ जीवावरी उठलेलं
सारं आकाश होतं फाटलेलं
झुले आकाशी तुझा झुला रे
तुला वादळात जन्म दिला रे…
आणि या बापाच्या हृदयस्पर्शी वेदनादायी शब्दांना आईने यथावकाश चाल लावली व ते गीत स्वतः गाऊन यूट्यूबवर प्रदर्शित केले. हृदय पिळवटून टाकणारे शब्द काय असतात याची अनुभूती हे गाणं ऐकताना येते.

आयुष्यात कितीही संघर्ष असला तरीही थांबला तो संपला याप्रमाणे अनेकजणींच्या बाबतीत घडत असतं. परंतु शीतलने अतिशय संयमाने व धैर्याने परिस्थितीला तोंड दिले. आणि पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेत आपले लेखन, कार्यक्रम व कलाकारांचे संघटन सुरु केले.

सांस्कृतिक चळवळीत तिचे मोठे योगदान आहे. नवयान महाजलसा कला प्रबोधन प्रशिक्षण व संशोधन संस्थेमार्फत लोक कलावंत मध्ये काम करण्याचा दोघांचा प्रयत्न सुरु आहे. लोकसंगीत, लोककला, लोकपरंपरा, लोकवाद्य ही काळाच्या ओघात विसरली जाऊ नयेत यासाठी जलसा म्युझिक अकादमीच्या माध्यमातून लोकवाद्यांचे प्रशिक्षण देण्याचे काम जलसा स्टुडिओ करत आहे. हे फार मोठे व महत्वाचे काम शीतलने हाती घेतले आहे. विद्रोही शाहिरी जलसा कधी थांबणार नाही असा मनोदय शीतल व्यक्त करते.

आज महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेर व देशभरात. ७५० पेक्षा जास्त शाहिरी जलसे शीतलने सादर केले आहेत. समतेच्या चळवळीसाठी लढलेले सर्व महामानव तिचे आदर्श आहेत. चळवळीच्या या वाटेवर महात्मा फुले व डॅा. बाबासाहेब आंबेडकर भेटले म्हणून आयुष्याच सोनं झालं व बरंच काही शिकतां आलं ही भावना ती व्यक्त करते. जातीअंताच्या लढाईत शिलेदार म्हणून शीतल काम करते आणि इथे डॅा.बाबासाहेब भेटतात म्हणूनच सामाजिक प्रेरणा म्हणून डॅा. बाबासाहेब कायमच भावतात असे शीतल सांगते.

जे कौटुंबिक ते ते सामाजिक हा नियम बदलून जे जे सामाजिक ते ते कौटुंबिक असे समजणाऱ्या, कलाकारांना पाठिंबा देऊन कौतुक करणाऱ्या, अतिशय धाडसी, बंडखोर, विद्रोही विचार करणाऱ्या व मांडणाऱ्या शाहीर शीतल साठे या आधुनिक नवदुर्गेस मानाचा मुजरा..!

शीतल साठे – 84213 76000


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading