July 27, 2024
the oath should be put on the heart article by rajendra ghorpade
Home » …यासाठीच अंतःकरणास घालायला हवी शपथ
विश्वाचे आर्त

…यासाठीच अंतःकरणास घालायला हवी शपथ

ऐसेया अंतःकरण । बाह्य येतां तयाची आण ।
न मोडी समर्था भेण । दासी जैसी ।। ९६० ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – राजाने दासीस शपथ घातली असतां राजाच्या भयाने ती शपथ दासी जशी मोडीत नाही, त्याप्रमाणे या साधकाने बाहेर विषयाकडे जाऊ नकोस, तुला माझी शपथ आहे अशी अंतःकरणास शपथ घातली असता तें अंतःकरण बाहेर विषयांकडे येण्याविषयी त्याची शपथ मोडीत नाही.

सातच्या आत घरात…पूर्वी मुलींना हा नियम प्रत्येक घरात लागू होता. आईला ही शपथ देऊनच मुली घराच्या बाहेर पडत असतं. यामध्ये आईला त्या मुलीची काळजी वाटत असे त्यामुळे ती तशी अट घालत असे. एखाद्याकडे न जाण्याची शपथही मुलींना घातली जात असे. इतके कडक नियम असत, पण ते पाळले जात होते. कारण यामध्ये दोघींच्या मनात सुरक्षेचा विचार होता. मुलांना सुद्धा बाहेर खेळायला जाताना आईची परवानगी काढावी लागते. आजही ही पद्धत प्रत्येक घरात आहे. मग आई वेळेत परत येणार असशील तरच खेळायला जायचे अशा विविध अटी घालून पाठवत असे. यामध्येही मुलगा बाहेर इतर कुठल्या अन्य संगतीत जाऊ नये याची काळजी असल्यानेच अशा अटी, वचने घेतली जातात.

राजेशाहीमध्ये तर शपथ, वचन याला खूप महत्त्व होते. एखाद्याला दिलेले वचन किंवा घेतलेली शपथ न मोडण्याची परंपरा होती. संन्यास घेतलेल्या राजाचे वारसदार कधीही राजगादीवर हक्क मागण्यासाठी जात नसत, तर राजगादी, राजसिहासन, राजवैभव हे त्यांच्याकडे चालून येत असे. तेंव्हाच ते खऱ्या अर्थाने स्वराज्य उभे राहात असे. ते सार्वभौम राजे होत असत. कारण कोणतेही वैभव हे तशी पात्रता असल्याशिवाय कधीच मिळत नसते. म्हणूनच म्हटले जाते भीक मागून कधी राजा होत नाही. राजा हा पराक्रमाने, कर्तृत्त्वाने ठरत असतो. त्याच्यातील गुणांनी तो घडत असतो. वारसा हक्क जरी असला, तरी तो वारसा हक्क चालून यायला हवा. भांडून अथवा भिक मागून मिळवलेला नसावा. तरच तो त्या सिंहासनावर बसण्यास पात्र ठरू शकतो. कारण तो त्या पदाची शपथ घेत असे व त्या नियमांचे पालन त्यांच्याकडून होत असते.

राज घराण्यात काम करणारे सेवकही त्या सिंहासनाची, राजाची शपथ घेत असत. सेवकांच्या पिढ्यान पिढ्या या शपथेचे पालन केले जात असे. अनेक सेवक राजाची, त्या राजगादीची सेवा करण्याची शपथ घेत असत अन् त्यांची पुढची पिढीही त्याचे पालन करत असे. हे दिलेले वचन तोडण्याचे धाडस त्यांच्या पुढच्या पिढीच्या वारसातही नव्हते. पिढ्यान पिढ्या ते त्या राजगादीचे सेवक म्हणूनच त्या राजघराण्यात काम करायचे. इतका विश्वास त्या राज घराण्यावर असायचा. अशा या वचन घेणाऱ्या, शपथा घेणाऱ्या सेवकांच्यामुळेच तर ही मोठी मोठी साम्राज्य घडली आहेत. कारण दिलेले वचन पाळणे, घेतलेली शपथ पाळणे तितके सोपे नसते. त्यासाठी मोठा त्याग करावा लागतो. या त्यागातूनच ही साम्राज्ये उभी राहीली आहेत हे मान्य करावेच लागते. तसे राज घराणेही या सेवकांची जाण ठेवत असत. त्यांच्या या योगदानाची योग्य ती दखल घेतली जात असे. त्यांचा योग्य तो मानसन्मान राखला जात असे. अशा या विश्वासाहर्तेच्या रचनेमुळेच मोठी मोठी साम्राज्ये उभी राहीली. विश्वास हा यात सर्वात महत्त्वाचा आहे. विश्वास संपला की ध चा मा व्हायला वेळ लागत नाही. विश्वासावरच हे सर्व व्यवहार अवलंबून आहेत.

साधना करतानाही विषय, वासनांपासून दूर राहाण्याची शपथ आपल्या अंतःकरणास घालायला हवी. साधनेत मन भरकटू देणार नाही असा दृढनिश्चय, दृढसंकल्प करायला हवा. म्हणजे मनाकडून त्याचे पालन होईल अन् मन साधनेत गुंतून राहील. यातून अंतःकरणातून साधना होईल. सद्गुरुंना असे वचन द्यायला हवे. सद्गुरुंना दिलेला शब्द मोडण्याचे धाडस साधक कधीही करू शकत नाही. वचनामुळे निश्चितच तो विषय, वासनापासून दूर राहू शकतो. असे झाल्यास साधनेत येणाऱ्या अडचणी आपोआपच दूर होतात. साधनेत मन रमेल अन् आत्मज्ञानप्राप्तीचा मार्ग सुकर होईल, असे आशिर्वचनही सद्गुरुंच्याकडून मिळेल. गुरुकृपेतूनच आत्मज्ञानाची प्राप्ती होईल. यासाठीच अंतःकरणासा घालायला हवी शपथ.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

समुद्र सर्वांत पवित्र तीर्थ…

जाणून घ्या, लसूण लागवडीबद्दल…

आळसंद ला सोमवारी पाचवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading