July 2, 2025
Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan addressing a national soybean cultivation strategy meeting in Indore, June 2025.
Home » संशोधन दिल्लीतून नाही तर शेतकरी बांधवांच्या शेतातून ठरवले जाईल – शिवराज सिंह चौहान
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

संशोधन दिल्लीतून नाही तर शेतकरी बांधवांच्या शेतातून ठरवले जाईल – शिवराज सिंह चौहान

सोयाबीनच्या चांगल्या पिकासाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत इंदूर येथे विचारमंथन

नवी दिल्‍ली – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह यांनी इंदूर येथे भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेत भारतीय कृषी संशोधन परिषदेचे वैज्ञानिक, शेतकरी, कृषी विद्यापीठांचे पदाधिकारी, कृषी विज्ञान केंद्रांचे (केव्हीके) तज्ञ, प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांचे वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय कृषी सचिव, आयसीएआरचे महासंचालक यांच्यासह केंद्र सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत आणि सोयाबीन उद्योगाच्या प्रतिनिधींसोबत सोयाबीनच्या उत्तम पिकासाठी व्यापक विचारमंथन केले.

सोयाबीन हितधारकांशी संवाद साधताना शिवराज सिंह म्हणाले की, खूप उपयुक्त चर्चा झाली आहे. हा  एक धार्मिक विधी नाही तर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ब्राझील, अमेरिकेत 10-15 हजार हजार हेक्टरची शेती असते, इथे आपल्याकडे बहुतेक शेतकऱ्यांकडे एक, दोन, पाच एकरची शेती आहे, त्यामुळे इथे शेती करणे कठीण आहे. शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शेतकरी हा त्याचा आत्मा आहे. मी कृषीमंत्री झाल्यापासून मला शेतीशिवाय दुसरे काहीही दिसत नाही. दिल्लीमध्ये आयसीएआरच्या संकुलात आम्ही दिवसभर बसून चांगले काम करण्याचा प्रयत्न करतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने ही कल्पना सुचली. जेव्हा नवीन बियाणांचे वाण जारी करण्याबाबत मी पंतप्रधानांशी बोललो तेव्हा ते म्हणाले की आपण  शेतात कार्यक्रम करू जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत संदेश पोहोचेल.

केंद्रीय मंत्री चौहान म्हणाले की, शेतीची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते वेगवेगळ्या दिशेने काम करत होते. आपल्याकडे 16 हजार वैज्ञानिक आहेत , आपल्याकडे प्रतिभा, क्षमता आणि बुद्धी आहे, मात्र ते प्रयोगशाळेत बसले आहेत. संशोधनाचा फायदा तर झाला आहे, पण शेतकरी शेतात बसून आहे. तो शेतात शेती करत आहे, प्रयोगशाळा आणि शेत यांची भेट होत नव्हती. अशा परिस्थितीत, माझ्या मनात आले की प्रयोगशाळेला शेतीशी जोडले पाहिजे.  एक कृषी पथक तयार करायचे, सर्वप्रथम शेतकरी, कृषी वैज्ञानिक, राज्य आणि केंद्र सरकारचे अधिकारी आणि संबंधित हितधारक हे एकत्रितपणे हे काम करतील तर चांगले परिणाम दिसून येतील. म्हणूनच विकसित कृषि संकल्प अभियानाचा प्रारंभ झाला ज्यात  2170 पथके गावागावांमध्ये गेली  आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. तिथे कोणतीही रॅली किंवा सभा नव्हती, त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या. शेतकऱ्यांनी 300  हून अधिक नवोन्मेष  केले आहेत, वैज्ञानिक त्यांच्याकडून शिकले. उदा. लिचीचे आयुष्य वाढवण्यासाठी त्यावर ग्लुकोजच्या द्रावणाने लेप करणे यासारख्या अनेक गोष्टी वैज्ञानिक शिकले.

शिवराज सिंह म्हणले की ज्या गोष्टी  आवश्यक आहेत, त्यावर संशोधन झाले पाहिजे. आता, संशोधन दिल्लीतून नाही तर शेतकरी बांधवांच्या शेतातून ठरवले जाईल. दरम्यान, सुधारित बियाण्यांची समस्या समोर आली, बियाणे कसे ओळखायचे. खाजगी कंपनीकडून खरेदी केले, पेरले, ते खराब निघाले. आता कारवाई झाली तरी काय अर्थ आहे? म्हणूनच शेतकऱ्यांच्या समस्या पाहून आता संशोधन केले जाईल. निर्माण झालेल्या समस्यांवर वैज्ञानिक  उपाय सुचवतील. अधिकारी ते उपाय शेतकऱ्यांना समजावून सांगतील. आपण एक राष्ट्र-एक शेती-एक टीम  या मंत्राने पुढे जाऊ. ते म्हणाले की, आज अशा प्रकारच्या बियाण्यांबद्दल चर्चा होत आहे जी दुष्काळात आणि जास्त पाऊस पडला तरी तग धरू शकतात. येलो मोजाइक दोन दिवसांमध्ये पिकाची नासाडी करते. आता आपण  जीनोम एडिटिंग पद्धतीचा अवलंब करू.

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, निकृष्ट दर्जाची कीटकनाशके आणि खतांबद्दलचे  एक प्रकरण समोर आले आहे. त्यांनी आश्वासन दिले की निकृष्ट दर्जाची बियाणी आणि कीटकनाशके तयार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांना योग्य बियाणे आणि खते ओळखता यावीत, यासाठी उपकरणेही तयार करावी लागतील.

शिवराज सिंह म्हणाले की, आपल्याला सोयाबीनचे उत्पादन वाढवावे लागेल. ही योजना जशी सुरू आहे तशी चालेल, पण शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आम्ही या योजनेत बदल करू. ते म्हणाले की, सोयाबीनमध्ये सर्वाधिक प्रथिने असतात, तेलाचे प्रमाण केवळ 18% असते, ते आपण वापरू शकत नाही. सोयाबीनपासून वेगवेगळी उत्पादने कशी बनवता येतील यावर आपण काम करू, यामुळे त्याचे मूल्य देखील वाढेल. शिवराज सिंह म्हणाले की, भारत सरकार शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही, आमच्या शेतकऱ्यांचे हित आमच्यासाठी सर्वप्रथम आहे.

शिवराज सिंह म्हणाले की, आपण 1,33,000 कोटी रुपयांचे तेल आयात करत आहोत आणि काही लोक येथील सोयाबीनचे क्षेत्र बदलण्याचा विचार करत आहेत. आम्ही असे धोरण बनवू की उत्पादन वाढेल आणि योग्य भाव मिळेल, खरेदी पद्धती देखील अशा असतील की आम्हाला शेतकऱ्यांकडून योग्यरित्या खरेदी करता येईल. ते म्हणाले की शेतकऱ्यांची सेवा म्हणजे देवाची पूजा आहे. मोदी यांची दूरदृष्टी आमच्यासाठी वरदान आहे. आज जे मुद्दे समोर आले आहेत, त्यावर आम्ही काम करू. आम्ही जगातील पद्धतींचा देखील अभ्यास करू. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. आपण एक रोडमॅप बनवू आणि लक्ष्य निश्चित करून काम करू.

शेतीची स्थिती आणि शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी लवकरच एक रोडमॅप सादर केला जाईल. शिवराज सिंह म्हणाले की, आम्ही निर्णय घेतला आहे की केव्हीकेचे शास्त्रज्ञ आठवड्यातून 3 दिवस शेतकऱ्यांबरोबर राहतील, मी आठवड्यातून 2 दिवस शेतकऱ्यांबरोबर राहीन, त्याशिवाय तुम्हाला सर्व गोष्टी समजणार नाहीत. मीही शेतात आहे, तुम्हीही शेतात आहात, शास्त्रज्ञही शेतात आहेत आणि आता उद्योगातील लोकांनीही शेतात यावे. यावेळी आपण पिकावर लक्ष ठेवूया. रोगांवर लक्ष ठेवूया. या वर्षी आपण बियाणे नियोजन बनायला हवे. आपण सोयाबीनपासून सुरुवात केली आहे, पुढचे लक्ष्य कापूस आहे, त्यानंतर ऊस आणि डाळी आहेत.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading