July 21, 2024
What is a village sadhu of a non-devotee
Home » अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय ।
मुक्त संवाद

अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय ।

अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय ।
व्याघ्रवाडा गाय सापडली ॥ १ ॥
कसबाचे आळे मांडिले प्रमाण ।
बस्वण्णाची आण तया काई ॥ २ ॥
केळी आणि बोरे वसती शेजारी ।
संवाद कोणे परी घडे तेथे ॥ ३ ॥
तुका म्हणे खीर केली कान्हेळ्याची ।
शुद्ध गोडी कैची वसे तिथे ॥४॥

तुकारामांनी दुष्टांबद्दलचा सात्विक संताप आणि त्यांच्या सोंगी – ढोंगीपणाबद्दलचा तिटकारा अनेक अभंगांतून मांडला. अभक्त ब्राह्मण, गोसावी, ढोंगी साधू या सर्वांवर आपल्या अभंगातून हल्ला चढविला. त्यातून त्यांची परखड समाज सुधारकाची भूमिका स्पष्ट होते. तुकारामांनी दुर्जनाचे वर्तन अनेक अभंगांमधून केले. तरीही दुर्जनांच्या दुष्ट कारवाया आणि त्यामुळे त्यांना झालेल्या मनःस्तापामुळे काही काळ दुर्बळ मन व्यथित हृदय आणि एकाकी भावना त्यांना सोसावी लागलीच. दुष्टांच्या कोंडाळ्यात राहिल्यावर सज्जन संताची काय स्थिती होणार ? याचा अनुभव तुकारामांनी घेतला होता. कुटिल कारवायांचा त्रास सोसला होता.

तुकारामांची समाजप्रियता, प्रबोधनातून व मार्गदर्शनामुळे त्यांच्याकडे आकृष्ट होणाऱ्यांच्या लोकांची संख्या वाढत निघालेली पाहून उच्चवर्णीय धर्ममार्तंडांची अंगाची लाही लाही होऊ लागलेली. त्यामुळे ते अधिकच आक्रस्ताळे बनलेले आणि चवताळलेले. मग तुकारामांचा छळ करण्यासाठी, नवनवीन प्रकार व पद्धतीने त्रस्त करण्याच्यादृष्टीने ती मंडळी डावपेच रचत. तुकाराम अध्यात्म चिंतन, भक्तित्व आणि तात्त्विक मूल्यांची शिकवण देत. तेच तर या दुर्जनांना खटकणारे. त्यामुळे विशिष्ट वर्णीयांचा दोष पत्करून आणि क्लेष सोसूनही त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले.

दुष्टांचे वर्णन करणारे अनेक अभंग तुकारामांनी सांगितले. कारण दुष्ट दुर्जनांची प्रवृत्ती, कारवाया, समाजाचा बुद्धिभेद करून स्वार्थ साधण्याचा कुटिल, हीन लेखून सामान्यांमध्ये न्यूनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न आणि धर्माच्या नावाखाली शोषण अशासारखी भोळ्या- भाबड्या अडाणी समाजाची स्थिती स्पष्टपणे मांडण्याची गरज तुकारामांनी चाणाक्षपणे ओळखली. म्हणूनच त्यांनी ‘स्वत:ला’ समोर ठेवून जणू समाजाचे प्रतिनिधित्व केले असावे असे वाटते.

या अभंगात तुकाराम म्हणतात अभक्ताच्या गावात साधू म्हणजे काय ? व्याघ्रवाड्यात सापडलेल्या गाईसारखी स्थिती होणार. (आक्रस्ताळ्यांच्या कोंडाळ्यात सापडलेल्या शांत चित्तीचे काय ? ) कसाब वृत्तीने क्रूर आणि कसेही करून कापणे हाच धंदा करणारे. कसाबाच्या आळीमध्ये खऱ्याखोट्याचा निवाडा चालला असताना बैलाची शपथ घेतली तर तिचे महत्त्व काय असणार ? ( अपप्रवृत्ती व दुष्ट नीतीच्या माणसांच्या घोळक्यात अडकलेल्या एखाद्या सज्जनाचे काय हाल? दुष्टांची, दैत्याची शपथ घेऊन काय साधणार?) केळी आणि बोरी शेजारी राहात असतील, त्या दोघींमध्ये कोणत्या पद्धतीने संवाद घडणार ? (जसा सज्जन व दुर्जनामध्ये कसा संवाद होणार) कोहळ्याची खीर केली तर तिच्यात शुद्ध गोडी कशी असणार ? ( कारल्याच्या भाजीला गोड चव कशी येणार?) जलचरांनी काय केलेले असते तेव्हा कोळी त्यांचा घात करतो? (दुर्जनाकडून निरपराध भोळ्या भाबड्या भाविकांना कर्मकांडाच्या, अर्धाच्या शब्द शस्त्रांचा मारा होणार )

या उदाहरणांवरून तुकाराम काय निदर्शनास आणू इच्छितात ? तर मूळ स्वभाव, उपजत वृत्ती रोखता न येण्यातून होणाऱ्या परिणामांचा विचार मांडतात. ही तर उपजत्व विरोधतत्व व विरुद्ध वृत्ती होय. निरपराध श्वापदाला पारधी मारतो. तसेच क्रूरकर्मी दुष्ट वृत्तीची माणसे संतांना पीडा, क्लेष देत राहतात. एक वेळ वज्र भंगेल, पण दुष्ट निवळणार नाही असे एका अभंगात म्हणतात. तसेच दुसऱ्या काही काव्यपंक्तीत ते म्हणतात दुर्जनरूपी कुत्रे संतांना छळण्यासाठी उणे पाहात असते. जमा पाहात नाही. घात व्हावा अशा गोष्टी करणाऱ्यांना संतांच्या म्हणण्यातील क्षुल्लक दोषही छळासाठी पुरेसे ठरतात. सर्प आपल्याला दोषी ठरवत नाही. पण दंश करतो त्याला मृत्यूला कवटाळावे लागते. विंचू स्वतःच्या नांगीत विष आहे हे मान्य करीत नाही. पण नांगी हाणतो, त्यालाच वेदना सहन कराव्या लागतात.

तुकारामांनी दुर्जनाच्या छळवादी वृत्तीची उदाहरणे देऊन त्यांच्याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात असलेले समज दूर करण्याचा प्रयत्न केला. शब्दात उपरोधिकणा, कडवटपणा, आणि तीव्र चीड न आणता व्यवहारातील उदाहरणे देत सामान्य माणसांना समजेल अशा भाषेत त्यांनी पंडित मंडळींच्या कानपिचक्या घेतल्या. मात्र ते करताना त्यांचे शब्द व उपमा या दुर्जनाचे वर्तन व त्यामुळे होणाऱ्या छळास त्या तंतोतंत लागू पडणाऱ्या आहेत. खऱ्याखोट्याची निवड करताना बैलाची शपथ घेणाऱ्या कसायाचे त्यांनी दिलेले उदाहरण, स्वतः त्यांच्यावरील खटल्यात झालेला निवाडा किती खरा आणि किती खोटा असेल तर सांगून जातो. सज्जनांचे आणि दुर्जनांचे एका गावातील राहणे केळी आणि बोरीच्या शेजारधर्माप्रमाणे सज्जनाचा घात करणारे ठरते, हे त्यांनी स्वानुभवावरूनच सांगितले आहे.

सज्जन व दुर्जनातील विचार भिन्नता, वर्तनभेद ही स्थिती इतिहासातील अनेक उदाहरणांवरून लक्षात येते. पौराणिक कथामध्येही सज्जन-दुर्जनांचा लढा आढळून येते. खरे तर ही सत्य-असत्याची लढाईच चालू असते. रामायण, महाभारत तर सज्जन – दुर्जन, सत्-असत्, इष्ट-अनिष्ट, प्रकृती – विकृती यांच्यामधील युद्ध होय. पांडव – कौरव, राम-रावण ही त्याचीच उदाहरणे नव्हेत काय ? आजच्या काळातही दहशतवादी, अतिरेकी यांच्या कारवाया व त्यातून होणाऱ्या निरपराध्यांची जीवित व वित्त हानी हे त्यातच मोडणारे आहेत. एवढेच काय, पण शेजारधर्म पाळणारे व न पाळणारे यांच्यातील धुसफूस, मत्सर व वैर हे सुद्धा मानसिक छळ करणारे व प्रसंगी लाठी-काठी, चाकू-तलवारीच्या मार्गाने आपल्या विकृतीस वाट करून देण्याच्याही घटना घडताना दिसतात.

वैयक्तिकतेपासून वैश्विकतेपर्यंत दुर्जन – सज्जनामधील लढा अथवा छुप्या तऱ्हेने संघर्ष – स्थिती ही आजच्या काळातही जाणवणारी आहे. अन्याय शोषण व छळ जो दुर्जनांकडून केला जातो त्यामुळे येणारी मानसिक अस्वस्थता, छळ आणि नैराश्य यावर मात करणेच आवश्यक आहे. कारण त्यातून मार्गक्रमणा, उद्दिष्टपूर्तता साध्य होऊ शकते. त्यासाठी सहनशीलता, चिकाटी, धारिष्ट्य आणि प्रामुख्याने आशावाद हवा. शिवाय सज्जन वा सामान्यांचे वर्तन नैतिक, पारदर्शक, समाजाभिमुख असायला हवी. हीच तर तुकारामांची ताकद असल्याने ते धर्मसुधारक, समाजसुधारक, सामाजिक व सांस्कृतिक अन्यायाच्या विरोधात दंड थोपटणारा एक आव्हानवीर योद्धा ठरले.

डॉ. लीला पाटील,
कोल्हापूर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

पाऊस

प्रेमात सन्मानाची अपेक्षा कशाला ?

ट्रायच्या नावाने फसवणूक

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading