November 22, 2024
Home » संचारबंदीतील काजूदराचे आंदोलन; शेतकऱ्यांचा वाढला आत्मविश्वास
काय चाललयं अवतीभवती

संचारबंदीतील काजूदराचे आंदोलन; शेतकऱ्यांचा वाढला आत्मविश्वास

धर्मप्रसार हे पोर्तुगीजांचे एक ध्येय होते. त्या कामासाठी ते गोव्याच्या बाहेरही फिरले. गोव्याच्या सीमेवर असलेला चंदगड-आजरा तालुक्यात यासंदर्भात अनेक पुरावे सापडतात. या प्रदेशाला पोर्तुगीजांनी नव्या  धर्मासह अनेक वनस्पती आणि पिकांची ओळख करून दिली. भात आणि आंब्याच्या अनेक जाती पोर्तुगीजांनी येथे आणल्या.

नंदकुमार मोरे, मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ।
EMAIL : NANDKUMARVMORE@GMAIL.COM । ९४२२६२८३००

भारताच्या भूमीवर कालिकत बंदरात सन १४९८ ला वास्को दि गामा उतरले आणि इतिहासाला नवी कलाटणी मिळाली. आधुनिक भारताच्या स्थित्यंतराची सुरुवात म्हणून या घटनेकडे पाहिले जाते. पुढे गोव्यात पोर्तुगीजांची सत्ता प्रस्तापित झाली. तेथील जनजीवनात त्यांनी अमूलाग्र बदल केले. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक बदलांपासून कृषी ते खाद्यसंस्कृतीपर्यंत पोर्तुगीजांचा प्रभाव या प्रदेशावर पडला. त्यांनी सुरू केलेल्या धर्मांतराच्या चळवळीने येथील जनजीवन ढवळून निघाले. लोक जमिनजुमला सोडून परागंदा झाले. अनेकांनी धर्मांतर केले. ज्यांना धर्मांतर करणे जमले नाही, ते गोव्यातून बाहेर पडले. पोर्तुगीजांच्या सीमेबाहेर जाऊन स्थिरावले. हा काळ गोव्याच्या इतिहासात ‘इन्क्विझिशन पिरेड’ म्हणून ओळखला जातो.

धर्मप्रसार हे पोर्तुगीजांचे एक ध्येय होते. त्या कामासाठी ते गोव्याच्या बाहेरही फिरले. गोव्याच्या सीमेवर असलेला चंदगड-आजरा तालुक्यात यासंदर्भात अनेक पुरावे सापडतात. या प्रदेशाला पोर्तुगीजांनी नव्या  धर्मासह अनेक वनस्पती आणि पिकांची ओळख करून दिली. भात आणि आंब्याच्या अनेक जाती पोर्तुगीजांनी येथे आणल्या. शिवाय अननस, पपई, काजू, बटाटे आणि रताळी ही या परिसर आज मोठ्या प्रमाणात घेतली जाणारी पिके पोर्तुगीजांचीच देण आहे. 
महाराष्ट्राच्या एका टोकाला गोवा-कोकणच्या घाटमाथ्यांवर चंदगड तालुका वसलेला आहे. गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमा या तालुक्याला लाभलेल्या आहेत. येथील सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि दाट जंगले पावसासाठी पोषक आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेले आंबोली येथून अवघ्या तीस किमी अंतरावर आहे. त्यामुळे गोवा आणि कोकणातून घाटमाथ्यावर सरकलेला पाऊस या परिसरात अक्षरश: कोसळतो.

पावसाळ्यात येथील ताम्रपर्णी आणि घटप्रभा नद्या येथील जमिनीचा लाल रंग घेऊन दुथडी भरून वाहतात. जांभ्या खडकापासून बनलेली येथील जमीन या पावसाने अक्षरश: वाहून जाते. डोंगरांवरच्या नाना जातीच्या वनस्पतीच या प्रदेशाच्या खऱ्या संरक्षक आहेत. परंतु, जंगले साफ करून नवी शेतजमीन तयार करण्याच्या प्रक्रियेत जमिनीची प्रचंड धूप सुरू झाली. झाडांच्या मूळांनी पकडलेली माती सैल पडली. ती थेट आढ्याओहोळातून नदीत मिसळू लागली.

चंदगडचे काजू हे मुख्य पीक 

अशात डोंगरच खाली उतरू नयेत म्हणून पोर्तुगीजांनी डोंगररांगांवर काजू लागवड करण्याचे ज्ञान दिले. कमी उंचीची, शेतीपुरक काजूची झाडे जमिनीची धूप थोपवण्यासाठी महत्त्वाची ठरली. पुढे महाराष्ट्र सरकारनेही या पिकाला उत्तेजन दिले. शेतीचे नवीन प्लॉट बसवणे आणि नव्याने तयार केलेल्या भुसभुशीत बांधांवर काजू लावणे हा येथील शिरस्ताच पडून गेला. सरकारने अनेक पद्धतीची अनुदाने देऊन येथील काजू पीक वाढवले. त्यामुळेच देशात महाराष्ट्र हा काजू उत्पादनात अव्वल झाला आणि महाराष्ट्रात चंदगडचे ते मुख्य पीक बनले.

वाढत्या मागणीने पिकाला व्यावसायिक रूप 

आज चंदगड, आजरा, गडहिंग्लज आणि तळकोकणात काजू हे हमखास उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून ओळखले जाते. येथील जांभ्या खडकापासून बनलेली जमीन काजू, आंबा पिकांसाठी पोषक आहे. या प्रदेशातील सत्तर टक्केहून जास्त जमीन अशी जांभ्या खडकापासून बनलेली असल्याने ती या पिकांच्या वाढीचे कारण ठरली. काजूची झाडे प्रारंभी जमिनीची संरक्षक म्हणून काम करत असली तरी, हळूहळू काजूला वाढलेल्या मागणीने या पिकाला व्यावसायिक रूप दिले. या गोष्टीला नव्वद नंतरचे बदलले समाजजीवन कारणीभूत ठरले.
नव्वदनंतर आकाराला आलेला नवमध्यमवर्ग काजूकडे सुकामेवा (ड्रायफ्रूट) म्हणून पाहू लागला. काजू जीवनावश्यक गोष्ट नसली तरी खाणे प्रतिष्ठित मानले जाऊ लागले. ती चैनीच्या वस्तूत समाविष्ठ झाली. त्यातच चंदगड परिसरातील काजूगर हे इतर प्रदेशातील काजूपेक्षा चवीला रुचकर असल्याने या प्रदेशातील काजूगरांना प्रंचड मागणी वाढली. इतर ठिकाणची काजूही चंदगडच्या नावावर खपू लागली.एकूणच आता काजूचे झाड येथील शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष बनला आहे. कारण या झाडापासून मिळणारी कोणतीच गोष्ट वाया जात नाही.

काजूपासून विविध उत्पादने

काजूच्या पानापासून टॅनिन खत तयार होते. सालीपासून रंग व शाई तयार करता येते. शिवाय उत्तम दर्जाचा डिंक काजूच्या झाडातून मिळतो. खोडापासून मिळणारे लाकूड बोटीच्या बांधणीत कामी येते. टरफलापासून उत्तम दर्जाचे वंगनासाठीचे तेल तयार होते. त्याचा उपयोग उद्योगक्षेत्राबरोबर बोटीना व मच्छिमारांच्या जाळ्याना लावण्यासाठी होतो. काजू गरावरील सालीपासून टॅनिन, बूट पॉलिश, कोंबडी खाद्य तयार होते. तर काजूच्या बोंडापासून अनेक पदार्थ तयार करता येतात. त्यावर प्रक्रीया करून  सरबत, व्हिनेगार, वाईन, फेणी, जाम इत्यादी पदार्थ मिळू लागले आहेत.

परिसरात शंभर काजू प्रक्रिया उद्योग 

या परिसरातील काजू बोंडाचे उत्पादन सुमारे १००० मे. टनाहून जास्त आहे. सध्या ही बोंडे गोव्याला जातात. तर काजूचे गर अनेक पदार्थांसाठी वापरले जाऊ लागले आहेत. वाढती हॉटेल्स, मिठाईची दुकाने या पिकाच्या वाढीला कारणीभूत ठरली. काजूचे गर सुक्यामेव्यापासून अनेक पदार्थासांठी वापरले जातात. जेवणात काजूची पेस्ट बनवण्यापासून मिठाई, मोदक, बर्फी, चॉकलेट, लाडू, विविध चवीचे मसाला काजू, फ्राय काजू असे पदार्थ तयार करता येतात. काजू गर सद्य: सुका मेवा म्हणून वापरला जातो. त्यामुळे या परिसरात काजू उद्योग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जवळपास शंभर काजू प्रक्रिया उद्योग असून हजारो लोकांना रोजगार या व्यवसायातून मिळाला आहे.

व्यापाऱ्यांनी रचला कोंडीत पकडण्याचा डाव

चंदगड, आजरा परिसरातील काजूचा व्यवसाय सुमारे रु. ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यापैकी जवळपास रु. पन्नास ते साठ कोटीचे काजू बी उत्पादन होते. मंगलोर, गोवा, कोकण येथील व्यापारी चंदगडचा काजू खरेदी करतात. साधारणत: मार्च ते मे हे तीन महिने काजूचे पीक असते. या दिवसात काजूच्या बागेची साफसाफाई करून अनेक लोक बागेतच राहायला जातात. नेमक्या याच काळात यावर्षी महामारीच्या रोगाची साथ आली. मार्च अखेरीला देशात संचारबंदी लागली. या संचारबंदीत अनेक पातळीवरच्या उलथापालथी घडल्या.  परंतु, जीवन थांबलेले नव्हते. उद्योगधंदे, व्यापार उलाढाल थंड पडली. शहरांमधील उद्योगव्यापाराला ब्रेक लागला. त्यामुळे शहरातील श्रमजीवी वर्ग धास्तावला. आता सर्वच संपल्याच्या समजूतीतून आपले गाव जवळ करू लागला. या काळात शेतकरी मात्र आपले शेत पिकवत होता. तो थांबू शकत नव्हता कारण त्याचे पीक शेतात उभे होते. ते सांभाळणे त्याला कर्मप्राप्त होते. परंतु, त्याने पिकवलेल्या शेतीमालाची बाजारात ठप्प झाल्याने तो पुरता हवालदिल झाला. त्याला आपला माल शहरात पोहोचवणे खडतर बनले. दलात आणि व्यापाऱ्यांनी हीच संधी साधून त्याला कोंडीत पकडण्याचे सापळे रचले. असा सापळा काजू पिकाबाबतही रचला गेला. 

संचारबंदीने काजू बागायतदार संकटात

देशात संचारबंदी लागू झाली तेव्हा हे पीक हाताशी यायला सुरुवात झाली होती. मार्च ते मे हा काजूचा मौसम. या दिवसात काजू पिकते. या परिसरात चारी दिशांनी काजूच्या मोहोराचा दरवळ घुमत असतो. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी काजू विकून शेतकरी पावसाळ्याची बेजमी करतो. घरी होऊ घातलेले लग्नादी कार्यक्रम, मुलांच्या शिक्षणाची फी, या दरम्यान होऊ घातलेल्या यात्रा, जत्रा सारी खर्चाची गणिते काजूच्या उत्पन्नावर घातली जातात. यावर्षीही ऐन महामारीच्या काळात हे पीक हाताशी येत होते. इतर पिके चांगली येऊनही बाजारपेठ बंदीमुळे हातातून गेली होती. विशेषत: चंदगडला मोठ्या प्रमाणात पिकणारी मिरची बाजारात पोहोचू न शकल्याने शेतात कूजून गेली. भाज्यांची स्थितीही यापेक्षा वेगळी नव्हती. त्यामुळे शेतकरी हतबल झाला होता. अशा काळात काजूचे पीक हाच एक आशेचा किरण होता. हे पिक व्यापारी वर्गाला कोट्यावधी रुपये नफा मिळवून देणारे. महामारीचा गैरफायदा घेऊन यावर्षी हा नफा अधिक करण्याची संधीच चालून आली. त्यामुळे सापळा रचून शेतकऱ्याला लूटण्याला डाव रचला गेला आणि काजू बागायतदार पुरता संकटात सापडला. 

शेतकऱ्यांंचे आतोनात नुकसान 

चंदगडचा भाजीपाला थेट राज्याची सीमा ओलांडून बेळगावात जातो.  महामारीमुळे तालुक्याबंदी, जिल्हाबंदी, राज्यबंदी अशा कचाट्यात सीमावर्ती प्रदेशातील शेतकऱ्यांचे खूप हाल झाले. बेळगाव ही सर्वात जवळची बाजारपेठ संचारबंदीत बंद केली गेली. त्यामुळे कोणताच माल बाजारात पोहोचवणे अशक्य झाले. त्यामुळे शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झाले. कोट्यावधी रुपयांची मिरची आणि इतर भाजीपाला शेतात कुजून गेला. दुधाचे नुकसान सुरूच होते. अशातच काजू व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना कोंडीत पकडले. संचारबंदीचा फायदा घेत गेल्यावर्षीच्या तुलनेत केवळ तीस टक्के दराने काजू खरेदी सुरू केली. काजूचा पडलेला दर बघून शेतकरी भांबावला. त्याचे वर्षभराचे गणित बिघडले. त्याला स्वत:ची लूट डोळ्यासमोर दिसू लागली.

व्यापाऱ्यांचा डाव उधळून लावला 

अशा वेळी सतर्कतेने संचारबंदी असतानाही एक आंदोलन उभे राहिले. चंदगडच्या तरुण शेतकरी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे व्यापाऱ्यांचा डाव उधळून लावला गेला आणि मोठा अनर्थ टळला.  संचारबंदीतच दरवर्षीप्रमाणे काजू खरेदीसाठी व्यापाऱ्याकडून गावोगावी वजनकाटे लावले गेले. परंतु, संचारबंदीचा फायदा घेत त्यांनी जाणीवपूर्वक पाडलेला दर शेतकऱ्यांच्या लक्षात आला. शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आली. मागील वर्षी दिडशे रुपये प्रती किलोने विकलेली काजू बी एकदम पन्नास रुपयांच्या आत व्यापारी मागू लागले. हलकर्णी-करंजगाव गावात केवळ सत्तेचाळीस रुपये प्रती किलो दराने काजू विकत घेतली जात असल्याचा पहिला फोन करंजगाव येथील परसू गावडे यांनी बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष नितीन पाटील यांना केला. संपर्क करून वस्तूस्थिती सांगितली. या फोननंतर सदर दर हे षड्‌यंत्र असल्याचे लक्षात येतात नितीन पाटलांनी काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेण्याचा कार्यक्रम हाती घेतला. संचारबंदीतही अनेक शेतकऱ्यांशी चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवली.

योग्यदर न मिळेपर्यंत काजू बी न विकण्याचा निर्णय

मागील वर्षीच्या तुलनेत केवळ तीस टक्के दर बघून उत्पादक चिंतेत पडले होते. संचारबंदीत परस्परांना भेटता येत नव्हते. परंतु, फोनाफोनी सुरू झाली. पडलेल्या दराची बातमी सोशल मिडियावरून व्हायरल झाली. दरम्यान बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील यांनी लोकांना धीर देणारा आणि काजू बी न विकण्याची विनंती करणारा पहिला दीर्घ संदेश फेसबुकवर लिहिला. त्यामध्ये त्यांनी चालू वर्षी काजू उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगले असून योग्य दर मिळेपर्यंत काजू बी विकू नये असे आवाहन केले.            

मांडले पिकांचे शास्त्रीय गणित

नितीन पाटील यांनी आपल्या आवाहनपर संदेशात या पिकाचे शास्त्रीय गणितच मांडले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दराबाबतचे भान आले. त्यांनी लिहिलेल्या संदेशात म्हटले, ‘शेतमालाचा दर हा कधीच संघर्ष केल्याशिवाय मिळत नाही, हे आपण दरवर्षी ऊस दराच्या आंदोलनात अनुभवतो. काजू उत्पादक शेतकरी म्हणून आपण काजू बागेची राखण करणे, ती कष्टाने जमा करणे, बागेची स्वच्छता ठेवणे, नवीन रोपे लागवड करणे, त्याची जोपासना करणे, आधुनिक शेतीतंत्रानुसार ठिबक सिंचनावर लागवड करणे,  काजू बागेवर फवारणी करणे इत्यादी कामे करत आहोत. काजू पीक म्हणजे आयते पीक असा एक चुकीचा समज शेती न करणाऱ्या वर्गाने सगळीकडे पसरवला आहे. त्यामुळे तुम्हाआम्हालाही कधीकधी तसेच वाटत राहते. पण इतर पीकामधली लागवड किंवा पेरणी वगळता काजूसाठी घेतले जाणारे कष्ट थोडे अधिकच आहेत. काजूच्या झाडाखाली इतर कोणतेही पीक येत नाही. त्यामुळे पिकाऊ जमीन अडकून राहते. जानेवारी ते जून असे तब्बल सहा महिने आपण या पीकासाठी कष्ट घेत असतो. दोन ते तीन वेळा संपूर्ण काजू बाग बेंदावी (स्वच्छ करावी) लागते. उन्हाच्या दिवसांमुळे बागेत खोपीचा निवारा उभा करावा लागतो. तीन महिने डोळ्यात तेल घालून राखण करावी लागते. वेचणीचे काम चालू असो वा नसो एक दोन माणसे राखणीसाठी सतत काजू बागेत मुक्कामालाच ठेवावी लागतात. काजू वेचणीसाठी घरातील लहानथोरांसकट सर्वच लोक या कामात गुंतून पडतात. प्रसंगी मजुरीची माणसे घ्यावी लागतात. काट्याकुट्यात हात घालताना जखमा होतात. बागेत साप, विंचू अशा सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका असतो.

किलोमागे ४० रुपये खर्च

एक काजू मुर्टा (काजूचे बोंड) वेचण्यासाठी एकदा वाकावे लागते. त्यामुळे काजू वेचणाऱ्याच्या पाठीचा मणका ढिला होतो. काजूची बी मुर्ट्यापासून वेगळी करावी लागते. ते काम दमवणारे असते. त्यामुळे प्रत्येक काजूला दोनवेळा हात लावल्याशिवाय ती पोत्यात जाऊन पडत नाही. एक माणूस दिवसाला जास्तीत जास्त दहा किलो काजू वेचून, बोंडापासून अलग करून जमा करु शकतो. त्यामुळे मजूराची २०० रुपये हजेरी असेल तर ती दहा किलोच्या मिळणाऱ्या पैशातून वजा करावी लागते. त्यामुळे एक क्विंटल काजूला २००० रु. खर्च फक्त वेचण्याचा आहे. काजू घरी नेणे, स्वच्छ धुवून पुन्हा वाळवणे, पोत्यात भरणे व पुन्हा विक्रीसाठी बाजारात नेणे या कामांकरीता क्विंटलमागे सरासरी १००० रु. खर्च येतो. शिवाय स्वच्छता आणि  राखण याचा  किमान खर्च १००० रु. येतोच. त्यामुळे क्विंटलमागे ४००० रु. असा ढोबळ उत्पादन खर्च काजूला आहेच आहे . त्यामुळे किलोमागे किमान ४० रु. खर्च येणाऱ्या काजूचा दर आपण किती ठरवायचा याचा अभ्यास आत्ता सर्व शेतकरीपुत्र मिळून करुया.

विशेष तयारीत आंदोलन

लहान मुले, वयोवृद्ध माणसे यांचा उपयोग काजूच्या शेतात होत असल्याने आपण कधीच या पिकाचा उत्पादन खर्च हिशोबात घेतलेला नाही. तसेच आपण शेतकरी म्हणून आपल्या आयुष्याचा जमाखर्च कधी मांडत नाही आणि स्वतःचीच फसवणूक करुन घेतो. या गोष्टीचा उहापोह होत राहील पण या हंगामात दर मिळवायचा असेल तर थोड्या विशेष तयारीने आपल्याला उतरावे लागेल.

तज्ज्ञांशी चर्चा करुन मांडलेले काही मुद्दे

या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करुन काही मुद्दे मांडत आहे. त्यानुसार आपण सर्वांनी काजू जमा करुयात.
१. काजू बी ही फक्त पडलेली वेचावी. झाड हलवून किंवा काठीने काढणे, मुर्टा (काजूचे बोंड) न पिकलेली  काजू काढणे हे चुकीचे आहे. मुर्टा पिकून झाडावरून गळुन पडला की तयार होणारी काजू बी ही टिकाऊ आणि प्रकियेला योग्य ठरते. अशा काजूची गुणवत्ता चांगली असते.
२. काजू वेचून घरी आणल्यानंतर पाणी भरलेल्या बॅरेलमध्ये, काहीलीत अथवा मोठ्या बुट्टीत ओतावी. पाण्यावर तरंगणारी काजू बाजुला काढावी. त्यात बऱ्याच चोप्या,  गर नसलेल्या, सडलेल्या काजू बाजूला येतात.  ही काजू परत सुकवून वेगळी भरुन ठेवावी. काजू गर नसलेली चोपी काजू टरफलापासुन तेल काढणारे कारखानदार ही थेट खरेदी करतात. राहीलेली तळाची काजू स्वच्छ धुवावी.
३. ही काजू सलग दोन दिवस वाळवावी. आकारानुसार लहान आणि मोठी अशी दोन नमुन्यात वर्गवारी करावी . मोठ्या बागायतदारांनी तीन नमुने केल्यास अधिक योग्य ठरेल आणि मग पोती भरुन शिवून थप्पी मारुन ठेवावी. या प्रकारे साठवलेल्या काजूला किड लागणार नाही. तिचे वजन कमी होणार नाही किंवा इतर कारणामुळे वर्षभर खराब होणार नाही. 
४. मागणी पुरवठा तत्वानुसार बाजारात आपल्या मालाचा दर ठरतो हे सर्वांनाच माहीती आहे. त्यामुळे व्यापारी आत्ता मे महिन्यात येणारा भरमसाठ माल पडेल तितक्या कमी दराने घेण्याच्या मानसिकतेत असतो. आपल्याला यंदा याच तत्वाला छेद द्यायचा आहे.  त्यामुळे आपण जर या पद्धतीने काजू साठवली तर ज्यावेळी आपल्या काजूला अधिक मागणी येईल त्याचवेळी आपण ती चांगल्या दराने विकूया.

पाटलांना संदेश व्हायरल

चंदगड व आजरा  तालुक्यातील काजू ही  शंभर टक्के सेंद्रिय आणि नैसर्गिक आहे. ‘चंदगडी काजू’ या नावावर ती बाजारात अधिक दराने खपवली जाते. परदेशातील बेचव आयात काजूपेक्षा अनेक प्रकारे ‘चंदगडी काजू’ दर्जेदार आणि स्वादिष्ट आहे. फक्त या सगळ्याचा फायदा प्रत्यक्ष काजू उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोचलेला नाही. तो यंदा आपण सर्वांनी मिळून करुन घ्यायचा आहे. महामारीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ते भरुन काढण्याची आपल्याला संधी आहे. सर्व काजू बागायतदार शेतकऱ्यांना या पोस्टद्वारे ही विनंती करतो की, समाधानकारक दर मिळवल्याशिवाय आपण काजू विक्री करु नये. सर्व लहानमोठ्या शेतकऱ्यांना आपण विनंती करुया की कोणत्याही बाजारात अथवा कारखान्यात काजू विक्रीला आणू नका. प्रसंगी पावसाळ्यात सुद्धा काजू साठवून ठेवण्याची तयारी करुया. दर आपलाच आहे.’ हा पाटलांना संदेश गतीने सर्वत्र फिरवला गेला. लोकांना या संदेशाने दराबाबत जागृत राहण्याचे भान आले. कोणीही व्यापाऱ्यांना काजू विकण्यासाठी पुढे आले नाही. पर्यायाने व्यापाऱ्यांनी रिकाम्या हाती वजनकाटे गुंडाळून घरचा रस्ता धरला. आंदोलन तीव्र करण्यासाठी आंदोलकांकडून सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांना मतभेद बाजूला ठेवून या प्रश्नावर एकत्र येण्याचे अवाहन केले गेले. सोबतच तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्यासोबत काजू दरासंदर्भाने बैठक घेण्यासंदर्भात प्रयत्न सुरू झाले. 

सोशल मिडिया मदतीला

महामारीने माणसांमध्ये संशयीवृत्ती वाढली. परस्परांवरचा विश्वास संपवण्याचे काम केले. संचारबंदीचा फायदा घेऊन काजूचे पीक घेणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांना लुबाडण्याचा व्यापाऱ्यांचा कुटील डाव शेतकऱ्यांनीच हाणून पाडायचा याचा मात्र चंग बांधला गेला. नम्रता देसाई, विद्यानंद गावडे, मिथून परब, निखिल शिरुर, राम देसाई, रजत हुलजी, एम. के. पाटील, परसू गावडे, नरेंद्र पाटील, विवेक मनगुतकर, भरमू नांगणूरकर, विक्रांत नार्वेकर यांनी आपल्या फेसबुक पेजवरून, व्हाट्सअप मेसेंजरवरून काजू दराबाबत जागृतीचे काम जोरदार राबवले. प्रत्येकापर्यंत संदेश पाहोचवून या क्षणी केवळ काजू विकण्यापासून शेतकऱ्यांना थांबवणे हे ध्येय समोर ठेवले गेले. विद्यानंद गावडे, मिथून परब आणि एम. के. पाटील यांनी काजू आंदोलकांची भूमिका विस्ताराने लिहून पसरवायला सुरुवात केली. या मंडळींच्या मेसेजवरून आणि रवींद्र पाटील, राहूल पाटील, अनिल केसरकर यांनी अनुक्रमे मिडिया माध्यमातून सतर्कतेच्या बातम्या सर्वसामान्यांपर्यत पोहोचवल्या. कोणीच कोणाला भेटू शकत नसल्याच्या काळात माध्यमांचा वापर करून कल्पकतेने आंदोलन सुरू केले गेले.

आंदोलनाने शेतकऱ्यांच्यामध्ये आत्मविश्वास 

शेतकऱ्यांचा सहभाग वाढवला गेला. सोशल मिडियाचा आणि या माध्यवांवर वावरणाऱ्या तरुणांचा वापर करून हे आंदोलनाची तीव्रता वाढवत नेली गेली. शेतकऱ्यांनी या आंदोलनात स्वयंस्फुर्तीने भाग घेतला. चंदगड-गडहिंग्लजचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे सतीश सावंत, केडीसी बँकेचे संचालक संतोष पाटील आणि गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष जितेंद्र शिंदे यांनी आंदोलकांची भूमिका समजून घेतली आणि काजू दराबाबत लक्ष घातले. आंदोलनाला ताकद मिळाली. एकत्र येण्यालाच अटकाव असताना महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात झालेल्या या आंदोलनाकडे मात्र कोणाचे लक्ष गेले नाही. माध्यमांचे सारे लक्ष कोरोनावर केंद्रीत झालेले असल्याने या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही. परंतु, एकीचे बळ काय असते ते काजूदराच्या आंदोलनाने शेतकऱ्यांना दाखवून दिले. या आंदोलनाने शेतकऱ्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि जागृती आणण्याचे सर्वात महत्त्वाचे काम केले.

 शेतकरी सजग बनला

आंदोलकांनी काजू उत्पादनाचा खर्च आणि व्यापारी प्रत्यक्ष देऊ करत असलेला दर यातील तफावत अधोरेखित करत आंदोलकांनी शेतकऱ्यांची मर्जी संपादन केली. ‘धीर धरा’ हेच या आंदोलनाचे ब्रीद वाक्य बनले. ‘कोणत्याही परिस्थितीत काजू विकू नका’ हे वारंवार सांगून शेतकऱ्यांना काजू विकण्यापासून परावृत्त करणे हेच आंदोलकांचे मुख्य काम होते. शेतकऱ्याची इतर नाशवंत पिके आणि काजू यामध्ये मूलभूत फरक असल्याने हे शक्य झाले. कारण काजू न विकता साठवून ठेवल्याने वजनात होणारी किरकोळ घट वगळता कोणतेही नुकसान होत नाही. ती केवळ योग्य पद्धतीने सुकवून ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी शेतकऱ्यांनी झाडावर पिकलेली कोणती काजू तोडायची, ती कशी सुकवायची याबद्दल नवे ज्ञान देण्याचे धोरण आंदोलकांनी अवलंबले. त्याला योग्य प्रद्धतीने प्रतिसाद मिळत गेला. कधीही काजू साठवून न ठेवणारा शेतकरी सजग बनला. तो योग्य पद्धतीने प्रतिसाद देऊ लागला. काही काजूचे उत्पादक शेतकरी जमा झालेली काजू तात्कळ विकून आपला पावसाळ्‌यातील बाजार खरेदी करतात. घरात लग्न असेल तर लग्नाची खरेदी, गावची यात्रा याच दिवसांमध्ये असते. त्यासाठीचा सारा खर्च अशी अनेक गणिते काजूच्या पैशांवर घातलेली असतात. त्यामुळे काजू न विकता दर वाढेल याची वाट पाहणे सुरू असताना तात्काळ समोर आलेले खर्च भागवायच कसे? हाही महत्त्वाचा प्रश्न समोर आला.

 ‘आपण जिंकणार, केवळ धीर धरा’ 

आंदोलकांनी गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीला निवेदन देऊन दराबाबत लक्ष घालण्याचे निवेदन दिले. बाजार समिती आंदोलकांबरोबर व्यापाऱ्यांशी चर्चा करू लागली. वारंवार बैठका पार पडल्या. परंतु, आंदोलकांच्या रु. १२५ प्रती किलो दराच्या मागणीला व्यापारी दाद देईनात. त्यांचा थंडा प्रतिसाद बघून आंदोलन तीव्र करून त्यांंना काजूच मिळू न देण्याची व्यवस्था केली गेली. यासाठी ती व्यवस्थित वाळवून गोण्या भरून ठेवण्याचे आवाहन केले गेले. याच वेळी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथील शेतकऱ्यांकडून साठ रुपये प्रती किलो दराने काजू खरेदी सुरू झाली. आंदोलकांनी सीमे पलीकडे असलेल्या या तालुक्यातील शेतकऱ्यांनाही ‘धीर धरा’ हा संदेश दिला. त्यांनाही आंदोलनात सहभागी करून घेतले. किमान रु. १२० प्रती किलो दराशिवाय कोणत्याही परिस्थितीत विक्री करायची नाही ही भूमिका त्यांनी समजून सांगितली गेली. शेतकऱ्यांचा धीर खचू नये यासाठी त्यांना ‘आपण जिंकणार, केवळ धीर धरा’ हेच वारंवार सांगितले जात होते.

दर मिळवायचाच या भूमिकेवर सर्व ठाम 

२१ मे दरम्यान हा लढा योग्य वळणावर आला. सरकार दरबारी आंदोलकांची मागणी निवेदानातून गेली. त्यातही आंदोलकांकडून व्यापारीवर्गाला आवाहन केले गेले. त्यामध्ये, शासनाचे सारे प्रशासन कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात गुंतलेले असल्याने कृपा करून त्याचा गैरफायदा घेऊ नका. शेतकऱ्याच्या अगतिकतेचा अंत पाहू नका. शेतकऱ्यांना तुम्ही रु. १२५ चा दर द्या. पक्का माल थोड्या वाढीव दराने विका परंतु, शेतकऱ्याच्या घामाची योग्य किंमत करा असे अवाहन त्यांना केले. या आवाहनानंतर ३० मे रोजी काही व्यापारी नव्वद रुपये दराने काजू मागू लागले. पन्नासच्या खाली असलेला दर चाळीस रुपयाने वाढला. आंदोलनाला थोडे थोडे यश मिळू लागले. परंतु, अजून संयम सोडू नका. धीर धरा. दर  १२५ रुपये मिळणारच. आपण तो मिळवायचाच या भूमिकेवर सर्व ठाम राहिले.

गोडावून तारण कर्ज’ योजना 

काजू दराचे हे आंदोलन जून महिन्यात नव्या वळणावर आले. बळीराजा संघटनेकडून आमदार राजेश पाटील यांना निवेदन देऊन या मागणीत लक्ष घालण्याचे निवेदन दिले गेले. आमदार स्वत: आंदोलकांना जाऊन भेटले. त्यांनी भूमिका समजून घेऊन ते संचालक असलेल्या जिल्हा बँकेकडून काजू उत्पादकांना प्रथमच ‘गोडावून तारण कर्ज’ ही योजना मंजूर करून घेतली. काजूच्या घरी असलेल्या पिकावर बँकेकडून कमी व्याजाने शेतकऱ्याला पैसे उभे करण्याची व्यवस्था केली गेली. त्यामुळे शेतकरी अजून निर्धास्त झाला. त्याला पैशाची गरज पडल्यास काजू पड्या दरात विकायची गरज उरली नाही. त्यामुळे काजू आंदोलनाला नवी दिशा मिळाली. काजू उत्पादकांच्या बाबतीत अशी योजना प्रथमच आकाराला आली.

जंगमहट्टीतील गावकऱ्यांना दिला धीर

दरम्यान काजूचा दर रु. १०० वर पाहोचला. व्यापारी आता शंभर रुपयांने काजू जमा करण्याचा प्रस्ताव देऊ लागले. परंतु, आंदोलकांनी आपली दराची मागणी कायम ठेवली. त्यासाठी ७ जूनला एम. के. पाटील यांनी बळीराजा संघटनेची मागणी पुन्हा एकदा सविस्तर पणे मांडली. त्यामध्ये काजू साठवणूकीची आपल्याला सवय नाही, ती सवय करून घ्या, जोखीम पत्करा, इतर माल नाशवंत असतो तशी काजूची बी नाशवंत नाही, फक्त योग्य ती काळजी घ्या, आपण यापूर्वी एकशे साठ रुपये दर घेतलेला आहे. त्यामुळे किती तोटा सहन करायचा हे ठरवा असे पुन्हा पुन्हा शेतकऱ्यांच्या मनावर बिंबवले गेले. अशा पद्धतीच्या पोस्ट विद्यानंद गावडे, मिथून परब, नरेंद्र पाटील, परसू गावडे यांनीही प्रसारित करण्याचा सपाटा सुरूच ठेवला. आंदोलक प्रत्यक्ष काजू उत्पादकांच्या भेटी घेऊ लागले. जंगमहट्टीतील गावकऱ्यांना नितीन पाटील, परसू गावडे, एम. के. पाटील, निवृत्ती मसूरकर जाऊन धीर देऊन आले. 

उद्योगाला उत्तेजन देणाऱ्या मागण्या 

केडीसी बँकेने शेतकऱ्यांना गोडावून तारण कर्ज देऊ केल्यानंतर काजूचा दर जवळजवळ एकशे पाच रुपयांपर्यंत पोहोचला. दरम्यान, आंदोलकांच्यावतीने आमदार राजेश पाटील यांनी शासनाला नवे निवेदन दिले. त्यामध्ये आंदोलकांची भूमिका योग्य पद्धतीने सरकारकडे पोहोचली. त्यामध्ये काजूला  १४० ते १६० रुपये इतका हमीभाव मिळावा, परदेशातून येणारा बेचव आणि निकृष्ट दर्जाच्या काजूवर १५ टक्के आयात शुल्क आकारावा, महामारीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाच वर्षावरील प्रत्येक काजूच्या झाडाला २०००  रुपये इतके अनुदान द्यावे, काजू उद्योगाला अन्न प्रक्रिया उद्योगाचा दर्जा देऊन जीएसटी परतावा द्यावा, काजू कारखानदारी टिकण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर पाच टक्के सूट किंवा अनुदान द्यावे अशा या उद्योगाला उत्तेजन देणाऱ्या मागण्या त्यांनी केल्या आहेत. या मागणीनुसार आणि जिल्हा बँकेने सुरू केलेल्या कर्ज योजनेसाठी शेतकऱ्यांच्या सातबारावर काजू पीक नोंदवलेले असणे आवश्यक आहे. त्यासाठी नितीन पाटील यांनी मा. तहसीलदार यांना निवेदन देऊन संबंधितांकडून पिक पाहणी करून सातबाऱ्यावर तशी नोंद करण्याबाबतचे निवेदन दिले गेले. 

नव्या कर्ज योजना मंजूर झाल्या हे आंदोलनाचे मोठे यश

एकूणच या आंदोलनाने काजू पिकाबाबत शेतकऱ्यांमध्ये अनेक पातळ्यावर जागृती निर्माण केली. व्यापाऱ्यांप्रमाणे काजू बी साठवण्याचे प्रशिक्षण दिले. साठवणूकीची सवय करायला भाग पाडले. संयम शिकवला. त्यामुळे जाहीर केलेल्या प्रारंभीच्या दरापेक्षा दुप्पटीहून दर दिला जाऊ लागला. शेतकऱ्यांंनी अजून ८० टक्के काजू साठवून ठेवली आहे. तिला नक्कीच दिडशे रुपये प्रती किलो दर मिळेल अशी स्थिती आहे. शासनस्तरावर प्रथमच काजूबद्दलची जागृती आली. आंदोलकांच्या मागण्या कोविडच्या संकटानंतर नक्कीच मार्गी लागतील. तसा शासनाकडून शब्द मिळाला आहे. सातबारा नोंदीसह नव्या कर्ज योजना मंजूर झाल्या हे आंदोलनाचे मोठे यश आहे.  आंदोलनाने शेतकऱ्याला आपल्या पिकाबापत सजग बनवले आहे. नव्या पद्धतीने माल विकायला शिकवेल आहे. या आंदोलनाने शेतकऱ्यांमध्ये भरलेले बळ आणि आणलेली सजगता काजू पिकाच्या वाढीसाठी नक्कीच बलवर्धक ठरेल. शासनाचे अधिक पाठबळ आणि उत्तेजन मिळाल्यास आणि आंदोलकांनी सुचविलेल्या गोष्टी राबविल्यास हा तालुका काजू व्यवसायातील देशातील अग्रगण्य क्षेत्र म्हणून विकसित होईल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading