December 1, 2023
Home » करवंद अन्‌ नेर्ली यांची व्यावसायिक लागवडीसाठी प्रयत्नांची गरज
संशोधन आणि तंत्रज्ञान

करवंद अन्‌ नेर्ली यांची व्यावसायिक लागवडीसाठी प्रयत्नांची गरज

मुख्यतः घनदाट जंगलात आढळणाऱ्या या वनस्पतींकडे उत्पन्नाचा स्त्रोत या उद्देशाने कधी पाहीलेच गेले नाही. जंगलात आढळणाऱ्या अनेक औषधी वनस्पतींची लागवड व्यावसायिक दृष्ट्या केली जात आहे. तशी करवंद व नेर्ली यांचीही लागवड करता येणे शक्‍य आहे. अन्य फळझाडांप्रमाणे यांचेही उत्पादन घेता येणे शक्‍य आहे. पण यावर अधिक संशोधन आपल्याकडे झालेले नाही.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

सह्याद्री घाटमाथ्यावर करवंद आणि नेर्ली ही दोन्हीही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. करवंद हे झुडूप तर नेर्ली ही वेलीवर्गीय वनस्पती आहे. या दोन्हीही वनस्पतीवर फारसे संशोधन झाले नाही. यामुळे या दुर्लक्षित वनस्पतींकडे लक्ष वेधले जावे या उद्देशाने डॉ. राजाराम पाटील, संदीप पै, निलेश पवार, विनोद शिंपले, राकेश पाटील, मानसिंगराज निंबाळकर यांनी या वनस्पतीच्या फळांमध्ये असणाऱ्या रासायनिक घटक आणि खनिजांच्या गुणधर्माचा अभ्यास केला. या संदर्भातील त्यांचा शोधनिबंध आंतराराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित झाला आहे. 

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर करवंदाची करिसा करंदस तर नेर्लीची इलॅग्नस कन्फेर्टा या जाती आढळतात. तसे करवंदाच्या जाती या सर्वत्र पाहायला मिळतात पण नेर्लीच्या जाती सह्याद्री व्यतिरिक्त ईशान्य भारतात मेघालय, मिझोरम, त्रिपुरा या राज्यात आढळतात. 

फळ आणि बियातील घटक 

संशोधकांनी केलेल्या संशोधनात नेर्लीच्या फळामध्ये असकॉर्बिक ऍसिड अर्थात व्हिटॅमीन सीचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. नेर्लीच्या फळामध्ये व्हिटॅमिन सीचे 8.20 ते 8.30 मिलीग्रॅम प्रति 100 ग्रॅम इतके प्रमाण आहे. करवंद आणि नेर्लीच्या फळ आणि बियांमध्ये कॉपर, मॅग्नेनिज, फेरस, झिंक, कॅल्शियम, क्रोमियम, कोबॉल्ट, मॅग्नेशियम ही आठ मुलद्रव्ये आढळतात. यामध्ये मॅग्नेनिज आणि कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे. 

आढळणाऱ्या मुलद्रव्यांचे प्रमाण असे (मिलीगॅम प्रति किलो) 

कॅल्शियमनेर्ली फळ – 17.06, बिया – 28.60 करवंद फळ – 29.26 बिया -49.56 
 मॅग्नेशियमनेर्ली फळ – 1358, बिया – 140 करवंद फळ – 523 बिया – 407 
नेर्ली आणि करवंदामध्ये आढळणाऱ्या मुलद्रव्यांचे प्रमाण (मिलिग्रॅम प्रति किलो)

विष, रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता 

संशोधनामध्ये या दोन्ही फळामध्ये विषाचा तसेच रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता (ऍन्टिऑक्‍सिडन्ट ऍक्‍टिव्हिटी ) असल्याचे आढळले. शरीरातील चयापचय क्रियेमध्ये तयार होणारंया घातक घटकांचे विघटन करण्याची क्षमता या फळामध्ये आहे. यामुळे या फळांचे महत्त्व विचारात घेऊन याचा सखोल अभ्यास होण्याची गरज आहे. 

मुख्यतः घनदाट जंगलात आढळणाऱ्या या वनस्पतींकडे उत्पन्नाचा स्त्रोत या उद्देशाने कधी पाहीलेच गेले नाही. जंगलात आढळणाऱ्या अनेक औषधी वनस्पतींची लागवड व्यावसायिक दृष्ट्या केली जात आहे. तशी करवंद व नेर्ली यांचीही लागवड करता येणे शक्‍य आहे. अन्य फळझाडांप्रमाणे यांचेही उत्पादन घेता येणे शक्‍य आहे. पण यावर अधिक संशोधन आपल्याकडे झालेले नाही. फक्त या फळांपासून जाम, जेली, वाईन, सरबत, लोणची इत्यादी उपपदार्थांचे उत्पादन घेता येऊ शकते इतकेच प्रयोग झाले आहेत. याची उत्पादनेही घेतली जात आहेत पण डोंगराळ भागात लागवडीच्या संदर्भात प्रयोग कोठे पाहायला मिळत नाही. डोगंराळ भागात वस्ती करून राहणाऱ्या घटकास या प्रयोगाचा निश्‍चितच फायदा होईल व अशा पद्धतीचे संशोधन त्यांच्या आर्थिक विकासासाठी उपयुक्त ठरू शकेल. त्यांचे जीवनमान उंचावणारा हा प्रयोग ठरू शकेल.

Related posts

रामकंद छे ! हे तर…

पश्चिम घाटास भूस्खलनाचा वाढता धोका

चैतन्याचा झरा… साळुंखे सर !

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More